फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!
विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.
विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.
प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.
सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.
उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व
या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.
फिरत्या प्रयोगशाळेची रचना
फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांसाठी लाभ
फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.
याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.
प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.
या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.