आज आपण जाणून घेणार आहोत”पृथ्वीचा आकार सांगणारा ज्योतिषशास्त्रज्ञ वराहमिहीर”यांच्या विषयी…
उज्जैनी मगध साम्राज्यातील विद्वंतांची नगरी,अत्यंत प्रीतीतली, बुद्धिमंतांची आश्रयदाती, या नगरीच्या मातीत जन्मलेले “वराहमिहीर” आदित्यब्राह्मणाचा पुत्र. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयात भरपूर लेखन… त्यांच्या ग्रंथाचा परिचय करून देणारा निवेदक, भाटोत्पल याने, वराहमिहिराबाबत बरेच लिहून ठेवले आहे.त्यामुळेच वराहमिहिराबद्दल जास्त माहिती मिळते. वराहमिहिरांचे ग्रंथ तीन वर्गात विभागता येतात. पहिला वर्ग ग्रह ज्योतिष विज्ञान, दुसरा आणि तिसरा मुख्यतः फलज्योतिष- विज्ञान. पहिल्या ग्रज्योतिष-विज्ञान या वर्गात त्यावेळी प्रचलित असलेल्या पौलुस,रोमक, वशिष्ठ, सूर्य आणि पैतामह या पाच सिद्धांताबाबत चर्चा,उहापौह आणि टीका आहे. याशिवाय आर्यभट्ट यांच्या संशोधनकार्यावर आधारित अशा दुरुस्त्या, बदल आणि सुधारणा, वराहमिहीराणी पंचसिद्धांत या ग्रंथात केल्या आहेत. वर्षातील कालविभाग अगदी छोट्या छोट्या एककात कशी करता येतात, साठ वर्षाच्या काल मानाने एक चक्र कसे असते आणि त्यातील वर्षे,दिवस, तास यांचा तपशील काय आहे,त्यांच्या नियंत्रक देवता कोणत्या,हा सारा उहापोह त्यांच्या ग्रंथात त्यांनी केला आहे . कालमापनासाठी वापरली जाणारी छायापद्धती आणि “केप्सीड्रा” जलयंत्र यांच्यातील तुलना गणितीपद्धतीने त्यांनी केली आहे. प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीपासून योजनात अंतर, भ्रमणकक्षेच्या परिसीमा, पृथ्वीचा आकार,ध्रुवाजवचा चपटेपणा,नक्षत्रांचा उदयास्त, कालमापन यंत्रे याबाबतीत भूमितीचा कुशलतेने वापर.पृथ्वीचा आकार चेंडूसारखा आहे, हे त्यांनी प्रथम सांगितले. फलज्योतिषावर त्यांनी बृहतजातक या ग्रंथ लिहिला.त्यांची ब्रहत्संहिता अजून उपलब्ध आहे. ग्रीक विज्ञानाबद्दल त्यांना आदर होता. त्यांच्या ग्रंथाचा मानाने उपयोग केला आहे. ब्रहत्संहिता या ग्रंथात त्यांनी कृषीशास्त्रावर लेखन केले आहे. त्यात पेरणी लावणी हवामानाचा परिणाम यावर चर्चा केली आहे.
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रा.भालबा केळकर संकलन- डॉ. बी. व्ही. लिंबाळकर
विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स ऑफ एडिंबरा ॲंड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.
रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.
त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्या शिवून ठेवत.)
प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ – २८ जून, इ.स. १९७२) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते.
जन्म- २९जून १८८३, कोलकाता,बंगाल,ब्रिटिश भारत
मृत्यू- २८ जून १९७२ कोलकाता,पश्चिम बंगाल, भारत
हे भारतीय शास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ होत.
त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले.तसेच औद्योगिक उत्पादन जोरदार वाढ करून बेरोजगारी कमी करण्याचा सरकारच्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी योजना तयार केली.
महालनोबिस यांची प्रसिद्धी ‘महालनोबिस अंतर’ यासाठी आहे जे की, एक संंख्याशास्त्रीय एकक आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली. आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांचा जन्मदिवस २९ जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिवस’म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमधे प्रो.महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे तसेच प्रेरणा देणे होय.
डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्री गोपाळ हायस्कूल, पुणे येथे झाले, तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नवरोज वाडिया महाविद्यालय, पुणे येथे घेतले. १९४७ साली ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. त्याच वर्षी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळून ते पोषण संशोधन प्रयोगशाळा, कुन्नूर (आता राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद) येथे रुजू झाले. त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ. वि. ना. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनसत्त्व ब६ आणि आवश्यक मेदाम्ले यांचे परस्पर संबंध’ या विषयावर संशोधन करून त्यांनी जीवरसायनशास्त्रात १९५१ साली पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनात त्यांनी ‘फ्रेनोडर्मा किंवा बेडकाची कातडी हा त्वचेचा विकार आवश्यक मेदाम्लांच्या कमतरतेमुळे होतो’, हे सिद्ध केले. पीएच.डी.पश्चात संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने फुलब्राइट शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन राष्ट्रीय पोषण संस्थेत अन्न-विष विज्ञानातील संशोधनाला वाहून घेतले.
डॉ. तुळपुळे यांचे मूलभूत शास्त्रीय ज्ञानात आणि कृषीविषयक, तसेच मानवाच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम कवकविष (अफ्लॉटॉक्सीन) या बुरशीच्या विषाबद्दलचे आहे. कृषिउत्पन्न, मुख्यत्वे मका आणि भुईमूग यांचा साठा करताना बाष्प जास्त प्रमाणात राहिले, तर ‘अॅस्पर्शिलस फ्लॅवस’ या विषारी कवकाची त्यावर वाढ होते व अफ्लॉटॉक्सीन निर्माण होते. त्याच्या प्रतिबंधाकरिता काय उपाय योजावेत हे डॉ. तुळपुळेंच्या संशोधनाने दाखवून दिले. या विषामुळे यकृताचा कर्करोग होतो हे त्यांनी माकडांवर प्रदीर्घ प्रयोग करून दाखवून दिले. राजस्थानात टोळीने राहणाऱ्या जमातीत दिसून येणारे यकृताचे विकार (सिऱ्हॉसिस) अफ्लॉटॉक्सीनमुळे होतात हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.
ते १९७१ साली सहायक निर्देशक आणि अन्न, तसेच औषध विषशास्त्राचे प्रमुख झाले. १९८० साली ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे (जी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) अखत्यारीत आहे) संचालक झाले आणि १९८३ साली निवृत्त झाले. त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनकार्यात डॉ. तुळपुळे यांनी आहार व पोषणशास्त्राच्या विविध क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले असून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.
त्यांचे खास संशोधन क्षेत्र अन्नविषविज्ञान होते आणि कवकविषासंबंधीचे संशोधन त्यांनी देशात सुरू केले. त्यांनी ‘कवकविषाचे हिंदुस्थानातील आरोग्याला धोके’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधनाकरिता मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटना, अन्नविषयक संघटना, आहार परिमाणित मध्यवर्ती समिती अशा विविध जागतिक संस्थांमधून डॉ. तुळपुळे यांनी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. तुळपुळे यांनी भारतीय पोषण मंडळात सचिव, खजिनदार आणि नंतर उपाध्यक्ष ही वेगवेगळी पदे सांभाळली. ते १९८१ साली भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. तुळपुळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या कार्याला नवीन दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच संस्थांबरोबर सहकार्याच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या अखत्यारीत त्यांनी सरकारला, तसेच काही आंतरराष्ट्रीय कार्यालयांना सल्ला दिला. — डॉ. तरला नांदेडकर