अवकाशामध्ये नेहमीच दुर्मिळ अशा काही खगोलीय घटना घडत असतात. त्यापैकीच एक दुर्मिळ घटना उद्या पहाटेच्या सुमारास घडणार आहे. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.
ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे.
5 फेब्रुवारी 2024 उद्या पहाटेच्या सुमारास पूर्व आकाशात जेष्ठ हा तारा चंद्राने झाकल्या जाईल. याला चंद्राची ज्येष्ठा बरोबर पिधान युती असे म्हणतात. हे पिधान सुरू होताना ते चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू होईल आणि त्याचा मोक्ष हा त्याच्या काळोख्या बाजूने होईल. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास 55 वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या 14 वर्षात मात्र तो एकदाही येत नाही. ह्या पाच वर्षांच्या कालखंडात 55 वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या पिधानाला खंड पडतो. या वेळचे जे पिधान चक्र आहे ते 2023 ते 2028 आहे. योगायोगाने यावेळेच्या पिधान चक्रात 56 पिधान आहेत. त्यातले 56 पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही तीन पिधान दिवसा व दोन पिधान रात्री अशी असतील.
यातलं हे दुर्मिळ असं पिधान उद्या पहाटे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल. परभणीच्या आकाशातून पिधानाचा स्पर्श 4 वाजून 46 मिनिटांनी व मोक्ष 5 वाजून 57 मिनिटांनी होईल. या खगोलीय घटनेचा जास्तीत जास्त खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.