+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
गॅलेलियो गॅलिली

गॅलेलियो गॅलिली

इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ

जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४

गॅलेलियो गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यु: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता.
जन्म व बालपण
गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलियोच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपने विचार करायला शिकवल. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारख असणारं ल्युट नावच वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलियोन लोकरीचा व्यापार करण, मठात जाऊन भिक्षुकी करण वैगेरे बर्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला.पण वडिलांना त्यानं डॉक्टर व्हावस वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याच लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचं. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्यान काही दिवस पोट भरलं.
एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलियो फक्त १७ वर्षाचा असताना एका रविवारी धर्मगुरूच पिसामधल्या कँथेड्रलमध्ये कंटाळवान प्रवचन चालू असताना त्यान उंच झोके घेणारा एक कंदील पाहिला आणि त्याला एकदम एक ‘ब्रेनवेव्ह’ आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्यानं लगेच प्रयोग सुरु केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाच वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला तेव्दाच वेळ लागतो- हा निष्कर्ष त्यानं काढला. ‘दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो’ -हेही त्याला कळल. या सगळ्या प्रयोगसाठी त्याकाळी घड्याळ नसल्यान वेळ मोजण्यासाठी त्यांन हाताची नाडीच वापरली होती! याच पेंड्यूलमचा वापर नंतर गॅलेलियोन त्याचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला. आणि याच पेड्यूलमचा वापर करून ह्युजेन्सनं पाहिलं घड्याळ बनवलं! त्या कँथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो ‘गॅलेलियोचा दिवा’ म्हणून ओळखला जातो. कालांतरान गॅलेलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र ‘माक्विस मोंटे’ याच्या मदतीन त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातलं त्याच पहिल लेक्चर प्रचंडच गाजलं! इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलियो खुलला. पडूआच्या कालाद्नात किवा बारमधे गॅलेलियो गंमतशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करे. त्यानं छोटस घरही घेतल आणि तो मरीना गाम्बा या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाच आणि गॅलेलियोच्या आईचं मुळीच पटायचं नाही. या काळात गॅलेलियोला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण मरीनाशी लग्न मात्र त्यान केल नाही. यानंतर त्यान त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसं संशोधन केल.
नवा शोध व मृत्यु
१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्यान कुठल्याशा उपकरानाविषयी एक दंतकथेवजा अफवा ऐकली. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवलं होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपने दिसत. या दुर्बीणविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलियोला वाटलं कि, याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर? आणि गॅलेलियोन ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून त्यान चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. १६१० साली गुरूच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह, चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या ‘कला’ यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधावर मग त्याने ‘दी स्टारी मेसेंजर’ हे पुस्तकही लिहिल. गुरुभोवती चंद्र बगून ‘चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही; आणि कोपर्निकसच म्हणन बरोबर असल पाहिजे, असं त्याच ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलेलियो चक्क रातोरात हिरो बनला! पण ‘या दुर्बीणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत , डाग आनि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंच चर्च म्हणायला लागलं. व गॅलेलियो विरुद्ध खटला चालू झाला, सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलियोने पुन्हा हार मानली. त्याची नजरकैद चालू होती, या नजर कैदेत त्याची बरीच वर्षे नैर्याशात गेली आणि अशातच कडाक्याची थंडी पडली असता ८ जानेवारी १६४२ रोजी गॅलेलियो मृत्यूमुखी पडला.
गॅलेलियो हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्यन एक सुंदर कलाकृतीही लिहिलीय. त्याच बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवलाय. अँटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटीश लेखकाने ‘गॅलेलियोज फिंगर’ नावच विज्ञानावर सुरेख पुस्तकही लिहिलंय.

गॅलेलियो गॅलिली
चार्ल्स डार्विन

चार्ल्स डार्विन

उत्क्रांतिवादाचा जनक

जन्म – १२ फेब्रुवारी, १८०९

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, ‘बळी तो कान पिळी’, ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.

चार्ल्स डार्विन
गॅलेलियो गॅलिली

थॉमस एडिसन

वीजेच्या दिव्याचा शोध

जन्मदिन – ११ फेब्रुवारी, इ.स. १८४७

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय “ढ’ आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
एकाधिकार
इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मतनोंदणी मशीनसाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) ९०,६४६
विद्युत दिव्यासाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) २,२३,८९८ (४ नोव्हेंबर, इ.स. १८७९ ला मागणी केली व २७ जानेवारी, इ.स. १८८० रोजी एकाधिकार मिळाला.)

विल्हेम राँटजेन

विल्हेम राँटजेन

स्मृतिदिन – फेबृवारी १० १९२३

जीवन
एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.
संशोधन
सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.
पुरस्कार
क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
फेब्रुवारी १० १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.

विज्ञान दिनविशेष

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट

तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित

स्मृतिदिन : १६ सप्टेंबर १७३६

डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ – १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. १७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरूवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)

सौजन्य

दिनविशेष आणि विज्ञान

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

भारतीय अभियंता

जन्म – सप्टेंबर १५, १८६०
(Engineers Day)

प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. १९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली. म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला. मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.

विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन; अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१); संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.

विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.

शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके व स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे.

भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.

रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.

विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्‍न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले.

सौजन्य

दिनविशेष व विज्ञान