+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
डॉ गोविंद स्वरूप

डॉ गोविंद स्वरूप

डॉ. गोविंद स्वरूप यांचा जन्म ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश, येथे 23मार्च 1929 झाला. यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते.

डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली.

कारकीर्द.
डॉ. गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.

सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद – नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.

पुरस्कार


शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७२)
पद्मश्री (१९७३)
पी.सी. महालनोबीस पदक (१९८४)
मेघनाद साहा पदक (१९८७)
होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००९)

७ सप्टेंबर २०२०, पुणे येथे अल्पशा अजाराणे निधन झाले…

संकलन डॉ. लिंबाळकर 9834393018

बौधायान

बौधायान

इतिहास प्राचीन भारतीय विज्ञानाचा या सत्रात आपले पुनश्च स्वागत🙏🏻🙏🏻🙏🏻

आज आपण जाणून घेणार आहोत चोकोणाचे वर्तुळ करणारा कल्पक भूमिती तज्ञ…….. बौधायन यांच्या विषयी. ख्रिस्ती पूर्व पाचवे ते तिसरे शतक असावे,प्राचीन भारतीयांचा ज्ञानयज्ञ हा जग व्यापून राहिला होता. त्यातूनच जगाला मिळालेले पायस म्हणजे गणित विषय, त्यातला एक महत्त्वाचा यज्ञकरता म्हणजे प्राचीन भारतीय भूमिती तज्ञ बौधायन होय.

भूमितीतील रचना कूट प्रश्न आणि त्याची उत्तरे, चौकोनाचे तेच क्षेत्रफळ असलेल्या समांतर समद्विभुज चौकोनात रूपांतर कसे करायचे,दोन काटकोन समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकेच क्षेत्रफळ असणारा काटकोन समभुज चौकोन कसा काढायचा, दोन काटकोन समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या फरका इतके क्षेत्रफळ असलेला काटकोन समभुज चौकोन काढणे,चौकोनाचे त्याच्या इतके क्षेत्रफळ असलेला समभुज चौकोन काढणे,काटकोन समभुज चौकोनाचे तितक्याच क्षेत्रफळाच्या वर्तुळात परिवर्तन करणे,असे अनेक भूमिती सिद्धांत त्यांनी मांडले व सिद्ध केले. बौधायनांच्या सूत्रग्रंथांमध्ये पुढील ६ ग्रंथांचा समावेश होतो :

१) बौधायन श्रौतसूत्र

२) बौधायन कर्मान्तसूत्र

३) बौधायन द्वैधसूत्र

४) बौधायन गृह्यसूत्र

५) बौधायन धर्मसूत्र

६) बौधायन शुल्बसूत्र

बौधायन शुल्बसूत्रांमध्ये आधुनिक भूमितीमधील काही प्रमेये समाविष्ट आहेत.

बौधायन प्रमेय/ पायथॅगोरसचे प्रमेय :

आज आधुनिक भूमितीमध्ये जे प्रमेय पायथॅगोरसचे प्रमेय म्हणून ओळखले जाते ते बौधायनांनी पायथॅगोरसच्या आधी कित्येक वर्षे आपल्या ग्रंथामध्ये श्लोकस्वरूपात लिहिलेले आहे.

दीर्घचतुरश्रस्याक्ष्णया रज्जुः पार्श्वमानी तिर्यग् मानीच यत् पृथग् भूते कुरूतस्तदुभयं करोति ॥

अर्थात त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्रिकोणाच्या कर्णाच्या वर्गाएवढी असते.

२ चेवर्गमूळ :

आज ज्या संख्यांना गणितात करणी संख्या म्हटले जाते त्या संख्यांची किंमत काढण्याची पद्धत देखील बौधायनांनी आपल्या ग्रंथात नमूद करून ठेवली आहे.

समस्य द्विकर्णि प्रमाणं तृतीयेन वर्धयेत।

तच् चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन सविशेषः।।

या पद्धतीने २ चेवर्गमूळ काढल्यास ते पाच दशांश स्थळांपर्यंत अचूक येते.

√२ = १ + १/३ + १/(३x४) – (१)/(३x४x३४) = ५७७/४०८ = १.४१४२१६ निरनिराळ्या आकाराच्या यज्ञविधी बांधण्यास भूमितीय रचना पद्धतीचा शोध त्यांनी लावला… तत्कालीन राजाकडून त्यांना भूमिती तज्ञ म्हणून गौरविण्यात आले होते…..

संकलन-डॉ. बी. व्ही. लिंबाळकर

आदित्य एल 1

आदित्य एल 1

भारत सूर्याच्या किती जवळ जाणार, L1 म्हणजे काय? जाणून घ्या इस्रोच्या आदित्य-L1 बाबत सर्व माहिती….
ISRO Aditya L1 Mission: चंद्रावर गेल्यानंतर आता भारत सूर्याच्या जवळ जाण्यास सज्ज झाला आहे. पण, सूर्याच्या उष्णतेने आदित्य-L1 जळून राख का होणार नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

सूर्याच्या पृष्ठभागापासून थोडे वर म्हणजेच फोटोस्फिअरचे तापमान सुमारे ५५०० अंश सेल्सिअस इतके असते. त्याच्या केंद्राचं कमाल तापमान १५ दशलक्ष अंश सेल्सिअस असतं. अशा स्थितीत कुठलंही यान किंवा स्पेसक्राफ्ट तेथे जाणं शक्य होत नाही. पृथ्वीवर मानवाने बनवलेली अशी कोणतीही वस्तू नाही जी सूर्याची उष्णता सहन करू शकेल. म्हणूनच स्पेसक्राफ्टला सूर्यापासून योग्य अंतरावर ठेवले जाते किंवा काही अंतरावरुन त्याचं भ्रमण केलं जातं.

इस्रो २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.५० वाजता आदित्य-एल१ मिशन लाँच करणार आहे. ही भारतातील पहिली अंतराळ आधारित वेधशाळा आहे. आदित्य-एल१ सूर्यापासून इतक्या लांब असेल की त्याला उष्णता जाणवेल, पण तो नष्ट होणार नाही किंवा खराब होणार नाही. त्याला अशाच प्रकारे तयार करण्यात आलं आहे.आदित्य-एल१ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाईल. या प्रवासादरम्यान आदित्य-एल१ १.५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करेल. म्हणजेच ते सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर दूर, पृथ्वीच्या जवळ असेल. तर १.५ दशलक्ष किलोमीटरचे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट जास्त आहे. प्रक्षेपणासाठी PSLV-XL रॉकेटचा वापर केला जाणार आहे आहे. ज्याचा क्रमांक PSLV-C57 आहे.

L1 म्हणजे Lagrange Point One म्हणजे काय?

आपल्या ताऱ्याला म्हणजेच सूर्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. तर, पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. अंतराळात जिथे या दोघांचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना भिडते. किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जिथे संपतो, तिथून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुरू होतो. या मधल्या बिंदूला Lagrange Point म्हणतात.

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लॅरेंज बिंदू चिन्हांकित केले गेले आहेत. भारताचे सूर्ययान लॅरेंज पॉइंट १ म्हणजेच L1 येथे तैनात असेल.दोन्हीच्या गुरुत्वाकर्षणाची जी सीमा आहे, तिथे एखादी छोटी वस्तू जास्त काळ राहू शकते. ती दोघांच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेली असेल. त्यामुळे अवकाशयानाचे इंधन कमी वापरले जाते. तो बराच वेळ काम करु शकतो. L1 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरळ रेषेच्या डावीकडे स्थित आहे. हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजे १५ लाख किमी. तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे. एकूण पाच लॅरेंज पॉइंट्स आहेत – L1, L2, L3, L4 आणि L5.


आदित्यसारख्या खडतर मिशनचा प्रवास कसा पूर्ण होणार?

आदित्य-L1 लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) येथून प्रवास सुरू करेल. म्हणजेच पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट ते LEO मध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मॅन्यूवरनंतर ते थेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या म्हणजेच स्फेअर ऑफ इन्फ्ल्यूएन्स (SOI) च्या बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझ फेज सुरू होईल. हे काही काळ चालेल.यानंतर आदित्य-एल१ हे हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येईल. L1 बिंदू कुठे आहे. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण, सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त १ टक्के आहे. या प्रवासात १२७ दिवस लागणार आहेत. हे फार अवघड असेल असं मानले जात आहे कारण त्याला दोन मोठ्या कक्षेतून जावे लागणार आहे. पहिली अवघड कक्षा म्हणजे पृथ्वीच्या SOI च्या बाहेर जाणे. कारण पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट खेचून घेते. यानंतर समुद्रपर्यटन क्रूज फेज आणि हॅलो ऑर्बिटमध्ये L1 हे स्थान कॅप्चर करणे. हे फार महत्त्वाचं असेल. त्याचा वेग इथे नियंत्रित केला नाही तर तो थेट सूर्याकडे जाईल आणि जळून राख होईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जातोय आदित्य एल-१

सूर्य हा आपला तारा आहे. त्यातूनच आपल्या सूर्यमालेला ऊर्जा मिळते. त्याचे वय सुमारे ४५० कोटी वर्षे मानले जाते. सौरऊर्जेशिवाय पृथ्वीवरील जीवन शक्य नाही. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे या सूर्यमालेतील सर्व ग्रह स्थिर आहेत. अन्यथा, ते खूप कधीच अंतराळात तरंगत राहिले असतेन्यूक्लियर फ्यूजन सूर्याच्या मध्यभागी म्हणजेच कोरमध्ये घडते. त्यामुळे सूर्याच्या आजूबाजूला आगीच्या ज्वाळा दिसतात. पृष्ठभागाच्या थोडंवर म्हणजे त्याच्या फोटोस्फियरचे तापमान ५५०० अंश सेल्सिअस पर्यंत असते. सूर्याचा अभ्यास याकरिता केला जात आहे जेणेकरुन सूर्यमालेतील उर्वरित ग्रहांबद्दल समजून घ्यायला मदत मिळेल.

सूर्यामुळे पृथ्वीवर रेडिएशन, उष्णता, चुंबकीय क्षेत्र आणि चार्ज्ड पार्टिकल्स यांचा सतत प्रवाह असतो. या प्रवाहाला सौर वारा किंवा सोलर विंड म्हणतात. ते उच्च ऊर्जा असलेल्या प्रोटॉनने बनलेले असतात. सौर चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळते, जे खूप स्फोटक आहे. येथेच कोरोनल मास इजेक्शन (CME) होते. त्यामुळे येणाऱ्या सौर वादळामुळे पृथ्वीचे अनेक प्रकारची हानी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अंतराळातील हवामान जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे हवामान सूर्यामुळे चांगलं होतं आणि बिघडतंही.


आदित्य मिशनचा मुख्य उद्देश काय?

सूर्याच्या कोरोनामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे.

सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

सौर वाऱ्यांचे वितरण आणि तापमानाचा अभ्यास करेल.

सौर वादळे, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याचे कारण अभ्यासणार आहे.

संकलन डॉ. बी. व्हि. लिंबाळकर

मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन

मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन

मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन यांचं जन्म २८ ऑगस्ट, इ.स. १९२८ मध्ये मंगळूरु, कर्नाटक येथे झाला.हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत.मेनन जी यांनी 1946 मध्ये ‘जसवंत कॉलेज’, जोधपूर , भारत येथून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले . यानंतर ‘रॉयल ​​इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, एम.एस्सी. 1949 मध्ये पीएच.डी आणि नंतर 1955 मध्ये ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ केले.

त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले.होमी भाभा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा वेळी ही मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोरहून मुंबई हलवली होती. 1966 मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली.
त्यावेळी ते ३८ वर्षाचे होते. 1975 पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली.
दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये नऊ महिने काम केले.
1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1974 ते 1978 या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली.

त्यांना 1961 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण, 1985 मध्ये पद्मविभूषण हे तिने पद्म पुरस्कार प्राप्त झाले. १९६०चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला.
विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले.

संकलन… डॉक्टर बी व्ही लिंबाळकर 9834393018

चांद्रयान 3– मोहिमेतून नक्की काय मिळणार

चांद्रयान 3– मोहिमेतून नक्की काय मिळणार

लँडिंगचा आनंद आहेच पण या मोहिमेतून नक्की काय मिळणार आहे हे जाणूया थोडे विस्तृतपणे

चंद्रयान-2 मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या चंद्रयान 3 मध्ये काढून टाकत लँडर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.
प्रपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर सात प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. यामध्ये लँडरवरील चार, रोव्हरवरील दोन आणि प्रोपल्शन मॉड्यूलवरील एक यंंत्राचा समावेश आहे.
इस्रोने चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसह विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलचा भाग म्हणून पाठवले होते.
चांद्रयान-2 चं ऑर्बिटर जवळपास चार वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आहे.

प्रपल्शन मॉड्यूल


17 ऑगस्ट रोजी चंद्रयानाचं लँडर प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले. त्याचे वजन 2145 किलो आहे आणि प्रक्षेपणाच्या वेळी त्यात 1696 किलो इंधन होते.
चंद्रयान-3 च्या प्रपल्शन मोड्यूलमध्ये शेप नामक उपकरण देखील जोडण्यात आले आहे. शेप (SHAPE) म्हणजे स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लेनेटरी अर्थ. हे शेप उपकरण प्रपल्शन मोड्यूलसोबत चंद्राभोवती फिरत राहील आणि इतर दूरच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारा निरिक्षण करेल आणि तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल.
इस्रोचा अंदाज आहे की हे यान तीन ते सहा महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. हे शेप उपकरण प्रोपल्शन मॉड्युलमध्ये बसवलेल्या एस बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचविण्याचं काम करेल.


लँडर मॉड्यूल


चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.
ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात त्याचं संशोधन केलं जाईल.
चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. (चंद्रावर एक दिवस आणि एक रात्र असं चक्र पूर्ण होण्यासाठी पृथ्वीवरचे 28 दिवस लागतात. )


लँडर


चंद्रयान-3 चे लँडर दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद, एक मीटर 116 सेमी उंच आणि 1749 किलो वजनाचे आहे. चंद्रयान-3 च्या दळणवळणात लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल कारण हे लँडर रोव्हर सोबतच चंद्रयान-2 वेळी प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरशी देखील संवाद साधेल. याशिवाय, तो बंगळुरूजवळील बेलालू येथील भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी थेट संवाद साधेल. चंद्रयान 1 आणि मंगळयान सारख्या अंतराळ मोहिमेदरम्यानही नेटवर्कचा वापर संपर्कासाठी करण्यात आला होता.


चंद्रयान 3 ची विशेष उपकरणे


इस्रोने लँडर मॉड्यूलमध्ये महत्त्वाचे पेलोड लावले आहेत. यापैकी एक म्हणजे रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फियर. थोडक्यात सांगायचं तर रंभा. (RAMBHA). हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून माहिती गोळा करेल.

लँडरमध्ये बसवलेलं हे महत्त्वाचं उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्मांचा अभ्यास करेल. लँडरमध्ये बसवलेलं आणखी एक प्रमुख उपकरण आहे, ज्याला आयएलएसए म्हणजेच इंस्ट्रुमेंट फॉर लूनार सिस्मिक एक्टिविटी असं म्हणतात. हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल.भूकंप ओळखण्यासाठी सेस्मोग्राफरही लँडरवर बसवण्यात आला आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती करायच्या असतील, तर आधी तिथल्या भूकंपीय क्रियाकलापांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग साइटवरील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करेल आणि चंद्राच्या कवच आणि आवरणाची तपासणी करेल.


यासोबतच एलआरए नावाचा आणखी एक पेलोड लँडरमध्ये बसवण्यात आला आहे. एलआरएला लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे असं म्हणतात. हे उपकरण चंद्राच्या गतिशीलतेची तपासणी करते. या उपकरणांना चालवण्यासाठी वीज लागते. चंद्रयान-3 मध्ये बॅटरीसोबतच वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेल लावण्यात आलेत.
जर लँडर सूर्यप्रकाशाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने उतरला तरी कोणतीही अडचण येणार नाही कारण लँडरच्या तीन बाजूंना सोलर पॅनेल आहेत. चौथ्या बाजूने रोव्हर सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी रॅम्प बसवण्यात आला आहे.


रोव्हर


चंद्रावर लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर, रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि संशोधन करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
चांद्रयान-3 च्या रोव्हरचं वजन फक्त 26 किलो आहे. त्याला सहा चाकं असून वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे.
रोव्हर-91.7 सेमी लांब, 75 सेमी रुंद आणि 39.7 सेमी उंच असलेलं हे रोव्हर त्याच्या सहा चाकांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरी मारेल. त्याच्या लहान आकारामुळे आणि इतर गोष्टींमुळे, रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. याचा अर्थ की रोव्हरने जर लँडरला गोळा केलेली माहिती पाठवली तरच लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल.
रोव्हरमध्ये दोन प्रमुख उपकरणे आहेत.
त्यापैकी पहिलं आहे एलआयबीएस म्हणजेच लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप. हे मुख्य उपकरण आहे. एखाद्या ठिकाणचे घटक आणि त्यांचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे.
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेसर प्रकाश टाकेल.
त्यामुळे पृष्ठभागावरील माती वितळून प्रकाश उत्सर्जित होईल. त्याच्या तरंगलांबीचे विश्लेषण करून, एलआयबीएस पृष्ठभागावर असणाऱ्या रासायनिक घटकांची ओळख पटवेल.
रोव्हरवर बसवलेले हे एलआयबीएस उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या घटकांचा शोध घेण्यात मदत करेल.
चंद्रावरील या मोहिमांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं संशोधन आहे.
एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लँडरला पाठवेल. लँडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल.
रोव्हरवर बसवलेलं दुसरं उपकरण आहे एपीएक्सएस म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले रासायनिक संयुगे शोधून काढेल.
यामुळे चंद्राच्या भूपृष्ठाबद्दल आणि मातीबद्दलची आपली समज वाढेल. त्यामुळे भविष्यातील प्रयोगांना अधिक वेग मिळेल.


नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटीसारख्या रोव्हरमध्येही असंच उपकरण बसवण्यात आलं होतं.

२३/८/२३
माहिती स्रोत –
ISRO website
BBC News.

डॉ.माधवी किशोर ठाणेकर
सांगली

संकलन डॉ. लिंबाळकर