सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात.
संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत.
सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत.त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी आहे. सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.
त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
सुधा मूर्ती यांचे प्रकाशित साहित्य
अस्तित्व आजीच्या पोतडीतील गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी) कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद – लीना सोहोनी गोष्टी माणसांच्ता जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी) डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी) तीन हजार टाके (मूळ इंग्रजी, ’थ्री थाउजंड स्टिचेस’; मराठी अनुवाद लीना सोहोनी) थैलीभर गोष्टी परिधी (कानडी) परीघ (मराठी) पितृऋण पुण्यभूमी भारत बकुळ (मराठी) द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी) महाश्वेता (कानडी व इंग्रजी) वाइज अँड अदरवाइज (इंग्रजी), (मराठी) सामान्यांतले असामान्य (अनुवाद उमा कुलकर्णी) २०१७ सुकेशिनी हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज (इंग्रजी)
पुरस्कार आणि सन्मान संपादन इ.स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड ) इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार इ.स. २००६ – भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.[१२] इ.स. २०१० – एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार. सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी इ.स. २०२३ – भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते.
नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).
विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी प्रेमविवाह केला. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत.
वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकिल म्हणून ते वर्ऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली.वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्यकेले•कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८),
• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी)
•मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४
•महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती.
•राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८
•शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५)
• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१
• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना, विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते.
नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले.
महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या.
कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहेत.
वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.
विक्रम अंबालाल साराभाई भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात ऑगस्ट १२, १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.
भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली.
डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. संपादन करा
३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे दुःखद निधन झाले.
जन्म.८ ऑगस्ट १९३४ औरंगाबाद येथे. महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही.
नेपाळ, भूतान, बांग्लादेश व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण मार्गाने केलेला पाणीवाटपाचा करार असो, भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारणं असो, किंवा राष्ट्रीय जलदिन साजरा करण्याची कल्पना राबवणं असो, प्रत्येक टप्प्यावर डॉ. माधवराव चितळे हे नाव, पाण्याशी जोडलेलं आहे.
डॉ. माधव चितळे यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली.
पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं. १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी ‘सर्वोत्तम पर्विन फेलो’ हा सन्मान पटकावला.
त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली.
जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.
दिलीप महालानेबिस यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३४ रोजी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील किशोरगंज जिल्ह्यात झाला. तेथे इंटर्न म्हणून काम केल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून बालरोगतज्ञ म्हणून पदवी प्राप्त केली.
यूकेमधील एनएचएसमुळे त्यांना यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी लंडन आणि एडिनबर्ग येथून पदव्या मिळवल्या. ते अतिसाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी ओरल रीहायड्रेशन थेरपीच्या वापरासाठी प्रख्यात होते.
दिलीप यांनी १९६६ मध्ये भारतातील कलकत्ता येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संशोधन अन्वेषक म्हणून ओरल रीहायड्रेशन थेरपीवर संशोधन करण्यास सुरुवात केली होती. बांगलादेशी स्वातंत्र्याच्या युद्धादरम्यान, त्यांनी जॉन्स हॉपकिन्स सेंटरच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले. पश्चिम बंगालमध्ये आश्रय मागणाऱ्या पूर्व बंगाल (आता बांगलादेश ) मधील निर्वासितांमध्ये १९७१ मध्ये कॉलरा सुरू झाला तेव्हा ओरल रीहायड्रेशन थेरपीची नाट्यमय जीवन-बचत प्रभावीता दाखवून दिली. यामुळे साधे, स्वस्त ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) ला मान्यता मिळाली. द लॅन्सेट या नियतकालिकाने त्यांच्या ह्या थेरपीला “२० व्या शतकातील सर्वात महत्वाचा वैद्यकीय शोध” म्हणून त्यांना गौरवण्यात आले.
त्यांनी १९७५ – १९७९ पासून डब्ल्यु एच ओ च्या कॉलरा कंट्रोल युनिटमध्ये अफगाणिस्तान, इजिप्त आणि येमेनमध्ये काम केले. १९८० च्या दशकात त्यांनी डब्ल्यु एच ओ साठी जिवाणूजन्य रोगांवर सल्लागार म्हणून काम केले. १९८० च्या मध्यात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस, ते डब्ल्यु एच ओ च्या अतिसार रोग नियंत्रण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी होते.
१९९० मध्ये त्यांची बांगलादेशातील इंटरनॅशनल सेंटर फॉर डायरियाल डिसीज रिसर्च येथे क्लिनिकल रिसर्च ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. पुढे जाऊन तेथील क्लिनिकल रिसर्चचे संचालक झाले. २००४ मध्ये, ते आणि डॉ. नॅथॅनियल पियर्स ओआरएस च्या सुधारित आवृत्तीवर काम करत होते जे सर्व प्रकारच्या अतिसारापासून निर्जलीकरण रोखण्यासाठी आणि कमी स्टूल आउटपुट सारखे अतिरिक्त फायदे प्रदान करण्यासाठी अधिक प्रभावी होईल.दिलीप यांचा विवाह जयंती महालनेबीस यांच्याशी झाला होता.
वयाच्या ८७ व्या वर्षी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पश्चिम बंगाल, कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी ग्रासले होते.