+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
परभणीत १५ वे ‘खगोल अभ्यासक संमेलन’ होणार

परभणीत १५ वे ‘खगोल अभ्यासक संमेलन’ होणार

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन

परभणी : सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने परभणीतील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे १३ व १५ डिसेंबर दरम्यान १५ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नांदेडच्या मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे सचिव श्रीनिवास औंधकर व परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली.
या संदर्भात परभणीत सोमवारी (दि.१९) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.पी.आर.पाटील, सचिव सुधीर सोनूनकर, दत्तात्रय बनसोडे, महेश कांकरिया यांची उपस्थिती होती.
या संमेलनाचे आयोजन खगोल अभ्यासक मंडळ नांदेड, एस्ट्रोनॉमिकल सोसायटी परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय संमेलनाचे उद्‍घाटन ११ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मनी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ दा.कृ.सोमण हे राहणार असून पद्मश्री दादा लाड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
दिनांक १३ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता समारोप होईल. यावेळी परभणीचे सुपुत्र व अंतराळ शास्त्रज्ञ मयुर महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक ११ ते १३ डिसेंबर या नियोजित तारखांना विशेष खगोलीय घटना निरीक्षणाची विशेष संधी खगोल अभ्यासकांना मिळणार आहे.
संमेलनाच्या पहिल्याच रात्री पश्चिम आकाशात बीजेची चंद्रकोर दिसणार असल्याने चंद्राचे अभ्यासपूर्ण निरीक्षणाची संधी तर आहेच, पण १३ डिसेंबरच्या रात्री आकाशात मिथुन राशीतील उल्का वर्षाव तसेच शनी व गुरु, ग्रहाचे दुर्बिणीद्वारे तज्ञांच्या मार्गदर्शनात निरीक्षण करता येणार आहे.
सहभागी खगोल अभ्यासकांना संमेलना दरम्यान तज्ञांच्या व्याख्यानां सोबतच संमेलनाच्या पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठातील विविध प्रगतशील विभागांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
या समेलनांमध्ये महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेले मान्यवर खगोल शास्त्रज्ञ, तज्ञ यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत. त्यात मुख्यत्वे दा. कृ. सोमण (खगोल मंडळ ठाणे), डॉ. मयूर महाजन (अंतराळ शाखज्ञ), एल. के. कुलकर्णी (नांदेड), श्री. हेमंत मोने (आकाशमित्र कल्याण), श्रीनिवास औंधकर (एमजीएमयु विज्ञान केंद्र- छत्रपती संभाजीनगर), डॉ. एम. के. पाटील (नांदेड विद्यापीठ), सुरेश चोपणे (स्काय वॉच संस्था-चंद्रपूर), डॉ. रामेश्वर नाईक (परभणी अॅस्ट्रॉनॉमीकल सोसायटी, परभणी), सुधीर फाकटकर (जीएमआरटी खोडद, नारायणगाव), सचिन मालेगावकर (हौशी खगोल पर्यावरण मंडळ नाशिक), विलास रवडे (हॅम रेडिओ तज्ञ-पुणे), संजय पुजारी (कराड), नंदकुमार कासार (पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, चिंचवड), (रवागिरी) अरुण डोळके (कुतूहल, नागपूर) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

संमेलनात विशेषतः उपग्रहाद्वारे प्राप्त अद्ययावत खगोलीय माहितीचे विश्लेषण कसे करावे, भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’, चालू खगोलीय घडामोडी, खगोलशाखातील आगामी आव्हाने व संधी, स्पेस वेदर (पृथ्वीवरील सध्याच्या एन निजओ परिस्थितीला सूर्य नियंत्रित करतो), सर्वांसाठी खगोलशास्त्र, रेडीओ खगोलशास्त्र, खगोलीय दुर्बिणीची तांत्रिक माहिती, रात्रीचे आकाश दर्शन, उल्कावर्षाव निरीक्षण, हाणले लद्दाख येथील डार्क स्कायचा थरारक अनुभव इत्यादी विषय चर्चेले जाणार आहेत. सर्व खगोलशास्त्रीय संकल्पनांवर तज्ञ अभ्यासकांसोबत सर्व सहभागी सदस्यांना विचार मांडण्याची संधी मिळणार असून यातून राज्यस्तरीय खगोलीय विचार मंथन घडणार आाहे.
दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, भूगोलकोशकार आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक लक्ष्मीकांत केशवराव कुलकर्णी (एल के कुलकर्णी) यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकूलात इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीतील , मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकूलात इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीतील , मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

दिनांक 17 जून 2026

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबई आणि परभणी ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ( PAS पास) मार्फत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .

याप्रसंगी विविध शाळांमधून जवळपास 400 विद्यार्थी , पालक, वनामकृवि मधील प्राध्यापक , विविध क्षेत्रातील मान्यवर इ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
या प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या उपक्रमाबाबत आयसीटी मुंबई व पास चे कौतुक करून मूलभूत विज्ञान क्षेत्रात काम होणे काळाची गरज असून विद्यार्थी व पालक यांनी या क्षेत्राकडे वळावे असे आवाहन केले . या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ संदीप मोरे , शास्त्रज्ञ , आय सी टी मुंबई यांनी आपल्या व्याख्यानात आयसीटी चे कार्य ,विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्या सोबत यशस्वी उद्योजक निर्माण करण्यात आयसीटीची भूमिका, आयसीटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ची प्रक्रिया , उद्योग उभारणी मध्ये आसीटी ची भूमिका इ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .ते म्हणाले सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी ) मध्ये आयसीटी चे योगदान सात टक्के असून आपल्या देशातील बहुतांश यशस्वी उद्योगपती हे आयसीटी मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले असल्याचे नमूद केले .

PAS पास मार्फत आसीटी मुंबई येथे आयोजित विज्ञान वारी मुळे आजचे व्याख्यान शक्य झाल्याचे नमूद करून या विज्ञानवारी अंतर्गत आयसीटी मुंबई येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा यावर्षीचा हा PAS पास व आसीटी चा संयुक्त उपक्रम यापुढे दरवर्षी नियमीतपणे राबवण्याचा निर्णय आयसीटी मुंबई प्रशासनाने घेतला असल्याचे जाहीर केले व याउपक्रमास शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ खंदारे, प्राचार्य उद्यानविद्या महाविद्यालय वनामकृवि यांनी प्रस्तुत उपक्रम विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक PAS पास चे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी केले ,आभार अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिव श्री सुधीर सोनुनकर यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पास टीमने परिश्रम घेतले . या प्रसंगी श्री खाडे सर , श्री घारे सर, मॅडम, डॉ अनंत लाड , श्री सोनकांबळे सर, श्री पटाईत , डॉ दोडके , डॉ गट्टी, कु पूजा वायाळ, आणि तिचे गाईड , व संपूर्ण PAS टीम उपस्थित होती .
या कार्यक्रमाचे प्रसंगी कु पुजा वायाळ या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने बनवलेल्या रॉकेटचे लाँचिंग करण्यात आले. तीची नासा करिता निवड झाली असून PAS मार्फत सन्मानपत्र देऊन तीचा यथोचित गौरव करण्यात आला .

थोर भारतीय शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांची जयंती उत्साहात साजरी

थोर भारतीय शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांची जयंती उत्साहात साजरी

परभणी : विज्ञान चौक , वसमत रोड ,परभणी येथे परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी मार्फत महान शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी सोसायटीचे सदस्य डॉ विजयकिरण नरवाडे , सहा प्राध्यापक , यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . ते म्हणाले, श्री सत्येंद्रनाथ बोस हे एक महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते . ते त्यांच्या क्वांटम मेकॅनिक्स मधील कार्यासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत . त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन सोबत काम केले असून बोस आईन्स्टाईन सांख्यिकी सिद्धांत आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेन्ट सिद्धांत मांडले . ज्यामधून अनुक्रमे पदार्थाचे मुलभुत कण बोसान व पदार्थाच्या पाचव्या अवस्थे बद्दल सैद्धांतिक पाया घालण्यात आला . त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते .
या प्रसंगी डॉ शेळके , स्त्री रोग तज्ञ ,श्री सुनील रायठठ्ठा उद्योगपती ,जालना, सुरेश केसापुरीकर ,गजानन सायखेडकर , विलास दहिभाते, चंद्रशेखर आलनुरे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक , इतर सदस्य व विज्ञान प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . सर्व उपस्थितितांचे आभार सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी मानले .

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

स्थळ:- आचार्य ग्लोबल अकॅडमी
दत्तधाम परिसर, परभणी.

दि. 15/09/2025 व 16/09/25

सुहाना प्रवीण मसाले फिरती विज्ञान प्रयोगशाळा व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीतील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन फिरती प्रयोग शाळेच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना शाळेत स्वतः विज्ञान विषयातील जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांचे प्रयोग दाखवण्याचे कार्य या विज्ञान वारी व फिरती प्रयोगशाळा यांच्या मार्फत करण्यात आली आहेत.
याच प्रकारचे दोन दिवशीय प्रात्यक्षिके परभणी शहरातील आचार्य ग्लोबल अकॅडमी, दत्तधाम परिसर, परभणी. या शाळेत दाखवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले व त्यांना नवचैतन्य मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल जागृत करण्यासाठी या फिरत्या प्रयोगशाळेचे खूप मोठे योगदान व मोलाचा वाटा असल्याचे यातून दिसून आले. अंतराळात असणाऱ्या अनेक घटकांचे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल असते या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत अंतराळ व खगोलशास्त्र यांच्या विषयीची जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात वाढवण्याचे कार्य विविध व्हिडिओ च्या माध्यमातून करण्याचे कार्य या फिरत्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात आले आहे.यामध्ये परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक सर, उपाध्यक्ष श्री पि. आर. पाटील सर , मुख्य समन्वयक श्री केंद्रेकर सर मुख्य संयोजक श्री सुधीर सोनूनकर सर, यांच्या नेतृत्वाखाली
आणि विज्ञान संवादक म्हणून श्री लक्ष्मण सोनवणे सर ,श्री अमोल कदम सर , सौ. मोहिनी कच्छवे मॅडम,सौ. पूजा कासार मॅडम व चालक श्री. सचिन शिसोदे यांच्या सहकार्यातून करण्यात आले..

प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक सर यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सरांनी विज्ञान केवळ पुस्तकातील विषय नसून प्रत्यक्ष प्रयोग करणे व विज्ञानातील विविध संकल्पना शिकणे. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी धडपड केली पाहिजे. त्याशिवाय, विज्ञान विषय व त्यातील रस वाढणे शक्य नसते. नवीन गोष्टींना अजून नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करणे हाच विज्ञानाचा खरा अर्थ ठरतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी हितगुज सरांनी केले.

अध्यक्षीय समारोप

संस्थेचे सचिव मुख्याध्यापक श्री मनोहर सुर्वे सर यांनी नमूद केले की, विद्यार्थी केवळ पुस्तक ग्राही नसून तो प्रयोगशील असला पाहिजे. यासाठी आम्ही आतापर्यंत खूप सारे प्रयोगशील उपक्रमही राबवले आहेत. त्यात सुहाना मसाले व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारी फिरती प्रयोगशाळा यांचा प्रयोगशील उपक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले व त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचे काम या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत होत आहे. यामुळे अशा विविध प्रयोगशील उपक्रमात आम्ही नेहमी आपली साथ देऊ व विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रदान करण्याचे कार्य करत राहू ग्वाही दिली.

आभार
संस्थेचे संचालक श्री बालाजी सुर्वे सर यांनी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व यामध्ये सहभागी असणारे सर्व प्रयोगशील शिक्षक वृंद यांचे आचार्य ग्लोबल अकॅडमी तील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या वतीने कौतुक पर शब्दात आभार मानले.

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

स्थळ- जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी

दिनांक- १२ ऑगस्ट २०२५

प्रवीण मसालेवाले पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरती विज्ञान प्रयोगशाळा , या उपक्रमाचा समारोप आज दि .12/09/2025 रोजी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मागील पाच दिवसांत शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांवरील प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच अंतराळ व खगोलशास्त्र विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविण्यात आली. या उपक्रमाचा लाभ तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी भूषविले.समारोप कार्यक्रमासाठी परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. प्रसाद वाघमारे व श्री लक्ष्मण सोनवणे, श्री अमोल कदम, सौ कच्छवे, सौ कासार, श्री सचिन शिसोदे हे सर्व विज्ञान संवादक सहकारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे मुख्यसंयोजक श्री सुधीर सोनूनकर , तसेच मुख्य समन्वयक श्री प्रकाश केंद्रेकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते

🎙️ प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
डॉ. रामेश्वर नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“ विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास फक्त पुस्तकापुरता न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांमधून अनुभवावा. या प्रयोगशाळेमुळे त्यांच्या जिज्ञासेला नवे पंख मिळतील. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूनच आपण प्रगतिशील समाज घडवू शकतो.”

🎙️ अध्यक्षांचे समारोप
अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,
“ आमच्या संस्थेचे ध्येय केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रयोगशीलतेवर भर देणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातात आणि समाजपरिवर्तनासाठी सक्षम होतात. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यार्थ्यांना अशा विज्ञानविषयक संधी सातत्याने उपलब्ध करून देत राहील .”

शेवटी आभारप्रदर्शन करताना आयोजकांनी या पाच दिवसीय उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकवर्गाचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!

विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.

विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.

फिरत्या प्रयोगशाळेची रचना

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी लाभ

 फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.

याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.

प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.

या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.