बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा
परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम : विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती
परभणी/प्रतिनिधी
गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली.
परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली. यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन चिंचोलकर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन वीर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.
बालकलावंतांचा सत्कार…
सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.