+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
यशवंत लक्ष्मण नेने

यशवंत लक्ष्मण नेने

कृषीशास्त्रज्ञ

24 नोव्हेंबर 1936
15 जानेवारी 2018

यशवंत लक्ष्मण नेने यांचा जन्म मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शालेय आणि बीएस्सी (अ‍ॅग्रिकल्चर) पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. १९५७ साली त्यांनी आग्रा विद्यापीठातून एमएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी १९६० साली पीएचडी मिळवली. त्यांचा संशोधनाचा विषय ‘वानसविकृतिविज्ञान आणि विषविज्ञान’ हा होता. वानसविकृतिविज्ञान म्हणजे पिकांवरील रोगनियंत्रणाचे विज्ञान. पीएचडी झाल्यावर त्यांनी चौदा वर्षे उत्तर प्रदेशातील पंतनगर विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांपैकी शेवटची पाच वर्षे ते विद्यापीठाच्या वानसविकृतिविज्ञान विभागाचे प्रमुख होते.

१९७४ साली आंध्रप्रदेशातील पाटनचेरू येथील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत (इक्रिसॅट) ‘वानसविकृतिविज्ञान’ विभागाच्या प्राचार्य पदावर त्यांची निवड झाली. १९८० साली डाळीमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्प विभागाची सूत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याच संस्थेत त्यांनी १९८६ ते १९८९ या काळात द्विदल धान्यविभागाचे संचालक, तर १९८९ ते १९९६ या काळात उपमहासंचालक म्हणून काम केले.

डाळींमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. त्या काळात डॉ.नेने यांनी त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या मदतीने ‘म्लान’ या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जाती विकसित केल्या. याकरिता डाळीचे सुधारित बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. याचा परिणाम म्हणून हेक्टरी ३७५ कि.ग्रॅ. उत्पादना ऐवजी १००० कि.ग्रॅ. उत्पादन मिळवता आले. त्यावर पडणाऱ्या ‘म्लान’ आणि ‘वोझोटी’ रोगांवर मात करण्यात यश मिळविले. याकरिता कमी उंचीच्या नवीन जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून, एकाच झाडापासून वर्षात दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली आणि परिणामी, हेक्टरी २००० कि.ग्रॅ. पर्यंत पीक घेता आले, जे पूर्वी हेक्टरी ६०० कि.ग्रॅ. होते. त्यापुढेही प्रगती साधताना संकरित तुरीच्या जाती विकसित केल्या; तद्वतच खूप पाऊस पडल्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ न देता, त्यावर तोडगा काढला. पीक उंच ओळीवर लावायचे आणि बाजूला खाच ठेवायची अशा पद्धतीने जास्तीचे पाणी जमिनीत मुरायची सोय करून दिली. त्यामुळे पिकांना होणारा जास्त पाण्याचा त्रास टाळला गेला.

त्यांना तांदळावरील खैरा रोगावर केलेल्या संशोधनाबद्दल १९६७ साली फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा पुरस्कार मिळाला. तसेच, ‘गव्हावरील रोगाचे निदान’ या कामाबद्दल १९७१ साली त्यांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग’ आणि ‘डॉ. आर.जी. अँडरसन पारितोषिक’ मिळाले. वनस्पतींच्या रोगनिदानातील त्यांच्या संशोधनासाठी ‘जीरसानिधी पारितोषिक’ मिळाले. या क्षेत्रात हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान समजला जातो. नंतर त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार मिळाला.

डॉ. नेने यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार, वक्ते, परिसंवादाचे अध्यक्ष आणि ‘द्विदल शेंगांवरील रोग’ या विषयावरील लेखक, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्विरीत्या पार पाडल्या. वानसविकृतिविज्ञान आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सभासद असून अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. भारतीय वैज्ञानिक संघटनेमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे कार्यकारिणी सभासद व संचालक मंडळाचे सदस्य, भारतीय केंद्रीय कीटक संशोधन समितीचे सभासद, ‘बुरशी नियंत्रण’ या विषयावरील शिबिराचे संचालक, अशा प्रकारे त्यांनी निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळेच १९८० साली त्यांना भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळाले, तर १९८५ व १९८६ साली त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.

असे विविध संस्थांचे काम सांभाळत असताना, डॉ.नेने यांचे संशोधनकार्यही सुरूच होते. त्यावर त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. त्यांचे एक स्वतंत्र पुस्तक असून त्यांनी दोन पुस्तके संपादित केली आहेत. त्यांचे ८४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. १९९१ साली जुन्नर येथे भरलेल्या चोविसाव्या मराठी विज्ञान संमेलनाचे डॉ.नेने हे अध्यक्ष होते. डॉ.नेने १९९६ साली इक्रिसॅट मधून निवृत्त झाले.

१५ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

संकलन- डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

वालचंद हिराचंद

वालचंद हिराचंद


जन्म. २३ नोव्हेंबर १८८२ सोलापुर


वालचंद हिराचंद दोशी सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट! वालचंद हे एक वेगळ्या प्रकारचे उद्योगपती होते.

वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले

बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.

ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली. जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले.

बॉम्बे सायकल अॅ्न्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅचन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली. प्रीमिअर इलेक्ट्रॉरनिक्सन, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅरक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅएन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शभन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंद नगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.

कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅणन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला.


वालचंद हिराचंद यांचे ८ एप्रिल १९५३ रोजी निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

जगदीशचंद्र बोस

जगदीशचंद्र बोस


30 नोव्हेंबर 1958
23 नोव्हेंबर 1937

जगदीशचंद्र बोस हे भारतातील पहिले वैज्ञानिक संशोधक होते. त्यांनी विज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र या विषयांतील शोध आणि प्रयोगांनी संपूर्ण जगाला प्रभावित केलं. रेडिओ कम्युनिकेशनसारखे शोधही लावले, तरीही त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकले नाही. विशेषतः उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे काम त्यांनी केलं.

विशेषतः उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे काम त्यांनी केलं.
जगदीशचंद्र बोस यांचे नाव आधुनिक भारतीय विज्ञानातील पहिले वैज्ञानिक संशोधक म्हणून घेतले जाते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, बोस यांनी त्यांच्या योगदानाने देशाला विज्ञानाच्या जगात जागतिक स्तरावर आणले. भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र या विषयांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम त्यांनी केलं आहे. विज्ञान साहित्यात योगदान देताना सर्वसामान्यांनाही विज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. त्यांना रेडिओ कम्युनिकेशनचे जनक म्हणून ओळखले जाते.

सुरुवातीचे शिक्षण गावात…
जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी ब्रिटीश राजवटीत असलेल्या पूर्व बंगालमधील मेमनसिंग येथील ररौली गावात झाला, जो आता बांगलादेशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे ब्रह्म समाजाचे नेते होते आणि ब्रिटिश राजवटीत अनेक ठिकाणी डेप्युटी मॅजिस्ट्रेट किंवा सहाय्यक आयुक्त होते. बोस यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या त्याच गावातील शाळेत झाले.

लहानपणापासून जीवशास्त्रात रस…
लहानपणापासूनच बोस यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची खूप आवड होती. यानिमित्ताने त्यांची जीवशास्त्रातील आवड जागृत झाली. वयाच्या 11 व्या वर्षी ते कलकत्त्याला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतला. यानंतर ते लंडनला वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा आपला इरादा सोडला आणि केंब्रिज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला.

शिकवण्याचे समर्पण…
बोस 1885 मध्ये भारतात आल्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. इंग्रजी प्राध्यापकांच्या तुलनेत भारतीय प्राध्यापकांच्या कमी पगाराला विरोध केल्याने त्यांनी तीन वर्षे विना वेतन अध्यापन केले, पण त्यांनी शिकवणे सोडले नाही. बोस यांचे काही विद्यार्थी जसे सतेंद्र नाथ बोस नंतर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ बनले.

वनस्पतीत जीवन आहे…
जगदीशचंद्र बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. पुढे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले की झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये जीवन असते. ते सिद्ध करण्याचा हा प्रयोग रॉयल सोसायटीत झाला आणि त्याच्या या शोधाचे जगभरात कौतुक झाले.

रेडिओ कम्युनिकेशनचे जनक…
वैज्ञानिक विभागात असे मानले जाते की बोस यांच्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणातूनच रेडिओ विकसित केला गेला. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय इटालियन शास्त्रज्ञ जी. मार्कोनी यांना जाते. मार्कोनी यांना या शोधाबद्दल 1909 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बोस आणि उपनिषद…
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि सिस्टर निवेदिता यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांवर प्रभाव टाकणाऱ्या वेद आणि उपनिषदांना बोस यांनी वैज्ञानिक बाजू दिली. भगिनी निवेदिता यांनी त्यांचे ‘रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग’ हे उपनिषद आधारित विज्ञानावरील प्रसिद्ध पुस्तक संपादित केलं. निवेदिता आणि टागोर यांच्यातील पत्रव्यवहारावरून असे दिसून येते की, निवेदितांनी वेद आणि उपनिषदांचा बराच अभ्यास केल्यानंतर बोस यांच्या ग्रंथांचे संपादन केलं.

बोस यांना बंगाली विज्ञान साहित्याचे जनक देखील म्हटले जाते. 1896 मध्ये, बोस यांनी निरुद्देशर कथा लिहिली जी एक छोटी कथा होती. परंतु, 1921 मध्ये त्यांच्या अभ्यक्त संकलनाचा भाग बनली. 1917 मध्ये त्यांना नाइटहूड ही पदवी देण्यात आली, त्यानंतर बोस सर जगदीश चंद्र बोस म्हणून ओळखले जाऊ लागले.

23 नोव्हेंबर 1937 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संकलन -डॉ बाहुबलि लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट

एम.जी.के. मेनन

एम.जी.के. मेनन

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
28 ऑगस्ट 1928
22 नोव्हेंबर 2016.

मंबिल्लिकलाथील गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करुन मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले.

त्यांना १९६१ मध्ये पद्मश्री, १९६८ मध्ये पद्मभूषण, १९८५ मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार प्राप्त झाले. १९६० चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार ही त्यांना मिळाला.

होमी भाभा यांच्या आग्रहास्तव १९५५ मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोर हून मुंबईला हलवली होती. १९६६ मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली. त्यावेळी ते ३८ वर्षाचे होते. १९७५ पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी.व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली.

दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९७२ मध्ये नऊ महिने काम केले. १९७४ मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. १९७४ ते १९७८ या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि १९८० मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. १९८२ ते १९८९ या कालावधीत ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८० ते १९८९ या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून राहिले. १९८९ ते १९९० दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

सरकारच्या मंत्रिमंडळात १९८९ मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्री पद भूषवले. १९९९ ते १९९६ या कालावधीत राज्यसभेचे ते खासदारही होते. मेनन १९७२ मध्ये काही काळ इस्रोचे चेरमन होते.

विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे २२ नोव्हेंबर २०१६ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ- इंटरनेट

शंकर पुरुषोत्तम आघारकर

शंकर पुरुषोत्तम आघारकर


जन्म.१८ नोव्हेंबर १८८४ मालवण येथे.


शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे वडील शासकीय खात्यात असल्यामुळे त्यांच्या अनेक गावी बदल्या होत असत. त्यामुळे शंकर आघारकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरनिराळ्या गावी झाले. ते १९०१ मध्ये धारवाडच्या शासकीय प्रशालेमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि यथाकाल वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्यांनी बी.ए.च्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळवला. याच परीक्षेत इंग्रजीमध्ये दाखवलेल्या नैपुण्यासाठी त्यांना बेल पारितोषिक देण्यात आले. ते १९०९ मध्ये वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भूशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.


आघारकर यांना १९१० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राणिशास्त्र प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदावर तात्पुरती नोकरी मिळाली. त्यांनी १९१३ पर्यंत त्या विषयाचे अध्यापन केले. अध्यापनाबरोबर निसर्ग निरीक्षण आणि संशोधनाची त्यांना विलक्षण गोडी असल्यामुळे, सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्‍चिम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.


एल्फिन्स्टन महाविद्यालयातील अध्यापकाची नोकरी संपल्यावर आघारकर १९१३ मध्ये कोलकाता येथे गेले. तेथील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेतील इंग्रज अधीक्षक डॉ. अ‍ॅनेडेल यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परिचय झालेला असल्यामुळे त्यांनी आघारकरांना भारतीय संग्रहालयाचे (इंडियन म्युझियम) मानद पत्र-प्रतिनिधी म्हणून नेमले. या संस्थेत स्वत:बरोबर आणलेल्या वनस्पती, प्राणी संग्रहाचा अभ्यास करत असताना उपअधीक्षक ग्रॅव्हली यांच्याशी परिचय झाला. आघारकर यांना त्यांच्याकडून अनेक तंत्रे शिकावयास मिळाली. ग्रॅव्हली यांच्याबरोबर पश्‍चिम घाटामध्ये प्रवास करून तेथील प्राणी आणि खास करून जलव्याल प्राणिसंघातील प्राण्यांचा त्यांनी अधिक अभ्यास केला.
कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांनी डॉ.सी.व्ही. रामन यांच्या शिफारशीवरून १९१३ मध्ये आघारकर यांची त्या विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तेथील घोष आसनाशी संबंधित होती.


आघारकर १९१४ मध्ये मुखर्जी यांच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले, परंतु त्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना १९१७ पर्यंत बंदिवासात राहावे लागले. नंतरची दोन वर्षे त्यांनी सक्षम वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि १९१९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.


नंतर डॉ.आघारकर यांनी सार्‍या युरोपभर प्रवास केला आणि तेथील विविध वनस्पतींचा संग्रह करून कोलकाता विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा अभ्यास करण्याची अनुमती मिळाली. त्याचा लाभ घेत डॉ.आघारकर यांनी नेपाळ मधील विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि वनस्पतींचा संग्रह केला. त्यांनी केलेला अभ्यास हा नेपाळ मधील वनसृष्टीचा पहिलाच शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होता, असे म्हटले जाते.


डॉ.आघारकर यांच्या कोलकाता विद्यापीठातील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत वनस्पति-शरीरविज्ञान, आनुवंशशास्त्र, वर्गीकरण, कवकशास्त्र, पुरातन वनस्पतिविज्ञान अशा विज्ञानशाखांच्या अभ्यासासला प्रारंभ झाला. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भात, आंबा, केळी, ज्यूट इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे आणि अन्य फळांविषयी बहुमोल संशोधन केले.
शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन १ सप्टेंबर १९६० रोजी झाले.

संदर्भ :- इंटरनेट

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर