शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंददायी शनिवार उपक्रम, टेलिस्कोप प्रशिक्षण कार्यशाळा आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळा नियोजन याबाबत रूपरेषा या दोन दिवसीय कार्यशाळेत सादर करण्यात आले. यावेळी जिल्ह्याभरातून जवळपास ६५० हून अधिक शिक्षक उपस्थित होते.
पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ भगवान आसेवार संचालक शिक्षण व वनामकृवि परभणी यांनी केले. यावेळी परभणी येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ ए एल शेळके त्यांची विशेष उपस्थिती होती.
उद्घाटनाच्या सत्रात डॉ आसेवर प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना संबोधित करताना म्हणाले कीआज येथे उपस्थित असलेले शिक्षक हे ज्ञानाचा स्त्रोत आहेत आणि उद्या घडणाऱ्या शास्त्रज्ञांचे शिल्पकार आहेत. जिल्हा परिषद आणि परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेने दिलेले हे व्यासपीठ परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल, याची मला खात्री आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ शेळके म्हणाले की, मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षक यांचा अतिशय मोलाचा वाटा असतो.
राज्य समूपदेशक श्री बालासाहेब कच्छवे यांनी आनंददायी शनिवार व मेंदूची व्यायामशाळा यावर मार्गदर्शन केले.
सामाजिक बांधिलकीतून सुहाना प्रवीण मसाले व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत फिरती विज्ञान प्रयोगशाळा पूर्ण जिल्हाभर वेगळ्या शाळांमध्ये नेण्यात येत आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती शिक्षकांना फिरती विज्ञान प्रयोगशाळा समन्वयक प्रकाश केंद्रेकर यांनी दिली व त्यांच्या शाळेपर्यंत ती कशी पोहोचेल याबाबत चर्चा झाली. या सर्व चर्चेला शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानवारी परीक्षेची माहिती विज्ञानवारी परीक्षा समन्वयक प्रसाद वाघमारे यांनी दिली. ही परीक्षा आपल्या शाळेत घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद शिक्षकांचा मिळाला.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी टेलिस्कोप प्रशिक्षणाच्या अगोदर ऑप्टिक्स या पदार्थ विज्ञानाच्या शाखेबद्दल व प्रकाशाच्या विविध घटकांबद्दल प्रताप भोसले यांनी मूलभूत घटकांची माहिती दिली. यानंतर टेलिस्कोप कसा हाताळावा? तसेच टेलिस्कोप किती प्रकारचे आहेत? टेलिस्कोप वापरताना घ्यावयाची काळजी, यासंबंधी सखोल असे मार्गदर्शन दृकश्राव्य माध्यमाद्वारे परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी केले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात शिक्षकांची प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी दत्ता बनसोडे व अशोक लाड यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार दीपक शिंदे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ पी आर पाटील, डॉ अनंत बडगुजर, डॉ रणजीत लाड, डॉ बाहुबली निंबाळकर, लक्ष्मण सोनवणे, अमोल कदम, पूजा कासार, मोहिनी कच्छवे, सचिन सिसोदे, माजिद भाई इत्यादींनी तथा परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या टीमने परिश्रम घेतले.