दिनांक 30/4/2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एकदिवशीय 'भौतिक संकल्पनांचे दृढ़ीकरण' या विषयाची कार्यशाळा,पशु शक्तीचा योग्य वापर योजना, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉक्टर बाहुबली लिंबाळकर यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून त्यांचे राष्ट्राविषयीचे प्रेम व भारतीय विज्ञान चळवळीतील योगदान याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब होते.दैनंदिन व्यवहारात भौतिकशास्त्राचा वापर कसा असतो याची उदाहरणे देत डॉ. इंद्र मणी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील व डॉ. स्मिता सोलंकी लाभल्या होत्या. मुले अशा प्रकारच्या कार्यशाळेने प्रेरित होतात असे मत डॉ. समप्रियाताई राहुल पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि कार्यशाळेचे प्रमुख डॉ. श्री जयंत जोशी हे मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्र येथून खास उपस्थित होते.
कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भौतिकशास्त्रातील प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबक,गुरुत्वमध्य, अपकेंद्रबल, केंद्रगामीबल,घनता, घर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम या संकल्पनांचे दृढ़ीकरण करणारे प्रयोग डॉ.जयंत जोशी यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांकडून करून घेतले. प्रयोग करताना मुलांचा आनंद ओसांडून वाहत होता.
तसेच शिक्षक व पालकांसोबतच्या परिसंवादात डॉ.जयंत जोशी सर बोलताना पूरक शिक्षण प्रणाली व शिक्षकांची भूमिका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून, प्रत्येक विषयाचे विषय सौंदर्य शिक्षकांनी मुलासमोर ठेवली तर त्यांना त्या विषयाची गोडी लागेल व ते आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जातील, अशी आशा डॉ.जयंत जोशी यांनी व्यक्त केली.कोणत्याही विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या विषयाचे वेडे होण्याची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथून आलेले गणित शिक्षक श्री.नागेश वाईकर सर यांनी मुलांना गणितीय संकल्पनांचे प्रयोगतून ज्ञान दिले.जालन्याहून श्री अमोल कुंभळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी शिंदे ,श्री प्रसाद वाघमारे, श्री प्रवीण वायकोस व दीपक शिंदे यांनी केले. याप्रसंगी श्री प्रकाश केंद्रेकर सर, प्रा. डॉ.सुनील मोडक सर, प्रा. विष्णू नवपुते सर व श्री नानासाहेब कदम व श्री रामटेके सर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी डॉ .रामेश्वर नाईक डॉ. प्रताप पाटील, सौ. कमल पाटील, श्री सुधीर सोनुनकर, डॉ. विजयकिरण नरवाडे, श्री हेमंत धनोरकर,श्री दत्ता बनसोडे , प्रसन्न भावसार, प्रसाद वाघमारे, डॉ.रणजीत लाड, ओम तलरेजा, अशोक लाड, संग्राम देशपांडे, डॉ.अनंत लाड, डॉ अमर लड़ा,नयना गुप्ता,पद्माकर पवार ,महेश काळे व संपूर्ण परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम व कृषी विद्यापीठातील कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना डॉ.रामेश्वर नाईक सरांनी पुढील काळात पण अशाच प्रकारच्या विविध विषयातील कार्यशाळा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने घेण्याचे आश्वासन देऊन पूरक शिक्षणप्रणालीचे महत्व सांगितले.
नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
डॉक्टर चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 मध्ये लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रमण्यम हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडिट खात्यात नोकरीला होते. विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सी. व्ही.रामन हे चंद्रशेखरांचे काका होते. अशा हुशार घराण्यातील असलेले चंद्रशेखर स्वतः ही बालपणापासून प्रतिभावान व हुशार होते.
डॉक्टर चंद्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. 1930 साली डॉक्टर चंद्रशेखर बी.एस्सी.झाल्यानंतर केंब्रिज विद्यापीठातील ट्रीनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पीएच.डी. झाल्यानंतर डॉ. चंद्रशेखर शिकागो विद्यापीठात 1939 साली सहाय्यक म्हणून रुजू झाले. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी इंडियन जनरल ऑफ फिजिक्स मध्ये चंद्रशेखर यांची पहिली शोध पत्रिका प्रकाशित झाली. 11 जानेवारी 1935 ला इंग्लंड येथील रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत त्यांनी आपले शोध पत्र सादर केले. ज्यामध्ये छोट्या छोट्या पांढऱ्या रंगाचे तारे एक निश्चित द्रवमान प्राप्त केल्यानंतर आपल्या वजनात आणि वृद्धीत वाढ करू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की ताऱ्यांचे द्रव्यमान हे सूर्यग्रहापेक्षा 1.4 पट आहे. त्यामुळे ते तारे आकुंचन पावतात व जड होतात. तार्यावरील त्यांचे संशोधन कार्य आणि ‘चंद्रशेखर मर्यादा’ नावाचा सिद्धांत खगोलशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठी उपलब्धी मानली जाते. डॉक्टर चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे त्यांचा हा “चंद्रशेखर मर्यादा सिद्धांत” पुंजवाद आणि सापेक्षतावाद याची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा 44% इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. डॉक्टर चंद्रशेखर यांनी 1939 साली आपला सिद्धांत An Introduction to the study of stellar structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रूपात मांडला. 1983 साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉक्टर चंद्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार देण्यात आला. 1972 मध्ये ब्लॅक होलचा शोध लागला. कृष्णविवरांच्या शोधात चंद्रशेखरांचा सिद्धांत कामी आला.
अमेरिकेच्या नासा या संस्थेने अंतराळात सोडलेल्या चार भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष तरंग ग्रहण करणारी असून या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा ‘चंद्रा एक्स रे’या नावाने ओळखली जाते. ही वेधशाळा 23 जुलै 1999 रोजी अंतराळात सोडण्यात आली असून ती आज तगायात कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतीशास्त्र नावाची शाखा आहे. या विषयातील स्थिरअंकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले. तसेच एका लघुग्रहाला 1958 मध्ये चंद्रशेखर असे नाव दिले गेले. चंद्रशेखर यांनी सुमारे 380 शोधले आणि अकरा पुस्तके लिहिली. चंद्रशेखर हे 1952 ते 1971 या काळात एस्ट्रो फिजिकल जनरल या प्रतिष्ठित शोध नियतकालिकाचे संपादक होते. नोबेल पुरस्कारा व्यतिरिक्त त्यांना इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. विज्ञान शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या साठी आपले महत्त्वपूर्ण जीवन समर्पित करणारे महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांनी 21 ऑगस्ट 1995 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकाचे कार्य बहुमोलाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बारकाव्यासह अभ्यास केला तर असे लक्षात येते की,भारताचे स्वातंत्र्य हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यावर लढल्या गेलेल्या अविरत प्रयत्नांची फलश्रूती आहे. भारताचे शैक्षणिक क्षेत्र लुळे पांगळे करण्याचा इंग्रजांचा मनसुबा आपल्या देशातील पुरुषोत्त्वास खऱ्या अर्थाने गुलाम बनविण्यास कारणीभूत ठरला आणि म्हणूनच गलितगात्र झालेल्या भारतीय मानसिकतेस उद्दीपित करण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षक तज्ञांचे, विपरीत परिस्थितीत लढणाऱ्या संशोधकांचे स्थान स्वातंत्र्याच्या लढ्यात वेगळ्या रूपाने उठून दिसते. परकीय सत्तेच्या अमलाखाली राहून संशोधनासाठी अपुरी सामग्री असताना अनेक अच्युत प्रतिभेच्या व्यक्तीमत्त्वांनी भारतीय विज्ञानाची झळाळती पताका जगभर पसरली. बुद्धिमान राष्ट्राच्या समूहात इंग्रजांच्या गुलामीत असणाऱ्या भारताने नाव अधोरेखांकित करण्याचे महान कार्य या भारतीयांनी केले. चला तर मग स्वतःच्या संशोधनाने भारताचे नाव जगभरात करणाऱ्या या शास्त्रज्ञाची आज आपण ओळख करून घेऊया…. “आधुनिक युगातील वशिष्ठ” आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय
आचार्य प्रपुल्लचंद्र रॉय यांचा जन्म राउली काठीपाडा पश्चिम बंगाल या गावी 2 ऑगस्ट 1861साली झाला. हरिश्चंद्र रॉय हे त्यांचे वडील ते साहित्याचे गाढे अभ्यासक होते. प्रफुल्लचंद्र रॉय यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांनी उभारलेल्या प्रायमरी शाळेत झाले. “अज्ञानी असणे हा शापच आहे “ध्येयाला ज्ञानाचे पंख लावले तर स्वर्गाचा मार्ग मोकळा होतो हे प्रफुल्ला लहान वयातच उमजले होते. हारे विद्यालयात प्रफुल्ल यांचे नाव घालण्यात आले.हारे शाळेतील शिक्षकांना प्रफुल्लच्या तल्लक बुद्धी व असामान्य प्रतिभेची जाणीव व्हायला वेळ लागला नाही. कलकत्त्याची हवा प्रफुल्लचंद्रांना मानवली नाही. त्यामुळे ते परत गावी गेले. रसायनशास्त्रात प्रफुल्ला अधिक रुचि निर्माण झाली. शालेय शिक्षण अल्बर्ट शाळेतून पूर्ण केल्यावर कॉलेज शिक्षण त्यांनी मेट्रोपोलीटन संस्थेतून पूर्ण केले. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे दोन विषय शिकण्यासाठी प्रफुल्लचंद्रांना प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये बाही:शालexternal विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यावा लागला. प्राध्यापक पेटलर यांनी स्पष्ट केलेले प्रयोग स्वतः करून बघण्यासाठी प्रफुलचंद्र व त्यांच्या मित्रांनी घरीच एक प्रयोगशाळा तयार केली. 1882 साली त्यांना एडीनबर्ग विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व उच्च शिक्षणासाठी त्यांनी एडनबर्ग ला प्रवेश घेतला. डॉक्टर ऑफ सायन्स डिग्री प्राप्त केली. लंडनमधील सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञांच्या वर्तुळात प्रफुल चंद्राचे नाव चर्चेला जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्राचा मोठ्या खुबीने वापर केला. मुठभर इंग्रजांनी केवळ विज्ञानाच्या बळावर विशाल काय भारताला गुलामीच्या काळोखात लुटले हे सत्य नाकारता येत नाही.भारतात परत आल्यावर जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक ब्राऊन यांचे प्रशंसापुत्र असूनही प्रफुल्लचंद्र रॉय यांना नोकरी मिळाली नाही. या काळात निकटचे मित्र श्री जगदीश चंद्र बोस यांच्याबरोबर ते राहिले. या कालावधीत त्यांनी वनस्पती शास्त्राचा भरपूर अभ्यास केला. शिवाय प्राचीन ग्रंथातून त्यांना अर्क रसायनाचा अभ्यास करता आला. नंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये केवळ 250 रुपये प्रतिमाह पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. रेसिडेन्सी कॉलेज मधील सरकारी नोकरीत प्रफुल चंद्रांची खूप घुसमट होत होती. याच काळात ते अशितोष मुखर्जी यांच्या संपर्कात आले. मुखर्जी यांनी नुकतेच कलकत्त्यास सायन्स कॉलेज घडले होते.भारतीय प्रथेपकाचा शोधच मुखर्जी घेत होते.रसायनशास्त्र शिकवीण्यासाठी प्रफुल्लचंद्र सारखा हिरा गवसला. प्रफुल्लचंद्र प्रेसिडेन्सी मधील नोकरी सोडून मुखर्जी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सायन्स कॉलेजमध्ये नव्या उत्साहाने व जोमाने प्रफुल्लचंद्र व त्यांचे विद्यार्थी रसायनशास्त्रातील नवनवीन शोधासाठी अथक प्रयत्न करू लागले. सायन्स कॉलेजच्या परिसरात आचार्यासाठी राहण्याची खोली बांधली होती. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आचार्याबरोबर राहता येई. प्रफुल्लचंद्र केमिकल सोसायटी ऑफ एडनबर्ग युनिव्हर्सिटी 1887- 88 या काळासाठी उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेले होते. नाईट्राईट संयुगावर प्रफुल्लचंद्रांनी भरपूर काम केले.नाईट्राइट तज्ञ म्हणून त्यांना वेगळी ओळख मिळाली. आयुर्वेदात पारा या धातूचा विशेष महत्त्व आहे. पारा व त्याची संयुगे याचा प्रफुल्लचंद्र यांनी भरपूर अभ्यास केला. पारा व नाइट्रिक अँसिड यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या ‘मरर्क्युरस नाईट्राईट’च्या शोधाणे प्रफुल्लचंद्र यांना जगभरात नवीन ओळख मिळाली. 1894 ते 1934 या चाळीस वर्षाच्या काळात त्यांचे दीडशे शोधनिबंध जगभरातील प्रसिद्ध शोधपत्रिकातून प्रसिद्ध झाले. अमोनियम नाइट्राइटचे पथ:,,क्करन करण्यात आचार्य व त्यांचा विद्यार्थी चमू यशस्वी झाला. या शोधाने जगभरातील वैज्ञानिकांचे श्वास रोखले गेले.अमोनियम नाईट्राईट स्फटिक स्वरूपात वेगळे मिळविले होते व हवा विरहित जागेत त्याचे विघटन न होता बाष्पीभवन होते तेही 60 डिग्री वर हे आचार्यांनी सहजपणे दाखवले. या शोधाबद्दल इंग्लंडच्या केमिकल सोसायटीत आचार्यांचा गौरव करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीमुळे सत्व हरवलेल्या भारतीय मनात प्राण फुंकण्यासाठी आचार्यांनी ‘HISTORY OF HINDU CHEMISTRY’ हे पुस्तक लिहिले.औद्योगिक क्षेत्रात आचार्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. त्यांनी संपूर्ण स्वदेशी अशा ‘बेंगाल केमिकल्स अँड फार्मासिटिकल वर्क्स’ उद्योगाची मूर्तमेढ 1901 साली कलकत्त्याला केली. स्वदेशी विज्ञानच राष्ट्रस प्रगतीपथावर नेऊ शकते, याच ध्यासाने अध्यापन करणारा हाडाचा शिक्षक म्हणजे आचार्य.स्वदेशी उद्योगाची कास पकडून भारताचा पाठिचा कणा ताठ करणारा उद्योजक म्हणजे आचार्य.आचार्य म्हणजे सप्तऋषी तेजोगोलातून भारतभूमीवर अवतरलेला, ज्ञान भंडाराने परिपूर्ण असलेला वशिष्ठच.. भारतीय रसायनशास्त्राची आभा जगभर पसरविणारे एक तेजोमय जीवन 16 जून 1944 रोजी आसमंतात विलीन झाले.आधुनिक रसायनशास्त्राच्या या जनकास आमचे त्रिवार वंदन……
नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश देणारे जगदीश चंद्र बोस यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सर जगदीश चंद्र बोस यांचा जन्म बंगाल देशातील मुंशिगंज जिल्ह्यात 30 नोव्हेंबर १८५८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवान चंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनल ऑफिसर होते आणि आईचे नाव बामा सुंदरी बसू होते. बसू नावाचे इंग्रजी स्पेलिंग मुळे पुढे बोस झाले. कलकत्ता येथील सेंट झेवियार्स शाळेत शिक्षण घेतल्यावर कलकत्ता विद्यापीठातून कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. लंडन विद्यापीठाची बी.एस.सी. व डी. एस. सी. पदवी प्राप्त केली. कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. इसवी सन 1876साली IACS इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स चे उद्घाटन झाले. त्यात सर जगदीशचंद्र बोस आणि प्रफुलचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा होता. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण मात्र भाषेत स्थानिक भाषेत व्हावे यावर त्यांनी भर दिला.सर जगदीशचंद्र बोस यांनी विद्युत लहरीवर संशोधन केले. बिनतारी संदेश वाहन तंत्रज्ञानाचा जनक कोण असेल तर ते होते सर जगदीशचंद्र बोस. सर जगदीशचंद्र बसुनी विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावला, पण बोसांना तरंगाच्या प्रवास जास्त अंतरापर्यंत अपेक्षित होता. पथक परिश्रमांनी या तरंगाचे अंतर वाढवण्यास बोस यशस्वी झाले.आता पुढचा प्रश्न समोर उभा राहिला की तरंग रिसिव्ह कशी करायची बोसांच्या संशोधनाची पुढची यशस्वी बाजू अशी की त्यांनी रिसिव्हरचा सेमीकंडक्टरचा शोध लावला.कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये भिंती पलीकडे घंटानाद आणि बारूद ज्वलनाचा प्रयोग केला.या वायरलेस टेलिकमुनिकेशनच्या जनकाला मानाचा मुजरा. प्रसार माध्यमाचा खडतर प्रवास पक्षी,प्राणी, वाद्य, विविध संकेत ध्वनी, टपाल खाते, तार ऑफिस करत करत ईमेल पर्यंत सुखर होत गेला.अर्थात हे श्रेय बोसांना द्यायला हवे. सर जगदीशचंद्र बोस यांचे बायोफिजिक्स क्षेत्रात खूप मोलाचे योगदान आहे.विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली. सर जगदीशचंद्र बोस यांनी “बोस इन्स्टिट्यूट” बोस विज्ञान मंदिर या संस्थेची स्थापना 1917 मध्ये कलकत्ता येथे केली.सर जगदीश चंद्र बोस यांनी भारतात प्रायोगिक विज्ञानाचा पाया रोवला. I.E.E.E.ने त्यांना फादर ऑफ रेडिओसायन्स म्हणून संबोधले, तसेच एम्पायर CIE इसवी सन 1903 साली त्यांना सन्मान प्राप्त झाला. सर जगदीशचंद्र बोस यांना नाईट बॅचलर ही उपाधी 1917 साली मिळाली. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा जगदीश चंद्र बोस एक श्रेष्ठ गुरु,आचार्य होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वसा मेघनाथ सहा,सिसिरकुमार मिश्रा, देवेंद्र मोहन बोस,सत्येंद्रनाथ बोस यांना दिला. देशाच्या विकासासाठी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाला जे.सी.बोस फेलोशिप प्रदान केली जाते. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात एक विवर जगदीशचंद्र बोस नावाने प्रसिद्ध झाले. 23 नोव्हेंबर 1937 साली बंगालच्या गिरिडो शहरात ही महान व्यक्ती अनंतात विलीन झाली. पर्यावरणीय अन्नसाखळी परस्परावलंबी आहे.सर जगदीशचंद्र बोस यांनी तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घातली. तंत्रज्ञानाचा वापर करताना वसुंधरेच्या नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन व्हायलाच हवे असा मोलाचा संदेश सर जगदिशचंद्र बोस यांचे जीवन चरित्र आम्हाला देतो. science knows no country because knowledge belongs to humanity and is the torch which illuminates the world… संकलन -सो माधुरी देहेडकर डॉ.बी.व्ही.लिंबाळकर
नमस्कार 🙏🏻🙏🏻 दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती……….. आज आपण भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉक्टर ‘कमल रणदिवे’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर कमल रणदिवे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर दत्तात्रय समर्थ. ते एक जीवशास्त्रज्ञ होते. बाईंनी फर्ग्युसन कॉलेज मधून 1937 साली B.sc ची पदवी घेतली. नंतर M.Sc करण्यासाठी त्या पुण्याच्या Agriculture कॉलेजमध्ये दाखल झाल्या. 1939 जयसिंग रणदिवे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले.बाईंनी डॉक्टर खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली.पोस्ट डॉक्टरेट प्रशिक्षणासाठी त्यांना अमेरिकेत “टिश्यू कल्चर” चे तंत्र शिकण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांना रॉकफेलर फाउंडेशन ची शिष्यवृत्ती मिळाली होती. बाईंनी राजुर परिसरात जो संशोधन प्रकल्प हाती घेतला होता त्याला केंद्र सरकारच्या” डिपारमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी” या खात्याने मदत केली होती. हा प्रकल्प “इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन”या नावाने होता. ही संस्था 1973 साली स्थापन झाली होती. कॅन्सरचे संशोधन हा बाईंच्या आयुष्याभराचा ध्यास होता.अमेरिकेतून परतल्यावर आय.सी.आर.सी. मध्ये त्यांच्यावर टिशू कल्चर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. या विभागातून बाईंनी तीन उपविभागाची निर्मिती केली. कार्सिनोजेनेसिस, सेल बायलॉजी आणि इमिनोलॉजी. कॅन्सर कसा कार्य करतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत उंदरासारख्या प्राण्यावर दीर्घकाळ संशोधन केले.त्यातून स्तनाचा कॅन्सर,रक्ताचा कॅन्सर आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे स्वरूप समजण्यास फार मोलाची मदत झाली. बाई या क्षेत्रातल्या पहिल्या शास्त्रज्ञ होत्या की ज्यानी ट्यूमर निर्माण करणारा व्हायरस आणि आपल्या शरीरातील संप्रेरके यांच्या कॅन्सरला बळी पडण्याच्या प्रवृत्तीशी ससेप्टिबिलीटी चा काय संबंध असतो हे शोधले. शिवाय त्यांनी कुष्ठरोगाच्या बॅक्टेरियावर जे काम केले त्यातून त्यावरची प्रतिबंध लस निर्माण करता आली. जगाकडे कुतुहलाने पाहण्याची बाईंची नेहमीच वर्त्ती होती. डॉक्टर कमल रणदिवे यांनी कर्करोग व कुष्ठ रोगावरील दोनशेहून अधिक वैज्ञानिक शोधप्रबंध प्रकाशित केले होते. डॉक्टर कमल यांना 1982 मध्ये मेडिसिन साठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया चा १९६४ चा पहिला रोप्य महोत्सव ही संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात त्यांना सुवर्णपदक देण्यात आले. डॉक्टर कमल यांना सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 1964 चा G.H.Watumal Foundation पुरस्कार देण्यात आला.शेवटच्या काही वर्षात बाईंना अल्झायमरचा त्रास झाला. 10 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.त्यावेळी एखादी स्त्री केवळ चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी भव्यदिव्य करते असे नक्कीच म्हणावेसे वाटते…….. विज्ञान सेनानी शब्दांकन- सो मृणालिनी कुंभारे संकलन- डॉ. बी. व्ही. लिंबाळकर….