भारतातील १९५० सालानंतरच्या कृषी शिक्षण व संशोधन कार्यातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल तसेच ज्यांच्या संशोधन व विकासाभिमुख दृष्टीने भारतात हरितक्रांती झाली त्यांच्यापैकी एक असलेल्या आत्माराम भैरव जोशी यांचा जन्म जबलपूर (मध्य प्रदेश) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाले. त्यांनी १९३२ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली.
पुढील शिक्षणाकरता जोशी यांनी नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी १९३७ मध्ये ही नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी प्रथम वर्गात सुवर्णपदकही मिळवले. त्यांची पुढील सर्व वाटचाल कृषिविज्ञानक्षेत्रात झाली. नवी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.तील (पुसा इन्स्टिट्यूट) ‘इकॉनॉमिक बॉटनी’ या विषयात त्यांनी असोसिएटशिप प्राप्त केली. ही पदवी एम.एस्सी.(कृषी)च्या समकक्ष होती. एम.एस्सी. झाल्यानंतर जोशी यांनी त्याच संस्थेत संशोधन साहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली. जोशी यांनी त्यांच्या कर्तृृत्वाने पुढे या संस्थेचे प्रमुख म्हणूनही कार्य केले. ही संस्था देशात व परदेशात नावारूपाला आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
१९४७ मध्ये पीएच.डी. पदवी अभ्यासक्रमासाठी इंग्लंड येथे जाण्याकरता त्यांची निवड झाली. त्यांनी १९५० मध्ये केंब्रिज विद्यापीठातून ‘सायटोजेनेटिक्स’ या विषयात पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यानंतर भा.कृ.अ.सं.त निरनिराळ्या पदांवर काम करत १९५९ मध्ये त्यांची वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. भा.कृ.सं.सं.स ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ म्हणून १९५८ मध्ये मान्यता मिळाली आणि ही संस्था भारतातील उच्च कृषी शिक्षणाची मातृसंस्था म्हणून गौरवली गेली. या संस्थेचे पहिले अधिष्ठाता म्हणून १९६१ मध्ये डॉ. जोशी यांनी कामास सुरुवात केली. शैक्षणिक कार्यक्रमात अनेक बदल घडवून भारतातील कृषी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पुढे १९६५ मध्ये याच संस्थेचे ते संचालक झाले. दोन वर्षे भा.कृ.अ.प.चे ते उपमहानिर्देशक म्हणून कार्यरत होते.
डॉ. जोशी यांच्यावर १९६०-१९६१ या काळात भा.कृ.अ.सं.ने भारतातील गहू पिकाच्या संशोधनाचे जाळे विणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या संस्थेचे अधिष्ठाता म्हणून काम करताना या गहू प्रकल्पाची जबाबदारी त्यांना पेलावी लागली. हीच भारतातील समन्वित पीक संशोधनाची गंगोत्री होती. एका पिकावर विविध विषयांचे तज्ज्ञ एकत्रित आणून देशातील अनेक संशोधन केंद्रांवर सर्वंकष चाचण्या करून पिकांच्या जातीविषयी, उत्पादन तंत्राविषयी माहिती मिळवणे, हा याचा प्रमुख उद्देश होता.
आधी भारतात गहू पिकावर संशोधन होतच होते. परंतु एका राज्यातील संशोधनाचा दुसर्या राज्यातील संशोधनाशी संबंध येत नव्हता व खुलेपणाने माहितीही दिली जात नव्हती. समन्वित संशोधन प्रकल्पाद्वारे निरनिराळ्या भू-हवामान विभागात लागवड पद्धतीत एकाच वेळी चाचण्या होऊ लागल्यामुळे पिकांच्या जाती, लागवडी इ.संबंधी दोन-तीन वर्षांतच त्यांचे शिफारशींचे निर्णय घेणे शक्य होऊ लागले. पूर्वी या गोष्टींना १०-१० वर्षे लागत. पुढे अनेक पिकांवर व पद्धतींवर अशा समन्वित प्रकल्पाच्या संशोधन योजना सुरू होऊन त्यांच्या शिफारशी प्रसारित करणे शक्य झाले. त्यामुळे उत्पादनवाढीचे लक्ष गाठणे शक्य झाले. याच प्रयत्नातून मेक्सिकन जातीच्या बुटक्या गव्हाच्या, भाताच्या, संकरित मका, ज्वारी व बाजरी पिकाच्या जाती निर्माण होण्यास मदत झाली. ही सर्व परिस्थिती ‘हरितक्रांती’ची सुरुवात होण्यास साहाय्यभूत ठरली. भारत १९६०पर्यंत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, मका आयात करत असे. ती परिस्थिती पुढील दहा वर्षांत पालटून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. डॉ. जोशी यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून १९७६मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
डॉ. जोशी यांनी दिल्लीतील भा.कृ.अ.सं. व कृ.अ.प. या संस्थांमध्ये प्रथमपासूनच काम केल्यामुळे त्यांची कृषी संशोधन व विकासाबद्दलची दृष्टी विशाल होऊन प्रादेशिक समस्यांबद्दलचे आकलन परिपूर्ण झाले. केवळ उत्तम व जातिवंत वाण करून न थांबता त्यांचे प्रात्यक्षिक शेतकर्यांच्या शेतावर दाखवणे महत्त्वाचे आहे, अशी त्यांची धारणा होती. संशोधकांबरोबरच राजकीय नेतृत्वदेखील महत्त्वाचे असते असा त्यांना अनुभव आला. आय.ए.आर.आय.चे अधिष्ठाता म्हणून काम करताना त्यांची व अण्णासाहेब शिंदे यांची ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर होऊन आय.ए.आर.आय.च्या प्रायोगिक विभागाला शिंदे यांच्या वरचेवर भेटी झाल्या. याच सुमारास (१९५८-१९६६) मेक्सिको येथून आलेल्या गव्हाच्या जातींच्या चाचण्या सुरू होत्या. या जातींच्या गव्हाची उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टर होती. डॉ. जोशी यांनी या नव्या वाणांचे प्रात्यक्षिक शेतकर्यांच्या शेतावर घेण्याची कल्पना सूचवली. अण्णासाहेब शिंदे यांना ही कल्पना पसंत पडून त्यातूनच ‘राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजने’चा जन्म झाल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले आहे. पुढे त्यांना १९६७-६८मध्ये आय.ए.आर.आय.च्या प्रायोगिक क्षेत्रास भेट देत असताना सूर्यफूल व सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिके घेण्याची कल्पना सूचवली.
त्या काळी राज्यातील शेती विभाग या कामास तयार नव्हता. परंतु केंद्रीय कृषी मंत्री सुब्रह्मण्यम व अण्णासाहेब शिंदे यांनी या सर्व सरकारी खात्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या दोन पिकांच्या प्रात्यक्षिकांना सर्व राज्यांत सुरुवात झाली. मध्य प्रदेश तर सोयाबीन राज्य झाले. आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांत सोयाबीन व सूर्यफूल या दोन पिकांना महत्त्व येऊन तेलबियांचे उत्पादन वाढले. हे सर्व डॉ. जोशी व त्या वेळच्या राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे होऊ शकले. डॉ. जोशी हे पहिल्या शैक्षणिक आयोगाचे (कोठारी आयोग) सदस्य होते. त्यांनी १९६०-१९६५ या काळात प्रत्येक राज्यात एका कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याबद्दल आग्रह धरला. प्रायोगिक तत्त्वावर उत्तर प्रदेशमध्ये पंतनगर येथे पहिले कृषी विद्यापीठ सुरू झाले. त्यानंतर पंजाब व मध्य प्रदेशमध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. आज भारतभर ३६पेक्षा अधिक कृषी विद्यापीठे आहेत. शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य एकत्रित करण्याचा प्रयत्न यामुळे साध्य होतो. डॉ. जोशी संशोधन व विकास कार्यात गुंतलेले होते, तरी ते स्वतः नियमित शैक्षणिक जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी एकंदर ४६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व पीएच.डी. या पदव्यांकरता मार्गदर्शन केले आहे. त्यांची व्याख्याने अतिशय उद्बोधक व समस्यांना भिडणारी होती.
डॉ. जोशी यांनी मूलभूत व व्यावहारिक बाबींवर संशोधन केले आहे. त्यात कापूस, बार्ली, राई व ट्रिटिकेल यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी कपाशी पिकातील संकरित जोम व भिन्न प्रजातींच्या संकरीकरणाबद्दलचे महत्त्वाचे संशोधन केले आहे. तीळ पिकातील गुणसूत्राबद्दलचे त्यांचे संशोधन जगभर मान्य झालेले आहे. डॉ. जोशी यांनी सुचवलेल्या पद्धतीने जगातील पहिला संकरित कापूस वाण डॉ. सी.टी. पटेल यांनी निर्माण केला (एच ४). त्याकरता हजारो हातांना काम मिळाले. या संकरित कापसामुळे कापूस उत्पादनात लक्षणीय भर पडून कापड गिरण्यांची भरभराट झाली. त्यांनी इंडियन जर्नल ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रिडिंगमध्ये संशोधनपर लेख लिहिले आणि या नियतकालिकाचे संपादक म्हणून अनेक वर्षे कार्य केले.
डॉ. जोशी यांना कृषी संशोधनामध्ये केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी इंटरनॅशनल टीम फॉर इंप्रूव्हमेंट ऑफ अॅग्रिकल्चरल रीसर्च ऑर्गनायझेशन इन इंडोनेशिया - सदस्य (१९६९); एफ एक्स ओ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर इंपप्रूव्हमेंट ऑफ फिल्ड क्रॉप प्रॉडक्टिव्हिटी इन इजिप्त - सदस्य (१९७२-७६); इंटरनॅशनल पोटॅटो रीसर्च इन्स्टिट्यूट, लिमा (पेरू) - बोर्ड ऑफ डायरेक्टर्स; टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी ऑफ कन्सल्टेटिव्ह ग्रुप ऑन इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर रीसर्च वॉशिंग्टन यू.एस.ए., मनिला (फिलिपिन्स) - सदस्य (१९७७-७८); इंटरनॅशनल क्रॉप रीसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स-हैदराबाद, इकाडी (सिरिया), ईटा (नायजेरिया), सिएट (कोलंबिया) या संस्थांमार्फत संशोधन करत असलेल्या पिकांच्या जगातील बहुतेक उपलब्ध जातींचा व संबंधित रानटी जातींचा संग्रह केला असून त्या योग्य तर्हेने जतन केल्या जात आहेत. हे सर्व काम रिओडी जानेरो-ब्राझील येथे जैवविविधतेसंबंधी झालेल्या जागतिक बैठकीच्या आधारे इंटरनॅशनल बोर्ड ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेस, रोम (इटली)-सदस्य (१९७४-१९७७); इंटरनॅशनल सर्व्हिसेस फॉर नॅशनल अॅग्रिकल्चरल रिसर्च हेग-सल्लागार (१९८१-१९८२); वर्ल्ड बँक मिशन टू टांझानिया-सदस्य (१९७९) या संस्थांमध्ये कार्यरत होते.
डॉ. जोशी १९७२-१९७६ या दरम्यान नॅशनल कमिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या समितीचे सदस्य होते. ते १९७७-८० या कालावधीत म.फु.कृ.वि.चे कुलगुरू होते. या काळात त्यांनी विद्यापीठामध्ये संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करून संस्था नावारूपाला आणली. डॉ. जोशी यांना इंडियन सायन्स अॅकेडमी, इंडियन अॅकेडमी ऑफ सायन्सेस, नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅग्रिकल्चर सायन्सेस, महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन बोटॅनिकल सोसायटी यावर सदस्य म्हणून कार्य केले. त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, अध्यक्ष (१९६२ व १९६९) म्हणूनही कार्य केले. त्यांना इंडियन अॅग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिट्यूट - नवी दिल्ली; जी. बी. पंत कृषी विद्यापीठ पंतनगर (उत्तर प्रदेश); मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी (महाराष्ट्र) या विद्यापीठांनी ‘सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने गौरविले आहे. त्यांना १९७६मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला व याच साली त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कारही प्राप्त झाला.
जागतिक कीर्तीचे कृषितज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन् यांनी ‘डॉ. जोशी हे गेल्या शतकातील महत्तम कृषी शास्त्रज्ञ होते’, असा उल्लेख केलेला आहे.
संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट
शिकारी ते बर्डमॅन : सलीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष.
डॉ.सलिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू दिले. ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणजे भारताचे ‘पक्षिपुरुष’ म्हणूनही आज संपूर्ण जगाला त्यांची ओळख असली आणि त्यांच्या शास्त्रीय कार्याला जागतिक स्तरावरची मान्यता लाभली असली, तरी त्यापेक्षाही काकणभर सरस असणारे त्यांचे कार्य म्हणजे भारताला त्यांनी दिलेली निसर्ग संरक्षण आणि सुस्थापन चळवळीची देणगी.
त्यांचा जन्म सुलेमानी मुस्ता अली इस्माइली कुटुंबात झाला. नऊ भावंडांमध्ये ते सर्वांत शेवटचे होते. आईवडिलांचे छत्र लवकर हरपल्यामुळे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या मामांच्या, अमिरुद्दीन तय्यबजी यांच्या, गिरगावातल्या खेतवाडीमधील घरी झाले. मामांकडे निरनिराळ्या प्रकारची अनेक हत्यारे आणि बंदुका होत्या. ते शिकारी होते. लहानपणी सलिमनी गंमत म्हणून आणि खाण्यासाठी म्हणून अनेक चिमण्यांची शिकार केली होती. एकदा त्यांनी गळ्यावर पांढरा ठिपका असलेली चिमणी मारली.
परंतु धार्मिक घरामध्ये ती खाण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मामांनी त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बी.एन.एच.एस.) अभिरक्षक डब्ल्यू.एस. मिलार्ड यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्या पक्ष्याची ओळख करून देण्याबरोबर सलिमला सोसायटीतील पेंढा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह फिरवून दाखविला. पक्षिसृष्टीचे दार त्यामुळे उघडले जाऊन सलिम अलींना पक्षीविषयक अभ्यास गांभीर्याने स्वीकारणे शक्य झाले. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता.
शालेय जीवनात सलिम अलींनी फारशी चमक दाखविली नाही. त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष रुची नव्हती. परंतु खेळांमध्ये गोडी होती. घरामध्ये निसर्गविषयक माहिती आणि त्या संदर्भातील साधनांची रेलचेल होती म्हणून त्याची परिणती सलिम अलींच्या मनात पक्षिशास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजण्यात आणि तो फोफावण्यात झाली. १९१३ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी प्राणिशास्त्र विषयात पदवी घेण्याच्या दृष्टीने सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे प्रवेश घेतला. परंतु लॉगॅरिथम्स आणि तत्सम अवघड गोष्टींमुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) तेव्हायला प्रयाण केले. तेथे त्यांचे बंधू जाबिर अली खाणधंद्यामध्ये होते. भावाला मदत करण्याबरोबर आजूबाजूला असलेल्या वनप्रदेशात त्यांची भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच त्यांची निसर्गशास्त्रज्ञ होण्याची कौशल्ये वाढीस लागली.
१९१७ साली भारतात परतल्यावर त्यांनी प्राणिशास्त्रविषयक एक वर्षाचा अनौपचारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम छंद म्हणून पूर्ण केला. फावल्या वेळात ते बी.एन.एच.एस.मध्ये जात. तेथे त्यांना भारतीय पक्षिसृष्टीचा परिचय झाला. तेथे त्यांची प्रेटर यांच्याशी गट्टी जमली. त्यांच्याबरोबर त्यांनी पक्षी जगतात बरीच मुशाफिरी केली. १९१८ साली त्यांनी तेहमिना नावाच्या आपल्या दूरच्या नात्यातील मुलीशी विवाह केला. लगेच ते दोघे तेव्हायला परत गेले. सलिम अलींना खाण धंद्यापेक्षा पक्ष्यांतच रस होता. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला धंदा पूर्णपणे बसला आणि १९२४ साली अली बंधू भारतात परतले.
पक्षिजीवनाविषयीचे प्रशिक्षण घेण्याकरिता त्यांनी ठिकठिकाणी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांना बर्लिन विद्यापीठाच्या प्राणिसंग्रहालयाने प्रतिसाद दिला. प्रा. एरविन स्टेसमन यांच्या हाताखाली त्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेतले. अर्थात त्यासाठी त्यांना तत्कालीन वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी असलेल्या पक्षिशास्त्रज्ञांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. बर्लिनमधील सात महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायांत कडी चढविण्याच्या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन कार्यानुभव घेतला.
१९३० साली भारतामध्ये पुन्हा एकदा नोकरीचा शोध सुरू झाला. योग्य नोकरी न मिळाल्यामुळे सलिम अली आणि तेहमिना यांनी अलिबागजवळच्या किहीम या किनारपट्टीवरील गावात मुक्काम हालवला. तेथेच त्यांनी आपला सारा वेळ पक्ष्यांचा मागोवा घेण्यातच घालवला. बाया सुगरण पक्ष्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अशा प्रकारे बाया सुगरण पक्ष्यांचे दीर्घकाळ निरीक्षण करणारे ते पहिलेच होते. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने त्यांच्या वर्तवणूकीविषयी होता. आजवर कोणी, कुठेच न नोंदवलेले जीवननाट्य त्यांनी प्रत्यक्ष बघितले.
बाया नरपक्षी मादीबरोबर मिलन करण्याच्या हेतूने तिला आकर्षित करण्याकरिता शिंदीच्या झाडांवर घरटी विणतात. एका विशिष्ट टप्प्यावर ते घरट्याचे विणकाम थांबवतात. मादी त्याचे निरीक्षण करते. आंतररचना तपासते. घरटे पसंत न पडल्यास पुन्हा नवे घरटे उभारण्यास नराद्वारे सुरुवात केली जाते. पुन्हा तीच प्रक्रिया पार पडते. घरट्यास पसंती लाभल्यास त्याच घरट्यात लगेच मिलन उरकून पसंतीची खातरजमा होते. मग तो नशीबवान नर घरट्याची उर्वरित बांधणी पूर्ण करतो. त्यामध्ये मादी अंडी घालते, उबवते. घरटी सजीव होतात. नर मात्र एक घरटे बांधून पूर्ण होताच दुसरे घरटे बांधायला घेतो आणि नव्या घरोब्याच्या तयारीला लागतो. याच क्रमाने, एकाच हंगामात किमान तीन-चार माद्यांचा तो दादला होतो. पक्षीविषयक पुस्तकातून आजवर कोणीही न नोंदवलेला हा जीवनपट डॉ.सलिम अलींनी सोसायटीच्या जर्नलमध्ये एक प्रदीर्घ लेख लिहून प्रकाशित केला.
सलिम अलींच्या या मूळ अभ्यासावरच या पक्ष्यांच्या संदर्भात पुढील अध्ययन झाले. प्रत्यक्ष अवलोकन करून खातरजमा झाल्यावरच शास्त्रशुद्ध पद्धतीने निष्कर्षाची मांडणी करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. भारतीय पक्ष्यांचा मागोवा घेऊन त्याचे सूचीकरण केले. भारतीय पक्षिशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध पायावर केली.
त्यांचे पक्षी-सर्वेक्षणाचे अहवाल वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरले. आजवर विचारात न घेतलेल्या पर्यावरण, परिसंस्था, भौगोलिक घटकांचा विचारही त्यात होता. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पक्ष्यांच्या परिसंस्थेचा परिस्थितीच्या दृष्टीने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. बंगळुरूहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात, १९६३ साली ‘इकनॉमिक ऑर्निथॉलॉजी इन इंडिया’ या शोधनिबंधातून त्यांनी पक्षी-अभ्यासाचे शेती आणि जंगलांच्या संदर्भातील महत्त्व पटवून दिले. देशातील अन्नधान्य वाढविण्याच्या मोहिमेत पक्ष्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या खाद्यसवयींचा विचार व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहामुळे, जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नंतरच्या काळात अनेक भारतीय कृषिविद्यापीठांनी अभ्यासक्रम आखले, उपक्रम सुरू केले. पारिस्थितिकी किंवा इकलॉजीचे आद्य तज्ज्ञ म्हणून डॉ. सलिम अली यांना मान द्यायला हवा.
पक्ष्यांचे वर्तन अभ्यासण्याकरिता त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यासही फार पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्या दृष्टीने ‘केवलादेव घना’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते. भरतपूरजवळील या पाणथळ प्रदेशात दरवर्षी करकोचे, बगळे, पाणकावळे, हविर्मुख (चमचे), क्रौंच इत्यादी पाणपक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधून डॉ.सलिम अलींनी आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीने लाखो पक्ष्यांना कडी चढवली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल घडून येतात, हे स्थलांतरित पक्षी कुठे कुठे विखुरतात, स्थानिक नि स्थलांतरित यांत संघर्ष होतो का, स्पर्धा असते का, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या परंपरागत जीवनात कोणता विक्षेप येतो, या आणि अशा दृष्टिकोनातून सालिम अलींनी अनेक अभ्यासप्रकल्पांची उभारणी केली. निरीक्षणातून पक्षिशास्त्र अभ्यासण्याला चालना मिळाल्यावर अनेक तरुण त्याकडे वळले. सलिम अलींच्या प्रयत्नांमुळे भारतभर अनेक ठिकाणी पक्षी-अभयारण्ये घोषित झाली.
पक्षी-स्थलांतरणाचा त्यांचा अभ्यास एवढा गाढा होता, की जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या बाबतीत प्रश्नांची उकल करण्याकरिता सलिम अलींना पाचारीत असे. त्यांचे पक्षिप्रेम, प्राणिमात्राविषयीची आस्था ही केवळ भाबड्या भूतदयेपोटी नव्हती. मात्र निरनिराळ्या प्रकल्प उभारणीपायी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने, परिसंस्था नष्ट होऊ लागल्यामुळे आणि अनेक पक्षिजाती नामशेष होऊ लागल्यामुळे त्यांना अतीव दु:ख होत असे. नुसते कायदे करून भागणार नाही, जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी व्याख्याने, फिल्म्स, स्लाइड्सद्वारा वन्यप्राण्यांचे महत्त्व पटवून देण्याचे त्यांनी सतत प्रयत्न केले.
सायलेंट व्हॅली संरक्षणाच्या आंदोलनात त्यांच्या प्रयत्नांना १९७७-१९७८ सालांत निसर्गप्रेमी जनतेने खंबीर आणि ठाम पाठिंबा दिला. यावरून लोकमानसात त्यांचा पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा रुजण्याची पावती मिळते. पशुपक्षी राखायचे म्हणून तिथून माणसाला बाहेर हुसकायचे, अशा विचारांचा पाठपुरावा ते करत नव्हते.माणूस आणि निसर्ग यांत सुसंवाद आणि परस्परपूरकता राखण्याच्या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. अशा विचारांना प्राधान्य देणाऱ्या ‘सह्याद्री बचाव’, ‘मुंबई बचाव’ चळवळींना त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.
भारतीय पक्षिशास्त्राचा अभ्यास खंडित होऊ न देता, तो पुढे चालू ठेवण्याची, त्याची प्रतिष्ठा वाढविण्याची आणि त्याला लोकमान्यता, लोकप्रियता मिळवून देण्याची कामगिरी सलिम अलींनी निष्ठापूर्वक पार पाडली. पक्षिशास्त्रात सतत नवीन भर टाकली. त्यांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे भारतात ठिकठिकाणी निसर्ग अभ्यास मंडळे, पक्षी निरीक्षण मंडळे, वृक्षमित्र संघटना उभ्या राहिल्या. सायलेंट व्हॅलीसारख्या घटना पुन्हा-पुन्हा घडू नयेत, त्यावर काही नियंत्रण असावे, लोकमताचा दबाव असावा, शास्त्रीय ज्ञानाचा अंकुश असावा, या दृष्टीने कायमस्वरूपाची एखादी योजना असावी यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे, पर्यावरण खाते निर्माण करावे असा आग्रह धरला. इंदिरा गांधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वन आणि पर्यावरण खात्याची निर्मिती १९८१ साली केली.
१९४७ साली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून तर ते सोसायटीचे अविभाज्य अंगच बनले. संस्थेच्या नियतकालिकाचेही ते संपादन करीत. कोणत्याही कामाबद्दल वेतन वा मानधन न घेता, त्यांनी तिचा कारभार सांभाळला. तिचे कार्यक्षेत्र वाढवले. उत्तरायुष्यात मिळालेल्या नाना पुरस्कारांचे मानधनही त्यांनी सोसायटीच्या उत्कर्षासाठी वेचले. त्यांच्या अविरत प्रयत्नांमधूनच मुंबई विद्यापीठाने १९५७ साली सोसायटीला एम.एस्सी. आणि डॉक्टरेटचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली.
शास्त्रज्ञ, संशोधक, कार्यकर्ता या आपल्या ओळखीबरोबरच डॉ. सालिम अली प्रसिद्ध आहेत, आपल्या निसर्गविषयक विशेषत: आपल्या पक्षीविषयक लेखनासाठी, पुस्तकांसाठी. त्यांचे आत्मचरित्र ‘द फॉल ऑफ द स्पॅरो’ १९८५ साली प्रकाशित झाले आणि गाजले. परंतु त्यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तके, तांत्रिक अहवाल लिहिले होते. त्यांच्या पुस्तकांचा वापर संदर्भग्रंथ म्हणून केला जातो. त्यांनी पक्षी-सर्वेक्षणावर आधारित ‘बर्ड्स ऑफ कच्छ’, ‘इंडियन हिल बर्डस’, ‘द बर्ड्स ऑफ त्रावणकोर’- कोचिन, ‘पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अॅन्ड सब कॉन्टिनेन्ट’ इत्यादी पुस्तके लिहिली. भारतीय पक्षिशास्त्रात सर्वांत मोलाची भर घातली ती त्यांच्या ‘हॅण्ड बुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अॅन्ड पाकिस्तान’ या दशखंडात्मक ग्रंथराजाने.
डॉ. सलिम अलींच्या निसर्गविषयक ज्ञानाची, अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निसर्गसंरक्षण, वन्यप्राणी संरक्षण समित्यांचे ते सदस्य होते. १९७६ साली त्यांना ‘नोबेल’ पारितोषिकाच्या तोडीचे ‘जे. पॉल गेट्टी’ पारितोषिक लाभले. त्याशिवाय त्यांना १९५८ साली ‘पद्मभूषण’ आणि १९७६ साली ‘पद्मविभूषण’ हे भारत सरकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९६७ साली ‘ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन’चे ‘सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. डच सरकारने ‘कमांडर ऑफ द नेदरलॅण्ड्स ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क’ देऊन गौरवान्वित केले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९८२ साली ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप इन ऑर्निथॉलॉजी’साठी त्यांची भारत सरकारने निवड केली. तीन मानद डॉक्टरेट मिळालेले डॉ. सलिम अली १९८५ साली राज्यसभेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले. १९८७ साली त्यांना निसर्ग आणि वन्यप्राणी यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल ‘दादाभाई नवरोजी पारितोषिक’ देण्यात आले.
१९८७ साली, ९१ वर्षांचे असताना, प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने मृत्यूने गाठेपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले.
संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट
जन्म. ११ नोव्हेंबर १९४३ मध्यप्रदेशातील बारावनी येथे. भारतातील अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. अनिल काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.
त्यांच्या मातोश्री कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले. डॉ. काकोडकर यांनी मुंबईत यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.
पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिॲक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या “ध्रुव रिॲक्टर”मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे १९९६ साली ते बीएआरसीचे संचालक झाले. २००० सालापासून अणुऊर्जा आयोगाची सूत्रे त्यांच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. तसेच भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्यात ते सचिवपदी कामही करतात.
अणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल. डॉ.काकोडकरांनी २५० पेक्षा अधिक संशोधनपर प्रबंध लिहिलेले आहेत. त्यांनी केलेल्या महान कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तीनही पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
अणुऊर्जेत भारत स्वयंपूर्ण व्हावा हे ध्येय बाळगून डॉ. काकोडकर वाटचाल करीत आहेत.
रामन यांचा जन्म ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या मद्रास परगण्यातील (सध्याच्या तामिळनाडू राज्यातील) तिरुचिरापल्ली येथे झाला. रामन यांना प्रखर बुद्धिमत्ता लाभल्याने अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी विशाखापट्टणम येथून आपली मॅट्रीकची परीक्षा पास केली. त्यांनी मद्रास (आताचे चेन्नई) येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये रामन यांचे वडिल गणित व भौतिकशास्त्र या विषयांचे प्राध्यापक होते. रामन यांनी मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधून भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळवून प्रथम क्रमांकाने बी.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी उच्चश्रेणीत मद्रास विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी संपादन केली. त्यांचे प्रकाशविषयक पहिले संशोधन विद्यार्थी दशेत असतानाच फिलॉसॉफिकल मॅगेझीनमध्ये प्रसिद्ध झाले.
मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संशोधनाची आवड असल्याने अध्यापनाबरोबरच विविध तंतुवाद्यांवर संशोधन केले व ब्रिटनमधील रॅायल सोसायटीला त्यावर शोधनिबंध सादर केला. ब्रिटनहून परत येताना समुद्राच्या पाण्याच्या निळ्या रंगाचे व आकाशाच्या निळ्या रंगाचे कुतूहल त्यांच्या मनात जागे झाले. भारतात परत आल्यानंतर या निळ्या रंगावर संशोधन करुन प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरींग) यावर कार्य केले व आकाश निळे का दिसते याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले.
त्याच काळात त्यांनी पारदर्शक पदार्थातून एकवर्णी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय घडेल याविषयी संशोधन केले. या संशोधनात त्यांना एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थांवर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबी इतक्या किरणांबरोबरच वेगळ्या तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात, असे आढळले. त्यावरुन पारदर्शक पदार्थातून प्रकाशकिरण जाताना त्याचे विकिरण होते, हे सिद्ध झाले. त्यालाच ‘रामन परिणाम’ (रामन इफेक्ट) म्हणतात. सन १९२८ मध्ये त्यांनी आपले हे संशोधन नेचर मासिकाला पाठवले.
रामन यांच्या संशोधनामुळे विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे जणू भांडारच खुले झाले. रामन यांच्या संशोधनानंतर केवळ दहा वर्षांमध्ये दोन हजारांहून जास्त रासायनिक संयुगांची रचना रामन परिणामाच्या मदतीने निश्चित केली गेली. लेसर किरणांच्या शोधानंतर रामन परिणाम हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण साधन ठरले. या परिणामामुळे द्राव आणि वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास करणे सोपे झाले. या शोधाबद्दल रामन यांना १९३० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
सन १९४८ मध्ये रामन यांनी बंगळूरु येथे रामन इन्स्टिटयूटही विज्ञान संशोधन संस्था स्थापन केली. १९४३ साली डॉ. कृष्णमूर्ती यांच्या सहाय्याने त्यांनी त्रावणकोर केमिकल कंपनीची उभारणी केली. काडेपेट्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम क्लोरेटचे उत्पादन या कंपनीमार्फत केले जाते. ही कंपनी आता टीसीएम लिमिटेड या नावाने ओळखली जाते.
रामन यांना रॉयल सोसायटीने सदस्यत्व देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे त्यांना सर हा किताब देण्यात आला. नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांना फ्रँकलिन पदक, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब, लेनिन शांतता पारितोषिक असे अनेक सन्मान प्राप्त झाले.
वयाच्या ८२ व्या वर्षी बंगळूरूमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
कृषि-संशोधक, क्रांतिकारक 7 नोव्हेंबर 1884 22 जानेवारी 1967
पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले व माध्यमिक शिक्षण नागपुरातील सिटी हायस्कूलमध्ये झाले. स्वातंत्र्यलढ्यासाठी व समाजसुधारणेसाठी त्यांनी बालसमाज, आर्य बांधव समाज, श्री समर्थ शिवाजी समाज व हनुमान आखाडा इ. सामाजिक उपक्रम सुरू केले.
विविध देशांना भेटी देणे, तेथील शेतीतील प्रश्न अभ्यासणे, प्रत्यक्ष शेतात काम करणे, विद्यापीठांतून शिक्षण घेणे, संशोधन करणे, प्रयोगशाळा उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतीत प्रयोग करणे, शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नवी पिके शोधणे, अधिक उत्पादन देणारी नवीन बी-बियाणे शोधणे व त्यांचा प्रसार करणे, आधुनिक शास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, अशा विविध स्तरांवर त्यांनी शेतीत आपले योगदान दिले.
अमेरिकेला जाऊन तेथून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावेे, या उद्देशाने खानखोजे यांनी पूर्वेकडे प्रयाण केले. जपानला त्यांचा शेती व्यवसायाशी जवळचा संबंध आला. जपानमधील आधुनिक शेतीची ओळख व्हावी; म्हणून त्यांनी शेतावर नोकरी केली. जपानी शेतकरी स्वतःचे मलमूत्र शेतात पसरवतात व शेतीला जैविक खत देतात, हे त्यांना अत्यंत स्तुत्य वाटले. त्यांना त्या खताची उपयुक्तता व श्रमप्रतिष्ठेचा असामान्य गौरव यामुळे नवीन दृष्टी मिळाली.
शेतीला जोडधंदाही पाहिजे, हे त्यांना पटले. जपानमधील वास्तव्यात साबण, आगपेट्या, टिनचे डबे आणि खेळाच्या वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान ते शिकले. जपानहून खानखोजे अमेरिकेत कॅलिफोर्नियाला गेले. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवून बर्कले विद्यापीठातील कृषिशास्त्र विभागात प्रवेश घेतला. तेथील मुख्य पुस्तकालय, उत्तम प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, निष्णात प्राध्यापक वर्ग, प्रात्यक्षिके यांचा खानखोजे यांच्यावर खोलवर परिणाम झाला.
खानखोजे यांनी फळबागांमध्ये नोकरी करून फळझाडांची लागवड, फळांची तोडणी, स्ट्रॉबेरी व हॉपची फुले वेचणे, फळांचे पॅकिंग यासंबंधीची शास्त्रशुद्ध माहिती मिळवली. नंतर ते मेरीज व्हिले या गावी ‘फळ संरक्षण आणि कॅनिंग’ कारखान्यात फळ परीक्षण व फळ डबाबंद करणे या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नोकरीसाठी खानखोजे सिअॅटल या गावी गेले. तेथे रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. दुर्दैवाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत मंदी आली. त्यामुळे कॅनडा व अमेरिकेत परदेशी मजुरांवर बंदी आली. मेक्सिकोत सोन्या-चांदीच्या खाणींचा शोध लागला होता व त्यांना मजूर हवेे होते. तेथे परदेशी मजुरांवर बंदी नसल्यामुळे खानखोजे मेक्सिकोला गेले.
सुट्टी संपल्यावर खानखोजे यांनी ओरेगॉन कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. बर्कले येथे त्यांनी चार सेमेस्टर पूर्ण केल्या होत्या व संरक्षण अकादमीत एक वर्ष शिक्षण घेतले होते. त्यामुळे ओरेगॉन विद्यापीठातील एक वर्ष शिक्षण घेतल्यावर त्यांना बी.एस. (१९११) ही कृषिशास्त्र शाखेतील पदवी मिळाली. त्यांनी पुलमन येथील वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात एम.एस.साठी प्रवेश घेतला. त्यांना प्राध्यापक डॉ. थॅचर व प्रा. थाम यांनी विभागातच नोकरी दिली. आयडाहो, ओरेगॉन, उटाह, नेवाडा ही शेजारची राज्ये दुष्काळी होती. तेथे १०/१२ इंचच पाऊस पडे, पण पिके मात्र रसरशीत व हिरवीगार असत. हे पाहून कोरडवाहू शेतीत खानखोजे यांनी विशेष लक्ष घातले, कारण भारतातही परिस्थिती दुष्काळीच असे. नापीक जमीन सुपीक करणे, आधुनिक अवजारे, खतांचा योग्य उपयोग यांद्वारे कोरडवाहू शेतीही फायदेशीर ठरू शकते हे त्यांना पटले.
भारतीय शेती व अमेरिकेतील शेतीवर तौलनिक टिपणी ते अशी करतात की, ‘पाश्चात्त्यास शेतकीत सधन बनता येते व भारतीयास शेतकीत कर्जबाजारी बनता येते. त्यासाठी भूमी परीक्षण, पाणी वापर, मशागत याबाबत शेतकर्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.’
खानखोजे यांनी पीक, प्राणी, शेती, प्रकाश, उष्णता-हवा आणि वनस्पती, पीक आणि रोग यांविषयी संशोधन केले. प्रा. थॅचर, थॉम, होल्टन व थॉमस हे प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करत व प्रोत्साहन देत. त्यांनी शेतीप्रमाणेच पशुधनावरही संशोधन केले. अधिक दूध देणार्या गाई, गोवंश सुधार, पशुपालन इत्यादी विषयांतील त्यांचे प्रावीण्य पाहून अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशन या प्रसिद्ध संस्थेने त्यांना आजीव सभासदत्व दिले. प्राध्यापकांच्या सहकार्याने खानखोजे यांनी ‘अमेरिकन सोसायटी फॉर द अॅग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक ट्रेनिंग इन इंडिया’ ही संस्था स्थापिली. तसेच त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रॉनॉमी या संस्थेचे सभासदत्वही मिळाले.
एम.एस.चे शिक्षण घेत असताना खानखोजे यांना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांचे व्याख्यान ऐकायची व त्यांच्याशी शेतकी विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली व अलबामा येथील टस्कगी विद्यापीठाला भेट देण्याचे आमंत्रणही मिळाले.
वॉशिंग्टन येथे अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रॉनॉमीच्या वार्षिक संमेलनाला हजर राहण्याचे खानखोजे यांनी ठरवले. वाटेत त्यांनी टस्कगी विद्यापीठाला भेट दिली. हे विद्यापीठ स्वावलंबी, औद्योगिक आणि कृषिशास्त्रात अग्रणी म्हणून नावाजलेले होते. व्यावहारिक शिक्षणाचे धडे देणारी संस्था म्हणून ती प्रसिद्ध होती. ‘कमवा आणि शिका’ या योजनेमुळे कोणतेही उच्च शिक्षण गरिबातल्या गरिबालाही शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले.
खानखोजे यांनी टस्कगी विद्यापीठातील कृषि-संशोधक डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचीही भेट घेतली. त्यांच्या संशोधन कार्याचा विशेषतः बटाटे, रताळी यांसारख्या पदार्थांवरील प्रक्रियेतून औद्योगिक विकास या संकल्पनेचा खानखोजे यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. वॉशिंग्टन विद्यापीठातील संमेलनात खानखोजे यांनी ‘रोपट्यांसाठी पाण्याच्या गरजेवर प्रभाव टाकणारे घटक’ (१९१३) हा निबंंध वाचला. या निबंधाचा नवीन पाठ्यपुस्तकात समावेश केला.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांविरुद्ध अनेक राष्ट्रे युद्धास उभी राहिली. भारतात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करावा व स्वातंत्र्य मिळवावे, असा खानखोजे व त्यांच्या मित्रांनी विचार केला व त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. जर्मनी, तुर्कस्थान, रशिया, मध्य पूर्वेतील इराण, इराक, अफगाणिस्तान या देशांत खानखोजे गेले. तेथून गनिमी फौज घेऊन भारतात क्रांती घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यानिमित्ताने स्पेन, कॉन्स्टॅन्टिनोपल, बर्लिन, बगदाद, बुशायर, सीराज, निरीज, केरमान, सिर्ईस्तान या भागांत खानखोजे यांनी सैन्यासह प्रवेश केला. तो भाग ताब्यात घेतला व १९१६ साली स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा केली. या भागात खानखोजे हे महंमद खान या नावाने फिरत होते.
पुढे खानखोजे यांनी इराणी पारपत्र मिळवले व हाजी आगाखान या नावाने हिंदुस्थानात प्रवेश मिळवला. त्यांनी नुकत्याच मंडालेहून सुटलेल्या टिळकांची भेट घेतली. नंतर ते मेक्सिकोला गेले. मेक्सिकोचे राष्ट्रीय कृषी विद्यापीठ चापिंगो या गावात नव्याने उभारले जात होते. तेथे त्यांना रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत नोकरी मिळाली. तेथे ते कृषीचे प्रयोग करत. राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान हे विद्यापीठाला भेट देण्यास आले असता त्यांना खानखोजे यांचे प्रयोग दिसले. मक्यावरील त्यांच्या प्रयोगाला प्रथम पारितोषिक व विशेष पुरस्कारही मिळाला. त्याची परिणती म्हणून त्यांना विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली.
त्यांनी गव्हावरही प्रयोग करून गव्हाचे विविध वाण विकसित केले. त्यांनी पावसाळ्यात व उन्हाळ्यात येणारी गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, अशा अनेक जाती विकसित केल्या. १९२९च्या राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांना एक हजार पेसोंचा प्रथम पुरस्कार मिळाला, तसेच सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मेक्सिकन सरकारने आधुनिक कृषिशास्त्र शिकवण्यासाठी कृषी शाळा स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी संपूर्ण देशाचा अभ्यासदौरा करून शासनास योग्य त्या सूचना करण्यासाठी समिती नेमली. त्या समितीवर खानखोजे यांची नेमणूक केली. यानिमित्ताने खानखोजे यांना संपूर्ण मेक्सिको देशभर फिरून तेथील प्रश्न समजावून घेता आले व लोकांचे प्रबोधनही करता आले. अनेक ठिकाणी कृषी संघ स्थापन केले. पुढे राष्ट्रीय पातळीवर त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला. त्याच्या अध्यक्षपदी खानखोजे यांची नेमणूक करण्यात आली.
मका हे मेक्सिकोचे महत्त्वाचे पीक. त्यांनी मक्याचे उत्पादन व दर्जा यात क्रांतिकारक सुधारणा केल्या. टिओसिंटे या जंगली वनस्पतीबरोबर मक्याचा संकर करून त्यांनी एकाच ताटाला अनेक कणसे लागणारी नवीन जात शोधली. अशा मक्याच्या शेेतात उभ्या असलेल्या खानखोजेंची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून ‘हिंदू जादूगार शेतीत चमत्कार करत आहे.’, या मथळ्यासह येऊ लागली. मेक्सिको सरकारने त्यांची शेतीविषयीची पुस्तके प्रसिद्ध केली. १९३० साली मेक्सिकन सरकारने त्यांना संशोधनातला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. Nuevas Variedades de maiz & Maiz Grenada Zea masy Digitata या खानखोजेंच्या दोन संशोधनपर लेखांनी शेतीत क्रांती घडवून आणली.
मक्याचे कणीस तोडल्यावर त्यावरील हिरवे पान पांढरे पडत असे. ग्राहकाला हिरवेगार कणीस अधिक आकर्षित करते. खानखोजेंनी नवी वेष्टन पद्धत शोधून काढली. त्यामुळे पान अनेक दिवस हिरवेगार राहू लागले व मेक्सिकोतून अमेरिकेला होणारी मक्याची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. खानखोजे यांनी अनुवंशशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी तूर, चवळी, सोयाबीन, वाल यावर संशोधन करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्याचप्रमाणे त्यांनी बहुवर्षीय तुरीचे झाड शोधले. ते झाड वर्षातून दोन वेळा पीक देत असे.
त्यांनी शेवग्याच्याही नवीन जाती शोधून काढल्या. शेवग्याच्या बीपासून सुगंधी द्रव्य निर्माण केले. शेवग्याचा पाला, शेंगा, खोड, मुळी या प्रत्येकाचा उपयोग करता येतो, हे त्यांनी सिद्ध केले व त्याचा प्रचार केला. त्यांनी टोमॅटो, लिंबू व अन्य फळांवर पडणारा लाल खवल्यांचा रोग, तसेच पशुखाद्य व निवडुंग यावरील अभ्यास करून शेतकर्यांना उपयोगी पडतील अशा पुस्तिका तयार केल्या. मेक्सिकन सरकारनेही त्यांची उपयुक्तता जाणून पुस्तिका प्रकाशित केल्या व त्या सामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली.
खानखोजे आपल्या उत्पन्नातील काही भाग जमीन खरेदीवर खर्च करत. त्यातील काही जमीन ते गरिबांना देत व त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देत. त्यांच्या शेतावर प्रयोग करत. स्वतःच्या जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करून त्याचा किफायतशीरपणा पाहत व यशस्वी प्रयोग शेतकर्यांपर्यंत पोहोचवून त्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळवून देत. त्यांचे प्रयोग कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आणि त्यातही ते आपले प्रयोग करत. त्यांच्या प्रयोगशीलतेला मेक्सिको सरकारनेही दाद दिली. त्यांनी खानखोजेंना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी दिली. त्यावर काम करणार्यांना, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शेतीचे यांत्रिकीकरण करणे या गोष्टी त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास मंडळ युरोपच्या दौर्यावर गेले. फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या.
मेक्सिकोत केळी, कॉफी, व्हॅनिला यांसारखी व्यापारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. त्यांची अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यातही केली जाई, पण त्या निर्यात व्यापारातून होणारा फारच थोडा फायदा प्रत्यक्ष शेतकर्यांपर्यंत पोहोचे म्हणून व्हेराक्रूज राज्याचे गव्हर्नर तेखेदा यांच्या सहकार्याने खानखोजे यांनी प्रत्येक पिकाची वेगळी शाळा सुरू केली आणि त्याद्वारे शेतकर्यांना निर्यातीचेही शिक्षण दिले. त्यांच्या या कार्यामुळे गव्हर्नर तेखेदा खूश झाले व त्यांनी खानखोजे यांना त्या संस्थानचे प्रतिनिधी म्हणून मेक्सिको राजधानीत सल्लागार समितीवर पाठवले. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची व अधिकार्यांची त्यांच्याशी ओळख झाली.
सदर्न पॅसिफिक रेल्वे कंपनीने मेक्सिको व अमेरिकेला जोडणारी हजार मैल लांबीची रेल्वे बांधली, परंतु ज्या प्रदेशातून ही रेल्वे जात होती, तो भाग निर्जन होता. त्यामुळे रेल्वे तोट्यात चाले. रेल्वे कंपनीने हा भाग लागवडीखाली आणण्याचे ठरवले. या निर्जन प्रदेशाचे सुजलाम सुफलाम भूमीत रूपांतर करण्याचे अत्यंत अवघड काम रेल्वेने खानखोजेंना दिले आणि त्यांनीही ते समर्थपणे पेलले. त्या जमिनीवर खानखोजेंनी अनेक कृषी प्रयोग केले. अनेक स्टेशनांच्या व रुळांच्या भोवती त्यांनी कृषिपिके घेतली. शेतीचा प्रसार व प्रचार केला.
युद्धकाळात रबराला मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. मेक्सिकोत अनेक ठिकाणी रबराची लागवड केली जाई. खानखोजेंनी मेक्सिकोतील रबर-जंगलांना भेटी दिल्या व या झाडांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्याची पुस्तिकाही काढली व शेतकर्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणीही आली. अमेरिकेतही रबर लागवडीविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी खानखोजेंची समक्ष भेट घेतली. मेक्सिको व ग्वाटेमाला येथे रबराची लागवड वाढवण्यासाठी खानखोजेंना आमंत्रण देण्यात आले. ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिका’ यांनी त्यांचा गौरव केला व डिक्शनरी ऑफ रीसर्च सायंटिस्ट ऑफ अमेरिका यात त्यांची नोंद झाली.
पूर्वी अमेरिकेत माकडांच्या ग्रंथीतून मानवाला उपयुक्त अशी हार्मोन्स मिळवली जात, पण पुढे माकडांचा असा उपयोग करण्यावर बंदी आली आणि अशा हार्मोन्सचा तुटवडा भासू लागला. याची जाणीव ठेवून खानखोजेंनी संशोधन केले व दक्षिण अमेरिकेतील वनस्पतींचा अभ्यास करून ‘मध्वालु’ या जंगली कंदांपासून आवश्यक ते हार्मोन्स मिळवले. त्यांनी अमेरिकन मित्राच्या साहाय्याने बोरानी मॅक्स कं. स्थापली. मेक्सिकोतील जंगली झाडांपासून प्रोजेस्टिरीन व टेस्टोस्टिरीन या औषधांचे उत्पादन सुरू केले.
मेक्सिकन सरकारने मसाल्याचे पदार्थ निर्माण करण्याच्या उद्देशाने खानखोजे यांना साडेचार हजार एकर जमीन दिली. खानखोजेंनीही त्याचा उपयोग कृषी प्रयोगशाळा (१९४४) उभारण्यासाठी केला. खानखोजेंनी आपल्या प्रयोगशीलतेच्या जोरावर अनेक प्रकारचे अन्नपदार्थही तयार केले व ते लोकप्रिय केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. खानखोजेंना भारतात परत येण्याची इच्छा झाली. १९४९मध्ये खानखोजेंना ही संधी मिळाली. मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री रा.कृ. पाटील यांनी मध्य प्रदेशात शेतीसुधारणा करण्यासंबंधात खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मेक्सिकन सरकारनेही त्यांना भारतात जाण्यास परवानगी दिली. ते नागपूरमध्ये पोहोेचल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहाने सर्वत्र स्वागत झाले, परंतु इथले दारिद्य्र पाहून ते फार दुःखी झाले, कारण त्याच काळात इतर देशांत झालेली प्रगती त्यांनी अनुभवली होती.
त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे काम मुख्यत्वे पाच गोष्टींशी संबंधित होते ः १) शेतकी शिक्षण, २) कृषी संशोधन, ३) डेमॉन्स्ट्रेशन फार्म्स, ४) लोकशिक्षण, ५) यांत्रिकीकरण, सहकार शेती.
खानखोजे यांनी ग्रामीण भागात दौरा केला. त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करून त्या लोकांकडून भरून घेतल्या. त्याआधारे आपला अहवाल दिला. विविध प्रकारच्या २९ सूचना दिल्या. शेेतीचे यांत्रिकीकरण, शेतकी शाळांची निर्मिती, प्राथमिक कृषिशास्त्राचे शिक्षण, मजुरांचे वेतन, पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेणे व त्यावर सामूहिक शेतीचे प्रयोग करणे इत्यादी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना त्यात होत्या. समितीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर भारताचे नागरिकत्व मिळण्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ते मेक्सिकोला (१९५१-५५) परत गेले. तरी तेथे त्यांचे मन रमेना. आपली प्रयोगशाळा, ग्रंथसंग्रह, फर्निचर, शेतजमीन विकून त्यांनी प्रवासखर्चाची सोय केली व ते परत हिंदुस्थानात आले. सरकारने त्यांच्यासाठी फारसे काही केले नाही, पण लोकांनी त्यांच्यासाठी दहा हजार रुपयांचा फंड जमा करून सेनापती बापट यांच्या हस्ते एका सत्कार समारंभात त्यांना अर्पण केला. नागपूर विद्यापीठात त्यांना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. संत्रा उत्पादकाच्या सहकारी संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.
खानखोजे ‘मुक्त-ग्राम’ या आपल्या संकल्पनेचा प्रचार करत. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे; अशी ती योजना होती. क्रमशः आधुनिक यंत्रे खेड्यात आणावीत व ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण करावे, अशी त्यांची संकल्पना होती. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. त्याद्वारे त्यांनी अनेक शेतीप्रश्न चर्चिले. शेतकर्यांचा पौष्टिक आहार, कुंपणासाठी झाडे, शेतीची सुधारलेली अवजारे, जमिनीची धूप व त्यापासून संरक्षण, जनावरांचे पौष्टिक अन्न, शेतकरी संघ, जंगली झाडांपासून नवी उत्पादने इत्यादींवर त्यांनी भाषणे दिली. टाकाऊ वनस्पतीच्या मुळ्या, खोडं वगैरेपासून खाद्यपदार्थ कसे करावेत हे ते सांगत व स्वतः करून खात. त्यांनी भारतीयांना सोयाबीनची ओळख करून दिली.
सन १९६१मध्ये खानखोजेंना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागपूरमध्ये घरासाठी भूखंड मिळाला. त्यांना १९६३मध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व निवृत्ती वेतन मिळू लागले. वार्धक्यामुळे जीवन जगणे कठीण होऊ लागले होते, पण ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील शेेवटच्या दिवशीही कृषी विभागाच्या रौप्य महोत्सवात ते सहभागी झाले होते.