+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


परभणी | १४ सप्टे २०२६


आज संध्याकाळी खगोलप्रेमींसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक खगोलीय घटना घडली. १४ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्र आणि शुक्राचा ‘लपंडाव’ म्हणजेच चंद्राने केलेलं शुक्राचं पिधान (Lunar Occultation) परभणीतून अत्यंत स्पष्टपणे अनुभवायला मिळाले. चंद्र आणि शुक्राचे हे पिधान परभणीतून अतिशय विलोभनीय दिसलेले आहे, यामुळे स्थानिक खगोल अभ्यासक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

सोमवारी संध्याकाळी साधारण ४:४५ वाजता शुक्र चंद्राच्या अतिशय जवळ आला. त्यानंतर बरोबर ५:०० वाजता शुक्र चंद्राच्या अप्रकाशित (अंधाऱ्या) भागामागे लपला (अदृश्य झाला) आणि साधारण ६:१५ वाजता तो चंद्राच्या प्रकाशित भागाच्या पलीकडून पुन्हा बाहेर आला.
सध्या शुक्र पृथ्वीच्या जवळ असून कोरीच्या (Crescent) रूपात आहे. तो केवळ २९% प्रकाशित असला तरी अत्यंत तेजस्वी आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या निळ्या आकाशातही एक चमकता बिंदू म्हणून तो सहजपणे पाहता आला.
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे खगोलप्रेमींनी सावलीतून किंवा सूर्यप्रकाश टाळून बायनॅक्युलरच्या (दुर्बिणीच्या) मदतीने या विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला.
चंद्र आणि शुक्राच्या या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या दृश्याने परभणीच्या आकाशप्रेमींना एक अनोखी मेजवानी दिली आहे.