इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबई व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी (PAS) आयोजित आयसीटी मुंबई येथील दिनांक 22 मे ते 24 मे 2026 या दरम्यान 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता 7 वी तील 40 विद्यार्थी निवडण्यात आले होती .
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल विशद करताना प्रा. डॉ. पराग नेमाडे यांनी ICT या इन्स्टिट्यूटची स्थापना व याअंतर्गत असणाऱ्या 9 Under Graduate Courses संशोधन करणाऱ्या विभागांची माहिती दिली. यानंतर फिजिक्स या शाखेतील महत्त्वाच्या अशा नॅनो मटेरियल अँड रिसर्च लॅबोरेटरी मध्ये विविध प्रकारच्या मायक्रोस्कोप विशेषतः इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपबद्दल व त्यांच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली. Cutting Edge High End केमिकल इंजिनियरिंग इन्स्ट्रुमेंट लॅब्स (Cutting Edge High End Chemical Engineering Instrument Labs) यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (SEM), )ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (TEM), Ultracentrifuge, X- Ray Diffraction, Gas Chromatography, Mass Spectroscopy, HPLC इत्यादी उपकरणांची माहिती देण्यात आली. पदार्थाची चौथी अवस्था प्लाजमा (Plasma) याबद्दल विशेष असे मार्गदर्शन वरिष्ठ प्रा.डॉ. आर. आर. देशमुख (HOD Department of Physics ICT Mumbai) यांच्याकडून करण्यात आले. सरफेस कोटिंग प्रयोगशाळेतील मधील विविध उपकरणांची माहिती देण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना फूड्स आणि फार्मा विभागांची सफरही घडवण्यात आली. विद्यार्थ्यांनी अन्न प्रक्रिया आणि टॅब्लेट बनवण्यासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे, टॅब्लेटचे विश्लेषण याबद्दल माहिती घेतली.
दुसऱ्या दिवशी भाभा अनुसंधान संशोधन केंद्रातील जनरल मॅनेजर तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ माननीय श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांनी न्यूक्लिअर एनर्जी फॉर सोसायटी या विषयावर power point व्दारे बालवैज्ञानिकांना सखोल मार्गदर्शन केले. नवीकरणीय ऊर्जा अनुद्वारे कशा पद्धतीने मिळवता येते. तसेच बी ए आर सी (BARC) मध्ये होणारे संशोधन व त्यांनी जिनेव्हा व स्वित्झर्लंड येथे केलेल्या संशोधनाबद्दल तसेच करिअरबद्दल माहिती देण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची समर्पक अशी वैज्ञानिक उत्तरे मा. अनुपमा कुलकर्णी यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचे भूमिपुत्र वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. उदय अण्णापुरे (HOD Department of Food Engineering and Technology ICT Mumbai) यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी व्हावे. तेव्हाच तुमचा सर्वांगीण विकास होईल. तसेच फूड इंजीनियरिंग व टेक्नॉलॉजी यातील करियर बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. फूड्स विभागातील पीएचडी स्कॉलर्सनी अन्न भेसळ ओळखणे, पोषक तत्वांशिवाय अन्न अधिक चविष्ट बनवण्यासाठी नैसर्गिक स्वादांचा वापर यावर प्रात्यक्षिक आणि जनजागृती केली. यावेळी तरुण वैज्ञानिकांनी केमिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंट लॅबरोटरी अंतर्गत वेगवेगळ्या उपकरणांची माहिती दिली. अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी? यासंबंधी विविध प्रयोगाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर मा .डॉ. संदीप मोरे, (Assistant Professor Department of Textile Processing and Engineering ICT Mumbai) यांच्याकडून टेक्स्टाईल लॅबोरेटरी येथे विद्यार्थ्यांना ब्लॉक प्रिंटिंग व स्क्रीन प्रिंटिंग या कपड्यांवर करण्यात येणाऱ्या प्रोसेस बद्दल माहिती देण्यात आली व त्यांच्याकडून यासंबंधी प्रयोगही करून घेण्यात आले. आपल्या कपड्यांना रंग कसा देतात हे यावेळी विद्यार्थ्यांना समजले. डाईस डिपार्टमेंट (Department of Speciality Chemicals ICT Mumbai) मध्ये वेगवेगळ्या रंगांबद्दल तसेच रंग कसे तयार करतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. वेगवेगळ्या फ्लेवर्सबद्दल ते नैसर्गिक असो व कृत्रिम ते कशा पद्धतीने तयार करतात व ते कसे ओळखावे याबद्दल तरुण महिला शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे सखोल माहिती दिली. फार्मासिटिकल तथा औषधनिर्माण विभागांमध्ये औषधांची निर्मिती तसेच औषध तयार करताना कोणकोणत्या रासायनिक क्रिया करतात व टॅबलेट व कॅप्सूल तयार करताना औषधातील घटकांचे वजनानुसार एकत्रीकरण याबद्दल सखोल अशी मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी टिंकर लॅब मध्ये मुलांचे आवडते कार्टून आयर्न मॅन , बॅटमॅन इत्यादींचे कपड्यावर थ्रीडी प्रिंटिंग कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व लेझर च्या साह्याने वस्तूंचे कशा पद्धतीने तुकडे केले जातात यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमधील काही प्रयोग केले, जसे की नॉन-न्यूटनियन द्रव: हा एक विशेष द्रव आहे, जो जोरात मारल्यास लवचिक घन पदार्थाप्रमाणे वागतो आणि दूर ढकलतो, तर त्यावर हलकेच वजन ठेवल्यास तो बुडतो. तसेच, अशा द्रवांचा उपयोग पेंट्स, दलदलीची वाळू (राटीची दलदल) यांमध्ये होतो. अंडरडॅम्पड आणि ओव्हरडॅम्पड प्रणाली कोणत्याही प्रक्रियेच्या नियंत्रण प्रणालीमध्ये उपयुक्त ठरतात, जसे की गीझरमधील तापमान नियंत्रण, कारमधील क्रूझ कंट्रोल, टाकीमधील पातळी नियंत्रण इत्यादी. विद्यार्थ्यांनी केलेला आणखी एक प्रयोग फ्लुइडायझेशनवर होता, ज्यामध्ये घन पदार्थाच्या स्तंभाला उकळत्या द्रवाप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाऊ शकते. या प्रयोगाचा उपयोग क्रूड ऑइलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लुइड कॅटॅलिटिक क्रॅकिंगमध्ये होतो. तसेच विद्यार्थ्यांनी ‘एलिफंट्स टूथपेस्ट’च्या प्रयोगाद्वारे उत्प्रेरणाचे (कॅटॅलिसिसचे) ‘वॉव सायन्स’ प्रात्यक्षिक पाहिले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात इस्रो मधील निवृत्त शास्त्रज्ञ श्री अरविंद कोलगे सर यांनी फिजिक्स विषयातील ऑफ ऑप्टिक्स तथा प्रकाशशास्त्र या विषयातील प्रकाशाच्या विविध प्रयोगांची मांडणी करून ते प्रत्यक्ष करून दाखवले. यानंतर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी आयसीटी चे कुलगुरू विज्ञानश्री प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित सर हे अध्यक्ष म्हणून लाभले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधन म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर ‘का?’ आणि ‘कसे?’ यांचा शोध याबरोबरच नाविन्य (Innovation) यासाठी “असेच का?” याचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा संबंधीचे प्रश्न पडले पाहिजेत तेव्हा वैज्ञानिक घडतो. त्याचबरोबर सदर उपक्रमाची त्यांनी स्तुती केली आणि आयसीटीची दरवाजे सर्वांसाठी उघडी आहेत अशी सूचक सूचना सभागृहातील सर्वांना करून सर्वांचे त्यांनी कौतुक केले. तसेच आयसीटीच्या एकूण कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 3 दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या विविध विभागात भेटीअंतर्गत आत्मसात केलेल्या ज्ञानार्जनाच्या आधारे 20 गुणांची एक परीक्षा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्राविण्य मिळवले, विशेष अशा श्रेणी देण्यात आल्या व त्या आधारे त्यांचे कुलगुरूंचे हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे उपक्रम विज्ञानवारी, आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी व एकूण उपक्रमांविषयी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाल वैज्ञानिकांना आयसीटी मुंबई बघण्याची अनुभव घेण्याचा संधी दिल्याबद्दल आय सी टी चे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय काटकर (आयएएस) मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमीटेड यांची विशेष उपस्थिती होती. श्री संजय काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘तुम्हा सर्व मुलांना या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यामागे अनेक अदृश्य हात आहेत. याची जाण सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावी व भविष्यात देखील तुमच्याकडून अशाच प्रकारचे समाज प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.’ असे प्रतिपादन केले व यासाठी माझी सर्व प्रकारे मदत तुम्हाला मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच स्वीय सहायक तथा विशेष कार्यकारी अधिकारी नानासाहेब कदम यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांपैकी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी सना शेख हिने आयसीटी इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या विभागातील संशोधन एवढ्या कमी वयात आम्हाला पाहता आले याबद्दल आनंद व्यक्त केला. तनिष्का लाड हिने आयसीटीच्या विविध विभागातील संशोधकांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आदित्य गवळी याने ‘”मुंबई के आकाश मे सितारे दिखे या ना दिखे लेकिन आयसीटी मे सितारे जरूर दिखेंगे.” अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ अनंत लाड यांनी केले व आभार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रणजीत लाड यांनी मांडले. ICT Mumbai वतीने समन्वयक (Convenor) म्हणून प्रा. डॉ. पराग नेमाडे (Associate Professor Department of Chemical Engineering and Technology ICT Mumbai) यांनी विशेषत्वे जबाबदारी पार पाडली. या 3 दिवसीय कार्यशाळेच्या प्रवास, निवास, भोजन तसेच एकूणच नियोजनामध्ये विशेष करून प्रशांत मुंढे (Research Associate and Admission Course Counsellor ICT Jalna, समन्वयक मराठी विद्यान परिषद परभणी, कार्यकरी सदस्य विज्ञान भारती), ICT मुंबईचे माजी विद्यार्थी प्रताप भोसले (MTech), ICT MUMBAI समुद्रशास्त्र (Oceanography) संशोधक अमर कच्छवे, पीएचडी स्कॉलर ऋषिकेश पांचाळ व पवन कदम, इंटर्न स्कॉलर्स पार्थ कायंदे व भूमी मांडलोई यांनी परिश्रम घेतले. या एकूणच कार्यशाळा सहलीच्या यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर, सहसचिव प्रसाद वाघमारे, भौतिकशास्त्र संशोधक डॉ विजयकिरण नरवाडे, विज्ञान प्रयोगशील शिक्षक अशोक लाड, दीपक शिंदे, नागेश वाईकर, विठ्ठल गवळी, चंद्रकांत कावरगे तसेच व्यावसायिक दत्ताभाऊ बनसोडे, गजानन चापके, छायाचित्रकार सुरेश कुऱ्हाडकर, विजय टेकाळे, सौ शितल नाईक, सौ मधुरा कच्छवे, सौ सुषमा वाईकर यांनी परिश्रम घेतले.
परभणी : विज्ञान चौक , वसमत रोड ,परभणी येथे परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी मार्फत महान शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी सोसायटीचे सदस्य डॉ विजयकिरण नरवाडे , सहा प्राध्यापक , यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . ते म्हणाले, श्री सत्येंद्रनाथ बोस हे एक महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते . ते त्यांच्या क्वांटम मेकॅनिक्स मधील कार्यासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत . त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन सोबत काम केले असून बोस आईन्स्टाईन सांख्यिकी सिद्धांत आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेन्ट सिद्धांत मांडले . ज्यामधून अनुक्रमे पदार्थाचे मुलभुत कण बोसान व पदार्थाच्या पाचव्या अवस्थे बद्दल सैद्धांतिक पाया घालण्यात आला . त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते . या प्रसंगी डॉ शेळके , स्त्री रोग तज्ञ ,श्री सुनील रायठठ्ठा उद्योगपती ,जालना, सुरेश केसापुरीकर ,गजानन सायखेडकर , विलास दहिभाते, चंद्रशेखर आलनुरे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक , इतर सदस्य व विज्ञान प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . सर्व उपस्थितितांचे आभार सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी मानले .
शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंददायी शनिवार उपक्रम, टेलिस्कोप प्रशिक्षण कार्यशाळा आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळा नियोजन याबाबत रूपरेषा या दोन दिवसीय कार्यशाळेत सादर करण्यात आले. यावेळी जिल्ह्याभरातून जवळपास ६५० हून अधिक शिक्षक उपस्थित होते.
पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ भगवान आसेवार संचालक शिक्षण व वनामकृवि परभणी यांनी केले. यावेळी परभणी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ ए एल शेळके त्यांची विशेष उपस्थिती होती. उद्घाटनाच्या सत्रात डॉ आसेवर प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना संबोधित करताना म्हणाले कीआज येथे उपस्थित असलेले शिक्षक हे ज्ञानाचा स्त्रोत आहेत आणि उद्या घडणाऱ्या शास्त्रज्ञांचे शिल्पकार आहेत. जिल्हा परिषद आणि परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेने दिलेले हे व्यासपीठ परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल, याची मला खात्री आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ शेळके म्हणाले की, मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षक यांचा अतिशय मोलाचा वाटा असतो. राज्य समूपदेशक श्री बालासाहेब कच्छवे यांनी आनंददायी शनिवार व मेंदूची व्यायामशाळा यावर मार्गदर्शन केले.
सामाजिक बांधिलकीतून सुहाना प्रवीण मसाले व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत फिरती विज्ञान प्रयोगशाळा पूर्ण जिल्हाभर वेगळ्या शाळांमध्ये नेण्यात येत आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती शिक्षकांना फिरती विज्ञान प्रयोगशाळा समन्वयक प्रकाश केंद्रेकर यांनी दिली व त्यांच्या शाळेपर्यंत ती कशी पोहोचेल याबाबत चर्चा झाली. या सर्व चर्चेला शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानवारी परीक्षेची माहिती विज्ञानवारी परीक्षा समन्वयक प्रसाद वाघमारे यांनी दिली. ही परीक्षा आपल्या शाळेत घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद शिक्षकांचा मिळाला. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी टेलिस्कोप प्रशिक्षणाच्या अगोदर ऑप्टिक्स या पदार्थ विज्ञानाच्या शाखेबद्दल व प्रकाशाच्या विविध घटकांबद्दल प्रताप भोसले यांनी मूलभूत घटकांची माहिती दिली. यानंतर टेलिस्कोप कसा हाताळावा? तसेच टेलिस्कोप किती प्रकारचे आहेत? टेलिस्कोप वापरताना घ्यावयाची काळजी, यासंबंधी सखोल असे मार्गदर्शन दृकश्राव्य माध्यमाद्वारे परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी केले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात शिक्षकांची प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी दत्ता बनसोडे व अशोक लाड यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार दीपक शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ पी आर पाटील, डॉ अनंत बडगुजर, डॉ रणजीत लाड, डॉ बाहुबली निंबाळकर, लक्ष्मण सोनवणे, अमोल कदम, पूजा कासार, मोहिनी कच्छवे, सचिन सिसोदे, माजिद भाई इत्यादींनी तथा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या टीमने परिश्रम घेतले.
निसर्गातील सर्वात विलोभणीय घटना म्हणजे ग्रहण.हे औचित्य साधून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण निरीक्षण आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसापासून परभणीत ढगाळ वातावरण होते. ग्रहणाच्या वेळी मात्र निसर्गाने परभणीकरांना पूर्ण साथ दिली. चंद्रग्रहण चांगल्या पद्धतीने व अतिशय सुंदर अशा वातावरणात पाहता आले
राष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या प्रांगणात निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पालक विविध क्षेत्रातील मान्यवर व खगोल प्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. सुमारे 450 खगोल प्रेमींनी यावेळी चंद्रग्रहणाचे निरीक्षण करून ग्रहणाचा आनंद लुटला. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्वप्रथम परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी आकाश निरीक्षण कसे करावे तसेच त्यावेळी आकाशात असलेल्या नक्षत्रांची माहिती दिली. त्यानंतर खगोल अभ्यासक नागेश वाईकर यांनी चंद्रग्रहण यासंबंधी अंधश्रद्धा व ग्रहणामागील विज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. याचा मानवी जीवनावर कोणतीही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही त्यामुळे सर्वांनी चंद्रग्रहण पाहण्यास काहीच हरकत नाही असे स्पष्ट केले.
चंद्रग्रहणाच्या तीन प्रकारांपैकी खग्रास प्रकारातले चंद्रग्रहण परभणीत दिसले. रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ झाला. 11 ते 12:23 या वेळेत चंद्रबिंब पृथ्वीच्या संपूर्ण छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन झाले. यावेळी लालसर तपकिरी रंगाचा चंद्र यावेळी सर्वांना पाहता आला. रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ झाला व उत्तर रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटले. या चंद्रग्रहणाचा स्पर्श उत्तर दिशेकडून झाला व मोक्ष दक्षिण दिशेकडून झाला. या चंद्रग्रहणाच्या सर्व निरीक्षणांच्या नोंदी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे घेण्यात आल्या. सर्वांनी उघड्या डोळ्यांनी तसेच दुर्बिणींद्वारे चंद्रग्रहण निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी विविध प्रकारच्या दुर्बिणी ग्रहण निरीक्षणासाठी लावण्यात आलेल्या होत्या. यावेळी प्रसाद वाघमारे, ओम शेठ तलरेजा, प्रताप भोसले, डॉ अनंत लाड, दत्ता बनसोडे, अशोक लाड, पार्थ दराडे, सुरेश कुराडकर, दीपक शिंदे, संतोष देवडे, लक्ष्मण सोनवणे, गजानन चापके, भागवत कचवे यांनी दुर्बिणीतून तसेच या चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर करून सर्वांना चंद्रग्रहण निरीक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
ग्रहणादरम्यान दूध फराळ खाऊन ग्रहणकाळात काही खाऊ नये या अंधश्रद्धेला छेद देऊन जनमानसात एक मोठा वैज्ञानिक संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
आज ७ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण ही खगोलीय घटना घडणार आहे. या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे रविवारी रात्री ९ वाजता केले आहे. यावेळेला टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण आपल्याला पाहता येईल.
आज रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११-०० ते १२-२३ संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२-२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल.
तरी या खगोल निरीक्षणाचा आनंद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.
स्थळ:- आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे, परभणी संपर्क: 9403061572, 99211 44842, 9405919184, 9028817712
फिरती विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केले. तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती माथुर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मुंडे, बाल संशोधक कु.पुजा वायाळ यांची उपस्थिती होती. कु. पूजा हिने “ संसाधनाची कमतरता नसून विचाराची गरज आहे “ अशी प्रतिक्रिया दिली. प्रविन मसालेवाला ट्रस्ट पुणे व परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दैठणा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेची माहिती घेतली. दैठणा जि.प. माध्यमिक शाळेच्या सुसज्य प्रयोग शाळेत फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेतून, विज्ञानसंवादकानी श्रीमती माथुर यांना विविध प्रयोगांचे सादरीकरण करुन दाखवले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे श्रीमती माथुर यांनी कौतुक केले. परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील, सुधीर सोनुनकर, प्रकाश केंद्रेकर, सुभाष जाधव, प्रताप भोसले, डॉ रणजित लाड, अशोक लाड, अमर कच्छवे, रामभाऊ कच्छवे, बाळासाहेब कच्छवे, उपसरपंच अभय कच्छवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश कच्छवे, दत्तराव कच्छवे, भरत कच्छवे ,मुख्याध्यापक अर्जुन कच्छवे, धनजय कच्छवे, हनुमान कच्छवे व ग्रामस्थांची उपस्थिती होती. या प्रसंगी ग्रामस्थानी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.