आज संध्याकाळी खगोलप्रेमींसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक खगोलीय घटना घडली. १४ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्र आणि शुक्राचा ‘लपंडाव’ म्हणजेच चंद्राने केलेलं शुक्राचं पिधान (Lunar Occultation) परभणीतून अत्यंत स्पष्टपणे अनुभवायला मिळाले. चंद्र आणि शुक्राचे हे पिधान परभणीतून अतिशय विलोभनीय दिसलेले आहे, यामुळे स्थानिक खगोल अभ्यासक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
सोमवारी संध्याकाळी साधारण ४:४५ वाजता शुक्र चंद्राच्या अतिशय जवळ आला. त्यानंतर बरोबर ५:०० वाजता शुक्र चंद्राच्या अप्रकाशित (अंधाऱ्या) भागामागे लपला (अदृश्य झाला) आणि साधारण ६:१५ वाजता तो चंद्राच्या प्रकाशित भागाच्या पलीकडून पुन्हा बाहेर आला. सध्या शुक्र पृथ्वीच्या जवळ असून कोरीच्या (Crescent) रूपात आहे. तो केवळ २९% प्रकाशित असला तरी अत्यंत तेजस्वी आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या निळ्या आकाशातही एक चमकता बिंदू म्हणून तो सहजपणे पाहता आला. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे खगोलप्रेमींनी सावलीतून किंवा सूर्यप्रकाश टाळून बायनॅक्युलरच्या (दुर्बिणीच्या) मदतीने या विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला. चंद्र आणि शुक्राच्या या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या दृश्याने परभणीच्या आकाशप्रेमींना एक अनोखी मेजवानी दिली आहे.
आनंद माध्यमिक शाळा, खानापूर येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळेची भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी Physics, Chemistry आणि Biology विषयांतील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक व सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून पाहत कृतीतून विज्ञान शिकण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व कुतूहलपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला. या उपक्रमासाठी सुहाना प्रयोगशाळा, पुणे मसालेवाले ट्रस्ट आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचे विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले…..
🔬✨ दिनांक :- 8-9-2026 ACME, English School, परभणी ✨🔬
ACME High English School, परभणी येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. विज्ञानातील संकल्पना केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष प्रयोगातून अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रयोग समजून घेतले व विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. 🧪⚗️🔭 विद्यार्थी व शिक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग यामुळे ही प्रयोगशाळा भेट अत्यंत आनंददायी व ज्ञानवर्धक ठरली व त्या निमित्त शाळेच्या मुख्याधपिका यांनी सुहाना फिरती प्रयोग शाळेचे आभार व्यक्त केले… 🌟 विज्ञान शिकूया… प्रयोगातून अनुभवूया! 🔬
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबई आणि परभणी ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ( PAS पास) मार्फत आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मूलभूत विज्ञानातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .
याप्रसंगी विविध शाळांमधून जवळपास 400 विद्यार्थी , पालक, वनामकृवि मधील प्राध्यापक , विविध क्षेत्रातील मान्यवर इ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . या प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या उपक्रमाबाबत आयसीटी मुंबई व पास चे कौतुक करून मूलभूत विज्ञान क्षेत्रात काम होणे काळाची गरज असून विद्यार्थी व पालक यांनी या क्षेत्राकडे वळावे असे आवाहन केले . या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ संदीप मोरे , शास्त्रज्ञ , आय सी टी मुंबई यांनी आपल्या व्याख्यानात आयसीटी चे कार्य ,विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्या सोबत यशस्वी उद्योजक निर्माण करण्यात आयसीटीची भूमिका, आयसीटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ची प्रक्रिया , उद्योग उभारणी मध्ये आसीटी ची भूमिका इ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .ते म्हणाले सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी ) मध्ये आयसीटी चे योगदान सात टक्के असून आपल्या देशातील बहुतांश यशस्वी उद्योगपती हे आयसीटी मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले असल्याचे नमूद केले .
PAS पास मार्फत आसीटी मुंबई येथे आयोजित विज्ञान वारी मुळे आजचे व्याख्यान शक्य झाल्याचे नमूद करून या विज्ञानवारी अंतर्गत आयसीटी मुंबई येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा यावर्षीचा हा PAS पास व आसीटी चा संयुक्त उपक्रम यापुढे दरवर्षी नियमीतपणे राबवण्याचा निर्णय आयसीटी मुंबई प्रशासनाने घेतला असल्याचे जाहीर केले व याउपक्रमास शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ खंदारे, प्राचार्य उद्यानविद्या महाविद्यालय वनामकृवि यांनी प्रस्तुत उपक्रम विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक PAS पास चे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी केले ,आभार अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिव श्री सुधीर सोनुनकर यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पास टीमने परिश्रम घेतले . या प्रसंगी श्री खाडे सर , श्री घारे सर, मॅडम, डॉ अनंत लाड , श्री सोनकांबळे सर, श्री पटाईत , डॉ दोडके , डॉ गट्टी, कु पूजा वायाळ, आणि तिचे गाईड , व संपूर्ण PAS टीम उपस्थित होती . या कार्यक्रमाचे प्रसंगी कु पुजा वायाळ या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने बनवलेल्या रॉकेटचे लाँचिंग करण्यात आले. तीची नासा करिता निवड झाली असून PAS मार्फत सन्मानपत्र देऊन तीचा यथोचित गौरव करण्यात आला .