सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते.घरची परिस्थिती थोडी कठीण असल्यामुळे कधी कधी आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून सत्येंद्रनाथ छोटी मोठी काम करायचे.
सत्येंद्रनाथाचे बालपण कोलकत्ता मध्येच गेले. शिक्षण ही काळाची गरज असते, हे सत्येंद्रनाथ यांना माहीत होतं. लहानपणापासूनच त्यांना अभ्यास करण्याची फार आवड होती. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. 1915 मध्ये सत्येंद्रनाथ यांनी गणितात एम.एससी. ची पदी मिळवली. 1915 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून सत्येंद्रनाथांना पदवी मिळाली तेव्हा ते प्रथम आले होते.
चांगल्या संगतीचा आपल्या मनावर व भविष्यावर चांगला परिणाम होतो, तसेच जर चांगल्या लोकांचे मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात आपण यशस्वी होतो. सत्येंद्रनाथांनाही सुभाषचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रॉय या दोघांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे सत्येंद्रनाथांच्या उज्वल भविष्यामध्ये मोलाची भर पडली.
सन 1916 ते सन 1921 पर्यंत सत्येंद्रनाथ यांनी कोलकत्ता येथील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा दिली. सन 1915 मध्ये महान सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईनचा जर्मन भाषेतील सापेक्षता सिद्धांत इंग्रजी भाषेत रूपांतर करणारे सत्येंद्रनाथ पहिले होते. 1921 मध्ये सत्येंद्रनाथ यांनी ढाका येथील एका विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. बोस सांख्यिकी आणि बोस कंडेन्सेटच्या सिद्धांताचा पाया विकसित करण्यासाठी १९२० च्या सुरुवातीच्या काळात क्वांटम मेकॅनिक्सवर केलेल्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. 1923 मध्ये प्रसिद्ध गणितज्ञ माल्ट यांनी काही शोध लावले त्या शोधाच्या समीकरणाशी संबंधित आपले स्वतःचे असे वेगळे शोध सत्येंद्रनाथांनी लावले. ते शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारी मासिक फिलोसोफिकल सोसायटी कडे पाठवण्यात आले. ते लेख आईन्स्टाईन यांनी आपल्या जर्मन भाषेत रूपांतर केले, आणि तो लेख छापून यावा म्हणून अथक प्रयत्न केले. या लेखामुळे सत्येंद्रनाथ बोस यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली.पुढे दहा महिने ते पॅरिस मध्ये होते. पॅरिसमध्ये सत्येंद्रनाथ मेरी क्युरी सोबत काम करत होते.नंतर जर्मनीमध्ये त्यांची भेट महान प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांच्यासोबत झाली. आईन्स्टाईन यांनी त्यांचे अतिशय चांगले अतिथ्य केले.
सन 1945 मध्ये त्यांनी ढाका इथल्या नोकरीतून कायमची रजा घेतले.1956 मध्ये सत्येंद्रनाथ यांची विश्वभारती विद्यालयाचे उपकूलपती म्हणून निवड करण्यात आली.
भौतिकशास्त्र व गणित या दोन विषयाचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. बोस आईन्स्टाईन सांख्यिकी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या यामिकितील सिद्धांतकरिता यांना विशेष ओळखले जाते. त्याची दखल घेत भारत सरकारने 1958 मध्ये सत्येंद्रनाथांना पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान केला. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून 1958 मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांची निवड करण्यात आली. बोस भारत सरकारच्या राज्यसभेचे इसवी सन 1952 ते 1958 पर्यंत सदस्य होते. 1944 मध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद सत्येंद्रनाथ बोस यांच्याकडे होते.ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया या संस्थेचे देखील अध्यक्ष होते. त्यांना आईन्स्टाईन पासून प्रेरणा व स्फूर्ती मिळाली होती. बोस यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यात विज्ञानाला लोकप्रिय करण्याचे कार्य विशेष आवडीने केले. बंगाल सायन्स असोसिएशनची स्थापना त्यांनी केली. ज्ञान व विज्ञान नावाची मासिक सुरू केले.
जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञ सोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी सांख्यिकी क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करून सर्वांना चकित केले होते. बोस यांनी एक्स-रे क्रिस्टलोग्राफी सह अनेक महत्त्वाच्या विषयावर काम केले.राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे मेघनाथ सहा मेमोरियल सुवर्णपदक त्यांना मिळाले होते.
भेटीस येणाऱ्यांचे ते हसून स्वागत करीत, प्राध्यापक बोसे जेवढे उच्च कोटी शास्त्रज्ञ होते त्यापेक्षाही जास्त ते एक महामानव होते. कोलकत्ता येथे 8 फेब्रुवारी 1974 रोजी या महामानवाचे, महान शास्त्रज्ञाचे हृदविकाराने निधन झाले.
विज्ञान क्षेत्रातील त्याचे नेत्र दीपक योगदान नेहमीच सर्वोच्च स्थानी राहील अशा या महान व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻
देवेंद्र मोहन बोस यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८८५ रोजी कलकत्ता येथे झाला. होमिओपॅथीमध्ये स्वतःला पात्र होण्यासाठी यूएसएला गेलेल्या पहिल्या भारतीयांपैकी ते एक होते. 1906 मध्ये, देवेंद्र बोस यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एमए पदवी प्राप्त केली. त्याने आपल्या काकांच्या बायोफिजिकल आणि प्लॉट फिजियोलॉजिकल तपासणीत भाग घेतला.
ज्यांनी वैश्विक किरण, कृत्रिम किरणोत्सर्गीता आणि न्यूट्रॉन भौतिकशास्त्र या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून दिली. 1907 मध्ये त्यांनी क्रिस्टा कॉलेज, केंब्रिज येथे प्रवेश घेतला आणि जेजे थॉमसन आणि चार्ल्स थॉमसन रीस विल्सन यांच्यासह प्रमुख भौतिकशास्त्रज्ञांसोबत कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम केले.1910 मध्ये ते लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये दाखल झाले, तेथून त्यांनी 1912 मध्ये भौतिकशास्त्रात डिप्लोमा आणि प्रथम श्रेणी बीएससी मिळवले. नंतर ते कलकत्त्याला परतले आणि 1913 मध्ये कलकत्ता येथील सीटी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवले. परदेशात शिकण्यासाठी त्यांना घोष ट्रॅव्हल फेलोशिप देण्यात आली. बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात दोन वर्षांसाठी प्रगत भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी निवड झाली. बर्लिनमध्ये देवेंद्रला प्रोफेसर एएच रेगिन यांच्या प्रयोगशाळेत नेमण्यात आले. चेंबरमध्ये वेगाने प्रवेगक अल्फा कणांच्या उत्तीर्णतेदरम्यान तयार झालेल्या प्रतिध्वनीयुक्त प्रोटॉनच्या ट्रॅकचे छायाचित्र काढण्यात तो यशस्वी झाला. प्राथमिक तपासणीचे परिणाम 1916 मध्ये फिलोजेन्सी झीत्स्क्रिस्टा जर्नलमध्ये प्रकाशित झाले. मार्च 1919 मध्ये पीएचडी केल्यानंतर ते भारतात परतले . जुलै 1919 मध्ये, डी.एम.बोस पुन्हा रासबिहारी बोस यांच्याकडे कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1932 मध्ये, ते प्राध्यापक सीव्ही रमण यांच्यानंतर भौतिकशास्त्राचे पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.1938 मध्ये, डीएम बोस संस्थेचे संस्थापक जेसी बोस यांच्या निधनानंतर, बोस संस्थेचे संचालक बनले.1945 मध्ये, बोस यांचा CSIR च्या अणुऊर्जा समितीमध्ये अणु रसायनशास्त्र तज्ञ म्हणून समावेश करण्यात आला. ही समिती पुढे अणुऊर्जा आयोग (AEC) बनली. कॉस्मिक रेज मध्ये त्यांनी विभा चौधरी यांच्यासोबत मोलाचे कार्य केले. अखेर 2 जून 1975 रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित सभा आयोजित करण्यात आली. या गणित सभेमध्ये परभणीतील गणित विषयातील तज्ञ प्राध्यापक , शिक्षक तसेच गणित शिकवणी विषय तज्ञ सहभागी झालेले होते या सभेमध्ये गणित विषयातील मार्गदर्शक तज्ज्ञ श्री संजय टिकारिया व श्री नागेश वाईकर यांनी सादरीकरण केले. परभणीमध्ये प्रस्तावित सायन्स पार्कमध्ये गणिताचे दालन कसे असावे? यामध्ये साहित्य कसे असावे? व त्यासाठी किती जागा लागू शकते? या विषयांवर सर्व विषय तज्ञांनी सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात श्री नागेश वाईकर यांनी सक्रिय जनगणित याविषयी आपले सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी कशी लागेल व यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये श्री संजय टिकारिया यांनी ‘माय टाईनी मॕथ लॅबोरेटरी’ याविषयी सादरीकरण केले यामध्ये गणित विषय कृतीतून कसा आपण शिकवू शकतो हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये परभणीतील सर्व गणित विषय तज्ञांनी गणित दालनाविषयी व त्याच्या एकूण रचणेवर सखोल चर्चा केली व आपल्या उपयुक्त सूचना मांडल्या.
या प्रसंगी सत्रांमध्ये सत्रनिरीक्षक म्हणून श्री व्हि एम भोसले, श्री संजय पेडगावकर, श्री संभाजी सवंडकर, श्री संतोष पोपडे, श्री प्रकाश केंद्रेकर, श्री विष्णू नवपुते यांनी काम पाहिले. या सत्रांनंतर श्री विठ्ठल भुसारे जि प शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी या गणित दालनातील विविध विविध कृतींचा आढावा व त्यातील जिल्हा परिषदचा सहभाग याविषयी विचार मांडले. त्यांनंतर मा शौकत पठान उपशिक्षणाधिकारी (प्रा) यांनी गणितातील तर्कशास्त्र यावर विवेचन केले. या सभेचे सूत्रसंचलन श्री प्रसाद वाघमारे, प्रास्ताविक श्री डॉ रामेश्वर नाईक व आभार प्रदर्शन श्री दिपक शिंदे यांनी केले. या सभेच्या यशस्वीतेसाठी डॉ पी आर पाटील, श्री सुधीर सोनुनकर, ओम तलरेजा, डॉ रणजित लाड, कोमल चव्हाण, अशोक लाड, विजय नरवाडे, डॉ निंबाळकर, अर्जून कच्छवे, दत्ता बनसोडे, अमरसिंग कच्छवे, प्रताप चव्हाण, घूंबरे सर, सवंडकर सर, पोपडे सर, जाधव सर, कुलकर्णी सर, जयस्वाल सर, चव्हाण सर, कानडे सर, पाटील सर, फेगडे सर, गडम सर आदिंनी परिश्रम घेतले.
रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.
त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.
नंतर टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. १९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.
इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअॅक्शन) असे नाव आहे.
१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली. १९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली.
महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले.भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले.
सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.
जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली.
डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला. भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. हृदयविकारामुळे त्यांचे 25 मे 1999 रोजी निधन झाले.
आपण जाणून घेणार आहोत भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या बद्दल. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७ रोजी झाला. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले.
मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाईप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्यदेखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यू यॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले. स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत. भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले. मिनिटाला २४०० टाईप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते. त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले. समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा. वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र. धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ. जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात काही शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.