आपण जाणून घेणार आहोत भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या बद्दल. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७ रोजी झाला. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले.
मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाईप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्यदेखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यू यॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले. स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत. भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले. मिनिटाला २४०० टाईप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते. त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले. समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा. वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र. धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ. जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात काही शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
निसर्ग आपल्याला विविध नैसर्गिक कृतीतून अवाक करत असतो. आपण म्हणतो की आपली सावली आपली साथ सोडून जाऊ शकत नाही. पण हे सत्य नाही. वर्षभरात असे दोन दिवस असतात ज्या वेळेत दुपारी काही क्षणा साठी आपली सावली आपली साथ सोडून जाते. त्या दिवसांना शून्य सावलीचा दिवस अर्थातच झिरो शॅडो डे अस संबोधलं जाते. दरम्यान परभणी अस्ट्रोनॉमिकल सोसायटी तर्फे सुद्धा ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले, ज्यास परभणीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शून्य सावलीचे विविध प्रयोग केले.
ह्या झिरो शॅडो डेच्या शुन्य सावली दिनाच्या दिवशी सुर्य आपल्या डोक्याच्या एकदम वर येत असल्याने आपणास आपली सावली दिसेनाशी होते.यालाच बिनासावलीचा दिवस असे देखील म्हटले जाते. वर्षातील खुप ठाराविक एक दोन दिवस आहे जेव्हा हा शुन्य सावलीचा अनुभव आपणास येत असतो. आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.
महाराष्ट्रातील विविध शहरे यांचे अक्षांश वेग वेगळे असल्या कारणाने विविध ठिकाणी शून्य सावलीची वेळ आणि दिनांक वेगळा असू शकतो.त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 वेळेमध्ये आपण शुन्य सावली दिवस अनुभवू शकतो. शहरे आणि शून्य सावली ची वेळ : परभणी – 12.19 मि., नांदेड – 12.17 मि., छ. संभाजीनगर – 12.25 मि., बीड- 12.23 मि., लातुर- 12.20 मि., हिंगोली-12.18 मि., धाराशिव- 12.22 मि., जालना – 12.23 मि.
पासच्या आवाहनास वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू श्री. इंद्र मनी ह्यांनी सुद्धा प्रतिसाद देत, शून्य सावली प्रयोग अनुभवले. त्यावेळी त्यांनी पास च्या विज्ञान चळवळ विषयी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रस्थावित परभणी विज्ञान संकुल परिसरात देखील शून्य सावली दिन विविध प्रयोगाच्या मार्फत साजरा केला गेला.
जी पाऊले अथक ध्येयाकडे उत्तुंग हिमनग तोकडा, मां भारतीच्या पुत्रापुढे…….. हे वर्णन ज्यांना लागू पडते त्या भारत मातेच्या सुपुत्राची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.एवरेस्ट ची उंची मोजणारे गणितज्ञ राधानाथ सिकदार……
त्यांचा जन्म, कलकत्ता येथे इसवी सन 1813साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तितुराम सिकदर. त्यांचे शालेय शिक्षण फिरंगी कमल बोस स्कूल आणि हिंदू स्कूल कोलकत्ता येथे झाले.लहानपणापासूनच त्यांना गणित विषयात विशेष रुचि होती. त्रिकोणमिती हा विषय त्यांचा विशेष लाडका! गणितावर त्यांचे लेखही प्रसिध्द होत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुढे ब्रिटिश सरकारनं त्यांना त्रिमितीय समितीत सहभागी करून घेतलं. भारतीय सर्वेक्षण खात्यात प्रगणक या पदावर ते रूजू झाले तेव्हा ते एकमेव भारतीय तर होतेच, शिवाय त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षं. त्यांची या क्षेत्रातील गती आणि ज्ञान इतकं थक्क करणारं होतं की देशातच नाही तर विदेशातही त्यांचा हात धरू शकणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. भारतीय सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न असा त्यांचा गौरवानं उल्लेख होऊ लागला. हवामान आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलं. वेधशाळेच्या कार्यपध्दतीत बदल करून हवेच्या दाबाच्या आकड्यांचे शून्य अंश सेल्सिअस तापमानासाठी रूपांतर करण्यासाठी म्हणून गणिती सूत्र शोधलं. खरंतर एव्हरेस्ट या शिखराला राधानाथांच्या नावानं ओळखलं जाणं जास्त योग्य होतं. तत्कालिन सरकारनं जरी एव्हरेस्ट यांचा सन्मान म्हणून या शिखराला त्यांचं नाव दिलं असलं, तरीही हे श्रेय पूर्णार्थानं राधानाथ यांनाच द्यायला हवं.त्रिमितीय समितीचं काम चालू असण्याचा तो काळ होता, १८५२ मधील. एका सकाळी राधानाथ सिकदर, घाईनं सर ॲण्ड्र्यु वॉ यांच्या ऑफिसमधे आले. त्यांचा चेहरा अत्यानंदानं चमकत होता. त्यावेळी त्यांनी एका दमात त्यांच्या साहेबाला सांगितलं, “सर मी जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर शोधलं आहे” व्यवसायानं गणितज्ज्ञ असणारे राधानाथ तत्कालिन ब्रिटिशराजमधील सर्वेक्षण खात्यात काम करत होते.
तत्कालिन सरकारनं हिमालयातील शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ यांचा अभ्यासगट नेमला होता. या प्रकल्पाचं नाव होतं, द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे (महा त्रिकोणमितीय सर्वेक्शण). राधानाथ हे या अभ्यास गटात सहभाग असणारे एकमेव भारतीय. सिकदारांनी सूर्य आणि रात्री दिसणारे तारे यांच्या निरीक्षणावर आधारलेली दिवसाच्या सेकंदाच्या अल्पांशापर्यंत अचूक वेळ समुद्रातील अकबोटींना इशारे देऊन कळविण्यासाठी एक संकेत प्रणाली स्थापन केली होती, ती इसवी सन 1853 पासून अमलात आली.
17 मे 1870 मध्ये गोंदालपारा येथे राधानाथ यांचे निधन झाले. अशा या हिमालया एवढ्या उत्तुंग बुद्धिमत्ता लाभलेल्या व तेवढ्याच मोठ्या मनाच्या गणित तज्ञाला कोटी कोटी नमन…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दिनांक 30/4/2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवशीय 'भौतिक संकल्पनांचे दृढ़ीकरण' या विषयाची कार्यशाळा,पशु शक्तीचा योग्य वापर योजना, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉक्टर बाहुबली लिंबाळकर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून त्यांचे राष्ट्राविषयीचे प्रेम व भारतीय विज्ञान चळवळीतील योगदान याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब होते.दैनंदिन व्यवहारात भौतिकशास्त्राचा वापर कसा असतो याची उदाहरणे देत डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील व डॉ. स्मिता सोलंकी लाभल्या होत्या. मुले अशा प्रकारच्या कार्यशाळेने प्रेरित होतात असे मत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कार्यशाळेचे प्रमुख डॉ. श्री जयंत जोशी हे मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र येथून खास उपस्थित होते.
कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भौतिकशास्त्रातील प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबक,गुरुत्वमध्य, अपकेंद्रबल, केंद्रगामीबल,घनता, घर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम या संकल्पनांचे दृढ़ीकरण करणारे प्रयोग डॉ.जयंत जोशी यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून करून घेतले. प्रयोग करताना मुलांचा आनंद ओसांडून वाहत होता.
तसेच शिक्षक व पालकांसोबतच्या परिसंवादात डॉ.जयंत जोशी सर बोलताना पूरक शिक्षण प्रणाली व शिक्षकांची भूमिका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून, प्रत्येक विषयाचे विषय सौंदर्य शिक्षकांनी मुलासमोर ठेवली तर त्यांना त्या विषयाची गोडी लागेल व ते आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जातील, अशी आशा डॉ.जयंत जोशी यांनी व्यक्त केली.कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या विषयाचे वेडे होण्याची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथून आलेले गणित शिक्षक श्री.नागेश वाईकर सर यांनी मुलांना गणितीय संकल्पनांचे प्रयोगतून ज्ञान दिले.जालन्याहून श्री अमोल कुंभळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी शिंदे ,श्री प्रसाद वाघमारे, श्री प्रवीण वायकोस व दीपक शिंदे यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश केंद्रेकर सर, प्रा. डॉ.सुनील मोडक सर, प्रा. विष्णू नवपुते सर व श्री नानासाहेब कदम व श्री रामटेके सर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी डॉ .रामेश्वर नाईक डॉ. प्रताप पाटील, सौ. कमल पाटील, श्री सुधीर सोनुनकर, डॉ. विजयकिरण नरवाडे, श्री हेमंत धनोरकर,श्री दत्ता बनसोडे , प्रसन्न भावसार, प्रसाद वाघमारे, डॉ.रणजीत लाड, ओम तलरेजा, अशोक लाड, संग्राम देशपांडे, डॉ.अनंत लाड, डॉ अमर लड़ा,नयना गुप्ता,पद्माकर पवार ,महेश काळे व संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम व कृषी विद्यापीठातील कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना डॉ.रामेश्वर नाईक सरांनी पुढील काळात पण अशाच प्रकारच्या विविध विषयातील कार्यशाळा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्याचे आश्वासन देऊन पूरक शिक्षणप्रणालीचे महत्व सांगितले.
नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
डॉक्टर चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 मध्ये लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रमण्यम हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडिट खात्यात नोकरीला होते. विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सी. व्ही.रामन हे चंद्रशेखरांचे काका होते. अशा हुशार घराण्यातील असलेले चंद्रशेखर स्वतः ही बालपणापासून प्रतिभावान व हुशार होते.
डॉक्टर चंद्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. 1930 साली डॉक्टर चंद्रशेखर बी.एस्सी.झाल्यानंतर केंब्रिज विद्यापीठातील ट्रीनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पीएच.डी. झाल्यानंतर डॉ. चंद्रशेखर शिकागो विद्यापीठात 1939 साली सहाय्यक म्हणून रुजू झाले. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी इंडियन जनरल ऑफ फिजिक्स मध्ये चंद्रशेखर यांची पहिली शोध पत्रिका प्रकाशित झाली. 11 जानेवारी 1935 ला इंग्लंड येथील रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत त्यांनी आपले शोध पत्र सादर केले. ज्यामध्ये छोट्या छोट्या पांढऱ्या रंगाचे तारे एक निश्चित द्रवमान प्राप्त केल्यानंतर आपल्या वजनात आणि वृद्धीत वाढ करू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की ताऱ्यांचे द्रव्यमान हे सूर्यग्रहापेक्षा 1.4 पट आहे. त्यामुळे ते तारे आकुंचन पावतात व जड होतात. तार्यावरील त्यांचे संशोधन कार्य आणि ‘चंद्रशेखर मर्यादा’ नावाचा सिद्धांत खगोलशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठी उपलब्धी मानली जाते. डॉक्टर चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे त्यांचा हा “चंद्रशेखर मर्यादा सिद्धांत” पुंजवाद आणि सापेक्षतावाद याची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा 44% इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. डॉक्टर चंद्रशेखर यांनी 1939 साली आपला सिद्धांत An Introduction to the study of stellar structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रूपात मांडला. 1983 साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉक्टर चंद्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1972 मध्ये ब्लॅक होलचा शोध लागला. कृष्णविवरांच्या शोधात चंद्रशेखरांचा सिद्धांत कामी आला.
अमेरिकेच्या नासा या संस्थेने अंतराळात सोडलेल्या चार भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष तरंग ग्रहण करणारी असून या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा ‘चंद्रा एक्स रे’या नावाने ओळखली जाते. ही वेधशाळा 23 जुलै 1999 रोजी अंतराळात सोडण्यात आली असून ती आज तगायात कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतीशास्त्र नावाची शाखा आहे. या विषयातील स्थिरअंकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले. तसेच एका लघुग्रहाला 1958 मध्ये चंद्रशेखर असे नाव दिले गेले. चंद्रशेखर यांनी सुमारे 380 शोधले आणि अकरा पुस्तके लिहिली. चंद्रशेखर हे 1952 ते 1971 या काळात एस्ट्रो फिजिकल जनरल या प्रतिष्ठित शोध नियतकालिकाचे संपादक होते. नोबेल पुरस्कारा व्यतिरिक्त त्यांना इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. विज्ञान शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या साठी आपले महत्त्वपूर्ण जीवन समर्पित करणारे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांनी 21 ऑगस्ट 1995 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ – २८ जून, इ.स. १९७२) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते.
जन्म- २९जून १८८३, कोलकाता,बंगाल,ब्रिटिश भारत
मृत्यू- २८ जून १९७२ कोलकाता,पश्चिम बंगाल, भारत
हे भारतीय शास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ होत.
त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले.तसेच औद्योगिक उत्पादन जोरदार वाढ करून बेरोजगारी कमी करण्याचा सरकारच्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी योजना तयार केली.
महालनोबिस यांची प्रसिद्धी ‘महालनोबिस अंतर’ यासाठी आहे जे की, एक संंख्याशास्त्रीय एकक आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली. आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांचा जन्मदिवस २९ जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिवस’म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमधे प्रो.महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे तसेच प्रेरणा देणे होय.