महर्षी दिनकर धोंडो कर्वे यांचा जन्म५जुलै १८९९ रोजी झाला.
दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले.
ते बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्र विषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी.फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते.
फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले. त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियत कालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यांनी सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.
डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा.इरावती कर्वे यांनी लिहिला होता.
१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला.
बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत. कार्य करत असताना ५ जुलै १९८०रोजी त्यांना देवाज्ञा झाली…
डाॅ. अनिल लचके.
संकलन- डॉ.बी. व्ही. लिंबाळकर