शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतातील शापूर जिल्ह्यात भेडा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील परमेश्वर सहाय भटनागर हे पंजाब विश्वविद्यालयाचे प्रतिष्ठित पदवीधर होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांना गरिबीत जीवन जगावे लागले.वडिलांच्या निधनाच्या वेळी शांतीस्वरूप यांचे वय अवघे आठ महिन्याचे होते. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत शांतीस्वरूप आपल्या आजोळी राहिले.
त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या सहाय्याने त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम व संकल्प च्या बळावर त्यांनी भरपूर प्रतिष्ठा मिळवली. प्राथमिक शिक्षण एका खाजगी शाळेत झाले. त्यानंतर ए पी हायस्कूल सिकंदराबाद उत्तर प्रदेश येथे पुढील शिक्षणासोबत ते विविध काम पण करत होते. त्यानंतर लाहोर इथून प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली.
इ.स. 1911 मध्ये त्यांनी दलाईसिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1913 झाली त्यांनी पंजाब विश्वविद्यालयाचे इंटरमीडिएट परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. त्यानंतर ते बीएससी झाले .फोरमैन क्रिसवियान कॉलेज मध्ये भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र या विभागात डेमोस्त्रेटर म्हणून रुजू झाले. इसवी सन 1919 मध्ये त्यांनी एमएससी रसायनशास्त्रामध्ये पूर्ण केली. इसवी सन 1921 मध्ये शांतीस्वरूप यांनी प्रो एफ जी डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड विश्वविद्यालयातून डी एस सी ची पदवी मिळवली.
भारतात परतल्या नंतर काशी हिंदू विश्वविद्यालयात रसायनशास्त्राची प्रोफेसर म्हणून ते काम करू लागले. नंतर ते लाहोरला गेले पंजाब विश्वविद्यालयात रसायन व भौतिकशास्त्राच्या निदेशक पदावर त्यांनी सोळा वर्षे काम केले.
आपल्या संशोधन जीवनातील प्राथमिक अवस्थेत त्यांनी चुंबकाची उपयोग या विषयावर अभ्यास केला के एन माथूर या आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चुंबकीय सुग्रहिता मध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांना मोजण्याचे एक अत्यंत संवेदनशील उपकरण बनविले. याच उपकरणाला भटनागर माथुर चुंबकीय व्यतीकरण तुला असे नामाभीधान देण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला उसाच्या चिपाटापासून प्राण्यांसाठी ढेप कशी तयार करता येईल, या प्रक्रियेत त्यांनी विकास केला. एक एप्रिल 1940 रोजी भटनागर यांना वैज्ञानिक व औद्योगिक बोर्डाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी भारत सरकारकडून औद्योगिक अनुसंधान उपयोग समिती I.U.R.C. साठी मान्यता प्राप्त केली.I U R.C. च्या शिफारशीनंतर संशोधन क्षेत्रात पुढे सरकारी उद्योगातून मिळणाऱ्या रॉयल्टी चा एक वेगळा कोश निर्माण करण्यात आला. 1943 मध्ये भटनागर यांच्या पाच राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या स्थापनेसाठी C.S.I.R.ने परवानगी दिली. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली, राष्ट्रीय धातूकर्म प्रयोगशाळा जमशेदपूर, इंधन अनुसंधान केंद्र धनबाद तथा केंद्रीय कांच सिरॅमिक अनुसंधान संस्थान कोलकत्ता, या त्या पाच प्रयोगशाळा आहेत. 1954 पर्यंत बारा राष्ट्रीय प्रयोगशाळा ची स्थापना करण्यात आली. भटनागर केवळ प्रख्यात वैज्ञानिक नव्हते तर कुशल प्रशासक व संयोजक पण होते.
सी एस आय आर ने भौतिकी रसायनिक जीवशास्त्र तसेच मेडिकल सायन्स व इंजिनिअरिंग विषयातील संशोधनासाठी एस एस भटनागर मेमोरियल अवॉर्ड ची घोषणा केली आहे.
या महान शास्त्रज्ञाचे नवी दिल्ली येथे 1 जानेवारी 1955 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अशा या चतुरस्त व महान वैज्ञानिकाला शतशः नमन..🙏🏻🙏🏻🙏🏻
रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.
त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.
नंतर टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. १९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.
इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअॅक्शन) असे नाव आहे.
१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली. १९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली.
महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले.भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले.
सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.
जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली.
डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला. भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. हृदयविकारामुळे त्यांचे 25 मे 1999 रोजी निधन झाले.
आपण जाणून घेणार आहोत भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या बद्दल. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७ रोजी झाला. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले.
मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाईप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्यदेखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यू यॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले. स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत. भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले. मिनिटाला २४०० टाईप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते. त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले. समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा. वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र. धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ. जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात काही शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
निसर्ग आपल्याला विविध नैसर्गिक कृतीतून अवाक करत असतो. आपण म्हणतो की आपली सावली आपली साथ सोडून जाऊ शकत नाही. पण हे सत्य नाही. वर्षभरात असे दोन दिवस असतात ज्या वेळेत दुपारी काही क्षणा साठी आपली सावली आपली साथ सोडून जाते. त्या दिवसांना शून्य सावलीचा दिवस अर्थातच झिरो शॅडो डे अस संबोधलं जाते. दरम्यान परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर्फे सुद्धा ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले, ज्यास परभणीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शून्य सावलीचे विविध प्रयोग केले.
ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते. वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो. आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.
महाराष्ट्रातील विविध शहरे यांचे अक्षांश वेग वेगळे असल्या कारणाने विविध ठिकाणी शून्य सावलीची वेळ आणि दिनांक वेगळा असू शकतो.त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 वेळेमध्ये आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो. शहरे आणि शून्य सावली ची वेळ : परभणी – 12.19 मि., नांदेड – 12.17 मि., छ. संभाजीनगर – 12.25 मि., बीड- 12.23 मि., लातुर- 12.20 मि., हिंगोली-12.18 मि., धाराशिव- 12.22 मि., जालना – 12.23 मि.
पासच्या आवाहनास वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू श्री. इंद्र मनी ह्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शून्य सावली प्रयोग अनुभवले. त्यावेळी त्यांनी पास च्या विज्ञान चळवळ विषयी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रस्थावित परभणी विज्ञान संकुल परिसरात देखील शून्य सावली दिन विविध प्रयोगाच्या मार्फत साजरा केला गेला.
जी पाऊले अथक ध्येयाकडे उत्तुंग हिमनग तोकडा, मां भारतीच्या पुत्रापुढे…….. हे वर्णन ज्यांना लागू पडते त्या भारत मातेच्या सुपुत्राची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.एवरेस्ट ची उंची मोजणारे गणितज्ञ राधानाथ सिकदार……
त्यांचा जन्म, कलकत्ता येथे इसवी सन 1813साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तितुराम सिकदर. त्यांचे शालेय शिक्षण फिरंगी कमल बोस स्कूल आणि हिंदू स्कूल कोलकत्ता येथे झाले.लहानपणापासूनच त्यांना गणित विषयात विशेष रुचि होती. त्रिकोणमिती हा विषय त्यांचा विशेष लाडका! गणितावर त्यांचे लेखही प्रसिध्द होत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुढे ब्रिटिश सरकारनं त्यांना त्रिमितीय समितीत सहभागी करून घेतलं. भारतीय सर्वेक्षण खात्यात प्रगणक या पदावर ते रूजू झाले तेव्हा ते एकमेव भारतीय तर होतेच, शिवाय त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षं. त्यांची या क्षेत्रातील गती आणि ज्ञान इतकं थक्क करणारं होतं की देशातच नाही तर विदेशातही त्यांचा हात धरू शकणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. भारतीय सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न असा त्यांचा गौरवानं उल्लेख होऊ लागला. हवामान आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलं. वेधशाळेच्या कार्यपध्दतीत बदल करून हवेच्या दाबाच्या आकड्यांचे शून्य अंश सेल्सिअस तापमानासाठी रूपांतर करण्यासाठी म्हणून गणिती सूत्र शोधलं. खरंतर एव्हरेस्ट या शिखराला राधानाथांच्या नावानं ओळखलं जाणं जास्त योग्य होतं. तत्कालिन सरकारनं जरी एव्हरेस्ट यांचा सन्मान म्हणून या शिखराला त्यांचं नाव दिलं असलं, तरीही हे श्रेय पूर्णार्थानं राधानाथ यांनाच द्यायला हवं.त्रिमितीय समितीचं काम चालू असण्याचा तो काळ होता, १८५२ मधील. एका सकाळी राधानाथ सिकदर, घाईनं सर ॲण्ड्र्यु वॉ यांच्या ऑफिसमधे आले. त्यांचा चेहरा अत्यानंदानं चमकत होता. त्यावेळी त्यांनी एका दमात त्यांच्या साहेबाला सांगितलं, “सर मी जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर शोधलं आहे” व्यवसायानं गणितज्ज्ञ असणारे राधानाथ तत्कालिन ब्रिटिशराजमधील सर्वेक्षण खात्यात काम करत होते.
तत्कालिन सरकारनं हिमालयातील शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ यांचा अभ्यासगट नेमला होता. या प्रकल्पाचं नाव होतं, द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे (महा त्रिकोणमितीय सर्वेक्शण). राधानाथ हे या अभ्यास गटात सहभाग असणारे एकमेव भारतीय. सिकदारांनी सूर्य आणि रात्री दिसणारे तारे यांच्या निरीक्षणावर आधारलेली दिवसाच्या सेकंदाच्या अल्पांशापर्यंत अचूक वेळ समुद्रातील अकबोटींना इशारे देऊन कळविण्यासाठी एक संकेत प्रणाली स्थापन केली होती, ती इसवी सन 1853 पासून अमलात आली.
17 मे 1870 मध्ये गोंदालपारा येथे राधानाथ यांचे निधन झाले. अशा या हिमालया एवढ्या उत्तुंग बुद्धिमत्ता लाभलेल्या व तेवढ्याच मोठ्या मनाच्या गणित तज्ञाला कोटी कोटी नमन…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दिनांक 30/4/2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवशीय 'भौतिक संकल्पनांचे दृढ़ीकरण' या विषयाची कार्यशाळा,पशु शक्तीचा योग्य वापर योजना, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉक्टर बाहुबली लिंबाळकर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून त्यांचे राष्ट्राविषयीचे प्रेम व भारतीय विज्ञान चळवळीतील योगदान याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब होते.दैनंदिन व्यवहारात भौतिकशास्त्राचा वापर कसा असतो याची उदाहरणे देत डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील व डॉ. स्मिता सोलंकी लाभल्या होत्या. मुले अशा प्रकारच्या कार्यशाळेने प्रेरित होतात असे मत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कार्यशाळेचे प्रमुख डॉ. श्री जयंत जोशी हे मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र येथून खास उपस्थित होते.
कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भौतिकशास्त्रातील प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबक,गुरुत्वमध्य, अपकेंद्रबल, केंद्रगामीबल,घनता, घर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम या संकल्पनांचे दृढ़ीकरण करणारे प्रयोग डॉ.जयंत जोशी यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून करून घेतले. प्रयोग करताना मुलांचा आनंद ओसांडून वाहत होता.
तसेच शिक्षक व पालकांसोबतच्या परिसंवादात डॉ.जयंत जोशी सर बोलताना पूरक शिक्षण प्रणाली व शिक्षकांची भूमिका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून, प्रत्येक विषयाचे विषय सौंदर्य शिक्षकांनी मुलासमोर ठेवली तर त्यांना त्या विषयाची गोडी लागेल व ते आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जातील, अशी आशा डॉ.जयंत जोशी यांनी व्यक्त केली.कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या विषयाचे वेडे होण्याची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथून आलेले गणित शिक्षक श्री.नागेश वाईकर सर यांनी मुलांना गणितीय संकल्पनांचे प्रयोगतून ज्ञान दिले.जालन्याहून श्री अमोल कुंभळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी शिंदे ,श्री प्रसाद वाघमारे, श्री प्रवीण वायकोस व दीपक शिंदे यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश केंद्रेकर सर, प्रा. डॉ.सुनील मोडक सर, प्रा. विष्णू नवपुते सर व श्री नानासाहेब कदम व श्री रामटेके सर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी डॉ .रामेश्वर नाईक डॉ. प्रताप पाटील, सौ. कमल पाटील, श्री सुधीर सोनुनकर, डॉ. विजयकिरण नरवाडे, श्री हेमंत धनोरकर,श्री दत्ता बनसोडे , प्रसन्न भावसार, प्रसाद वाघमारे, डॉ.रणजीत लाड, ओम तलरेजा, अशोक लाड, संग्राम देशपांडे, डॉ.अनंत लाड, डॉ अमर लड़ा,नयना गुप्ता,पद्माकर पवार ,महेश काळे व संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम व कृषी विद्यापीठातील कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना डॉ.रामेश्वर नाईक सरांनी पुढील काळात पण अशाच प्रकारच्या विविध विषयातील कार्यशाळा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्याचे आश्वासन देऊन पूरक शिक्षणप्रणालीचे महत्व सांगितले.