+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
होमी भाभा

होमी भाभा


जन्म. ३० ऑक्टोबर १९०९

स्मृती दिन -२४ जानेवारी १९६६


भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर, प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते.

स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. होमी भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.

त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली.

वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले.

१९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली,तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली.

अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो,याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.

त्यांनी अनेक संस्था उभारल्या. तुर्भ, तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,ऊर्जा आयोग,अवकाश संशोधन, कॉन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.

त्यांच्या निधना नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन त्यात होमी भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

संकलन डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

होमी भाभा

दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर

गणितज्ञ ,काप्रेकर स्थिरांक.

17 जानेवारी 1905
4 जुलै 1986

हॅपी नंबर, आर्मस्ट्राँग नंबर, ड्यूडने नंबर.. यादी आणखी थोडी मोठी आहे. या यादीत दोन भारतीय नव्हे, तर महाराष्ट्राशी संबंधित नावं पण आहेत. एक आहे काप्रेकर अंक आणि दुसरं आहे काप्रेकर कॉन्स्टंट किंवा स्थिरांक!! , म्हणजे ६१७४

मराठमोळे गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर यांचा आवडता छंद म्हणजे आकडेमोड करणे!!! याच त्यांच्या आवडीने त्यांची ओळख ६१७४ या रहस्यमयी आकड्याशी झाली. या संख्येने जगभरातल्या गणितज्ञांची झोप उडवली आहे. तेही एकदोन दिवस नाही, तर ही संख्या तब्बल १९४९ पासून एक रहस्य बनून राहिला आहे.

काप्रेकरांचा जन्म १७ जानेवारी १९०५ चा. डहाणू त्यांचं जन्मगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि ठाण्यात झाले, तर पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात. त्यांचे गणित विषयात अधिकृत असे शिक्षण झाले नव्हते. पण गणिताबद्दल त्यांना अतोनात प्रेम होते. पुढे जाऊन त्यांनी देवळाली परिसरातल्या एका शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली. तशी त्यांना लहानपणापासून गणितातले कठीण कठीण प्रश्न सोडवायची आवड होती. या छंदातूनच एका माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या या अवलियाने गणितात क्रांती केली. अनेक स्थिरांक, तसेच कित्येक संख्या त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. त्यांनी ‘मनोरंजक गणित’ लोकप्रिय केले.

पण हे सगळे लगेच घडले असे झाले नाही. त्यांना गणितात अधिकृत शिक्षण झाले नसल्याने आणि माध्यमिक शाळेत शिकवत असल्याने नेहमीच भेदभावाची वागणूक मिळत असे. त्यांचे शोधनिबंध देखील कोणी छापत नसे, एवढेच काय गणितीय संमेलनांना सुद्धा ते स्वखर्चाने जात असत. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांचे गणित प्रेम वरचढ ठरत असे. १९४९ साली अशाच एका गणित संमेलनात त्यांनी या असामान्य संख्येबद्दल माहिती दिली. पण स्वतःच्या अहंकारात असलेल्या इतर गणितज्ञांनी त्यावेळी त्यांची थट्टा केली. भारतात या संकल्पनेचं महत्त्व कळलं नसलं तरी या भारतीय प्रतिभावंताची दखल परदेशी गणितज्ञांनी घेतली. १९७५साली अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक मार्टिन गार्डर यांनी एका बड्या सायन्स मॅगझिनमध्ये याबद्दल लेख लिहिला. त्यानंतर मात्र जगाला त्यांची दखल घेणे भाग पडले.

ही संख्या का रहस्यमय किंवा मॅजिकल आहे याबद्दल तुमच्या मनात निश्चित कुतूहल जागृत झाले असेल. चला तर मग पद्धतशीरपणे ६१७४नावाच्या या रहस्यमयी संख्येबद्दल जाणून घेऊया..

उदा. मनातल्या मनात एक आकडा निवडा, फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, संख्येत एक अंक एकदाच यायला हवा. उदाहरणार्थ १२३४ हा अंक चालेल पण १२१४ चालणार नाही, कारण त्यात १ हा अंक दोनदा येतो.

तर, हा काप्रेकर अंक कसा चालतो हे पाहण्यासाठी आपण १२३४ ही संख्या घेऊ.

आता ती उतरत्या क्रमात लिहू- ४३२१
पुन्हा ती चढत्या क्रमात लिहू- १२३४
आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू – (४३२१-१२३४= ३०८७)

आता ही नवी संख्याअंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- ८७३०
परत त्या संख्येला चढत्या क्रमात लिहू – ०३७८
आता मोठ्या संख्येला लहान संख्येने वजा करू – (८७३० – ३७८ =८३५२)

आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू – ८५३२
आता आलेले उत्तर अंकांच्या चढत्या क्रमात लिहू – २३५८
परत मोठ्या संख्येतून छोट्या संख्येला वजा करू – (८५३२ -२३५८ = ६१७४). हे ६१७४ उत्तर म्हणजेच काप्रेकरांचे मॅजिकल म्हणजे जादूई संख्येचे उत्तर.

आता या जादूई संख्येला वर दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे रिपीट करा, काही केले तरी उत्तर हे ६१७४ हेच येते. पुढे कितीही वेळा ही प्रक्रिया पुन्हापुन्हा केली तरी येणारे उत्तर हे ६१७४ हेच येते…

तुमच्या खात्रीसाठी दुसरी संख्या घेऊन ही प्रक्रिया करून पाहू. आता २००५ ही संख्या घेऊ, याच्यासोबत वर दिलेली प्रक्रिया पुन्हा रिपीट करू.

५२०० – ००२५ = ५१७५
७५५१- १५५७ = ५९९४
९९५४- ४५९९ = ५३५५
५५५३ – ३५५५ = १९९८
९९८१- १८९९ = ८०८२
८८२० – ०२८८ = ८५३२
८५३२ – २३५८ = ६१७४
७६४१- १४६७ = ६१७४

तुम्ही स्वतः हे पडताळून पाहा. उत्तर हे ६१७४ हेच येईल. आजही गणितज्ञांसाठी ही संख्या कोडे असली तरी तुम्ही जादू म्हणून ही ट्रिक दुसऱ्यांना शिकवू शकता.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

विज्ञानवारी पूर्व परीक्षा 2024

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, परभणी

    परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आयुका पुणे येथे ‘विज्ञानवारी’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने विज्ञानवारी पूर्व परीक्षेचेचे आयोजन खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आहे.

परीक्षेचे माध्यम : मराठी व इंग्रजी

परीक्षेसाठी पात्र वर्ग : इयत्ता 7 वी

परीक्षा दिनांक : दि. 20.02.2024 (ऑफलाईन व ऑनफलाईन)

परीक्षेचे स्वरूप : बहुपर्यायी (MCQ)

प्रश्नसंख्या : 30

गुणसंख्या : 30

विज्ञानवारीसाठी निवड करावयाची विद्यार्थी संख्या : 1 विद्यार्थी

ऑफलाईन परीक्षा केन्द्र : निवडक सर्व स्तरावरील शाळा, जि. परभणी.
ऑनलाईन परीक्षा : परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा. परीक्षेची लिंक आणि वेळ दि. 20.02.2024 या दिवशी https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.

Section A – Basic Science – 6 Questions

Section B – Practical Science – 6 Questions

Section C – Carrier Science – 6 Questions

Section D – Achievers Section – 6 Questions

Section E – Indian Knowledge System (IKS) Dr M. S. Swaminathan – 6 Questions

सोबत : अभ्यास विषयक मुद्दे

विज्ञानवारी पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम एस. सी. ई. आर. टी. व मधील इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी सामान्य विज्ञान व पाठ्यपुस्तकातून करावा. तसेच https://pasindia.org.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या स्त्रोतांचा वापर करावा.


अधिक माहितीसाठी संपर्क:

9028817712, 9405919184, 9921144842, 9422177478

*विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.

ऑस्ट्रोनोमिकल  सोसायटीच्या सक्रिय जनगणित कार्यशाळेस प्रतिसाद

ऑस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या सक्रिय जनगणित कार्यशाळेस प्रतिसाद

परभणी/ 5.01.2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन आले होते.

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी गत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 93 उपक्रमशील गणित शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण डॉ.विवेक माँटेरिओ आणि गीता महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात आलेले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ इंद्रमणी तर प्रमुख अतिथी म्हणून विवेक माँटेरिओ,गीता महाशब्दे, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे,डॉ.योगेंद्र रॉय, व. ना. मा. वी.शाखा अभियंता दीपक काशाळकर, संप्रियाताई राहुल पाटील,ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक,
डॉ.पी.आर. पाटील,विठ्ठल भुसारे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले गणित हा विषय सर्व शास्त्रांचा पाया आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक नागेश वाईकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुरवसे तर आभार सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक,डॉ.रणजीत लाड, श्रीमती कमल चव्हाण, प्रसाद वाघमारे,दत्ता बनसोडे,आकाश नरवाडे, आनंद बडगुजर,डॉ.बाहुबली निंबाळकर,अशोक लाड,दीपक शिंदे, प्रसन्न भावसार,ज्ञानराज खटिंग अदिनी परिश्रम घेतले.

होमी भाभा

डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर

हवामान शास्त्रज्ञ, उपग्रह शास्त्रज्ञ, अभियंता

25 मार्च 1933.
2 जानेवारी 2015.

गोवारीकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचं बालपण कोल्हापूरच्या कोष्टी गल्लीत गेले. त्यांचे वडील इंजिनिअर होते. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरात पुस्तकांचा जंगी खजिनाच होता. पुस्तकांच्या सहवासात राहून, वसंतरावांनाही लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. या पुस्तकांमधूनच त्यांना हेन्री फोर्ड भेटला. वसंतराव म्हणतात, ‘‘हेन्री फोर्ड हा माझा आदर्श होता आणि त्याच्यासारखाच आपणही मोटारीचा कारखाना काढायचा, असे माझे स्वप्न होते.’’

    त्या वेळी लहानग्या वसंतने मोटार बनवण्याचा. नुसता ध्यासच घेतला नाही, तर एक छोटेखानी मोटार तयार करून ती गल्लीत फिरवलीदेखील! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही, यावर वसंतरावांचा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी जे यश संपादन केले, त्यातून त्यांचे हे तत्त्वज्ञान त्यांनी सिद्ध करून दाखवले.

   कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर लंडनला रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रथम त्यांनी हार्वेल येथील अ‍ॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर समरफिल्ड रिसर्च स्टेशन, ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधनात्मक काम केले. त्याच दरम्यान डॉ.गोवारीकरांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.

संशोधन आणि विज्ञानविषयक साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनुभव घेत, डॉ.गोवारीकर रमून गेले होते. लंडनमध्येच संशोधनाच्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द करून तिथेच स्थिर होण्याच्या विचारात असतानाच, त्यांना भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात अर्थात इस्रो येथे पाचारण करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ.विक्रम साराभाई यांनी गोवारीकर यांची प्रगल्भ बुद्धी जोखली होती. वैज्ञानिक म्हणून स्वबळावर, स्वचातुर्याने, एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गोवारीकरांची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर अग्निबाणासाठी लागणारे इंधन तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली. सुरुवातीला अग्निबाणाला लागणारे घनइंधन विकसित करण्यासाठी डॉ.वसंत गोवारीकर इस्रो येथे प्रॉपेलंट इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

१९६७ साली केरळ राज्यातल्या थुंबा या गावी एका वापरात नसलेल्या जुन्या चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बनावटीच्या अग्निबाणासाठी लागणारे घनइंधन तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यातूनच पुढे जगातले सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंधन घडवले गेले. जुन्या चर्चचे पुढे भव्य वास्तूत रूपांतर झाले. तेथे संशोधन आणि विकसन विभाग स्थापन केला गेला एवढेच नाही, तर त्यांनी तेथे प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लांट यांसारखी युनिट्सही स्थापली आणि वाढवली. ‘सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’ हे युनिट तर नंतरच्या काळात जगातले सर्वांत मोठे घनइंधन तयार करणारे युनिट ठरले. डॉ. वसंत गोवारीकर भारताच्या अवकाश प्रॉपेलंट तंत्रज्ञानाचे (एच.टी.पी.बी.) जनक मानले गेले.

पुढे १९७९ साली त्यांची विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे अग्निबाणाच्या साहाय्याने, भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला आणि १९८३ साली एसएलव्ही-३ हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.

१९८६ ते १९९३ या कालावधीत डॉ. वसंत गोवारीकर यांची भारतीय शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या कालावधीत सलग चार पंतप्रधानांसाठी त्यांनी हे काम केले. विज्ञान सर्वसामान्य जनमानसात रुजले पाहिजे, भारतातल्या प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे विचार या द्रष्ट्या शास्त्रज्ञाच्या मनात सतत रुंजी घालत होते. त्या विचारांतून त्यांना देशभरात एक वैज्ञानिक चळवळ रुजवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन केले. त्यानुसार भारतात १९८७ सालापासून ही प्रथा अमलात आली आहे. दरवर्षी एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन देशभरातल्या गावागावांतून विद्यार्थ्यांसाठी, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व वयोगटांतल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वाढावा या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम राबवले जातात. त्यांमध्ये पथनाट्ये, व्याख्याने, प्रयोग मेळावे, विविध विषयांवरील कृतिसत्रे, सहली, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.

त्यांनी सुरू केलेला आणखी एक अत्यंत कल्पक, देशव्यापी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस! शालेय शिक्षण घेणाऱ्या तमाम भारतीय बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादन करण्यासाठीची मोठी पर्वणीच असते. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच, वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्व देशभरातल्या जनमानसात रुजवण्यासाठी, डॉ.गोवारीकरांच्या प्रयत्नाने एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवण्यात आली, ज्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, स्वयंसेवी गट, स्वयंसेवी संस्था, अशा देशभरातल्या जवळपास ५० संस्थांनी एकत्र येऊन, देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

१९९० सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘भारताची लोकसंख्या’ हा होता. भारताची लोकसंख्या आता स्थिरीकरणाकडे (जन्म आणि मृत्युदर समान झाल्याने लोकसंख्या तेवढीच राहणे) वाटचाल करीत आहे, हा त्यांचा निष्कर्ष आता जगन्मान्य झाला आहे.

    १९९३ ते १९९५ या काळात खतांविषयीच्या एका प्रकल्पावर भारत सरकारने डॉ.वसंत गोवारीकर यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. २००५ साली त्यांच्या प्रमुख संपादकपदाच्या नेतृत्वाखाली ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले. हा जगातील सर्व प्रकारच्या खतांची माहिती देणारा अतिशय परिपूर्ण असा ग्रंथ असून त्याचे काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करून, नेटकेपणाने पुरे केलेले आहे. अशा प्रकारचा खतांसंबंधीचा संपूर्ण माहिती देणारा जगातला हा पहिलाच ग्रंथ आहे.

आज डॉ. वसंत गोवारीकर यांना मॉन्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून सारा देश ओळखतो. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केली व त्यानुसार दरवर्षी मे महिन्यात आगामी मॉन्सूनचे भाकीत वर्तवण्यात येते. ते बहुतांशी अचूक ठरल्याने, समस्त भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठीच मदत मिळाली आहे.

१९९५ ते १९९८ या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. गोवारीकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. इस्रोचे ‘सतीश धवन डिस्टिंग्विश्ड प्राध्यापक’ म्हणून इस्रोतील तरुण शास्त्रज्ञांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष होते. इंफाळ येथील मणिपाल विद्यापीठाच्या कोर्टावरही त्यांची नेमणूक झाली होती. भारत सरकारच्या शुगर टेक्नॉलॉजी मिशनच्या स्थापनेपासून, म्हणजे १९९३ सालापासून ते त्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.

त्यांचे २०० हून अधिक विज्ञानविषयक शोधनिबंध, अनेक विज्ञान पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे हे लेख आणि पुस्तके अनेक विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासासाठी लावले गेले आहेत.

‘द अ‍ॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या इंधनासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना ‘आर्यभट्ट’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक संस्थांची सुवर्णपदके, मानाच्या पदव्या, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत.


2 जानेवारी 2015 रोजी वसंत गोवारीकर यांचे पुण्यात निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबलि लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट