+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ

सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ


12 नोव्हेंबर 1896.
20 जून 1987.

शिकारी ते बर्डमॅन : सलीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष.

डॉ.सलिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू दिले. ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणजे भारताचे ‘पक्षिपुरुष’ म्हणूनही आज संपूर्ण जगाला त्यांची ओळख असली आणि त्यांच्या शास्त्रीय कार्याला जागतिक स्तरावरची मान्यता लाभली असली, तरी त्यापेक्षाही काकणभर सरस असणारे त्यांचे कार्य म्हणजे भारताला त्यांनी दिलेली निसर्ग संरक्षण आणि सुस्थापन चळवळीची देणगी.

     त्यांचा जन्म सुलेमानी मुस्ता अली इस्माइली कुटुंबात झाला. नऊ भावंडांमध्ये ते सर्वांत शेवटचे होते. आईवडिलांचे छत्र लवकर हरपल्यामुळे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या मामांच्या, अमिरुद्दीन तय्यबजी यांच्या, गिरगावातल्या खेतवाडीमधील घरी झाले. मामांकडे निरनिराळ्या प्रकारची अनेक हत्यारे आणि बंदुका होत्या. ते शिकारी होते. लहानपणी सलिमनी गंमत म्हणून  आणि खाण्यासाठी म्हणून अनेक चिमण्यांची शिकार केली होती. एकदा त्यांनी गळ्यावर पांढरा ठिपका असलेली चिमणी मारली. 
     परंतु धार्मिक घरामध्ये ती खाण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मामांनी त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बी.एन.एच.एस.) अभिरक्षक डब्ल्यू.एस. मिलार्ड यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्या पक्ष्याची ओळख करून देण्याबरोबर सलिमला सोसायटीतील पेंढा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह फिरवून दाखविला. पक्षिसृष्टीचे दार त्यामुळे उघडले जाऊन सलिम अलींना पक्षीविषयक अभ्यास गांभीर्याने स्वीकारणे शक्य झाले. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता.

     शालेय जीवनात सलिम अलींनी फारशी चमक दाखविली नाही. त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष रुची नव्हती. परंतु खेळांमध्ये गोडी होती. घरामध्ये निसर्गविषयक माहिती आणि त्या संदर्भातील साधनांची रेलचेल होती म्हणून त्याची परिणती सलिम अलींच्या मनात पक्षिशास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजण्यात आणि तो फोफावण्यात झाली. १९१३ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी प्राणिशास्त्र विषयात पदवी घेण्याच्या दृष्टीने सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे प्रवेश घेतला. परंतु लॉगॅरिथम्स आणि तत्सम अवघड गोष्टींमुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) तेव्हायला प्रयाण केले. तेथे त्यांचे बंधू जाबिर अली खाणधंद्यामध्ये होते. भावाला मदत करण्याबरोबर आजूबाजूला असलेल्या वनप्रदेशात त्यांची भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच त्यांची निसर्गशास्त्रज्ञ होण्याची कौशल्ये वाढीस लागली. 
     १९१७ साली भारतात परतल्यावर त्यांनी प्राणिशास्त्रविषयक एक वर्षाचा अनौपचारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम छंद म्हणून पूर्ण केला. फावल्या वेळात ते बी.एन.एच.एस.मध्ये जात. तेथे त्यांना भारतीय पक्षिसृष्टीचा परिचय झाला. तेथे त्यांची प्रेटर यांच्याशी गट्टी जमली. त्यांच्याबरोबर त्यांनी पक्षी जगतात बरीच मुशाफिरी केली. १९१८ साली त्यांनी तेहमिना नावाच्या आपल्या दूरच्या नात्यातील मुलीशी विवाह केला. लगेच ते दोघे तेव्हायला परत गेले. सलिम अलींना खाण धंद्यापेक्षा पक्ष्यांतच रस होता. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला धंदा पूर्णपणे बसला आणि १९२४ साली अली बंधू भारतात परतले.

     पक्षिजीवनाविषयीचे प्रशिक्षण घेण्याकरिता त्यांनी ठिकठिकाणी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांना बर्लिन विद्यापीठाच्या प्राणिसंग्रहालयाने प्रतिसाद दिला. प्रा. एरविन स्टेसमन यांच्या हाताखाली त्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेतले. अर्थात त्यासाठी त्यांना तत्कालीन वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी असलेल्या पक्षिशास्त्रज्ञांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. बर्लिनमधील सात महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायांत कडी चढविण्याच्या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन कार्यानुभव घेतला.

    १९३० साली भारतामध्ये पुन्हा एकदा नोकरीचा शोध सुरू झाला. योग्य नोकरी न मिळाल्यामुळे सलिम अली आणि तेहमिना यांनी अलिबागजवळच्या किहीम या किनारपट्टीवरील गावात मुक्काम हालवला. तेथेच त्यांनी आपला सारा वेळ पक्ष्यांचा मागोवा घेण्यातच घालवला. बाया सुगरण पक्ष्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अशा प्रकारे बाया सुगरण पक्ष्यांचे दीर्घकाळ निरीक्षण करणारे ते पहिलेच होते. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने त्यांच्या वर्तवणूकीविषयी होता. आजवर कोणी, कुठेच न नोंदवलेले जीवननाट्य त्यांनी प्रत्यक्ष बघितले.

     बाया नरपक्षी मादीबरोबर मिलन करण्याच्या हेतूने तिला आकर्षित करण्याकरिता शिंदीच्या झाडांवर घरटी विणतात. एका विशिष्ट टप्प्यावर ते घरट्याचे विणकाम थांबवतात. मादी त्याचे निरीक्षण करते. आंतररचना तपासते. घरटे पसंत न पडल्यास पुन्हा नवे घरटे उभारण्यास नराद्वारे सुरुवात केली जाते. पुन्हा तीच प्रक्रिया पार पडते. घरट्यास पसंती लाभल्यास त्याच घरट्यात लगेच मिलन उरकून पसंतीची खातरजमा होते. मग तो नशीबवान नर घरट्याची उर्वरित बांधणी पूर्ण करतो. त्यामध्ये मादी अंडी घालते, उबवते. घरटी सजीव होतात. नर मात्र एक घरटे बांधून पूर्ण होताच दुसरे घरटे बांधायला घेतो आणि नव्या घरोब्याच्या तयारीला लागतो. याच क्रमाने, एकाच हंगामात किमान तीन-चार माद्यांचा तो दादला होतो. पक्षीविषयक पुस्तकातून आजवर कोणीही न नोंदवलेला हा जीवनपट डॉ.सलिम अलींनी सोसायटीच्या जर्नलमध्ये एक प्रदीर्घ लेख लिहून प्रकाशित केला.
     सलिम अलींच्या या मूळ अभ्यासावरच या पक्ष्यांच्या संदर्भात पुढील अध्ययन झाले. प्रत्यक्ष अवलोकन करून खातरजमा झाल्यावरच शास्त्रशुद्ध पद्धतीने निष्कर्षाची मांडणी करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. भारतीय पक्ष्यांचा मागोवा घेऊन त्याचे सूचीकरण केले. भारतीय पक्षिशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध पायावर केली.

      त्यांचे पक्षी-सर्वेक्षणाचे अहवाल वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरले. आजवर विचारात न घेतलेल्या पर्यावरण, परिसंस्था, भौगोलिक घटकांचा विचारही त्यात होता. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पक्ष्यांच्या परिसंस्थेचा परिस्थितीच्या दृष्टीने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. बंगळुरूहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात, १९६३ साली ‘इकनॉमिक ऑर्निथॉलॉजी इन इंडिया’ या शोधनिबंधातून त्यांनी पक्षी-अभ्यासाचे शेती आणि जंगलांच्या संदर्भातील महत्त्व पटवून दिले. देशातील अन्नधान्य वाढविण्याच्या मोहिमेत पक्ष्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या खाद्यसवयींचा विचार व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहामुळे, जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नंतरच्या काळात अनेक भारतीय कृषिविद्यापीठांनी अभ्यासक्रम आखले, उपक्रम सुरू केले. पारिस्थितिकी किंवा इकलॉजीचे आद्य तज्ज्ञ म्हणून डॉ. सलिम अली यांना मान द्यायला हवा.

    पक्ष्यांचे वर्तन अभ्यासण्याकरिता त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यासही फार पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्या दृष्टीने ‘केवलादेव घना’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते. भरतपूरजवळील या पाणथळ प्रदेशात दरवर्षी करकोचे, बगळे, पाणकावळे, हविर्मुख (चमचे), क्रौंच इत्यादी पाणपक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधून डॉ.सलिम अलींनी आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीने लाखो पक्ष्यांना कडी चढवली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल घडून येतात, हे स्थलांतरित पक्षी कुठे कुठे विखुरतात, स्थानिक नि स्थलांतरित यांत संघर्ष होतो का, स्पर्धा असते का, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या परंपरागत जीवनात कोणता विक्षेप येतो, या आणि अशा दृष्टिकोनातून सालिम अलींनी अनेक अभ्यासप्रकल्पांची उभारणी केली. निरीक्षणातून पक्षिशास्त्र अभ्यासण्याला चालना मिळाल्यावर अनेक तरुण त्याकडे वळले. सलिम अलींच्या प्रयत्नांमुळे भारतभर अनेक ठिकाणी पक्षी-अभयारण्ये घोषित झाली.

     पक्षी-स्थलांतरणाचा त्यांचा अभ्यास एवढा गाढा होता, की जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या बाबतीत प्रश्‍नांची उकल करण्याकरिता सलिम अलींना पाचारीत असे. त्यांचे पक्षिप्रेम, प्राणिमात्राविषयीची आस्था ही केवळ भाबड्या भूतदयेपोटी नव्हती. मात्र निरनिराळ्या प्रकल्प उभारणीपायी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने, परिसंस्था नष्ट  होऊ लागल्यामुळे आणि अनेक पक्षिजाती नामशेष होऊ लागल्यामुळे त्यांना अतीव दु:ख होत असे. नुसते कायदे करून भागणार नाही, जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी व्याख्याने, फिल्म्स, स्लाइड्सद्वारा वन्यप्राण्यांचे महत्त्व पटवून देण्याचे त्यांनी सतत प्रयत्न केले.

     सायलेंट व्हॅली संरक्षणाच्या आंदोलनात त्यांच्या प्रयत्नांना १९७७-१९७८ सालांत निसर्गप्रेमी जनतेने खंबीर आणि ठाम पाठिंबा दिला. यावरून लोकमानसात त्यांचा पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा रुजण्याची पावती मिळते. पशुपक्षी राखायचे म्हणून तिथून माणसाला बाहेर हुसकायचे, अशा विचारांचा पाठपुरावा ते करत नव्हते.माणूस आणि निसर्ग यांत सुसंवाद आणि परस्परपूरकता राखण्याच्या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. अशा विचारांना प्राधान्य देणाऱ्या ‘सह्याद्री बचाव’, ‘मुंबई बचाव’ चळवळींना त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.

     भारतीय पक्षिशास्त्राचा अभ्यास खंडित होऊ न देता, तो पुढे चालू ठेवण्याची, त्याची प्रतिष्ठा वाढविण्याची आणि त्याला लोकमान्यता, लोकप्रियता मिळवून देण्याची कामगिरी सलिम अलींनी निष्ठापूर्वक पार पाडली. पक्षिशास्त्रात सतत नवीन भर टाकली. त्यांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे भारतात ठिकठिकाणी निसर्ग अभ्यास मंडळे, पक्षी निरीक्षण मंडळे, वृक्षमित्र संघटना उभ्या राहिल्या. सायलेंट व्हॅलीसारख्या घटना पुन्हा-पुन्हा घडू नयेत, त्यावर काही नियंत्रण असावे, लोकमताचा दबाव असावा, शास्त्रीय ज्ञानाचा अंकुश असावा, या दृष्टीने कायमस्वरूपाची एखादी योजना असावी यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे, पर्यावरण खाते निर्माण करावे असा आग्रह धरला. इंदिरा गांधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वन आणि पर्यावरण खात्याची निर्मिती १९८१ साली केली.

     १९४७ साली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून तर ते सोसायटीचे अविभाज्य अंगच बनले. संस्थेच्या नियतकालिकाचेही ते संपादन करीत. कोणत्याही कामाबद्दल वेतन वा मानधन न घेता, त्यांनी तिचा कारभार सांभाळला. तिचे कार्यक्षेत्र वाढवले. उत्तरायुष्यात मिळालेल्या नाना पुरस्कारांचे मानधनही त्यांनी सोसायटीच्या उत्कर्षासाठी वेचले. त्यांच्या अविरत प्रयत्नांमधूनच मुंबई विद्यापीठाने १९५७ साली सोसायटीला एम.एस्सी. आणि डॉक्टरेटचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली.

    शास्त्रज्ञ, संशोधक, कार्यकर्ता या आपल्या ओळखीबरोबरच डॉ. सालिम अली प्रसिद्ध आहेत, आपल्या निसर्गविषयक विशेषत: आपल्या पक्षीविषयक लेखनासाठी, पुस्तकांसाठी. त्यांचे आत्मचरित्र ‘द फॉल ऑफ द स्पॅरो’ १९८५ साली प्रकाशित झाले आणि गाजले. परंतु त्यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तके, तांत्रिक अहवाल लिहिले होते. त्यांच्या पुस्तकांचा वापर संदर्भग्रंथ म्हणून केला जातो. त्यांनी पक्षी-सर्वेक्षणावर आधारित ‘बर्ड्स ऑफ कच्छ’, ‘इंडियन हिल  बर्डस’, ‘द बर्ड्स ऑफ त्रावणकोर’- कोचिन, ‘पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अ‍ॅन्ड सब कॉन्टिनेन्ट’ इत्यादी पुस्तके लिहिली. भारतीय पक्षिशास्त्रात सर्वांत मोलाची भर घातली ती त्यांच्या ‘हॅण्ड बुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान’ या दशखंडात्मक ग्रंथराजाने.

     डॉ. सलिम अलींच्या निसर्गविषयक ज्ञानाची, अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निसर्गसंरक्षण, वन्यप्राणी संरक्षण समित्यांचे ते सदस्य होते. १९७६ साली त्यांना ‘नोबेल’ पारितोषिकाच्या तोडीचे ‘जे. पॉल गेट्टी’ पारितोषिक लाभले. त्याशिवाय त्यांना १९५८ साली ‘पद्मभूषण’ आणि १९७६ साली ‘पद्मविभूषण’ हे भारत सरकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९६७ साली ‘ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन’चे ‘सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. डच सरकारने ‘कमांडर ऑफ द नेदरलॅण्ड्स ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क’ देऊन गौरवान्वित केले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९८२ साली ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप इन ऑर्निथॉलॉजी’साठी त्यांची भारत सरकारने निवड केली. तीन मानद डॉक्टरेट मिळालेले डॉ. सलिम अली १९८५ साली राज्यसभेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले. १९८७ साली त्यांना निसर्ग आणि वन्यप्राणी यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल ‘दादाभाई नवरोजी पारितोषिक’ देण्यात आले.

    १९८७ साली, ९१ वर्षांचे असताना, प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने मृत्यूने गाठेपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले.

संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट 
सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ

भौतिशास्त्रातील नोबेल, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) यांना जाहिर

यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे.

रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल’हुलियर (Anne L’Huillier) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

त्यांना पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ

कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना करोना लसी साठी नोबेल जाहीर

   
    यंदाचा शरीर विज्ञान आणि ओषधशास्त्र यासाठीचा नोबेल करोना लसीची निर्मिती करणाऱ्या कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना जाहीर झाला आहे. त्यांनी mRNA या लशीची निर्मिती केली होती.

   जगभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेल पारितोषिक समजलं जातं. नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली आहे. करोना महामारीपासून वाचण्यासाठी mRNA या लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

    जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचं दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केलं. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग करोनाच्या काळात लढत होतं त्यावेळी २०२० मध्ये mRNA या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या दोघांनी शोध लावलेल्या mRNA या चा वापर केला. पुढे बायोएनटेक यांनी फायजर तर मॉडर्नानं वीआसी/ एनआयएच यांच्यासहकार्यानं लसींची निर्मिती केली.

    कैटिलिन कैरिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला होता. त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण केलं. पुढे त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक बनल्या. २०१३ नंतर कैटलिन कैरिको या बायोएनटेक RNA या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बनल्या.

   ड्रू वीजमैन यांचा जन्म १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये झाला. त्यांनी १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण केली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी काम केलं. १९९७ मध्ये त्यांनी स्वत: चा संशोधन ग्रुप सुरु केला. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.

mRNA लस कशी काम करते?

     कोरोना विषाणू शरीरात कसा पसरतो? कोणत्या भागावर त्याचा जास्त परिणाम होतो? हे सर्व समजून घेतल्यानंतर दोघांनी एमआरएनए लसीचे सूत्र विकसित केले. यानंतर लसही तयार करण्यात आली. वास्तविक, आपल्या पेशींमध्ये असलेला DNA मेसेंजर RNA म्हणजेच mRNA मध्ये रूपांतरित झाला. याला इन विट्रो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. कॅटलिन ९० च्या दशकापासून ही प्रक्रिया विकसित करत आहे.

     १९५१ साली अशीच परिस्थिती होती. जेव्हा पिवळ्या तापाने जगाला धडकी भरवली होती, त्यावेळी मॅक्स थेलर यांना या रोगावरील लस विकसित केल्याबद्दल औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
संदर्भ - इंटरनेट 
सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ

लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर.

20 जून 1869.
26 सप्टेंबर 1956.

कृषी क्रांती करणारी औजारे निर्माता.

   महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेल्या लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म बेळगावातील गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे बालपण बेळगाव येथे गेले. सुरुवातीला त्यांनी बेळगाव येथे सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले. त्याचबरोबरीने त्यांनी दुकानाच्या मागील बाजूस लहान शेडमध्ये कडबा कापणीचे यंत्र तयार करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे कोणत्याही एका कामाकडे लक्ष देता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे लक्ष्मणरावांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले व १९०३मध्ये सायकलचे दुकान तीन हजार रुपयांना विकले व कडबा कापण्याच्या यंत्रासोबत दुसरे शेतीला आवश्यक असणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले.

   भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सुमारे ८० टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरणारे यंत्र तयार केले तर आपल्या मालाला मागणी येईल, अशी त्यांना खात्री वाटली. त्या काळी पश्चिम भारतात, मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्वमशागतीसाठी लाकडी नांगराचा उपयोग करत असत. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्या वेळेच्या पारंपरिक शेती नांगरणीतील समस्यांची पूर्ण जाणीव होती. अशा स्थितीत नांगरणीसाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीच्या आऊतांचे नमुने पाहिले. 

   जमिनीच्या मशागतीसंबंधी शक्य ती सर्व माहिती त्यांनी गोळा केली. त्या वेळी शेतकी खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हार लिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाळ, पाठ, मधला भाग इ. बिडाचे होते व हाळीस व रूमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी बिडाची भट्टी त्यांनी माळरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सॅड व फायर क्ले मागवली. चार पोती कोक गोळा केला व साचे घालून ओतकामाला सुरुवात केली, परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढवून आपल्याला हवे तसे नांगराचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्या वेळेस किर्लोस्करांनी आपल्या छोटेखानी कारखान्यात सहा नांगर तयार केले, परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यात पडून राहिला. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित शेतकऱ्याला नांगराचे महत्त्व पटून ते सहाही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे ३५ नांगरांची मागणी केली.

   कालांतराने किर्लोस्करांच्या लक्षात आले की, काळ्या जमिनीत वापरण्यासाठीचा नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगरांचे काही भाग अधिक जड करून व हाळीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्यात आवश्यक त्या सुधारणा त्यांनी केल्या. हा सुधारित नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठवला. युरोपीयन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष असल्याचे सांगून विलायती नांगरांचीच शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपन्यांचे फाळ मागवले व त्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाळ तयार करण्यास कोणती पद्धत वापरतात याचा शोध लावला. ती पद्धत अवलंबल्यावर किर्लोस्करांचे फाळ विलायती फाळांसारखे होऊ लागले, परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यात अनेकानेक प्रयोग करून फाळ अधिक उपयुक्त केला. १९१०मध्ये किर्लोस्करवाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला. हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल करणारा ठरला.

   नंतर हळूहळू शेतकऱ्यांना लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली व त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून दिवसाला २००-२५० नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर होते. हे एक प्रकारे किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळालेले यशच म्हणता येईल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांत घडलेली ही एक क्रांतीच होय.

    किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, उसाचे गुर्‍हाळ आणि पाण्याच्या पंपाचे उत्पादनसुद्धा सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक-लोखंडी नांगर व दोन-पाण्याचा पंप, किर्लोस्करांनी दिला. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावाचे टपाल तिकीट काढले.

   त्यांचे सुपुत्र शंतनु किर्लोस्कर यांनी कारखानदारीत जगात नाव उज्ज्वल केले आहे.

संकलन - डॉक्टर बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट 
बाळ दत्तात्रय टिळक.

बाळ दत्तात्रय टिळक.


26 सप्टेंबर 1918.
25 मे 1999.

रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) १९६६ ते १९७८ या कालखंडातील संचालक – बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.

त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक जाणकार तंत्रज्ञ म्हणून ते परिचित होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.

त्या काळामध्ये वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणारे विविध रंग आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये नित्य लागणारी रसायने आपल्या देशात तयार होऊ लागलेली होती. तथापि दर्जेदार प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळत नसत. हे लक्षात घेऊन टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. तेथे प्रा. के. व्यंकटरामन हे अत्यंत नावाजलेले प्रोफेसर औद्योगिक रसायनशास्त्रातील दर्जेदार संशोधन करीत असत. त्यांचे मार्गदर्शन टिळकांना मिळाले.

१९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.

     इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअ‍ॅक्शन) असे नाव आहे. कृषी उद्योगामध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने गरजेचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. टिळकांनी कीटकनाशकांसंबंधी संशोधन सुरू केले.

१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली.

१९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. प्रा. रॉबिन्सन यांनी जीवशास्त्रामध्ये विशेष क्रियाशील असणाऱ्या अल्कोलॉइडवर्गीय रसायनांचे संशोधन केले होते, म्हणून त्यांना १९४७ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रा. वुडवर्ड यांनी प्रयोगशाळेत अनेक सेंद्रिय रसायने घडवलेली होती. त्याबद्दल त्यांना १९६५ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.

डॉ. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला. साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ तर झालाच, पण औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञांना रसायननिर्मिती करताना डॉ. टिळकांच्या मार्गदर्शनाची मदत झाली. रसायन उद्योगक्षेत्रातील अनेक उद्योजक, तंत्रज्ञ त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येऊ लागले. देशातील आणि परदेशातील अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांनी रसायननिर्मितीशी संबंधित अनेक व्याख्याने दिली. वैज्ञानिक संशोधन आणि विकास या संदर्भात अनेक आंतरदेशीय करार होत असतात. त्यासाठी परदेशात जाणाऱ्या पथकांचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते.

      मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. त्या काळात रसायननिर्मितीसाठी बहुतांशी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत असे. ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’च्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार डॉ. टिळकांनी प्रयोगशाळेच्या वाटचालीचा आराखडा बनवला.

    भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नेमून दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रासंगिक अडचणी दूर करण्यासाठी ते संशोधकांसह नियमितपणे बैठका घेत असत. छोट्या आणि मोठ्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी आणि रसायननिर्मिती करतानादेखील त्यांची दूरदृष्टी, अनुभव, बुद्धिमत्ता, तसेच कौशल्यदेखील उपयुक्त ठरले. उपयोजित संशोधन करीत असताना, रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनाकडे डॉ. टिळकांनी विशेष लक्ष दिले होते.

दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आणि ३५ जणांनी एम.टेक. किंवा एम.फिल.साठीचे प्रबंध लिहिले. त्यांचे अनेक विद्यार्थी रसायनशास्त्रामध्ये लक्षणीय संशोधन करू शकले. विशेषत: औद्योगिक रसायनशास्त्रामधील अनेक विद्यार्थी स्वत:चा उद्योग उभारू शकले.

    डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली. तसेच ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’, ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’, ‘इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ अशा कंपन्यांचे एक संचालक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली.

    महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले. भारत सरकारच्या ‘नॅशनल टॅलन्ट अँड टेक्नॉलॉजी’च्या संचालकपदी डॉ. टिळकांनी काही काळ कार्य केलेले होते. भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले, तेव्हा प्रयोगशाळेच्या संशोधनावर आधारित असलेल्या रसायनांचे औद्योगिक उत्पन्न सुमारे पंधरा लाख रुपये होते. १९७८ साली डॉ. टिळक सेवानिवृत्त झाले, त्या वर्षी तो आकडा ८१ कोटी रुपये एवढा वाढला होता. प्रयोगशाळेतील संशोधन केवळ प्रयोगशाळेतच राहता कामा नये, त्याचा औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग व्हावा, असे त्यांना वाटत असे. नित्य आयात केल्या जाणाऱ्या रसायनांचे भारतामध्येच उत्पादन व्हावे, म्हणून त्यांनी आयात-पर्यायी रसायनांचे संशोधन हाती घेतले होते. त्या काळामध्ये भारतात परकीय चलनाची खूप कमतरता होती. त्याची बचत होण्याकडे त्याचा उपयोग झाला.

    सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.

जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कर्करोगरोधक वनस्पतींचाही अभ्यास केला.

ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अ‍ॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली. त्यामुळे अनेक छोटेमोठे प्रकल्प त्यांना पार पाडता आले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेतर्फे ‘फोरम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ (एफ.ओ.एस.टी.इ.आर.ई.डी.-फॉस्टेरॅड) हा कक्ष त्यांनी सुरू केला. कृषी मालाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने काही यशस्वी प्रयत्न त्यांना त्यामुळे करता आले. विशिष्ट रसायनांचा सूक्ष्म तवंग जर एखाद्या छोट्यामोठ्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पसरवता आला, तर पाण्याचे बाष्पीभवन काही प्रमाणात थोपवता येते. बरेचसे पाणी जमिनीत जिरते. हे लक्षात घेऊन, याचे संशोधनही डॉ. टिळकांनी दीर्घकाळ केले.

डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला.
भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे, आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे ते मानद सदस्य झाले. के.जी. नाईक सुवर्णपदक (१९५९), बॅनर्जी सुवर्णपदक (१९६०) या सन्मानाचेदेखील ते मानकरी झाले. डॉ. टिळक औद्योगिक रसायनशास्त्राचे मान्यवर संशोधक होते. प्रयोगशाळेतील ज्ञान-विज्ञान आणि अनुभव यांद्वारे ग्रमीण विकास साधण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.

हृदयविकारामुळे त्यांचे 25 मे 1999 रोजी निधन झाले.

संकलन – डॉक्टर बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

सलीम अली – पक्षिशास्त्रज्ञ

डॉ सतीशधवन


जन्म. २५ सप्टेंबर १९२०

सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते.

त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.


धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. १९५१ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी केली. कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ अशी ओळख असलेल डॉ. सतीश धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधनाची सुरवात केली.

त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली.

श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय. १९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले. १९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली.

डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले. १९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता.

धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत. १० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली.

यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला.

पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला. या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले.

१९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला.

१९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय. १९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांना लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले. इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला.

डॉ.सतीश धवन यांचे ३ जानेवारी २००२ रोजी निधन झाले.

संदर्भ- संजीववेलणकर पुणे.
संकलन- डॉ बाहुबली लिंबाळकर