+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
चंद्रग्रहण निरीक्षणास परभणीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

चंद्रग्रहण निरीक्षणास परभणीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

निसर्गातील सर्वात विलोभणीय घटना म्हणजे ग्रहण.हे औचित्य साधून  परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण निरीक्षण आयोजन करण्यात आले होते.  गेल्या दोन-तीन दिवसापासून परभणीत ढगाळ वातावरण होते. ग्रहणाच्या वेळी मात्र निसर्गाने परभणीकरांना पूर्ण साथ दिली. चंद्रग्रहण चांगल्या पद्धतीने व अतिशय सुंदर अशा वातावरणात पाहता आले

राष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या प्रांगणात निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पालक विविध क्षेत्रातील मान्यवर व खगोल प्रेमींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. सुमारे 450 खगोल प्रेमींनी यावेळी चंद्रग्रहणाचे निरीक्षण करून ग्रहणाचा आनंद लुटला. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्वप्रथम परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी आकाश निरीक्षण कसे करावे तसेच त्यावेळी आकाशात असलेल्या नक्षत्रांची माहिती दिली. त्यानंतर खगोल अभ्यासक नागेश वाईकर यांनी चंद्रग्रहण यासंबंधी अंधश्रद्धा व ग्रहणामागील विज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. याचा मानवी जीवनावर कोणतीही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही  त्यामुळे सर्वांनी चंद्रग्रहण पाहण्यास काहीच हरकत नाही असे स्पष्ट केले.

चंद्रग्रहणाच्या तीन प्रकारांपैकी खग्रास प्रकारातले चंद्रग्रहण परभणीत दिसले. रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ झाला. 11 ते 12:23 या वेळेत चंद्रबिंब पृथ्वीच्या संपूर्ण छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन झाले. यावेळी  लालसर तपकिरी रंगाचा चंद्र यावेळी सर्वांना पाहता आला.  रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ झाला व उत्तर रात्री 1  वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटले. या चंद्रग्रहणाचा स्पर्श उत्तर दिशेकडून झाला व मोक्ष दक्षिण दिशेकडून झाला. या चंद्रग्रहणाच्या सर्व निरीक्षणांच्या नोंदी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे घेण्यात आल्या.
सर्वांनी उघड्या डोळ्यांनी तसेच दुर्बिणींद्वारे चंद्रग्रहण निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी विविध प्रकारच्या दुर्बिणी ग्रहण निरीक्षणासाठी लावण्यात आलेल्या होत्या. यावेळी प्रसाद वाघमारे, ओम शेठ तलरेजा, प्रताप भोसले, डॉ अनंत लाड, दत्ता बनसोडे, अशोक लाड, पार्थ दराडे,  सुरेश कुराडकर, दीपक शिंदे, संतोष देवडे, लक्ष्मण सोनवणे, गजानन चापके, भागवत कचवे यांनी दुर्बिणीतून तसेच या चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर करून सर्वांना चंद्रग्रहण  निरीक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

 ग्रहणादरम्यान दूध फराळ खाऊन ग्रहणकाळात काही खाऊ नये या अंधश्रद्धेला छेद देऊन जनमानसात एक मोठा वैज्ञानिक संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

चंद्रग्रहण निरीक्षणास परभणीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

परभणीकरांना आज अनुभवता येणार खग्रास चंद्रग्रहण

आज ७ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण ही खगोलीय घटना घडणार आहे.
या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे रविवारी रात्री ९ वाजता केले आहे.
यावेळेला टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण आपल्याला पाहता येईल.

आज रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११-०० ते १२-२३ संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२-२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल.

तरी या खगोल निरीक्षणाचा आनंद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.


स्थळ:-
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे, परभणी
संपर्क: 9403061572, 99211 44842, 9405919184, 9028817712