+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
थोर भारतीय शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांची जयंती उत्साहात साजरी

थोर भारतीय शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांची जयंती उत्साहात साजरी

परभणी : विज्ञान चौक , वसमत रोड ,परभणी येथे परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी मार्फत महान शास्त्रज्ञ श्री सत्येंद्रनाथ बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी सोसायटीचे सदस्य डॉ विजयकिरण नरवाडे , सहा प्राध्यापक , यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . ते म्हणाले, श्री सत्येंद्रनाथ बोस हे एक महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते . ते त्यांच्या क्वांटम मेकॅनिक्स मधील कार्यासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत . त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन सोबत काम केले असून बोस आईन्स्टाईन सांख्यिकी सिद्धांत आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेन्ट सिद्धांत मांडले . ज्यामधून अनुक्रमे पदार्थाचे मुलभुत कण बोसान व पदार्थाच्या पाचव्या अवस्थे बद्दल सैद्धांतिक पाया घालण्यात आला . त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते .
या प्रसंगी डॉ शेळके , स्त्री रोग तज्ञ ,श्री सुनील रायठठ्ठा उद्योगपती ,जालना, सुरेश केसापुरीकर ,गजानन सायखेडकर , विलास दहिभाते, चंद्रशेखर आलनुरे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक , इतर सदस्य व विज्ञान प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . सर्व उपस्थितितांचे आभार सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी मानले .

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

फिरती विज्ञान प्रयोगशाळा

स्थळ:- आचार्य ग्लोबल अकॅडमी
दत्तधाम परिसर, परभणी.

दि. 15/09/2025 व 16/09/25

सुहाना प्रवीण मसाले फिरती विज्ञान प्रयोगशाळा व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीतील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन फिरती प्रयोग शाळेच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना शाळेत स्वतः विज्ञान विषयातील जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांचे प्रयोग दाखवण्याचे कार्य या विज्ञान वारी व फिरती प्रयोगशाळा यांच्या मार्फत करण्यात आली आहेत.
याच प्रकारचे दोन दिवशीय प्रात्यक्षिके परभणी शहरातील आचार्य ग्लोबल अकॅडमी, दत्तधाम परिसर, परभणी. या शाळेत दाखवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले व त्यांना नवचैतन्य मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील कुतूहल जागृत करण्यासाठी या फिरत्या प्रयोगशाळेचे खूप मोठे योगदान व मोलाचा वाटा असल्याचे यातून दिसून आले. अंतराळात असणाऱ्या अनेक घटकांचे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल असते या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत अंतराळ व खगोलशास्त्र यांच्या विषयीची जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात वाढवण्याचे कार्य विविध व्हिडिओ च्या माध्यमातून करण्याचे कार्य या फिरत्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात आले आहे.यामध्ये परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक सर, उपाध्यक्ष श्री पि. आर. पाटील सर , मुख्य समन्वयक श्री केंद्रेकर सर मुख्य संयोजक श्री सुधीर सोनूनकर सर, यांच्या नेतृत्वाखाली
आणि विज्ञान संवादक म्हणून श्री लक्ष्मण सोनवणे सर ,श्री अमोल कदम सर , सौ. मोहिनी कच्छवे मॅडम,सौ. पूजा कासार मॅडम व चालक श्री. सचिन शिसोदे यांच्या सहकार्यातून करण्यात आले..

प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक सर यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सरांनी विज्ञान केवळ पुस्तकातील विषय नसून प्रत्यक्ष प्रयोग करणे व विज्ञानातील विविध संकल्पना शिकणे. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी धडपड केली पाहिजे. त्याशिवाय, विज्ञान विषय व त्यातील रस वाढणे शक्य नसते. नवीन गोष्टींना अजून नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करणे हाच विज्ञानाचा खरा अर्थ ठरतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी हितगुज सरांनी केले.

अध्यक्षीय समारोप

संस्थेचे सचिव मुख्याध्यापक श्री मनोहर सुर्वे सर यांनी नमूद केले की, विद्यार्थी केवळ पुस्तक ग्राही नसून तो प्रयोगशील असला पाहिजे. यासाठी आम्ही आतापर्यंत खूप सारे प्रयोगशील उपक्रमही राबवले आहेत. त्यात सुहाना मसाले व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारी फिरती प्रयोगशाळा यांचा प्रयोगशील उपक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले व त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचे काम या फिरत्या प्रयोगशाळे मार्फत होत आहे. यामुळे अशा विविध प्रयोगशील उपक्रमात आम्ही नेहमी आपली साथ देऊ व विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रदान करण्याचे कार्य करत राहू ग्वाही दिली.

आभार
संस्थेचे संचालक श्री बालाजी सुर्वे सर यांनी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व यामध्ये सहभागी असणारे सर्व प्रयोगशील शिक्षक वृंद यांचे आचार्य ग्लोबल अकॅडमी तील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या वतीने कौतुक पर शब्दात आभार मानले.

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा समारोप समारंभ

स्थळ- जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी

दिनांक- १२ ऑगस्ट २०२५

प्रवीण मसालेवाले पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरती विज्ञान प्रयोगशाळा , या उपक्रमाचा समारोप आज दि .12/09/2025 रोजी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मागील पाच दिवसांत शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांवरील प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच अंतराळ व खगोलशास्त्र विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढविण्यात आली. या उपक्रमाचा लाभ तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी भूषविले.समारोप कार्यक्रमासाठी परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, प्रा. पी. आर. पाटील, प्रा. प्रसाद वाघमारे व श्री लक्ष्मण सोनवणे, श्री अमोल कदम, सौ कच्छवे, सौ कासार, श्री सचिन शिसोदे हे सर्व विज्ञान संवादक सहकारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे मुख्यसंयोजक श्री सुधीर सोनूनकर , तसेच मुख्य समन्वयक श्री प्रकाश केंद्रेकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते

🎙️ प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
डॉ. रामेश्वर नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास फक्त पुस्तकापुरता न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगांमधून अनुभवावा. या प्रयोगशाळेमुळे त्यांच्या जिज्ञासेला नवे पंख मिळतील. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूनच आपण प्रगतिशील समाज घडवू शकतो.”

🎙️ अध्यक्षांचे समारोप
अध्यक्ष रामराव दादा लोहट यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,
आमच्या संस्थेचे ध्येय केवळ पुस्तकातील ज्ञान न देता प्रयोगशीलतेवर भर देणे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातात आणि समाजपरिवर्तनासाठी सक्षम होतात. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यार्थ्यांना अशा विज्ञानविषयक संधी सातत्याने उपलब्ध करून देत राहील .”

शेवटी आभारप्रदर्शन करताना आयोजकांनी या पाच दिवसीय उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकवर्गाचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!

विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.

विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.

फिरत्या प्रयोगशाळेची रचना

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी लाभ

 फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.

याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.

प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.

या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला

‘आकाशाचे नाते जोडणारा’ तेजस्वी ध्रुवतारा निखळला



    20 मे तारीख 2025 मंगळवारी सकाळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर सर यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कळाली आणि मन सुन्न झाले. सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की नारळीकर सरांचे गेल्या आठवड्यात त्यांचे हिप ऑफ फ्रॅक्चर चे ऑपरेशन झाले होते. त्यांना घरी आणले होते.  ते त्यांचे आई वडील बसत त्या खुर्चीवर तीन तास बसले. आयझर मध्ये गाडीतून चक्कर मारून आले. काल दिवसभर आनंदात होते आणि सकाळी सर अनंतात विलीन झाले. 
    विज्ञान क्षेत्रातील एक अद्वितीय ध्रुवतारा निखळला. ज्यांना लहानपणापासून आपले हिरो मानत आलो, विज्ञान अथवा वैज्ञानिक म्हटलं की मराठी घरांमध्ये पहिलं नाव उच्चारलं जायचं, 'नारळीकर'.गणित व खगोलशास्त्रामध्ये ज्यांच्यामुळे आवड निर्माण झाली असे जयंत नारळीकर सर आता पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाहीत या विचाराने मन दु:खी झाले. पण म्हणतात ना 'जातस्य ध्रुवो ही मृत्यू' तथा जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच. आमच्या पिढीला डॉ जयंत नारळीकर यांचा सारखा शास्त्रज्ञ व त्यांचा सहवास लाभणे हे आमचे भाग्यच. जसा सचिन तेंडुलकर प्रत्येकाला आपल्या घरातला सदस्य वाटायचा तसेच नारळीकर सरही प्रत्येक विज्ञान प्रेमीला आपल्या घरातला सदस्यच वाटायचे. त्यामुळे प्रत्येक विज्ञान प्रेमीला नारळीकर सर आपल्यात नाहीत हे ऐकून फार दुःख झाले. यानंतर डॉ नारळीकर सरांच्या सहवासातील आठवणींनी मनामध्ये गर्दी केली होती. नारळीकर सरांचे संशोधन, परदेशातील शिक्षण, भारतात आगमन, TIFR मध्ये संशोधन सुरू असताना जेष्ठ शास्त्रज्ञ श्री यश पाल यांच्या आग्रहाखातर 'आयुका'ची स्थापना व व विस्तार, विज्ञान साहित्याची निर्मिती व अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये केलेली बहुमोल कामगिरी हे सर्व आठवले. त्यांची गणितातील आवड हे मात्र वाखाणण्याजोगी होती.  नारळीकर सरांचे शिक्षण संशोधन याबद्दल अनेक मान्यवर त्यांच्या लेखांमधून ही माहिती देतीलच पण मला उमजलेले नारळीकर सर मी या लेखात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
     आयुकामध्ये JVN या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले, आयुकाचे चैतन्य आणि श्वास असणारे असलेले नारळीकर सर यांच्या विज्ञान साहित्याबद्दल सांगायचे झाल्यास मी शाळेत असताना 'आकाशाशी जडले नाते, वामन परत न आला, प्रेषित या कादंबऱ्या वाचण्यात आल्या. प्रेषित व यक्षांची देणगी या कादंबऱ्यांनी तर प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि त्याचे गारुड आजतागायत कायम आहे.  विज्ञानातील संकल्पना विज्ञान कथांच्या माध्यमातून अतिशय सोप्या करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना विज्ञानामध्ये गोडी निर्माण केली.  विशेषतः मराठी भाषेमध्ये सरांनी विपुल लिखाण केले.  आपण साहित्यिक नाही हे वारंवार सर सांगत आले मात्र त्यांची पुस्तक वाचल्यानंतर असे कळते की साहित्याबद्दलची त्यांची जाण किती मोठ्या उंचीची आहे. 

14 जानेवारी 2017 रोजी नारळीकर सर परभणीला आले असता त्यांची भेट घेण्याचा योग आला आणि त्यांचा प्रवासी प्रबंधक म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. या दिवसभरात नारळीकर सरांना अजून जवळून अनुभवता आले. त्यामध्ये तुमच्या स्वभावातील नम्रपणा, आपण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असताना देखील प्रत्येक व्यक्तीला बोलताना असणारी अदब, त्या व्यक्तीची व्यवस्थित विचारपूस सर करायचे. नारळीकर सरांना लहान मुले यांच्या बद्दल खूप कौतुक आणि कुतुहल होते. लहान मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी व तो मनात रुजवण्यासाठी सर सर्वतोपरी प्रयत्न करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी शाळे शिक्षण घेत असताना आपण आयुका येथे भेटलो होतो आता वीस वर्षानंतर आपण भेटतोय आणि मी गणित या विषयांमध्ये पदवी मिळवत आहे. हे एकूण सरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सौ मंगला नारळीकर यांना म्हणाले की ‘’अगं हा तुझ्या विषयाचा आहे बरं का?” तेव्हा तितक्यात मिश्किल पद्धतीने मंगला मॅडमने देखील त्यांना उत्तर दिले की ‘’अरे हो का ! गणिताबद्दल तू काय बोलणार बरं?’’ हे ऐकून त्या ठिकाणी चांगला हशा पिकला होता. असे अनेक प्रसंग या दाम्पत्यांच्या जीवनात घडले असतील. सर्वजण सरांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होते पण मात्र नारळीकर सर वैतागून गेले होते पण मी मात्र त्यांना इच्छा बोलून दाखवली की मला तुमच्या सोबत एक फोटो घ्यावयाचा आहे. तेव्हा त्यांनी म्हणाले की हो नक्कीच! माझ्या बाजूला बसा. पण मात्र मी त्यांच्या पायाशी बसून फोटो काढला आणि मनात म्हणालो ‘मम पामरासी काय थोरपण, पायीची वाहने पायीच बरी.’

होएल-नारळीकर स्टेडी स्टेट थेअरीचा सिद्धांत मांडतानाचा एक अनुभव नारळीकर सर सांगतात की आदल्या दिवशी फ्रेड होएल सरांनी त्यांना या सिद्धांतावर वैज्ञानिक मंडळी काय उलट प्रश्न विचारू शकतात याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यानुसार सादरीकरणाच्या आतल्या रात्री नारळीकर सरांनी या सर्व उलट प्रश्नांची शक्यता व त्यावरील उत्तरे यांचा अभ्यास केला व यशस्वीरित्या तो प्रबंध सादर केला. हा प्रसंग मी माझ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग मांडताना सांगितला तेव्हा विद्यार्थ्यांनी तसेच केले आणि त्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. यानंतर दिवसभरात सरांकडून हे असे आणि अनेक प्रसंग सर सांगत राहिले आणि त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. संध्याकाळी सरांचा ‘अवकाशातील विचित्र वर्षाव’ या विषयावर मराठीमध्ये व्याख्यान झाले आणि या व्याख्यानासाठी तुडुंब गर्दी झालेली होती. नंतर सर पुण्याला परत निघत असताना मी भारताच्या मंगळयान मोहिमेवर एक छोटेसे इंग्रजी भाषेतून संकलित पुस्तक तयार केले होते ते सरांना दाखवले सरांनी बघितल्यानंतर आनंद व्यक्त केला पण मात्र हे जर मराठीमध्ये लिहाल तर अजून आपल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असे सुचवले. अगदी असेच मला श्री मोहन आपटे यांच्याकडून देखील सुचवण्यात आले होते.

यानंतर मात्र मी पुढचे सर्व लिखाण ते वर्तमानपत्रातील असो किंवा एखाद्या वैज्ञानिक घटनेबद्दल असो ते मराठी मधून लिहू लागलो आणि यानंतरच सरांना भेटण्यासाठी आलेले परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, डॉक्टर पी आर पाटील आणि सुधीर सोनुनकर या तीन महारथींची भेट व त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध की जो आजतागायत कायम आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामुळे सरांचे सरांकडून बरेच काही शिकता आले व मिळवता आले. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे विज्ञान वारी हा उपक्रम दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात येतो यात विद्यार्थ्यांना एका परीक्षेद्वारे निवडून आयुका पुणे येथे नेण्यात येते . यामध्ये नारळीकर सरांचा ‘Ask a Scientists’ कार्यक्रम असतो यामध्ये लहान मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरे सर शास्त्रीय पद्धतीने व तितक्यात मिश्किल पद्धतीने देतात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो हेच मुलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि परभणीतील विद्यार्थ्यांची जवळपास 80 टक्के प्रश्न त्यामध्ये घेतले जातात याबद्दल नारळीकर सरांनी नेहमीच कौतुक केले आहे व याची नोंद घेतली आहे.

दोन वर्षांपूर्वी सरांच्या पत्नी सौ मंगला मॅडम यांचे निधन झाले आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाला नारळीकर सरांना व्हीलचेअर वर पाहिले तेव्हा मात्र काळजात चर्रर झाले. हिरोला व्हीलचेअर वर बघून खूप वाईट वाटले आणि यावर्षी नारळीकर सर खूप आजारी असताना देखील गणित या विषयावर सरांनी ‘Ask a Scientists’ कार्यक्रमा ऐवजी गणित या विषयावर व्याख्यान दिले आणि वाटले की आता सरांनी एक नवीन इनिंग सुरू केली आहे. पर्यंत सरांची बुद्धी विलक्षण साथ देत होती. पण सर मात्र शरीराने खूप थकले आहेत असे दिसत होते. मी माझा मित्र जयेश चाचड आम्ही सरांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि तसेच घडले 20 मे मंगळवारी सकाळी नारळीकर सर आपल्यात नाहीत ही बातमी कळली आणि मन सुन्न झाले. पृथ्वीवरील एक अढळपदी विराजमान असलेला तेजस्वी तारा लुप्त झाला अशीच त्यांच्या बद्दल प्रत्येकाची भावना झाली. जरी नारळीकर सर आपल्यात नसले तरी देखील त्यांनी जो विज्ञानाचा त्यांच्या साहित्याचा जो ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे, जो मार्ग आखून दिला आहे त्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण मात्र आकाशाशी नाते जोडणाऱ्या या व्यक्तीच्या कार्याला एका लेखात कवेत घेणे कसे शक्य होईल बरे! जोपर्यंत सूर्य-चंद्र असतील तोपर्यंत या ‘आकाशाशी नातं जोडणाऱ्या’ या तेजस्वी ताऱ्याचे आढळपद प्रत्येक विज्ञान प्रेमीच्या मनात कायम राहील.

प्रसाद वाघमारे
खगोलशास्त्र तथा गणित अभ्यासक
सहसचिव, परभणी कल सोसायटी, परभणी

परभणीकरांनी वाहिली खगोलशास्त्रज्ञ डॉ नारळीकरांना श्रद्धांजली

दिनांक २० मे २०२५, परभणी

पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज दिनांक 20 मे 2025 रोजी , आकाशाशी जडलेले नाते ,असलेल्या प्रा डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणीकरांच्या वतीने अर्पण करण्यात आली.

जगातील ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांनी केलेल्या कार्य अगदी सोप्या भाषेमध्ये खगोलाचा अभ्यास, खगोलीय गोष्टी आहेत , त्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मांडण्याचा काम आदरणीय प्रा डॉ जयंत नारळीकर यांनी केलेला आहे

परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल , परभणी यांच्या वतीने विज्ञान चौक,परभणी या ठिकाणी डॉ नारळीकर यांना , त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजयजी ससाने (शिक्षणाधिकारी योजना) तसेच आदरणीय डॉ पी आर पाटील सर, सुभाष जाधव सर, ओमसेठ तलरेजा, नागेश वाईकर सर, प्रद्युम्न शिंदे डॉ रवी शिंदे, प्रा राम कराळे त्याचबरोबर प्रसाद वाघमारे तसेच सुधीर सोनूनकर व विज्ञानप्रेमी परभणीकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

त्यांच्या कार्याची ओळख ही चिरंतन आणि शाश्वत असून, त्यांच्या कार्याचा उपयोग, सर्व खगोल संशोधन करणाऱ्यां विद्यार्थ्यास , संशोधकास उपयोग होईल. प्रा डॉ जयंत नारळीकर यांना परभणीकरांच्या वतीने, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.