+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!

विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.

विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.

फिरत्या प्रयोगशाळेची रचना

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी लाभ

 फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.

याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.

प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.

या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.

‘पाय’ ची कुळकथा

‘पाय’ ची कुळकथा

कुतूहलामुळे ज्ञानाची कक्षा रुंदावत जाते असे म्हणतात. असेच कुतूहल वेगवेगळ्या विषयांमध्ये देखील असते मानवाला वाटत आले आहे. वेगवेगळ्या विषयातील अनेक घटक हे या कुतूहलाला कारणीभूत असतात. त्यापैकीच गणित विषयातील ‘पाय’ (Pi) ही संकल्पना. आज 14 मार्च ‘पाय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पाय (π =3.14) स्थिरांकातलेले 3 , 1 आणि 4 हे तीन महत्त्वाचे अंक असल्यामुळे प्रत्येक वर्षातील तिसऱ्या महिन्यातील 14 तारखेला म्हणजेच 14 मार्चला ‘पाय दिवस’ साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम या ‘पाय डे’ची संकल्पना 1988  सॅन फ्रान्सिस्को मधील एक्सप्लोरेटोरियम मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ  यांनी पाय दिवसाचे आयोजन केले होते आणि त्यानंतर 2009 मध्ये युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अमेरिकेत 14 मार्च हा ‘राष्ट्रीय पाय डे’ म्हणून साजरा करण्याचा ठराव संमत केला. 2019 मध्ये युनेस्कोच्या 40 व्या सर्वसाधारण परिषदेने नोव्हेंबर 2019 मध्ये पाय दिवस हा ‘आंतरराष्ट्रीय पाय दिवस’ म्हणून घोषित केला आणि विशेष म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म दिवसही 14 मार्च रोजी आहे. पाय (  या स्थिरांकाची अपूर्णांकातील किंमत 22/7 घेतली जाते म्हणून सातव्या महिन्यातील 22 तारीख म्हणजेच 22 जुलै या दिवशी सुद्धा 22 जुलै या दिवसाला ‘पाय निकटन दिन’ म्हणजेच ‘Pi approximation day’ असे संबोधले जाते. पाय हि संख्या ‘अपरिमेय संख्या’ आहे. पाय स्थिरांक दर्शवण्यासाठी π  या ग्रीक अक्षराचा चिन्ह म्हणून उपयोग करण्यात येतो.                                                                                     

वर्तुळाचा परीघ आणि व्यास या गुणोत्तराला पाय संबोधण्यात येते. या पायचा वापर करून अनेक गणितातील कोडी तसेच क्लिष्ट कॅल्क्युलेशन्स सोपे करणे शक्य झाले. यामध्ये उदा. नदीच्या लांबीचे मोजमाप, पिरॅमिडचा आकार, ताऱ्यांचे अंतर तसेच विश्वाच्या आकाराचे वर्णन यामुळे शक्य झाले.                                                                                                                                                               

प्राचीन काळापासून ते आतापर्यंत प्रत्येक गणितज्ञाला या ‘पाय’ने नेहमीच भुरळ घातली आहे आणि त्या त्या काळच्या गणितज्ञांनी यामध्ये या पाय स्थिरांकाची किंमत शोधण्यात मोलाची भर घातली. त्या भारतीय गणिततज्ञांविषयी व त्यांनी त्याकाळी शोधलेल्या ‘पाय’ च्या किमती विषयी या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

१) शुल्वसूत्र (ख्रिस्तपूर्व 1500)

बौधायन शुल्वसूत्र : π = 3.088

मानव शुल्वसूत्र :  π = 3.16049 आणि 3.029

२) आर्यभट्ट 2 (ख्रिस्ताब्द 950) : π = 3.1416 सुमारे

३) भास्कराचार्य (ख्रिस्ताब्द 1150) :  π = 3.1416 आणि  22/7 स्थूल

४) शंकर वारियर (ख्रिस्ताब्द 1500 -1560) : π =  3.14159265391…अचूक

५) माधव ख्रिस्ताब्द 1350 ते 1425) : π = = 3.141592653592 अचूक

६) श्रीनिवास रामानुजन (ख्रिस्ताब्द 1887 -1920) :

वैश्विक गणिताला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन.

जगभरात आणि गणितज्ञांनी पायाची निश्चित किंमत काढण्याचा प्रयत्न केला. पण मात्र यामध्ये अचूकतेमध्ये जाण्याचे यश श्रीनिवास रामानुजन यांनाच आले.

रामानुजन यांनी असे सूत्र शोधून काढले की त्या सूत्राच्या सहाय्याने पायची 15 दशांश स्थळापर्यंतची अचूक किंमत निश्चित करता आली ते सूत्र असे आहे.

π = = 3.1415926535897943…

या सूत्राच्या सहाय्याने संगणकाच्या मदतीने आपण पाय या स्थिर अंकाची अब्जावधी दशांश स्थळापर्यंत किंमत काढू शकतो.

अशाप्रकारे इतर अनेक भारतीय गणितज्ञांनी पाय या स्थिरांकाची किंमत शोधण्यात मोलाची भर घातली. सर्व गणित प्रेमींना ‘पाय डे’ च्या ‘पाय’मय शुभेच्छा.

प्रसाद मार्तन्डराव वाघमारे

गणित शिक्षक अभ्यासक

परभणी

Mobile: 9405919184

प्राचीन कृषीतज्ञ “खन”

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक

नमस्कार मी डॉक्टर बाहुबली लिंबाळकर🙏🏻🙏🏻 इतिहास भारतीय विज्ञानाचा……….या सत्रात आपले सहर्ष स्वागत. आज आपण भारतात अन्नसमृद्धी आणणारा प्राचीन कृषीतज्ञ “खन”यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.इसवी सन पूर्व सहावे शतक… वंगदेश( बंगाल) या देशात एकदा दुष्काळानी थैमान मांडले. आणि त्या काळात कृषतज्ञ म्हणून “खन” यांची ख्याती झाली. योग्य मार्गदर्शन करून, वंगवासीयांना समृद्ध करणारा “कृषीप्रसार”या प्राचीन संस्कृत कृषीग्रंथाचा रचीता…….पर्जन्यमानावर कृषी कार्यपद्धती अवलंबून आहे, हे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासणारा प्राचीन भारतीय कृषीतज्ञ. कोणते पीक कोणत्या महिन्यात पेरावे, याबाबत वैज्ञानिक संशोधन कार्य. कोणत्या महिन्यात पाऊस नको, कोणत्या महिन्यात पाऊस उपकारक याचा पद्धतशीर अभ्यास,त्यावेळी त्यांनी खगोलीय बदलाच्या अभ्यासावर केला. मार्गशीषातला पाऊस राजालाही भिकेला लावेल. माघातला पाऊस देशाला धान्य समृद्धी आणील. फाल्गुणातला पाऊस धान्य भरपूर देईल. कार्तिकात लोकरीवजा ढग दिसली तर, हिवाळी पीक खूप येईल. शेत नांगरणी बाबत सांगताना मातीच्या गुणधर्माप्रमाणे व कोणते पीक घ्यायचे आहे, त्यावर कशी नांगरणी करावी हे खनांनी त्यावेळेस अभ्यासपूर्वक सांगितले आहे.बी पेरणी, लावणी, कापणी याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्वक सूचना दिलेल्या आहे. धरणी मातेला, कृषीक्रांतीने मनोहर असे सुफल हरीत स्वरूप दिले पाहिजे, म्हणजे आपण आपल्या काळ्या आईचे उजळ सुपुत्र ठरू. मात्र त्यासाठी प्रत्येकाने जमिनीत स्वतः खपले पाहिजे. अंग मळवले पाहिजे. चिखलात काम केले पाहिजे. जो शेतात स्वतः खपतो तो काळ्या आईच्या अमाप कृपेला पात्र ठरतो. अन्नधान्य समृद्धीने त्याचे घर फुलून येते…………. कृषीतज्ञ,कृषीभूषण”खन”
प्रा. भालबा केळकर संकलन- डॉक्टर बाहुबली लिंबाळकर
9834393018

आद्य संशोधक कणाद

आद्य संशोधक कणाद

इसवी सन पूर्व सहावे शतक, आर्यवृत्तातील प्रयाग तीर्थक्षेत्र, येथे मुनी सोमशर्मा यांना राजप्रतिनिधी पेक्षा जास्त मान होता. कश्यपा नावाचा” आलुक्य” म्हणून ख्याती असणारा त्यांचा शिष्य. धान्याचे कण गोळा करताना सोमशर्मांना प्रयाग सारख्या समृद्ध नगरात कश्यपा दिसला. तेव्हा त्यांनी त्यांना कश्यपाऐवजी कणाद असे नाव दिले. कणाकणाचे विश्वज्ञान मिळवणारा, मूलभूत ज्ञानाचा प्रस्थापक.
“सदैव शंकाकुल राहावे” असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला. गृहगती,नक्षत्रगती, ध्रुवाची जागा,सप्तऋषींचे भ्रमण, ताऱ्यांची उत्पत्ती आणि नाश हे सारे नियमित चालू आहे. आपल्या दैनंदिन, जीवन व्यवहार आणि जीवन व्यापार यात सुद्धा तर्कशुद्ध घडामोडी चालू असतात.पण आजार, नुकसान, अपयश इत्यादीकडे व्यवहारिक दृष्ट्या आपण बघत असल्याने “जगात काही नियम नाही” सारे असंबंध आहे, असे आपण अनुमान काढतो. पण प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण शक्य आहे, असे दिसून येते. तेव्हा अन्यवस्था, अंदाधुंदी असे सृष्टीचे, जगाचे स्वरूप वाटणे, हा आपल्या संकुचित दृष्टीचा दोष आहे. सृष्टी, विश्व हे नियमबद्ध आहेत. विश्वाची ढोबळमानाने सहा वर्गात वर्गवारी करता येते. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय म्हणजे वस्तू. त्यांनी पदार्थाचे उपवर्गीकरण नऊ रूपात केले. क्षिती, आव, तेज, वायू, आकाश, काल, दिक, मन आणि आत्मन. पदार्थाचे पंचंद्रीयांना जास्त सहज ज्ञान होणारे गुणविशेष म्हणजे गंध, स्पर्श आणि ध्वनी हे आहेत. पहिले चार हे चार प्रकारच्या कणांनी तयार झालेले आहेत. या कणांचे स्वरूप मूलभूत आहे. वस्तू कणांची बनली आहे. विश्वकनमय आहे. या कणांनाच मी “परमाणु” असे म्हणतो. असे कणाद म्हणतात. परमाणु अमर आहेत.
विश्वाचे वैशेशिक तत्त्वज्ञान( वैशेषिक सूत्र) या ग्रंथात त्यांनी हे सगळे लिहून ठेवले आहे. पुढे त्यांनी वस्तूचे चोवीस गुणविशेष सांगितले रंग, रुचि, गंध ,स्पर्श, ध्वनी, अंक, संख्या, भिनत्व, संयुकत्व, विभागित्व, दूरत्व, संनिध्यात्व, प्रवाहित्व, प्रवाहारोधकत्व, जाणीवत्त्व, सोख्य, दुःख, इच्छा, निरीच्छा, लालसा, जडत्व, वृत्ती ,गुण, अवगुण हे ते गुणविशेष. पंचमहाभूते आणि काल अवकाश, मन आणि आत्मा या वर्गात वस्तूचे जास्त तपशील वर्गीकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी परमाणुच्या संयोगाचा पद्धतशीर अभ्यास केला. रासायनिक बदलाच्या बाबतीत उष्णतेचा हात असतो हे त्यांनी सहप्रमाण मांडले. रेणू ही रासायनिकरित्या संयुक्त होतात असे त्यांनी प्रतिपादन केले. प्राचीन भारतीय वैज्ञानिक कनाद हाच,अणु सिद्धांताचा आद्य जनक हे आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांनीही मान्य केले…….
प्राचीन भातीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
प्रा.भालका केळकर
संकलन…
डॉ.बाहुबली लिंबाळकर
9834393018

खगोलशास्त्रज्ञ गर्ग

भगवान श्रीकृष्ण ,पांडव, कौरव यांचा तो काळ, गर्ग नावाचे एक महान मुनी. त्यांना ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. विश्वरूपाचं अद्भुत वर्णन गर्गमुनि श्रीकृष्णाच्या महालात प्रवचनाद्वारे ऐकवत असत. अनेक नवनिर्माण तेजगोलांच ज्ञान, अनेक नक्षत्रांचे रहस्य त्यांना उलगडलेलं होतं. आकाशाच्या या अमर्याद अवकाशात पसरला आहे 27 ताराकापुंजांचा संभार. सतत वेगाने धावणारा आणि सारे आकाश तेजाने भारून टाकणारा. पुढे ते श्रीकृष्णाला कृतिका, रोहिणी, मृग , वर्षा ,पूनरवसु,अरद्रा पुष्य ,आश्लेषा, मघा, फाल्गुनी ,हस्त, चित्रा ,स्वाती ,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्राविषयी सांगत. नक्षत्रांच्या या पसाऱ्यात आपला जीवप्रणेता सूर्य आहे. गर्ग मुनीना तेव्हा जाणवले की नक्षत्र आपलं दैनंदिन, ऋतूंनी विविध रंगी आणि विविध गुणी केलेले जीवन घडवतात, जगण्यासाठी सुखमय करतात. आणि ह्या नक्षत्राच्या ही पलीकडे अमर्याद अतिसुंदर विश्व आहे. हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. खगोलशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ग्रहज्योतिष विज्ञान आणि फलज्योतिष विज्ञान यांचाही त्यांना चांगला अभ्यास होता. या विस्तीर्ण अवकाशात असंख्य ग्रह गोल पसरलेले दिसतात तरी ते विश्वनीयत्याच्या शिस्तीन बद्ध आहेत. त्यांची हालचाल, त्यांच्या कक्षा नियमित आणि निश्चित आहेत. गर्ग नक्षत्रांची संख्या निश्चित करणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांना गर्गसंहितेचा कर्ता मानले जाते. वराहमीहिराची बृहस्थसंहिताही गर्गसंहितेवर आधारित आहे. अथर्व वेदात त्यांच्या नावाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ऋचा आहेत. नक्षत्र संख्या 27 की 28 या वादात गर्ग यांचा भाग असावा. 20 ते 23 व्या तारका पुंजाच्या क्षेत्रात तेजोगोलांची अशी काही गर्दी आहे त्यामुळे नक्षत्र संख्येचा गोंधळ होतो. याच क्षेत्रात पण फार दूरवर असणारे नक्षत्र म्हणजे अभिजीत.
आकाश गणिताच्या सोय नुसार सूर्याच्या नक्षत्र भ्रमणाच्या काळाला 27 नक्षत्रे मानून भागले तर प्रत्येक भागाला बरोबर पूर्णांकात मोडता येईल असा काळ मिळतो. नक्षत्र मालिकात अश्विनी आणि भरणी ला गर्ग मुनी यांनीच स्थान दिले. गर्ग मुनी म्हणत परमेश्वराने आपल्या जीवसृष्टीचा प्रयोग करायला हीच भूमी मान्य केली. कारण या भूमीला अनेक ऋतुंनी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध आकर्षक सृष्टीला वैभव दिले व सजवले. वसंत ऋतुनी जीवनाचा बहरीचा उत्साह पूर्ण आणि निष्पाप प्रारंभ दाखवला, ग्रीष्माने कष्टमय आणि कर्तुत्व पूर्ण तारुण्य दाखवले, वर्षा आणि शरद यांनी कर्तुत्वाने निर्माण केलेली समृद्धीजनक लाभवृष्टी दाखवली आणि हेमंत व शिशिर यांनी समृद्ध सुखकारक अशा जीवनाची परिणिती दाखवली. आणि याच ऋतूंच्या गर्भात वसंताचा उत्साहवर्धक उषःकाल आहे या जाणिवेचे बीज निर्माण केले. यातच आपल्या जीवनाचा जणू परिपाठच दडला आहे. आकाशस्थ ग्रहगोल ,तेजोगोल, तारका समूह हे अत्यंत नियमितपणे मार्गक्रमण करतात. त्यांनी भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करायला प्रारंभ केला. यातूनच त्यांना सूर्याचे नक्षत्र भ्रमण लक्षात आलं. सूर्याच्या विशिष्ट नक्षत्रातील स्थानावरूनच त्यांना उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा कळू लागला. वर्षातले महिने, दिवस, दिवसांचे प्रहर , घटीका हे सारे ज्ञान त्यांना आकाशान दिल. प्रत्येक आकाशात असणाऱ्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो हे अटळ आहे, असे गर्ग मुनी त्यावेळी सांगत……………
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन….
प्रा.भालबा केळकर
संकलन डॉ.बाहुबली लिंबाळकर
9834393018