+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
रखमाबाई सावे

रखमाबाई सावे

 

*जन्मदिन – २२ नोव्हेंबर १८६४*

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स ऑफ एडिंबरा ॲंड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)