बानु कोयाजी या भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ होत्या. कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्या पुण्याच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालक होत्या. समाजातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले होते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्या केंद्र सरकारच्या आरोग्य सल्लागार बनल्या होत्या आणि तिच्या कार्यक्षेत्रात त्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध होत्या. कोयाजी यांना सार्वजनिक सेवेसाठी 1989 मध्ये पद्मभूषण आणि 1993 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते
७ सप्टेंबर १९१७ रोजी मुंबईमध्ये बानू कोयाजी यांचा जन्म झाला. पुढे याच बानू कोयाजी पुढे पदमभूषण डॉ. बानुबाई कोयाजी म्हणून प्रसिद्धीस आल्या. बानुबाई यांचे वडील पेस्तनजी कापडिया हे एम.डी. होते. १९४६ मध्ये बानुबाई मुंबईच्या नावाजलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम.डी. झाल्या. पुढची काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं.
बानुबाई कोयाजी या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राच्या तज्ञ् होत्या. बानुबाई या कायम सकारात्मक आणि उच्च विचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या होत्या. बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी यांचं काम बघून बानुबाईंना एक कळून चुकलं होतं कि वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे.
आपल्या समाजात स्त्रियांचे प्रश्न महत्वाचे आहेत. भारतीय समाजाला स्त्रीतज्ञ आणि प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ आहे, हे ध्येय त्यांनी आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला.
पहिल्या सहा महिन्यांसाठी बानुबाई फक्त काय काम चालत हे बघण्यासाठी पुण्याच्या के इ एम रुग्णालयात आल्या आणि कायमच्याच के इ एमच्या झाल्या. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.
१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले. के.इ.एम हॉस्पिटलसोबत त्या ५५ वर्षे कार्यरत होत्या.
बानुबाईंनी आपलं काम फक्त के. इ. एम पुरतं मर्यादित ठेवलं नाही तर त्याचं स्वरूप मोठं करून त्या सगळ्या क्षेत्रात काम करत राहिल्या. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली.
डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. तब्बल ३०० गावांमध्ये त्यांनी कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना रोजगार मिळेल यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं.
डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. अनेक कामांमध्ये डॉ.बानूबाई पटाईत होत्या.
त्यांनी त्यांच्या कामाव्यतिरिक्त एक महत्वाचं आणि वेगळं काम केलं होतं. सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. ‘सकाळ’ चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून ‘सकाळ’ च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी ‘सकाळ’च्या संचालक झाल्या. ‘सकाळ’ चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.
आपल्या कामामुळे त्या भारताच्या स्वास्थ्य सल्लागार समितीच्या सदस्य होत्या. जागतिक पातळीवर मॅगसेसे अवॉर्डमुळे प्रसिद्ध होत्या. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पदमभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. के इ एम म्हणजे बानू कोयाजी हे सेगमेंट अगदी फिट्ट झालं होतं.
१५ जुलै २००४ ला डॉ.बानुबाई कोयाजी यांचं निधन झालं पण आपल्या कामामुळे त्यांनी भारताला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख दिली.
एम.ए.ला सुवर्णपदक मिळालं आणि लगेच ‘टीआयएफआर’ मध्ये गणितात संशोधन सुरू झालं. गणितात करिअर करण्याच्या दिशेनं सुरू झालेल्या प्रवासाला भलामोठा यू-टर्न मिळाला तो लग्नाचा. तोही थेट ‘केंम्ब्रिज’ला पोहोचवणारा. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संस्कारांप्रमाणे संसार सुरू झाला. मुलींचा जन्म झाला आणि करिअर अधिकच दूर गेलं. पण कालांतरानं भारतात परतल्यावर गणिताशी जुळलेली नाळ पीएच.डी. मिळवून गेली आणि मग गणितातलं संशोधन पुन्हा एकदा सुरू झालं. गणित शिकवणं, सोप्या भाषेत पुस्तकनिर्मिती करणं, यात डॉ. मंगला नारळीकर यांचं करिअर पुन्हा एकदा बहरत गेलं.. पण तत्पूर्वीच्या ‘गद्धेपंचविशी’तल्या आयुष्यानं जगणं मात्र अधिक आनंदी केलं..समृद्ध केलं..
या सदरासाठी माझे २० ते ३० वर्षे वयातील अनुभव लिहिण्याची विचारणा झाली तेव्हा मी जरा बिचकतच हे काम कबूल केलं. कारण ‘गद्धेपंचविशी’ या वाक्प्रचारात त्या तरुण वयात केलेली साहसी, कदाचित धोका पत्करूनही अंगावर घेतलेली कामं, क्वचित वेडेपणाकडे झुकणारे उपद्व्याप, एखाद्या तत्त्वाला किंवा ध्येयाला वाहून घेणं, असे प्रकार अंतर्भूत असतात. माझ्या आयुष्यात असं काही झालं नाही.
साधारण १९४४ ते १९६५ या काळात, मुंबईतील मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी कुटुंबात वाढलेली मी. माझी स्वप्नं तशी साधीच होती. एखाद्या विषयात अभ्यास करावा, चांगली पदवी, जमल्यास पैसे मिळवावेत, योग्य तरुणाशी विवाह करून संसार करावा. तो करताना आधी घर आणि घरातील माणसं यांची देखभाल करून वेळ मिळाल्यास करिअरचा विचार करावा हेच संस्कार होते आणि ते मला मान्यही होते. याच काळात सर्वात जवळचं, नाजूक नातंदेखील विणायचं असतं. तर अशा माझ्या २० ते ३० वर्षे या वयातील काही सांगण्याजोगे, मजेदार किंवा विचार करण्यास प्रवृत्त करणारे अनुभव सांगते.
शिक्षणात मी हुशार विद्यार्थिनी होते, शाळेत मला सगळे विषय आवडत होते, जमत होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांचे पर्याय होते. कोणी डॉक्टर होण्यास, तर कोणी मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुचवलं. बहुधा ते जमलंही असतं. पण काकांनी मला स्पष्ट सांगितलं, की सर्वार्थानं कामावर लक्ष देऊन ती नोकरी करायची असेल, तरच ती परीक्षा द्यावी, नाही तर एका लायक व्यक्तीची संधी तू घालवशील. लग्न करून संसार सांभाळत तो मार्ग झेपेल याची खात्री नव्हती. मला गणित हा विषय खास आवडे. म्हणून त्याचाच अभ्यास करायचं ठरवलं.
‘इंटर आर्ट्स’, ‘बी.ए.’, ‘एम.ए.’ या सगळ्यांत मी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून अनेक बक्षिसं, पदकं मिळवली. बहुतेक हुशार विद्यार्थी विज्ञान शाखा निवडून डॉक्टर किंवा अभियंता व्हायला जात. त्यामुळे ‘आर्ट्स’ला चढाओढ कमी असे, हे महत्त्वाचं कारण माझ्या सतत पहिलं येण्यामागे आहे. नंतर मी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या प्रसिद्ध संस्थेत गणितात संशोधन करण्यास प्रवेश घेतला, तिथे काम चांगलं चालू होतं.
मला काही माझ्या अभ्यासाच्या किंवा थोडा वेळ केलेल्या नोकरीच्या काळात जोडीदार भेटला नाही. त्यामुळे पाहून, ठरवूनच लग्न करावं लागणार हे उघड होतं. १९६३ च्या सुमाराला काही हितचिंतकांनी ‘स्थळं’ सुचवली होती. त्यात जयंत नारळीकर हे नाव देखील होतं. मला माझ्या काका-काकूंनी मुलीप्रमाणे वाढवलं होतं. कारण मी सहा महिन्यांची असताना माझे वडील कर्क रोगानं वारले, तेव्हा आईनं मला आणि माझ्या मोठय़ा भावाला मुंबईला काका-काकूंच्या जवळ ठेवलं आणि ती स्वत: पुण्याला तिच्या आईवडिलांच्या जवळ राहून वैद्य आणि डॉक्टर झाली. तिनं अनेक वर्षं ‘ताराचंद रामनाथ रुग्णालया’त रुग्णसेवा आणि आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण देण्याचं काम केलं. काका- बाळासाहेब राजवाडे मुंबईत ‘लेबर ऑफिसर’ होते आणि मामा- बाळासाहेब चितळे हे पुण्यात प्रथम बांधकाम कंत्राटदार होते, नंतर श्रेयस हॉटेलचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हा लग्नाची बोलणी करणं वगैरे जबाबदारी काका आणि मामा यांची होती. त्याप्रमाणे काकांनी नारळीकरांकडे पत्रानं एक प्रस्ताव धाडला होता. पण त्यावर प्रगती झालेली नव्हती, कारण जयंत इंग्लंडमध्ये, त्याचे आईवडील अजमेरमध्ये, तर आम्ही मुंबईत होतो.
दरम्यान, १९६४ च्या जूनमध्ये जयंतचं फ्रेड हॉइल यांच्याबरोबरचं गुरुत्वाकर्षणावरील काम प्रसिद्ध झालं आणि तो एकदम जगप्रसिद्ध तरुण शास्त्रज्ञ झाला. त्याच वेळी मी ‘एम.ए.’च्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवून पहिली आले होते. आधी सांगितल्याप्रमाणे ‘टीआयएफआर’मध्ये लगेच संशोधनाला सुरुवात झाली. जयंत १९६५ च्या हिवाळ्यात भारत भेटीवर आला, त्या वेळी माझं ‘टीआयएफआर’ मध्ये काम सुरू झालं होतं. लोकांनी पाहिलं, की एकाच विषयात काम करणारा तरुण आणि तरुणी, दोघेही खूप हुशार, योग्य वयाचे आहेत, तर त्यांचे लग्न व्हावे, किंवा ते होईलच! काही लोकांना राजवाडय़ांच्याकडून गेलेल्या जुन्या प्रस्तावाची माहिती असावी. परंतु दोन्ही घरांच्या लोकांची एकमेकांशी भेट किंवा परिचयही झालेला नव्हता. जयंत तर ‘सीएसआयआर’नं (काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च) आखलेल्या त्याच्या दौऱ्यात अतिशय व्यग्र होता. या ट्रिपमध्ये लग्नाचा विचारही करु शकत नव्हता. त्यानं तसं आई-वडील आणि त्याचे मामा वगैरेंना सांगितलं होतं. पुण्यात तो आणि त्याचे आई-वडील मामांकडे, प्रा. हुजूरबाजारांकडे असताना माझे मामा त्यांना भेटण्यास गेले, त्या वेळी नारळीकर मंडळींकडून त्यांच्यावर अचानक अग्निवर्षांव झाला. असं झालं होतं, की जयंत नारळीकर याचं लग्न मंगला राजवाडे हिच्याशी (म्हणजे माझ्याशी)ठरल्याची बातमी लोकांमध्ये पसरली होती, अर्थात ती अफवा होती. पण त्यामुळे लग्नासाठी इतर प्रस्ताव किंवा बोली भाषेत अपेक्षित मुली सांगून येणं थांबलं होतं. त्यामुळे ही अफवा राजवाडय़ांच्या लोकांनी (म्हणजे माझ्या घरच्यांनी!) मुद्दाम पसरवली असा नारळीकरांचा समज झाला होता. त्यामुळे तात्यासाहेब नारळीकरांनी (जयंतच्या वडिलांनी) या लोकांची खरडपट्टीच काढली. तेव्हा माझ्या मामांनी शांतपणानं त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, की अशी अफवा पसरणं मुलीच्या दृष्टीनं अधिक धोक्याचं असतं. कारण एकदा ठरलेलं लग्न मोडलं, तर आपल्या समाजात मुलीची जास्त नाचक्की होते, तेव्हा अशी अफवा पसरण्यासाठी आम्ही जबाबदार नाही. त्यानंतर अर्थात हा प्रस्ताव पूर्णपणे बारगळला असं आमचे लोक समजून चालले.
पुढे नारळीकर कुटुंब महाराष्ट्रात इतर शहरात गेलं, त्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं, की त्या-त्या शहरात कुणी योग्य वयाची ‘स्कॉलर’ मुलगी असेल, तर तिचं लग्न जयंत नारळीकरशी ठरल्याची अफवा पसरते आहे! मग त्यांचा गैरसमज दूर झाला. जयंत त्याचा दमवणारा दौरा आटोपून इंग्लंडला परत गेला. नंतर त्याच्या आईवडिलांनी लग्नासाठी आलेले अनेक प्रस्ताव तपासले, विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या उपवर तरुणींची माहिती त्यात होती. काही मुलींची भेट घेण्याचं ठरलं. तात्यासाहेबांनी सप्टेंबरमध्ये माझ्या काकांना पत्र पाठवून तसं कळवलं आणि भेटण्यास मला अजमेरला घेऊन येण्याचं सुचवलं. जयंत डिसेंबरमध्ये येणार होता, त्या वेळी जमल्यास लग्न ठरवायचं होतं. त्या वेळी मी मामांबरोबर तिथे जाऊन आले. नंतर डिसेंबरमध्ये जयंतशी भेट होणार होती, तेव्हा काका माझ्याबरोबर होते. जयंत आणि मी अजमेरच्या ‘फॉय सागर’ तलावाभोवती फिरायला गेलो आणि थोडय़ा गप्पा मारल्या. प्रथम मी जरा बिचकत होते, पण ‘केंम्ब्रिज’च्या जीवनातील मजेदार गोष्टी सांगून जयंतनं मला हसवलं आणि मी मोकळेपणानं बोलू लागले. लग्नासाठी जयंतनं एकच मुलगी पाहिली, मीही एकच मुलगा पाहिला आणि आमचं लग्न ठरलं. पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे त्यानं मला पत्र लिहून ‘प्रपोज’ केलं, ते मी स्वीकारलं!
‘ टीआयएफआर’ मध्ये राजीनामा देऊन लग्न करून मी ‘केंम्ब्रिज’ला गेले. तिथे संसार मांडताना अर्थात उत्साह होता, पण स्वयंपाक करणं, घर चालवणं हे अनुभवातून शिकायचं होतं. करिअरचा तेव्हा खास विचार नव्हता. गणित विषयाची, आवडणाऱ्या शाखांची व्याख्यानं ऐकणं, तिथे ‘पार्ट ३’चा अभ्यास करणाऱ्यांना एक ‘लेक्चर कोर्स’ देणं आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांची ‘टय़ुटोरियल्स’ घेणं एवढंच केलं. मात्र स्वयंपाक शिकणं आणि करणं, घराची देखभाल, विविध मित्रमैत्रिणी जोडणं, नदीत लहान बोट चालवायला शिकणं (पंटिंग), इंग्लंडमधील सर्व ऋतुबदल उत्सुकतेनं अनुभवणं, मुंबईत कधीच करायला न मिळालेलं बागकाम करणं, जयंतचा कामानिमित्त प्रवास होई तेव्हा त्याच्याबरोबर प्रवास, या सगळ्याचा मी भरपूर आनंद घेतला. इंग्रजी भाषा येत होती, तरी इंग्लंडमधील लोकांचे उच्चार समजायला जरा कठीण. शिवाय तिथली बोलीभाषा आणि संस्कृती समजायलादेखील कधी कधी वेळ लागे.
दोन उदाहरणं सांगते, नव्या घरासाठी सामान विकत घेण्यास सकाळी नऊ-साडेनऊला गेलो. दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ५ किंवा ६ पर्यंत उघडी असत. मला आवडलेलं कॉफी टेबल दुकानदार त्याच दिवशी नक्की पोहोचवणार होता. ‘‘डिनर टाइमपर्यंत आलं नाही, तर फोन करा.’’ असं तो म्हणाला. आता ‘डिनर टाइम’नंतर याचं दुकान तरी उघडं कसं असेल, अशी माझी शंका. पण सामान्य इंग्रजी माणूस दुपारच्या जेवणालाच ‘डिनर’ म्हणतो हे मला माहीत नव्हतं. माझ्या मते डिनर टाइम म्हणजे संध्याकाळी ७ किंवा ८! आणखी एक घटना म्हणजे पहिल्या कन्येच्या जन्माच्या वेळी अपत्यमार्गाला टाके घातले होते. तिसऱ्या दिवशी तपासायला आलेल्या डॉक्टर बाईला ते पुरेसे भरून आलेले दिसले नाहीत. तिनं विचारलं, ‘‘काल आणि आज ‘बाथ’ घेतलीस ना?’’ मला जरा रागच आला. म्हटलं, ‘‘आम्ही रोजच बाथ घेतो!’’ तिनं तेथील परिचारिके ला सांगितलं, ‘‘हिला टबमध्ये गरम पाण्यात मीठ टाकून जास्त वेळ बसायला द्या.’’ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की यांच्यासाठी बाथ म्हणजे टबमध्ये पाण्यात बसणं, तर माझ्यासाठी बाथ म्हणजे बादली-तांब्या किंवा फार तर शॉवरनं आंघोळ किंवा केवळ अंग धुणं. शिवाय गरम पाण्यात मीठ टाकू न बसलं की शरीराच्या जखमा भरून येतात हे नवीन ज्ञानही मिळालं.
१९७० पासून अपत्याची जबाबदारी आल्यावर जगणं आणखी व्यग्र, समृद्ध होत गेलं, पण ‘करिअर’ मात्र आणखी दूर गेलं. बहुधा १९६८-६९ मध्ये, पूर्वी ‘टीआयएफआर’मध्ये काम करणारा परिचित शास्त्रज्ञ आम्हाला भेटला, त्यानं जयंतबरोबर माझ्याही कामाची चौकशी केली. मी काही संशोधनात्मक काम करत नाही, हे कळल्यावर त्याला राग आलेला दिसला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही मुली अशाच असता. आधी मारे अभ्यास करून यश मिळवता, पण अभ्यासाचं करिअर पुढे नेत नाही, संसारात गुरफटून जाता.’’ त्याचे शब्द माझ्या मनात घर करून खुपत राहिले. नाही तरी टीका जेव्हा बहुतांशी सत्य असते, तेव्हा ती स्वीकारावी लागते, मनाला लागते.
पुढे १९७२ च्या सप्टेंबरमध्ये दोन लहान मुलींना घेऊन आम्ही मुंबईत राहण्यास आलो. ‘टीआयएफआर’मध्ये ‘पदार्थ विज्ञान’ विभागात प्रोफेसरचं पद जयंतनं स्वीकारलं. १९७३ मध्ये त्याचे आई-वडील आमच्याकडे राहाण्यास आले. मी एकत्र कुटुंबात वाढले होते. अशा कुटुंबातील व्यक्ती परस्परांना किती साहाय्यभूत होतात ते मी अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यास माझी तयारी होतीच. आम्हाला ‘टीआयएफआर’च्या समोरच्या कॉलनीत राहायला सदनिका होती. त्याच संस्थेच्या गणित विभागात मी पूर्वी काम करत होते. मी बराचसा स्वयंपाक उरकून, मुलींना शाळेत पाठवून दोनएक तास वेळ काढू शकत होते. नव्यानं आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मी पुन्हा गणित विभागात व्याख्यानं ऐकायला जाऊ लागले. मला त्या अभ्यासात गोडी आहे हे समजून त्या विषयाची व्याख्यानं माझ्या सोयीच्या वेळी होऊ लागली आणि मी पुन्हा अर्धवेळ संशोधक झाले. काही काळानं एक प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले. आणि ‘पीएच.डी.’देखील मिळाली. या वेळी राहाण्याची जागा संस्थेजवळ होती याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. माझ्या पीएच.डी.च्या कामाची तुलना मी श्रावणी सोमवारच्या कहाण्यांतील म्हातारीच्या कहाणीशी करते. घरातील सर्वाच्या गरजा पुरवून उरलेलं वाटीभर दूध घेऊन तिनं ते शंकराच्या मंदिरात अर्पण केलं, त्यानं तो गाभारा भरून गेला.
पूर्वी कधी शिक्षकी पेशाचा विचार केला नव्हता. मैत्रिणींना गणिताच्या अभ्यासात मदत केली होती तेवढंच! मुंबईत आधी माझ्या आणि नंतर इतरांच्याही, घरकामाला येणाऱ्या बायकांच्या मुलांना अभ्यासात मदत करताना लक्षात आलं की आपण यांना नीट शिकवू शकतो. त्यांना न समजणारी गणितं समजावून सांगितल्यावर त्यांना ती सोडवता येऊ लागली की मलाही आनंद होत असे. पाचवी ते सातवीचं गणित सोप्या पद्धतीनं समजावून सांगणारं माझं छोटंसं पुस्तक ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे ‘मनोविकास’नं प्रकाशित के लं. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, ते मला अनपेक्षित होतं. ज्यांनी शाळा मध्येच सोडून दिली, परंतु नंतर नोकरी करताना ज्यांना गणिताच्या काही परीक्षा द्याव्या लागतात, त्या २०-२२ र्वष वयाच्या तरुणांना हे छोटंसं पुस्तक उपयोगी पडतं.
कधी कधी भूतकाळ समोर उभा राहातो, त्याचा विचार करता प्रश्न येतो, माझा ‘केम्ब्रिज’मधील काळ करिअर न केल्यामुळे फुकट गेला का? आता वाटतं, नाही फुकट गेला. कारण तिथे शिकलेल्या इतर गोष्टी, आनंदानं अनुभवलेले ऋतुबदल, जोडलेली मित्रमंडळी, वेगळ्या संस्कृतींचं निरीक्षण, विविध खाद्यप्रकार शिकणं, त्यात प्रयोग करणं, मुलींचं बालपण अनुभवणं, त्यांचे पहिले बोल, पहिली पावलं यांचा आनंद घेणं, त्यांच्यासाठी कपडे शिवणं, हे सगळं आनंद देणारं, समृद्ध करणारं होतंच की! आपलं जीवन किती यशस्वी, किती वाया गेलेलं, हे आपणच ठरवावं!
हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय र. पु. परांजपे म्हणजेच “रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे”.
रँग्लर पदवी म्हणजे काय? पूर्वी केंब्रिज विद्यापीठात गणित विषयाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यास रँग्लर म्हणून घोषित केले जाई. रँग्लर म्हणून सर्वप्रथम येणाऱ्यास सिनियर रँग्लर म्हटले जाई. र. पु. परांजपे १८९९ मध्ये सिनियर रँग्लर म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा लेखी नसून तोंडी असतं. परीक्षार्थी विद्यार्थ्यास तिपाई स्टूलावर बसविले जायचे म्हणून या परीक्षांना ‘ट्रायपॉस’ परीक्षा असे नाव पडले. प्रश्नकर्ते प्राध्यापक समोर खुर्चीवर बसून अत्यंत कठीण प्रश्न विचारून विद्यार्थ्यास जेरीस आणत व ज्ञानाची खरी कसोटी घेत. सिनियर रँग्लर विद्यार्थ्यास पुढे अनेक सन्मान व सवलती मिळत. अशा विद्यार्थ्याचे पुढचे शिक्षण खास सुविधांसह होत असे, त्याला कोलेजची फेलोशिप मिळे, विद्यापीठात चांगले पद तसेच पुस्तक लिहण्याचे आमंत्रण मिळे.
कालांतराने लेखी परीक्षा सुरु झाल्या. र. पु. परांजपे यांचा जन्म दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळच्या मुर्डी या गावी १६ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे वडील पुरुषोत्तम हे खुप हुशार होते. बुद्धिमत्तेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. र. पु. हे तेरा भावंडापैकी सातवे. भारतरत्न कर्वे व रँग्लर परांजपे ही आत्ये मामे भावंडं. कर्वेंनी र. पु. ना शिक्षणाखातर भरपूर मदत केली. र.पु.चे प्राथमिक शिक्षण आंजर्ले, मुरुड, दापोली येथे झाले व उच्चशिक्षण मुंबई, पुणे येथे. त्यांनी बी.एस.सी. सर्व पारितोषिकासह पास केलेली. त्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ते इंग्लंडला गेले.
१८९९ साली भारतातील पहिले ‘रँग्लर’ म्हणून इंग्रज सरकार तर्फे त्यांचा बहुमान झाला.
१९०२ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांना फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पद मिळाले. दहा वर्षे ते या पदावर होते.
१९१३ साली मुंबई कायदेमंडळाचे सरकारी नियुक्त झाले.
१९१४ मध्ये पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. ( ३ वर्ष पदावर )
१९१६ ते १९२० विधिमंडळात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना सदस्यत्व मिळाले.
१९२१ साली त्यांची मुंबईचे शिक्षण व आरोग्यमंत्री म्हणून शासनाकडून नियुक्ती झाली ( १९२३ पर्यंत ).
१९२७ मध्ये वनविभाग, सहकार व कृषिविभागाचे मंत्री ( ६ महिने पदावर ) म्हणून कार्यरत होते.
१९२७ ते १९३२ पर्यंत लंडनमधील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य त्यांना मिळाले.
१९३२ साली लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू ( ६ वर्ष ) आणि
१९४४ ते १९४७ पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये भारताचे उच्चायुक्त झाले.
१९४९ साली चेन्नई मधल्या ‘भारतीय बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे’ संस्थापक व अध्यक्ष ही ते झाले.
१९५८ मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ( ३ वर्ष ) झाले.
बुद्धिवादी, कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांचा लौकिक होता. गोपाळ कृष्ण गोखल्यांना ते आपले गुरु मानीत. त्यांचे मोडी हस्ताक्षर फार सुंदर, सुरेख होते. १९३८ साली त्यांनी आपल्या जन्मगावी शाळा सुरु केली. त्याचे नाव ‘गोपाळ कृष्ण गोखले’ स्कूल ठेवले. त्याच शाळेत त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे ग्रंथालय देखील सुरु केले. वाचा: दापोलीतील मोडी लिपी जाणकार ‘तेजोनिध रहाटे’ बद्दल दापोलीच्या रस्त्यांवरून चालताना पटापट गणित सोडवत जाणारा मुलगा, जो पुढे गणिततज्ञ व शिक्षणतज्ञ झाला, ‘सिनियर रँग्लर’ हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय ठरला.
भारतातील रेडिओ-खगोलशास्त्राच्या विकासाचे श्रेय प्रा. गोविंद स्वरूप यांना जाते. उत्तर प्रदेशातील ठाकुरद्वार येथे जन्मलेल्या गोविंद स्वरूप यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण अलाहाबाद येथून १९५० साली पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी चार वर्षे दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत, दोन वर्षे ऑस्ट्रेलियातील ‘राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि संशोधन संघटने’त आणि एक वर्ष अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधनात्मक कार्य केले. त्यानंतर १९६१ साली त्यांनी अमेरिकेतील स्टॅन्फर्ड विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली.
स्टॅन्फर्ड विद्यापीठातील आणखी दोन वर्षांच्या कार्यानंतर ते १९६३ साली भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. तेथे नवनिर्मित रेडिओ-खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले. १९८९ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेने पुणे येथे रेडिओ खगोल भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स’ (एन.सी.आर.ए.) हे केंद्र स्थापन केले. प्रा.स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच आली. १९९४ साली या केंद्राच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतरही प्रा.स्वरूप यांची याच केंद्रात ‘प्रोफेसर एमेरिटस’ या पदावर विशेष नियुक्ती केली गेली. या पदावर ते १९९९ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’तर्फेसुद्धा त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना ‘सन्माननीय शास्त्रज्ञ’ हे विशेष पद देण्यात आले.
गोविंद स्वरूप यांचे संशोधन हे सुरुवातीस सौरविषयक रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित होते. या संशोधनात त्यांनी सूर्यावर घडणाऱ्या सौरज्वालांसारख्या विविध घटनांशी निगडित असलेल्या, तसेच सौरबिंबावरील विविध भागांतून होणाऱ्या रेडिओलहरींच्या वर्णपटाचा मागोवा घेतला. प्रा.गोविंद स्वरूपांचा पीएच.डी.चा प्रबंध सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या सूक्ष्मलहरींच्या अँटेनाद्वारे केलेल्या दिशानुरूप निरीक्षणांवर आधारित होता. प्रा. स्वरूप यांनी सौरप्रभेतून होणाऱ्या रेडिओलहरींच्या ‘यू’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट उत्सर्जनाचा शोध लावलेला आहे. सौरप्रभेतील चुंबकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या या उत्सर्जनाचे निरीक्षण सौरप्रभेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते.
सौरसंशोधनाबरोबरच कालांतराने डॉ.स्वरूप यांनी स्पंदके (पल्सार्स), किंतारे (क्वेसार्स), दीर्घिकांची केंद्रस्थाने यांसारख्या इतरही अनेक प्रकारच्या रेडिओस्रोतांचा आपल्या संशोधनक्षेत्रात समावेश केला. वेगवेगळ्या भागात विभागलेल्या एकाच रेडिओदीर्घिकेतील दोन भागांचा एकमेकांशी असलेला संबंध त्यांनी रेडिओलहरींच्या निरीक्षणाद्वारे प्रथमच दाखवून दिला. रेडिओदीर्घिकांचा प्रा. स्वरूप यांनी निदर्शनास आणून दिलेला हा गुणधर्म आता सर्वमान्य झाला आहे. प्रा. स्वरूप यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध आणि वैज्ञानिक लेख प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विसाहून अधिक आहे.
प्रा. स्वरूप यांनी रेडिओलहरींचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी साधनेही आपल्या संशोधनाद्वारे विकसित केली असून त्याचा उपयोग जगातल्या अनेक देशांतील वेधशाळांतून केला जातो. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतल्या आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी मुंबईजवळील कल्याण येथे, सौरसंशोधनाला उपयुक्त ठरणारे व्यतिकरणमापी (इंटरफेरोमीटर) साधन उभारले. प्रा.स्वरूप यांनी विकसित केलेल्या दोन साधनांना एकस्वाचा अधिकारही मिळाला आहे. रेडिओखगोलशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी आपल्या देशात रेडिओ दुर्बिणी असण्याची गरज ओळखून प्रा.स्वरूप यांनी त्या दृष्टीने तामीळनाडूमधील उटी आणि महाराष्ट्रातल्या नारायणगाव जवळच्या खोडाद येथे वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रचंड रेडिओ दुर्बिणींची उभारणी केली.
उटी येथे उभारलेली रेडिओ दुर्बीण ही अन्वस्तीय नळकांड्यांपासून तयार केली गेलेली असून ती १९७० साली कार्यान्वित झाली. सुमारे ९२ सें.मी. लांबीच्या रेडिओलहरींचा वेध या दुर्बिणीतून घेतला जातो. विश्वनिर्मितीच्या स्थिर-स्थिती प्रारूपाचे खंडन करणारा पुरावा या दुर्बिणीने स्वतंत्रपणे मिळवला आणि महास्फोट सिद्धान्ताच्या प्रारूपाला बळकटी दिली.
खोडाद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ या प्रचंड दुर्बिणीची उभारणी ही सर्वार्थाने प्रा.स्वरूप यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणता येईल. सहा मीटरपर्यंत लांबीच्या रेडिओलहरींचे निरीक्षण करू शकणारी ही दुर्बीण अंतराळातल्या अतिदूरवरच्या हायड्रोजनच्या विद्युतभाररहित अणूंचा वेध घेऊ शकते. परिणामी या दुर्बिणीद्वारे विश्वाच्या बाल्यावस्थेतील स्थितीसंबंधी संशोधन करणे शक्य झाले आहे. याबरोबरच ही दुर्बीण विविध प्रकारची स्पंदके, दीर्घिका अशा अनेक रेडिओस्रोतांची निरीक्षणे करू शकते. मोठ्या तरंगलांबीच्या रेडिओलहरींची निरीक्षणे करणारी ही जगातली सर्वांत मोठी दुर्बीण ठरली आहे.
प्रा.स्वरूप आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या रेडिओ खगोलशास्त्रावरील समितीचे १९७९ ते १९८२ या काळात अध्यक्ष होते. याच संघटनेने स्थापलेल्या मोठ्या खगोलशास्त्रीय दुर्बिणी व तत्सम सुविधा विकसित करण्यासंबंधीच्या समितीचे ते १९९४ ते २००० या काळात सदस्य होते. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सायन्स या संघटनेच्या विविध प्रकारच्या रेडिओलहरींच्या संशोधनात्मक वापरात सुसूत्रता आणणाऱ्या समितीवरही त्यांनी काम केले आहे.
प्रा. स्वरूप हे विविध सन्मानांनी विभूषित केले गेले आहेत. १९७२ साली ‘पद्मश्री’ आणि १९७३ सालच्या ‘शांतीस्वरूप भटनागर’ पारितोषिकाचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे ‘प्रशांतचंद्र महालनोबीस पदक’ आणि ‘सी.व्ही. रमण पदक’, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ‘मेघनाद साहा पदक’, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे ‘बिर्ला पारितोषिक’ असे अनेक राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले आहेत. महाराष्ट्रातल्या मानाच्या फाय फाउंडेशन पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत.
प्रा. स्वरूप यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांत रशियातील ‘फेडरेशन ऑफ कॉस्मोनॉटिक्स’ या संस्थेचे ‘त्स्कोलावॉस्की पदक’ (१९८७), आंतरराष्ट्रीय रेडिओविज्ञान संघटनेचे ‘जॉन हॉवर्ड डेलिंगर सुवर्णपदक’ (१९९०), इराणचे ‘ख्वारीज्मी’ आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९९) आदींचा समावेश आहे. प्रा. स्वरूप यांची इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे ‘फेलो’ म्हणून १९९१ साली नियुक्ती केली गेली. ‘थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (इटली) या संस्थेकडूनही त्यांची ‘फेलो’ म्हणून नियुक्ती केली गेली. २००७ साली त्यांना ऑस्ट्रेलियातील विविध संस्थांतर्फे ग्रेट रेबेर या आद्य रेडिओ-खगोलतज्ज्ञाच्या स्मरणार्थ देण्यात येणारे पदक देऊन त्यांचा विशेष गौरव केला गेला.
संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट
भटनागर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे क्रमाक्रमाने भारतात १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांची मालिका निर्माण झाली. अशा प्रकारे भारतात विविध वैज्ञानिक शाखांतील पद्धतशीर संशोधनाला भटनागर यांच्या परिश्रमामुळे बहुमोल चालना मिळाली. पुढे १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘नैसर्गिक साधनसंपत्ती व वैज्ञानिक संशोधन’ या मंत्रालयाचे पहिले सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी विरल मृत्तिका, किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी) खनिजे. गंधकयुक्त खनिजे, खनिज तेल इत्यादींचे भारतातील साठे शोधण्याच्या कार्याला चालना दिली.
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाचे १९५४ मध्ये ते सचिव झाले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक शासकीय व्याप साभांळून त्यांनी वैयक्तिक संशोधनही चालू ठेवले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी औद्योगिक दृष्टया उपयुक्त अशा विविध द्रव्यांच्या निर्मितीच्या प्रकिया शोधून काढल्या (उदा., विषारी वायूचा वा धुराचा परिणाम न होणारे व कापडावर लेप देता येणारे रोगण, फेसाळ रबराच्या निर्मितीसाठी योग्य असा विद्राव, विस्फोटक द्रव्यांच्या साठवणीसाठी लागणारी विशिष्ट प्रकारची पात्रे. न फुटणारे व काचसदृश गुणधर्म असलेले पदार्थ आणि त्यांपासून उपयुक्त उपकरणे बनविणे, कृषी व्यवसायातील टाकाऊ पदार्थापासून प्लॅस्टिके तयार करणे वगैरे). त्यांना अनेक रासायनिक प्रक्रियांची व उपकरणांची एकस्वे मिळालेली होती.
भटनागर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. ऑक्सफर्ड, पाटणा, अलाहाबाद, लखनौ, आग्रा व सागर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचे सदस्य म्हणून निवड होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची नंतर निवड झाली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्टस ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेचं सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र शाखेचे १९२८ व १९३८ मध्ये ते अध्यक्ष होते आणि १९४५ साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी सु. १७० संशोधनात्मक निबंध व लेख लिहीले. त्यांच्या इलमुलवर्क हा विद्यूत शास्त्रावरील उर्दु ग्रंथ व लाजवंती हा उर्दु कवितांचा संग्रह हेही प्रसिद्ध आहेत.
तरूण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या लक्षणीय महत्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे भटनागर यांच्या स्मरणार्थ १९५७ पासून प्रतिवर्षी पाच ते सहा ‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिके’ देण्यात येत आहेत. ही पारितोषिके ४५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना त्यांनी पारितोषिक देण्यात येणाऱ्या वर्षाच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या भौतिकीय, रासायनिक, जीववैज्ञानिक, अभियांत्रिकीय, वैद्यकीय, गणितीय वा इतर विज्ञानांत केलेल्या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल देण्यात येतात.
डॉ. मेघनाद साहा हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. साहा समीकरण तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. हे समीकरण ताऱ्यांच्या भौतिक आणि रासायनिक स्थिती स्पष्ट करण्याशी संबंधित आहे.
आज भारताचे सरकारी कामकाज ज्या दिनदर्शिकेनुसार सुरू आहे. ती राष्ट्रीय दिनदर्शिका (Indian National Calendar) तयार करण्यातही साहा यांचं महत्वाचं योगदान आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि 22 मार्च 1957 रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती आणि अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे.
मेघनाद साहा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील शाओराटोली गावात झाला. मेघनाद साहाच्या वडिलांचे नाव जगन्नाथ साहा होते. आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील जगन्नाथ साहा हे एक छोटे दुकानदार होते. हालाकीची परिस्थिती असल्याने जगन्नाथ यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च उचलणे कठीण जात होते. यासाठीच प्राथमिक शिक्षणानंतर मेघनाद यांनी दुकानाच्या कामात मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र मेघनाद याची इच्छा पुढे शिक्षण घेण्याची होती.त्यांच्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते
मेघनाद साहा हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. विज्ञान विषयाची त्यांना अधिक आवड होती. वर्गात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते. एकदा त्यांनी सूर्याभोवती वर्तुळ आकारात फिरणाऱ्या आवरणाबद्दल विचारले. ज्याचे उत्तर त्यांचे शिक्षक देऊ शकले नाही. त्यावेळी मेघनाद यांनी आपण याचा शोध लावून याची माहिती काढणार असल्याचे शिक्षकांना सांगितले होते. यावरून मेघनाद खूप हुशार असल्याचे शिक्षकांना जाणवले. मात्र त्याचे कुटुंबीय मेघनाद यांना पुढे शिकू देणार की नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडला. मेघनाद यांचं शिक्षण थांबू नये, असे त्यांना वाटत होते. यानंतर त्यांनी स्वतः मेघनाद यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. याबाबत शिक्षकाने मेघनाद याच्या भावाशी चर्चा केली.
मेघनाद यांचा भाऊ त्यांच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मेघनाद अभ्यासात खूप हुशार आहे. त्याचे शिक्षकही तसे सांगत आहेत. त्याने पुढे शिक्षण घ्यावे, अशी शिक्षकांची इच्छा आहे. यावर वडिलांनी सांगितले की, मेघनाद खूप हुशार आहे. पण त्याला दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागेल. ज्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. याबाबत मदत करण्यासाठी डॉ.अनंत यांच्याशी बोलू, असे मेघनाद यांच्या भावाने वडिलांना सांगितले. त्यांच्या वडिलांनी यावर आपली संमती दर्शवली. डॉ. अनंत कुमार हे एक कुशल आणि प्रभावी डॉक्टर होते. तसेच ते एक चांगले व्यक्ती देखील होते. डॉ.अनंत दास यांनी मेघनाद साहा यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली. मेघनाद यांनी दुसऱ्या गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. पुढे ते डॉ.अनंत कुमार यांच्या घरी राहत होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर मेघनाद साहा यांनी केवळ आपल्या शाळेतच नाही तर संपूर्ण ढाका जिल्ह्यात आठवीत सर्वाधिक मार्क मिळवले. त्यानंतर मेघनाद साहा यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. सोबतच त्यांना ढाका येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला.
स्वातंत्र्य लढ्यात घेतला भाग
त्याच काळात देशभर स्वातंत्र्यलढ्याची आग धगधगत होती. मेघनाद याशी प्रभावित झाले होते. बंगालचे राज्यपाल त्यांच्या शाळेला भेट देणार होते. राज्यपालांच्या आगमनानिमित्त मेघनाद साहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आंदोलनात भाग घेतला. याच्या परिणामी, मेघनाद यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. मेघनाद यांना त्यांच्या साथीदारांसह शाळेतून काढून टाकण्यात आले. मात्र त्यांना किशोरीलाल ज्युबिली स्कूल या खाजगी शाळेत प्रवेश मिळाला. पुढे साहा हे इंटरमिजिएट परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर कलकत्ता विद्यापीठात साहा यांनी संपूर्ण विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत साहा यांची वाटचाल प्रगती आणि विकासाच्या दिशेने सुरू झाली.
शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू शिक्षक म्हणून लाभले. इंटरमिजिएटनंतर मेघनाद साहा पुढील पदवी शिक्षणासाठी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले. जिथे जगदीशचंद्र बसू आणि प्रफुल्ल चंद राय सारखे मोठे शास्त्रज्ञ त्यांचे शिक्षक होते. तसेच सत्येंद्र नाथ बसू त्यांचे वर्गमित्र होते. एकदा डॉ. बसू त्यांना म्हणाले, ”मेघनाद तुला गणितात विशेष रस आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु विज्ञानाची इतरही क्षेत्रे आहेत. तू भौतिकशास्त्रावर भर दे. तू आमच्यासोबत प्रयोगशाळेत येत जा.” यानंतर वेळ मिळाल्यावर मेघनाद साहा प्रफुल्लचंद राय आणि डॉ जगदीशचंद्र बसू यांच्या प्रयोगशाळेत पोहोचायचे. ते त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐकायचे आणि त्यानुसार अभ्यास करत होते. बीएस्सी करत असताना मेघनाद याचे मन वैज्ञानिक शोधांमध्ये मग्न झाले. पुढे मेघनाद साहा यांनी आपल्या नाव-नवीन शोधांनी विज्ञान जगताला चकित केले.
एमएस्सी केल्यानंतर मेघनाद साहा यांची भारतीय वित्त विभागात निवड झाली, पण शालेय जीवनात सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांना पाठिंबा दिल्याने आणि राज्यपालांच्या शाळाभेटीला विरोध केल्यामुळे साहा यांना सरकारी नोकरी मिळाली नाही. मात्र साहा निराश झाले नाहीत. त्यांनी ही एक संधी म्हणून घेतली आणि नवीन शोधांवर लक्ष केंद्रित केलं. आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. मेघनाद साहा सायकलवरून प्रवास करत अनेक ठिकाणी जात शिकवणी घेत असत. काही काळानंतर मेघनाद साहा आणि त्यांचे मित्र सत्येंद्र नाथ बसू यांची कलकत्ता येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली.
सूर्य आणि ताऱ्यांशी संबंधित माहिती देणारा फॉर्म्युला शोधला. आपल्या अभ्यासादरम्यान त्यांना अग्निस क्लर्क यांचे ‘स्टार फिजिक्स’ हे प्रसिद्ध पुस्तक मिळाले, ज्यामुळे त्यांना एक नवी दिशा मिळाली. Thermodynamics, सापेक्षता आणि अणु सिद्धांत हे त्या काळी भौतिकशास्त्राचे नवीन विषय होते. या विषयांचा अभ्यास करून मेघनाद यांनी शिकवायला सुरुवात केली. या विषयांवर नोट्स काढत असताना मेघनाद साहांच्या समोर Astro Physics चा एक प्रश्न उभा राहिला. याच प्रश्नाचे उत्तर शोधून ते जगप्रसिद्ध झाले. मेघनाद साहाच्या शोधांपैकी एक म्हणजे आयनीकरण फॉर्म्युला. हा फॉर्म्युला भौतिकशास्त्रज्ञांना सूर्य आणि इतर तार्यांचे अंतर्गत तापमान आणि दाब याबद्दल माहिती देण्यास सक्षम आहे. एका प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञाने या शोधला भौतिकशास्त्रातील 12वा सर्वात मोठा शोध म्हटले आहे.
खगोल भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान. 1920 मध्ये साहा इंग्लंडला गेले, जिथे ते अनेक शास्त्रज्ञांच्या संपर्कात आले. त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आणखी चमकण्याची संधी मिळाली. 1921 मध्ये ते मायदेशी परतले. मेघनाद साहा हे कदाचित पहिले शास्त्रज्ञ होते जे इतक्या लहान वयात त्यांच्या शोधांसाठी प्रसिद्ध झाले आणि रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येत राहिले. त्या काळी आपल्याच देशातील काही शास्त्रज्ञांनी त्यांच्या सुत्राबाबत असहमती दर्शवली आणि अलाहाबाद विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात त्यांच्या पदभार स्वीकारण्यात अडथळे निर्माण केले. पण मेघनाद साहा या गोष्टींनी विचलित झाले नाही. 1923 मध्ये ते प्रयाग विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष झाले. भौतिकशास्त्राव्यतिरिक्त मेघनाद साहा यांना प्राचीन भारताचा इतिहास, जीवशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या विषयांनी देखील आकर्षित केले. त्यांनी सूर्यप्रकाशातील रेडिओ लहरी आणि रेडिओ क्रियाकलापांवर संशोधन केले.
आईन्स्टाईन यांनीही केले होते कौतुक. डॉ. साहा यांच्या उच्च तापमानातील घटकांच्या सिद्धांताला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला एक विशेष भेट असल्याचे म्हटले होते. साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या संशोधन ग्रंथांचा अनुवाद देखील केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज कलकत्ता विद्यापीठात न्यूक्लियर फिजिक्स शिकवले जात आहे. साहा अणुऊर्जेच्या सकारात्मक वापराच्या बाजूने होते. त्यांनी 1950 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्सची स्थापना केली. कलकत्ता विद्यापीठाने डॉ. साहा यांच्यासाठी ट्रॅव्हलिंग फेलोशिप आयोजित केली होती. त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान डॉ. साहा यांनी आपला अभ्यास आणि शोध सुरू ठेवला.
राजकारणातही होते सक्रिय. शास्त्रज्ञ असण्यासोबतच डॉ.साहा हे सर्वसामान्यांमध्येही लोकप्रिय होते. ते 1952 मध्ये भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत उतरले. कलकत्ता येथून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने त्यांचा विजयी झाला होता. त्यांनी यापूर्वी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसोबत राष्ट्रीय नियोजन समितीवर काम केले होते.
मेघनाद साहा हे तार्यांचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करुन सिद्धांत मांडणारे भारतीय वैज्ञानिक. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते. साहा यांचा जन्म ढाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगलादेश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एमएससी आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएचडी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेज मध्ये संशोधन करून डीएससी पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१-२३), पलित प्राध्यापक (१९३८-५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२-५६); तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३-३८) होते.
मेघनाद साहासाहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्भारित अणू) म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही. साहा समीकरणामुळे दिलेल्या दाबाला व तापमानाला तारकेय वातावरणातील आयनीभवनाच्या परिमाणाची आकडेमोड तसेच अणूपासून उत्तरोत्तर इलेक्ट्रॉन वेगळा काढण्याकरिता लागणाऱ्या ऊर्जेची आकडेमोड शक्य झाली. अशा प्रकारे साहा समीकरण तारा आणि अणू यांच्या मूलभूत संबंधाविषयीची पहिली सूत्ररूप मांडणी आहे.
साहा यांनी १९२० मध्ये ‘सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे. साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते (१९२७). भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९३४). १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले. साहा यांनी लिहिलेले ग्रंथ : ए ट्रीटाइज ऑन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी; ऑन ए फिजिकल थिअरी ऑफ द सोलर करोना; ए ट्रीटाइज ऑन हीट; ए ट्रीटाइज ऑन मॉडर्न फिजिक्स आणि माय एक्सपिरिअन्सेस इन रशिया. १९३५ मध्ये त्यांनी इतिहास, संस्कृती व विज्ञान यांना वाहिलेले सायन्स अँड कल्चर हे नियतकालिक सुरू केले. 16 फेब्रुवारी 1956 रोजी साहा हे नियोजन आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे जात असताना अचानक ते कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं.