+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

शाश्वत विकासासाठी जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर गरजेचा

प्रकट मुलाखतीतून पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितला पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र

परभणी/ 9/4/2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जनकल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वनामकृवि परभणी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.जगदीश नाईक आणि डॉ.विजयकिरण नरवाडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांच्या व्यक्तिमत्वासह त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण कांतराव झरीकर, प्रमुख वक्ते हरीश कुलकर्णी व स्वागताध्यक्ष संदीप देशमुख, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचा पहिला वनभुषण पुरस्कार मिळालेले चैत्राम पवार यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. धुळे जिल्हा- सार्की तालुक्यात बारीपाडा येथे त्यांनी जवळपास 400 हेक्टर वनक्षेत्राचे संरक्षण केलेले आहे. 1990 च्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे राबवून 400 हेक्टर जंगलाचे संरक्षण केले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी जवळपास 5 हजारहून अधिक झाडे लावली असून आजूबाजूच्या 40 गावामध्येही ही वनसंवर्धनाची चळवळ सुरू आहे अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली.
श्री.पवार यांनी घेतलेले शिक्षण, आपल्या कामाची केलेली सुरुवात, जनप्रबोधन, संघटन आदीबाबत डॉ.नाईक यांनी प्रश्न विचारून त्यांना बोलते केले.
श्री.पवार यांनी केवळ कष्टाचे डोंगर फोडले नाहीत, तर बारीपाडा गावच्या आदिवासींच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणला. अज्ञान, दारिद्य्र आणि अनारोग्य या समस्यांना तोंड देतानाच पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवण्याचे महत्वाचे काम ते 30 वर्षापासून करत आहेत.
बेसुमार वृक्षतोड थांबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन करताना भविष्याची चिंता आणि वर्तमानातील गरज यांची सांगड घालावी लागत होती. हळूहळू त्यांची मते ग्रामस्थांना पटू लागली; पण ती अंगवळणी पडण्यासाठी काही अवधी लागला. मुळात शाश्वत विकासासाठी ते झटत होते. त्यामुळे केवळ जंगल वाढविणे किंवा वृक्षतोड थांबविणे एवढ्यापुरता त्यांचा विषय नव्हताच. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पाच बिंदूंवर त्यांनी काम केले आणि त्यासाठी डॉ.आनंद फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रबोधन करूनही जंगलतोड होतच होतीआणि बारीपाडा शहाणा झाला तरी आसपासच्या गावांचं काय? त्यांच्या कुर्‍हाडी कोण थांबविणार? हा प्रश्न होता. त्यामुळे गावाने नियमावली बनवली आणि सर्वजण तिचे पालन करू लागले असे श्री.पवार यांनी सांगितले.
केवळ झाडांची कत्तल थांबवायची नव्हती, तर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून बारीपाड्याच्या अनंत समस्यांचे उत्तर मिळवायचे होते. त्यातूनच त्याची लोकसहभागातून जैवसाखळी शाश्वत स्वरूपात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या वृक्षांचे संवर्धन आणि नव्या झाडांची लागवड करताना जन, जंगल, जमीन, जल आणि जनावर या पंचसूत्रीचा कधीही विसर पडू दिला नाही, असेही ते म्हणाले.
केवळ पावसावर अवलंबून असणार्‍या आणि ठरावीकच पारंपरिक पिके घेणार्‍या बारीपाड्यात त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
इंद्रायणीसारखी सुवासिक तांदळाची शेती केली तशी मोहाच्या फुलांपासून निरनिराळे पदार्थ बनवले. साबण, अगरबत्ती तयार झाली.
बचतगटातून वडिलांनी घेतलेली रक्कम मुदत संपली तरी ती परत केली नाही तेव्हा वसुलीसाठी श्री.पवार यांनी सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एका क्षणात निर्णय घेतला. जेवढी रक्कम थकीत आहे तेवढ्या किमतीची भांडी घरातून उचलून आणा आणि बचत गटात ठेवा.अशा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि या प्रसंगामुळे बारीपाड्याच्या गावकर्‍यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला.

कधीकाळी बेसुमार वृक्षतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आता सदाहरित डोंगरासाठी आणि वाहणार्‍या ओढ्यांसाठी ओळखला जातो. निसर्ग आणि माणूस यांच्या समन्वयातून ही संपदा निर्माण झाली आहे. या कामामध्ये पुढील पिढी जोडण्याचे कामही सुरू असून 44 गावांचा समूह करून लोकसहभागातून 11 हजार 200 हेक्टर वनक्षेत पुढे आणल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्याकडे महिला, पुरुष असा कुठलाच भेद नाही. वनभाजी महोत्सव 100 टक्के महिलांचा असतो. त्याला 20 वर्षे झाली असून त्यांना पूर्वी बोलता येत नव्हते अशा महिला सर्व भाज्यांची माहिती पटापट देतात. वन धन केंद्राच्या माध्यमातून 3 गावात मोहाच्या झाडासारख्या शाश्वत संसाधनांचा वापर करून उद्योग निर्मितीचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गरजा कमी करून नैसर्गिक संसाधने वाचवीण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असे सांगून वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. जैवसाखळी ऍग्रो फॉरेस्ट्रिसारखी कामे विविध विद्यापीठे, संशोधक आदींच्या मदतीने 10 वर्षे सातत्याने काम केले तरच निश्चित बदल झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वन संवर्धन कार्यात युवकांचा वाढता सहभाग हे आशादायी चित्र असून पर्यावरणाशिवाय आपण जगूच शकत नाही हे सर्वांना कळू लागले आहे

शब्दांकन—श्री बाळासाहेब काळे.