विज्ञान दिनविशेष
३१ ऑगस्ट १८८९
थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.
एडिसनचा कायनेटोस्कोप
एडिसने १८८९ साली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायनेटोग्राफ आणि कायनेटोस्कोप तयार केले. कायनेटोग्राफने चित्रित केलेली फिल्म कायनेटोस्कोपद्वारा पीप शोसारखी दाखविली जाई. फ्रान्समध्येही ल्यूम्येअर बंधूंनी चलत्चित्र प्रक्षेपक तयार केला व २८ मार्च १८९५ रोजी लंच अवर ॲट द ल्यूम्येअर फॅक्टरी हा पहिला चलच्चित्रपट तेथील एका भागात दाखविला; तर २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये करमणुकीचे एक साधन म्हणून चार्ज ऑफ द ड्रॅगन्स नावाचा सु. १५ मी. (५० फूट) लांबीचा एक चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आला. नंतर १८९६ च्या २० फेब्रुवारी रोजी लंडनचा रॉयल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्येही असाच एक प्रयोग करण्यात आला. चलत्चित्रप्रक्षेपकात महत्त्वाच्या सुधारणा टॉमस अरमॅट याने केल्या. अशा प्रकारचा सुधारलेला चलत्चित्रप्रक्षेपक म्हणजेच व्हिटास्कोप होय. पूर्वी दृश्यांचे चित्रीकरण सूर्यप्रकाशात उघड्या जागी होत असे. पुढे १८९३ साली फेब्रुवारीमध्ये वेस्ट ऑरेंज येथे एडिसनने अंतर्ग्रह चित्रीकरणासाठी ब्लॅक मारिआ नावाचे पहिले चित्रपटनिर्मितीगृह बांधले.
सौजन्य
दिनविशेष-आणि-विज्ञान