परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आयुका पुणे येथे ‘विज्ञानवारी’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने विज्ञानवारी पूर्व परीक्षेचेचे आयोजन खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आहे.
परीक्षेचे माध्यम : मराठी व इंग्रजी
परीक्षेसाठी पात्र वर्ग : इयत्ता 7 वी
परीक्षा दिनांक : दि. 20.02.2024 (ऑफलाईन व ऑनफलाईन)
परीक्षेचे स्वरूप : बहुपर्यायी (MCQ)
प्रश्नसंख्या : 30
गुणसंख्या : 30
विज्ञानवारीसाठी निवड करावयाची विद्यार्थी संख्या : 1 विद्यार्थी
ऑफलाईन परीक्षा केन्द्र : निवडक सर्व स्तरावरील शाळा, जि. परभणी. ऑनलाईन परीक्षा : परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा. परीक्षेची लिंक आणि वेळ दि. 20.02.2024 या दिवशी https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.
Section A – Basic Science – 6 Questions
Section B – Practical Science – 6 Questions
Section C – Carrier Science – 6 Questions
Section D – Achievers Section – 6 Questions
Section E – Indian Knowledge System (IKS) – Dr M. S. Swaminathan – 6 Questions
विज्ञानवारी पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम एस. सी. ई. आर. टी. व मधील इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी सामान्य विज्ञान व पाठ्यपुस्तकातून करावा. तसेच https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या स्त्रोतांचा वापर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
9028817712, 9405919184, 9921144842, 9422177478
*विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन आले होते.
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी गत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 93 उपक्रमशील गणित शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण डॉ.विवेक माँटेरिओ आणि गीता महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ इंद्रमणी तर प्रमुख अतिथी म्हणून विवेक माँटेरिओ,गीता महाशब्दे, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे,डॉ.योगेंद्र रॉय, व. ना. मा. वी.शाखा अभियंता दीपक काशाळकर, संप्रियाताई राहुल पाटील,ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील,विठ्ठल भुसारे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले गणित हा विषय सर्व शास्त्रांचा पाया आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक नागेश वाईकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे तर आभार सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक,डॉ.रणजीत लाड, श्रीमती कमल चव्हाण, प्रसाद वाघमारे,दत्ता बनसोडे,आकाश नरवाडे, आनंद बडगुजर,डॉ.बाहुबली निंबाळकर,अशोक लाड,दीपक शिंदे, प्रसन्न भावसार,ज्ञानराज खटिंग अदिनी परिश्रम घेतले.
गोवारीकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचं बालपण कोल्हापूरच्या कोष्टी गल्लीत गेले. त्यांचे वडील इंजिनिअर होते. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरात पुस्तकांचा जंगी खजिनाच होता. पुस्तकांच्या सहवासात राहून, वसंतरावांनाही लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. या पुस्तकांमधूनच त्यांना हेन्री फोर्ड भेटला. वसंतराव म्हणतात, ‘‘हेन्री फोर्ड हा माझा आदर्श होता आणि त्याच्यासारखाच आपणही मोटारीचा कारखाना काढायचा, असे माझे स्वप्न होते.’’
त्या वेळी लहानग्या वसंतने मोटार बनवण्याचा. नुसता ध्यासच घेतला नाही, तर एक छोटेखानी मोटार तयार करून ती गल्लीत फिरवलीदेखील! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही, यावर वसंतरावांचा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी जे यश संपादन केले, त्यातून त्यांचे हे तत्त्वज्ञान त्यांनी सिद्ध करून दाखवले.
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर लंडनला रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रथम त्यांनी हार्वेल येथील अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर समरफिल्ड रिसर्च स्टेशन, ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधनात्मक काम केले. त्याच दरम्यान डॉ.गोवारीकरांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.
संशोधन आणि विज्ञानविषयक साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनुभव घेत, डॉ.गोवारीकर रमून गेले होते. लंडनमध्येच संशोधनाच्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द करून तिथेच स्थिर होण्याच्या विचारात असतानाच, त्यांना भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात अर्थात इस्रो येथे पाचारण करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ.विक्रम साराभाई यांनी गोवारीकर यांची प्रगल्भ बुद्धी जोखली होती. वैज्ञानिक म्हणून स्वबळावर, स्वचातुर्याने, एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गोवारीकरांची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर अग्निबाणासाठी लागणारे इंधन तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली. सुरुवातीला अग्निबाणाला लागणारे घनइंधन विकसित करण्यासाठी डॉ.वसंत गोवारीकर इस्रो येथे प्रॉपेलंट इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
१९६७ साली केरळ राज्यातल्या थुंबा या गावी एका वापरात नसलेल्या जुन्या चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बनावटीच्या अग्निबाणासाठी लागणारे घनइंधन तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यातूनच पुढे जगातले सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंधन घडवले गेले. जुन्या चर्चचे पुढे भव्य वास्तूत रूपांतर झाले. तेथे संशोधन आणि विकसन विभाग स्थापन केला गेला एवढेच नाही, तर त्यांनी तेथे प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लांट यांसारखी युनिट्सही स्थापली आणि वाढवली. ‘सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’ हे युनिट तर नंतरच्या काळात जगातले सर्वांत मोठे घनइंधन तयार करणारे युनिट ठरले. डॉ. वसंत गोवारीकर भारताच्या अवकाश प्रॉपेलंट तंत्रज्ञानाचे (एच.टी.पी.बी.) जनक मानले गेले.
पुढे १९७९ साली त्यांची विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे अग्निबाणाच्या साहाय्याने, भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला आणि १९८३ साली एसएलव्ही-३ हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.
१९८६ ते १९९३ या कालावधीत डॉ. वसंत गोवारीकर यांची भारतीय शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या कालावधीत सलग चार पंतप्रधानांसाठी त्यांनी हे काम केले. विज्ञान सर्वसामान्य जनमानसात रुजले पाहिजे, भारतातल्या प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे विचार या द्रष्ट्या शास्त्रज्ञाच्या मनात सतत रुंजी घालत होते. त्या विचारांतून त्यांना देशभरात एक वैज्ञानिक चळवळ रुजवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन केले. त्यानुसार भारतात १९८७ सालापासून ही प्रथा अमलात आली आहे. दरवर्षी एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन देशभरातल्या गावागावांतून विद्यार्थ्यांसाठी, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व वयोगटांतल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वाढावा या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम राबवले जातात. त्यांमध्ये पथनाट्ये, व्याख्याने, प्रयोग मेळावे, विविध विषयांवरील कृतिसत्रे, सहली, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.
त्यांनी सुरू केलेला आणखी एक अत्यंत कल्पक, देशव्यापी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस! शालेय शिक्षण घेणाऱ्या तमाम भारतीय बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादन करण्यासाठीची मोठी पर्वणीच असते. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच, वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्व देशभरातल्या जनमानसात रुजवण्यासाठी, डॉ.गोवारीकरांच्या प्रयत्नाने एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवण्यात आली, ज्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, स्वयंसेवी गट, स्वयंसेवी संस्था, अशा देशभरातल्या जवळपास ५० संस्थांनी एकत्र येऊन, देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
१९९० सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘भारताची लोकसंख्या’ हा होता. भारताची लोकसंख्या आता स्थिरीकरणाकडे (जन्म आणि मृत्युदर समान झाल्याने लोकसंख्या तेवढीच राहणे) वाटचाल करीत आहे, हा त्यांचा निष्कर्ष आता जगन्मान्य झाला आहे.
१९९३ ते १९९५ या काळात खतांविषयीच्या एका प्रकल्पावर भारत सरकारने डॉ.वसंत गोवारीकर यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. २००५ साली त्यांच्या प्रमुख संपादकपदाच्या नेतृत्वाखाली ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले. हा जगातील सर्व प्रकारच्या खतांची माहिती देणारा अतिशय परिपूर्ण असा ग्रंथ असून त्याचे काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करून, नेटकेपणाने पुरे केलेले आहे. अशा प्रकारचा खतांसंबंधीचा संपूर्ण माहिती देणारा जगातला हा पहिलाच ग्रंथ आहे.
आज डॉ. वसंत गोवारीकर यांना मॉन्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून सारा देश ओळखतो. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केली व त्यानुसार दरवर्षी मे महिन्यात आगामी मॉन्सूनचे भाकीत वर्तवण्यात येते. ते बहुतांशी अचूक ठरल्याने, समस्त भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठीच मदत मिळाली आहे.
१९९५ ते १९९८ या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. गोवारीकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. इस्रोचे ‘सतीश धवन डिस्टिंग्विश्ड प्राध्यापक’ म्हणून इस्रोतील तरुण शास्त्रज्ञांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष होते. इंफाळ येथील मणिपाल विद्यापीठाच्या कोर्टावरही त्यांची नेमणूक झाली होती. भारत सरकारच्या शुगर टेक्नॉलॉजी मिशनच्या स्थापनेपासून, म्हणजे १९९३ सालापासून ते त्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.
त्यांचे २०० हून अधिक विज्ञानविषयक शोधनिबंध, अनेक विज्ञान पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे हे लेख आणि पुस्तके अनेक विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासासाठी लावले गेले आहेत.
‘द अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या इंधनासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना ‘आर्यभट्ट’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक संस्थांची सुवर्णपदके, मानाच्या पदव्या, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत.
2 जानेवारी 2015 रोजी वसंत गोवारीकर यांचे पुण्यात निधन झाले.
गणिती प्रज्ञावंतांना सहसा त्यांच्या योगदानानुसार उत्तम आणि अत्युतम अशा दोन वर्गात विभागले जाते. पण काही गणितज्ञ अपवादात्मक असामान्य अशा तिसर्या वर्गात मोडतात. अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये भारताचे श्रीनिवास रामानुजन यांचा समावेश असणे आपल्यासाठी गौरवास्पद आहे.
वयाच्या दहाव्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती. पण दुसर्या विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्नातक पदवी मिळवू शकले नाहीत. पोटापाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली व वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले.
त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक जी. एच. हार्डी यांना एका नऊपानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले व त्यांनी रामानुजनला 1914 मध्ये इंग्लंडला बोलवून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखीन पंख फुटले व त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी 1919 मध्ये ते मायदेशी परतले.
केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत.
ते सांगत की, झोपेत असताना असंख्य अतिशय प्रगत गणिती सूत्रे असणारी त्यांना स्वप्ने पडत असत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत व ती सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. कदाचित अशा निष्पाप, अतिशय संवेदनशील ग्रहणशीलता व तरल चित्तवृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे स्वप्नात दिसत असावित. , रोखठोक तर्कशात्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्यांना ती सहसा दिसणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल.
रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. 1997 पासून ‘द रामानुजन र्जनल’ नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडित असे दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध होतात. 2005 पासून विकसनशील देशातील 45 वर्षांहून कमी वय असलेल्या गणितज्ञास त्याच्या उल्लेखनीय संशोधनासाठी ‘श्रीनिवास रामानुजन’ पारितोषिक देण्यात येते.
आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली.
गणित वर्ष 2012 साजरे करण्याचे उद्देश त्यांच्या कार्याची आठवण करत नवीन संशोधकांची पिढी तयार करणे, गणिताकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करणे तसेच जनसामान्यांपर्यंत गणिताची महती पोहचवणे असे आहे. त्या दृष्टीने गणिताबाबत विविध स्तरांवर कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे, स्पर्धा व प्रकाशने आणि गणितातील करिअर्सच्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे असे कार्यक्रम हाती घ्यावेत अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ‘ट्युरिंग वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. अँलन ट्युरिंग (1912-1954) हे इंग्लंड मधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षी अनेक कार्यक्रम जगभर आखले आहेत.
गणितातील संकल्पना व पद्धती उपलब्ध असल्यामुळेच अनेक क्षेत्रांत प्रगती होते, म्हणून गणितात सातत्याने संशोधन करून ज्ञानात भर घालणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण सर्व या ‘2012 गणित वर्षा’त गणिताचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन यांची नवी दालने उघडण्याचा संकल्प करूया.
4000 सूत्रांची मांडणी
केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्वी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी दोन तृतीयांश अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत…आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ‘ट्युरिंग वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. अँलन ट्युरिंग (1912-1954) हे इंग्लंड मधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शक ठरत आहे.
गणितात अशी संख्या आहे ज्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी नि:शेष भाग जातो. अशी कोणतीही संख्या नाही असेच बहुतांश जणांचे म्हणणे होते. पण हा एक आकडा खूपच विचित्र आहे आणि जगातील सर्व गणितज्ञांना धक्का बसला आहे.
ही संख्या भारतीय गणितज्ञांनी त्यांच्या अविचल बुद्धिमत्तेने शोधून काढली.
ही संख्या २५२० पहा.
ही अनेक संख्यांपैकी एक असल्याचे दिसते,…. तथापि, प्रत्यक्षात तसे नाही,
२५२० ही अशी संख्या आहे, ज्याने जगभरातील अनेक गणितज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.
२५२० या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने नि:शेष भाग जातो.
सम किंवा विषम:
हे खरोखर आश्चर्यकारक आणि अशक्य असल्यासारखे वाटते.
आता, खालील तक्ता पहा;
२५२० ÷ १ = २५२०
२५२० ÷ २ = १२६०
२५२० ÷ ३ = ८४०
२५२० ÷ ४ = ६३०
२५२० ÷ ५ = ५०४
२५२० ÷ ६ = ४२०
२५२० ÷ ७ = ३६०
२५२० ÷ ८ = ३१५
२५२० ÷ ९ = २८०
२५२० ÷ १० = २५२
२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] च्या गुणाकारात लपलेले आहे.
भारतीय हिंदू वर्षाच्या संदर्भात, या २५२० क्रमांकाचे कोडे सोडवले आहे.
हे या संख्येचे गुणांक आहेत.
आठवड्याचे दिवस (७),
महिन्याचे दिवस (३०)
आणि वर्षातील महिने (१२)
[ ७ × ३० × १२ = २५२० ] हे काळाचे वैशिष्ट्य आणि प्रभुत्व आहे.
महान गणिती ज्याने ते शोधले होते ते होते श्री श्रीनिवास रामानुजम अय्यंगार.
भारत सरकारच्या एन सी आर टी (NCRT)आणि एन सी एस एम (NCSM)यांच्या संयुक्त विद्यमाने, सर्वात मोठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा , म्हणजेच 'विध्यार्थी विज्ञान मंथन', विज्ञान भारती तर्फे दरवर्षी एका दिवसाच्या नियोजनाची असते. ही परीक्षा प्रथमच परभणीत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी , परभणी यांच्या सहकार्याने , परभणी येथे दोन दिवसाची , दिनांक 16 व 17 डिसेंबर ला संपन्न झाली.
या परीक्षेसाठी वीस जिल्ह्यातील म्हणजेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र प्रांत यातील 130 विद्यार्थीची निवड झाली होती, निवड झाल्या पैकी 113 विध्यार्थी परीक्षेसाठी हजर होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमा दरम्यान दिनांक 16 डिसेंबर रोजी संबंधित निवड झालेली विद्यार्थी व त्यांचे पालक यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले विविध विभागात जसे की उती संशोधन केंद्र, रेशम संशोधन केंद्र, हवामान प्रयोगशाळा तसेच नाहेप प्रकल्पा अंर्तगत असलेला रोबोट विभाग दाखवून त्यासंदर्भात सविस्तर माहिती व त्या विभागाला भेट देण्यात आली व तेथील तज्ञ डॉ. आनंद दौंडे, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. आनंतलाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणीत या महाविद्यालयाला भेट देऊन त्यामधील शरीरचनाशास्त्र विभाग, विकृतीशास्त्र विभाग, परोपजीवीशास्त्र विभाग व शल्य चिकित्सा विभाग यांना भेट देऊन तेथे असलेल्या तज्ञ डॉ. चंद्रकांत मामडे, डॉ. गोविंद गंगने, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. बापूराव खिल्लारे, डॉ. शरद चेपटे मार्गदर्शन मिळाले.
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाला विद्यार्थ्यां पालकांची भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुललाच्या "विद्यार्थी विज्ञान मंथन" परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन विज्ञान संकल्प पाहून विद्यार्थी भारावून गेलीत भविष्यात होऊ घातलेल्या या विज्ञान संकल्पनाची वाटचाल ही विज्ञान क्षेत्रातील अतिशय प्रभावशाली , प्रेरणादायी असेल आणि परभणीचे नाव हे देशभर गौरवित करणार आहे. असे मत विद्यार्थी आणि पालकांनी त्या ठिकाणी मांडली.
दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता परीक्षेचा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ उदय खोडके, व प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल हे उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून श्री ओम प्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जि प परभणी, डॉ पी .आर. पाटील जि प परभणी , डॉ. पराग नेमाडे आय सी टी जालना, व श्री श्यामजी बाराडकर हे होते.
ही परीक्षा सकाळी ठीक नऊ वाजता सुरू झाली या परीक्षा घेण्यासाठी रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र, जीवशास्त्र , व गणित विभागातर्फे परीक्षार्थी साठी परभणीतील विविध महाविद्यालयातील निष्णात असे प्राध्यापक व शिक्षक तसेच स्व्यमसेवक लाभले.
प्रा. विष्णू नावपुते , प्रा सतीश मुंदे , प्रा.अरुण भांगे, प्रा. काशिनाथ सालमोटे, प्रा. तुळशिराम दळवे , प्रा. विशाल डाके, प्रा.मोहन गडेकर, प्रा सुषमा सोळुंके, प्रा.विना सदावर्ते, प्रा माकू पर्शिया, प्रा. दत्तात्रेय भड, प्रा. नितीनकुमार पारवे, प्रा. वैभव राऊत, प्रा.शिवाजी पारवे, प्रा. संभाजी सवंडकर प्रा. शंकर ठोंबरे, प्रा. संजय ढवळे, प्रा. आशा रेंगे, प्रा जे. यु. पाटील, प्रा. संतोषी झरकर , प्रा. डी. एन. ढवळे , प्रा. प्रताप भोसले व श्री प्रसार वाघमारे यांनी परिश्रम घेतले .
तसेच या परीक्षेसाठी विज्ञान भारती ( विभा) विद्यार्थी विज्ञान मंथन चे देवगिरी प्रांत समन्वयक श्रीपाद कुलकर्णी आणि अमोल कुंबळकर, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वयक
मीना माळगावकर आणि वैशाली कामत , आणि देवगिरी प्रांत संयोजक डॉ .नितीन अधापुरे, व महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ.मानसी मालगावकर, पश्चिम देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य मा. राहुल पाठक, मा. अनिल संवत्सर, मा. अवधूत देशमुख , त्याच बरोबर , विभाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य श्री श्याम बारडकर समन्वयक म्हणून लाभले.
या सर्व जणांनी अथक परिश्रम घेऊन पूर्ण लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडून निकाल लावला. त्यातून इयत्ता 6 वी ते 11 वी मधून प्रति वर्गातून 3 या प्रमाणे एकूण 18 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यामध्ये इयत्ता सहावीतून सर्वेश चांडक, आरुष पगार व अथर्व चौबे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता सातवीतून आयुष पाटील, अन्हाद अहुजा व अमोल पाटील हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता आठवीवीतून श्रीजित मित्रा, अनुपम नजन व अद्वैत राममोहन हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता नववीतून अमृत वर्षिनी, सिद्धांत कावरे व मानस मगर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले. इयत्ता दहावीतून चार्वी कोठारी, समान पांडे व ओम हरकल हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय आले तर इयत्ता अकरावी मधून रोहन पुणेकर, अर्णव जोगळेकर आणि सर्वेश पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय क्रमांक पटकाविले. वरील सर्व विद्यार्थामघून प्रत्येक इयतेतून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यींची राष्ट्रीय पातळी वरील परीक्षेसाठी निवड झाली आहे.
सदर परीक्षा चालू असताना पालकांसाठी व ईतर विद्यार्थ्यांसाठी, भाभा अणु ऊर्जा प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ जयंत जोशी यानी भौतिकशास्त्रातील विविध प्रयोग सहजपणे करून दाखवले व त्यांचे महत्त्व विषद करून सांगितले . मुलांना प्रयोग करून दाखविले व करून घेतले .मुलांसाठी ही रोमांचक ठरले. तसेच , डॉ अनिल खरात यांनी संमोहनशास्त्रा बद्दल असणारे समज व गैरसमज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
सक्सेस ॲप बालनाट्यने जिंकली रसिकांची मने
नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी (नृ.) च्या वतीने लेखक दिग्दर्शक त्र्यंबक वडसकर यांनी केलेले बाल नाट्य सक्सेस ॲप हे सादर केले. आत्मविश्वास हाच खरा सक्सेस ॲप आहे ही टॅगलाईन घेऊन हे बालनाट्य होते. तथागत गौतम बुद्धाने प्रतिपादित केलेले “अतः दीप भव” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रकाश स्वतः झाला पाहिजे हे प्रभावी मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकातून केला आहे.
या नाटकात पुजा गमे, प्रांजली वाघ, संध्या जवंजाळ,शुभांगी पांचाळ, प्रिती पांचाळ धनश्री एडके, वैष्णवी कदम, वेदिका मुळे, अंजली वाळके, पुनम आव्हाड, अंजली वाघ , वेदिका तसनुसे, ऋतुजा वाघ, निकिता सातपुते यांचा समावेश होता , निर्मिती प्रमुख प्राचार्य पी.बी.शेळके नेपथ्य शैलेष ढगे , प्रकाश योजना लक्ष्मीकांत जोगेवार,विरेन दामूके तर संगीत प्रा. संजय गजमल यांचे होते रंगभूषा राखी मुळे यांची होती.
ब्रम्हामांडाची सफर प्रसिद्ध खगोलतज्ञ श्री हेमंतजी धानोरकर यांनी उपस्थितांना टेलीफिल्म च्या माध्यमातून आपल्या ओघवत्या वाणीमधून ब्रम्हामांडाची माहिती करून दिली .
रिसर्च ॲज करियर संशोधन हे करिअर याबददल मा डॉ रंजन गर्गे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले .
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्रातील विविध शंकांचे निरसन करत, नेहरू तारांगणाचे संचालक श्री अरविंद परांजपे यांनी त्यांचाशी संवाद साधला.
या दोन दिवशीय कार्यक्रमाचा समारोप समारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कुलगुरू डॉक्टर प्रा इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान याप्रसंगी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर धर्मराज गोखले संचालक विस्तार शिक्षण , श्री. श्याम बारडकर ,सौ .डॉ. समप्रिया पाटील व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील कार्यक्रमसंपन्न झाला. दिवसभरातील समारंभा कार्यक्रमाचे संचलन श्री नितीन लोहट , श्री दीपक शिंदे , डॉ. विजयकिरण नरवाडे , डॉ बाहुबली लिंबाळकर यांनी केले तर तसेच कार्यक्रमाचे आभार श्री नितीन आधापुरे ,कैलाश सुरवसे, महेश शेवाळकर यांनी मानले.
परीक्षा यशस्वी करण्यासाठी परभणीतील व्यवस्थापनात समाजप्रिय श्री संदीप देशमुख, श्री वाकोडकर, श्री महेश काकंरिया, श्री सचिन तोष्णीवाल, श्री राजन मानकेश्वर , श्री संतोषी देवडे श्री नितिन लोहट ,श्री मिलिंद मोताफळे, सौ अंजली बाबर, श्री पठाण सर , डॉ. अंकित मंत्री , डॉ. माऊली हरबक श्री रामभाऊ रेंगे, श्री दीपक देशमुख , श्री उपेंद्र फडणीस , श्री विनोद मुलगिर, डॉ. बालाजी कोंडरे, श्री दत्ता बनसोडे, श्री सनद जैन ,श्री ओम तलरेजा ,v श्री गणेश माऊली खंटीग, श्री भगवानदादा खंटीग, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री सुभाष जाधव, श्री कल्याण भरोसे , श्री राजपाल देशमुख , श्री माजेद ,श्री अखिल अन्सारी, श्री भागवत नाईक यांच्या बहुमोल योगदानामुळे यांच्या बहुमोल सहकार्यामुळे, आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य यांनी परिश्रम घेऊन राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मंथन प्रज्ञाशोध परीक्षा 2024 यशस्वीरित्या संपन्न केली