+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
मंगला नारळीकर

मंगला नारळीकर

गणितज्ज्ञ – गद्येपंचविशी

17 मे 1943
17 जुलै 2023

एम.ए.ला सुवर्णपदक मिळालं आणि लगेच ‘टीआयएफआर’ मध्ये गणितात संशोधन सुरू झालं. गणितात करिअर करण्याच्या दिशेनं सुरू झालेल्या प्रवासाला भलामोठा यू-टर्न मिळाला तो लग्नाचा. तोही थेट ‘केंम्ब्रिज’ला पोहोचवणारा.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संस्कारांप्रमाणे संसार सुरू झाला. मुलींचा जन्म झाला आणि करिअर अधिकच दूर गेलं. पण कालांतरानं भारतात परतल्यावर गणिताशी जुळलेली नाळ पीएच.डी. मिळवून गेली आणि मग गणितातलं संशोधन पुन्हा एकदा सुरू झालं. गणित शिकवणं, सोप्या भाषेत पुस्तकनिर्मिती करणं, यात डॉ. मंगला नारळीकर यांचं करिअर पुन्हा एकदा बहरत गेलं.. पण तत्पूर्वीच्या ‘गद्धेपंचविशी’तल्या आयुष्यानं जगणं मात्र अधिक आनंदी केलं..समृद्ध केलं..

या सदरासाठी माझे २० ते ३० वर्षे वयातील अनुभव लिहिण्याची विचारणा झाली तेव्हा मी जरा बिचकतच हे काम कबूल केलं. कारण ‘गद्धेपंचविशी’ या वाक्प्रचारात त्या तरुण वयात केलेली साहसी, कदाचित धोका पत्करूनही अंगावर घेतलेली कामं, क्वचित वेडेपणाकडे झुकणारे उपद्व्याप, एखाद्या तत्त्वाला किंवा ध्येयाला वाहून घेणं, असे प्रकार अंतर्भूत असतात. माझ्या आयुष्यात असं काही झालं नाही.

साधारण १९४४ ते १९६५ या काळात, मुंबईतील मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी कुटुंबात वाढलेली मी. माझी स्वप्नं तशी साधीच होती. एखाद्या विषयात अभ्यास करावा, चांगली पदवी, जमल्यास पैसे मिळवावेत, योग्य तरुणाशी विवाह करून संसार करावा. तो करताना आधी घर आणि घरातील माणसं यांची देखभाल करून वेळ मिळाल्यास करिअरचा विचार करावा हेच संस्कार होते आणि ते मला मान्यही होते. याच काळात सर्वात जवळचं, नाजूक नातंदेखील विणायचं असतं. तर अशा माझ्या २० ते ३० वर्षे या वयातील काही सांगण्याजोगे, मजेदार किंवा विचार करण्यास प्रवृत्त करणारे अनुभव सांगते.

शिक्षणात मी हुशार विद्यार्थिनी होते, शाळेत मला सगळे विषय आवडत होते, जमत होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांचे पर्याय होते. कोणी डॉक्टर होण्यास, तर कोणी मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुचवलं. बहुधा ते जमलंही असतं. पण काकांनी मला स्पष्ट सांगितलं, की सर्वार्थानं कामावर लक्ष देऊन ती नोकरी करायची असेल, तरच ती परीक्षा द्यावी, नाही तर एका लायक व्यक्तीची संधी तू घालवशील. लग्न करून संसार सांभाळत तो मार्ग झेपेल याची खात्री नव्हती. मला गणित हा विषय खास आवडे. म्हणून त्याचाच अभ्यास करायचं ठरवलं.

‘इंटर आर्ट्स’, ‘बी.ए.’, ‘एम.ए.’ या सगळ्यांत मी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून अनेक बक्षिसं, पदकं मिळवली. बहुतेक हुशार विद्यार्थी विज्ञान शाखा निवडून डॉक्टर किंवा अभियंता व्हायला जात. त्यामुळे ‘आर्ट्स’ला चढाओढ कमी असे, हे महत्त्वाचं कारण माझ्या सतत पहिलं येण्यामागे आहे. नंतर मी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या प्रसिद्ध संस्थेत गणितात संशोधन करण्यास प्रवेश घेतला, तिथे काम चांगलं चालू होतं.

मला काही माझ्या अभ्यासाच्या किंवा थोडा वेळ केलेल्या नोकरीच्या काळात जोडीदार भेटला नाही. त्यामुळे पाहून, ठरवूनच लग्न करावं लागणार हे उघड होतं. १९६३ च्या सुमाराला काही हितचिंतकांनी ‘स्थळं’ सुचवली होती. त्यात जयंत नारळीकर हे नाव देखील होतं. मला माझ्या काका-काकूंनी मुलीप्रमाणे वाढवलं होतं. कारण मी सहा महिन्यांची असताना माझे वडील कर्क रोगानं वारले, तेव्हा आईनं मला आणि माझ्या मोठय़ा भावाला मुंबईला काका-काकूंच्या जवळ ठेवलं आणि ती स्वत: पुण्याला तिच्या आईवडिलांच्या जवळ राहून वैद्य आणि डॉक्टर झाली. तिनं अनेक वर्षं ‘ताराचंद रामनाथ रुग्णालया’त रुग्णसेवा आणि आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण देण्याचं काम केलं. काका- बाळासाहेब राजवाडे मुंबईत ‘लेबर ऑफिसर’ होते आणि मामा- बाळासाहेब चितळे हे पुण्यात प्रथम बांधकाम कंत्राटदार होते, नंतर श्रेयस हॉटेलचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हा लग्नाची बोलणी करणं वगैरे जबाबदारी काका आणि मामा यांची होती. त्याप्रमाणे काकांनी नारळीकरांकडे पत्रानं एक प्रस्ताव धाडला होता. पण त्यावर प्रगती झालेली नव्हती, कारण जयंत इंग्लंडमध्ये, त्याचे आईवडील अजमेरमध्ये, तर आम्ही मुंबईत होतो.

दरम्यान, १९६४ च्या जूनमध्ये जयंतचं फ्रेड हॉइल यांच्याबरोबरचं गुरुत्वाकर्षणावरील काम प्रसिद्ध झालं आणि तो एकदम जगप्रसिद्ध तरुण शास्त्रज्ञ झाला. त्याच वेळी मी ‘एम.ए.’च्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवून पहिली आले होते. आधी सांगितल्याप्रमाणे ‘टीआयएफआर’मध्ये लगेच संशोधनाला सुरुवात झाली. जयंत १९६५ च्या हिवाळ्यात भारत भेटीवर आला, त्या वेळी माझं ‘टीआयएफआर’ मध्ये काम सुरू झालं होतं. लोकांनी पाहिलं, की एकाच विषयात काम करणारा तरुण आणि तरुणी, दोघेही खूप हुशार, योग्य वयाचे आहेत, तर त्यांचे लग्न व्हावे, किंवा ते होईलच! काही लोकांना राजवाडय़ांच्याकडून गेलेल्या जुन्या प्रस्तावाची माहिती असावी. परंतु दोन्ही घरांच्या लोकांची एकमेकांशी भेट किंवा परिचयही झालेला नव्हता. जयंत तर ‘सीएसआयआर’नं (काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च) आखलेल्या त्याच्या दौऱ्यात अतिशय व्यग्र होता. या ट्रिपमध्ये लग्नाचा विचारही करु शकत नव्हता. त्यानं तसं आई-वडील आणि त्याचे मामा वगैरेंना सांगितलं होतं. पुण्यात तो आणि त्याचे आई-वडील मामांकडे, प्रा. हुजूरबाजारांकडे असताना माझे मामा त्यांना भेटण्यास गेले, त्या वेळी नारळीकर मंडळींकडून त्यांच्यावर अचानक अग्निवर्षांव झाला. असं झालं होतं, की जयंत नारळीकर याचं लग्न मंगला राजवाडे हिच्याशी (म्हणजे माझ्याशी)ठरल्याची बातमी लोकांमध्ये पसरली होती, अर्थात ती अफवा होती. पण त्यामुळे लग्नासाठी इतर प्रस्ताव किंवा बोली भाषेत अपेक्षित मुली सांगून येणं थांबलं होतं. त्यामुळे ही अफवा राजवाडय़ांच्या लोकांनी (म्हणजे माझ्या घरच्यांनी!) मुद्दाम पसरवली असा नारळीकरांचा समज झाला होता. त्यामुळे तात्यासाहेब नारळीकरांनी (जयंतच्या वडिलांनी) या लोकांची खरडपट्टीच काढली. तेव्हा माझ्या मामांनी शांतपणानं त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, की अशी अफवा पसरणं मुलीच्या दृष्टीनं अधिक धोक्याचं असतं. कारण एकदा ठरलेलं लग्न मोडलं, तर आपल्या समाजात मुलीची जास्त नाचक्की होते, तेव्हा अशी अफवा पसरण्यासाठी आम्ही जबाबदार नाही. त्यानंतर अर्थात हा प्रस्ताव पूर्णपणे बारगळला असं आमचे लोक समजून चालले.

पुढे नारळीकर कुटुंब महाराष्ट्रात इतर शहरात गेलं, त्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं, की त्या-त्या शहरात कुणी योग्य वयाची ‘स्कॉलर’ मुलगी असेल, तर तिचं लग्न जयंत नारळीकरशी ठरल्याची अफवा पसरते आहे! मग त्यांचा गैरसमज दूर झाला. जयंत त्याचा दमवणारा दौरा आटोपून इंग्लंडला परत गेला. नंतर त्याच्या आईवडिलांनी लग्नासाठी आलेले अनेक प्रस्ताव तपासले, विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या उपवर तरुणींची माहिती त्यात होती. काही मुलींची भेट घेण्याचं ठरलं. तात्यासाहेबांनी सप्टेंबरमध्ये माझ्या काकांना पत्र पाठवून तसं कळवलं आणि भेटण्यास मला अजमेरला घेऊन येण्याचं सुचवलं. जयंत डिसेंबरमध्ये येणार होता, त्या वेळी जमल्यास लग्न ठरवायचं होतं. त्या वेळी मी मामांबरोबर तिथे जाऊन आले. नंतर डिसेंबरमध्ये जयंतशी भेट होणार होती, तेव्हा काका माझ्याबरोबर होते. जयंत आणि मी अजमेरच्या ‘फॉय सागर’ तलावाभोवती फिरायला गेलो आणि थोडय़ा गप्पा मारल्या. प्रथम मी जरा बिचकत होते, पण ‘केंम्ब्रिज’च्या जीवनातील मजेदार गोष्टी सांगून जयंतनं मला हसवलं आणि मी मोकळेपणानं बोलू लागले. लग्नासाठी जयंतनं एकच मुलगी पाहिली, मीही एकच मुलगा पाहिला आणि आमचं लग्न ठरलं. पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे त्यानं मला पत्र लिहून ‘प्रपोज’ केलं, ते मी स्वीकारलं!

‘ टीआयएफआर’ मध्ये राजीनामा देऊन लग्न करून मी ‘केंम्ब्रिज’ला गेले. तिथे संसार मांडताना अर्थात उत्साह होता, पण स्वयंपाक करणं, घर चालवणं हे अनुभवातून शिकायचं होतं. करिअरचा तेव्हा खास विचार नव्हता. गणित विषयाची, आवडणाऱ्या शाखांची व्याख्यानं ऐकणं, तिथे ‘पार्ट ३’चा अभ्यास करणाऱ्यांना एक ‘लेक्चर कोर्स’ देणं आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांची ‘टय़ुटोरियल्स’ घेणं एवढंच केलं. मात्र स्वयंपाक शिकणं आणि करणं, घराची देखभाल, विविध मित्रमैत्रिणी जोडणं, नदीत लहान बोट चालवायला शिकणं (पंटिंग), इंग्लंडमधील सर्व ऋतुबदल उत्सुकतेनं अनुभवणं, मुंबईत कधीच करायला न मिळालेलं बागकाम करणं, जयंतचा कामानिमित्त प्रवास होई तेव्हा त्याच्याबरोबर प्रवास, या सगळ्याचा मी भरपूर आनंद घेतला. इंग्रजी भाषा येत होती, तरी इंग्लंडमधील लोकांचे उच्चार समजायला जरा कठीण. शिवाय तिथली बोलीभाषा आणि संस्कृती समजायलादेखील कधी कधी वेळ लागे.

दोन उदाहरणं सांगते, नव्या घरासाठी सामान विकत घेण्यास सकाळी नऊ-साडेनऊला गेलो. दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ५ किंवा ६ पर्यंत उघडी असत. मला आवडलेलं कॉफी टेबल दुकानदार त्याच दिवशी नक्की पोहोचवणार होता. ‘‘डिनर टाइमपर्यंत आलं नाही, तर फोन करा.’’ असं तो म्हणाला. आता ‘डिनर टाइम’नंतर याचं दुकान तरी उघडं कसं असेल, अशी माझी शंका. पण सामान्य इंग्रजी माणूस दुपारच्या जेवणालाच ‘डिनर’ म्हणतो हे मला माहीत नव्हतं. माझ्या मते डिनर टाइम म्हणजे संध्याकाळी ७ किंवा ८! आणखी एक घटना म्हणजे पहिल्या कन्येच्या जन्माच्या वेळी अपत्यमार्गाला टाके घातले होते. तिसऱ्या दिवशी तपासायला आलेल्या डॉक्टर बाईला ते पुरेसे भरून आलेले दिसले नाहीत. तिनं विचारलं, ‘‘काल आणि आज ‘बाथ’ घेतलीस ना?’’ मला जरा रागच आला. म्हटलं, ‘‘आम्ही रोजच बाथ घेतो!’’ तिनं तेथील परिचारिके ला सांगितलं, ‘‘हिला टबमध्ये गरम पाण्यात मीठ टाकून जास्त वेळ बसायला द्या.’’ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला, की यांच्यासाठी बाथ म्हणजे टबमध्ये पाण्यात बसणं, तर माझ्यासाठी बाथ म्हणजे बादली-तांब्या किंवा फार तर शॉवरनं आंघोळ किंवा केवळ अंग धुणं. शिवाय गरम पाण्यात मीठ टाकू न बसलं की शरीराच्या जखमा भरून येतात हे नवीन ज्ञानही मिळालं.

१९७० पासून अपत्याची जबाबदारी आल्यावर जगणं आणखी व्यग्र, समृद्ध होत गेलं, पण ‘करिअर’ मात्र आणखी दूर गेलं. बहुधा १९६८-६९ मध्ये, पूर्वी ‘टीआयएफआर’मध्ये काम करणारा परिचित शास्त्रज्ञ आम्हाला भेटला, त्यानं जयंतबरोबर माझ्याही कामाची चौकशी केली. मी काही संशोधनात्मक काम करत नाही, हे कळल्यावर त्याला राग आलेला दिसला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही मुली अशाच असता. आधी मारे अभ्यास करून यश मिळवता, पण अभ्यासाचं करिअर पुढे नेत नाही, संसारात गुरफटून जाता.’’ त्याचे शब्द माझ्या मनात घर करून खुपत राहिले. नाही तरी टीका जेव्हा बहुतांशी सत्य असते, तेव्हा ती स्वीकारावी लागते, मनाला लागते.

पुढे १९७२ च्या सप्टेंबरमध्ये दोन लहान मुलींना घेऊन आम्ही मुंबईत राहण्यास आलो. ‘टीआयएफआर’मध्ये ‘पदार्थ विज्ञान’ विभागात प्रोफेसरचं पद जयंतनं स्वीकारलं. १९७३ मध्ये त्याचे आई-वडील आमच्याकडे राहाण्यास आले. मी एकत्र कुटुंबात वाढले होते. अशा कुटुंबातील व्यक्ती परस्परांना किती साहाय्यभूत होतात ते मी अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यास माझी तयारी होतीच. आम्हाला ‘टीआयएफआर’च्या समोरच्या कॉलनीत राहायला सदनिका होती. त्याच संस्थेच्या गणित विभागात मी पूर्वी काम करत होते. मी बराचसा स्वयंपाक उरकून, मुलींना शाळेत पाठवून दोनएक तास वेळ काढू शकत होते. नव्यानं आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मी पुन्हा गणित विभागात व्याख्यानं ऐकायला जाऊ लागले. मला त्या अभ्यासात गोडी आहे हे समजून त्या विषयाची व्याख्यानं माझ्या सोयीच्या वेळी होऊ लागली आणि मी पुन्हा अर्धवेळ संशोधक झाले. काही काळानं एक प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले. आणि ‘पीएच.डी.’देखील मिळाली. या वेळी राहाण्याची जागा संस्थेजवळ होती याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. माझ्या पीएच.डी.च्या कामाची तुलना मी श्रावणी सोमवारच्या कहाण्यांतील म्हातारीच्या कहाणीशी करते. घरातील सर्वाच्या गरजा पुरवून उरलेलं वाटीभर दूध घेऊन तिनं ते शंकराच्या मंदिरात अर्पण केलं, त्यानं तो गाभारा भरून गेला.

पूर्वी कधी शिक्षकी पेशाचा विचार केला नव्हता. मैत्रिणींना गणिताच्या अभ्यासात मदत केली होती तेवढंच! मुंबईत आधी माझ्या आणि नंतर इतरांच्याही, घरकामाला येणाऱ्या बायकांच्या मुलांना अभ्यासात मदत करताना लक्षात आलं की आपण यांना नीट शिकवू शकतो. त्यांना न समजणारी गणितं समजावून सांगितल्यावर त्यांना ती सोडवता येऊ लागली की मलाही आनंद होत असे. पाचवी ते सातवीचं गणित सोप्या पद्धतीनं समजावून सांगणारं माझं छोटंसं पुस्तक ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे ‘मनोविकास’नं प्रकाशित के लं. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, ते मला अनपेक्षित होतं. ज्यांनी शाळा मध्येच सोडून दिली, परंतु नंतर नोकरी करताना ज्यांना गणिताच्या काही परीक्षा द्याव्या लागतात, त्या २०-२२ र्वष वयाच्या तरुणांना हे छोटंसं पुस्तक उपयोगी पडतं.

कधी कधी भूतकाळ समोर उभा राहातो, त्याचा विचार करता प्रश्न येतो, माझा ‘केम्ब्रिज’मधील काळ करिअर न केल्यामुळे फुकट गेला का? आता वाटतं, नाही फुकट गेला. कारण तिथे शिकलेल्या इतर गोष्टी, आनंदानं अनुभवलेले ऋतुबदल, जोडलेली मित्रमंडळी, वेगळ्या संस्कृतींचं निरीक्षण, विविध खाद्यप्रकार शिकणं, त्यात प्रयोग करणं, मुलींचं बालपण अनुभवणं, त्यांचे पहिले बोल, पहिली पावलं यांचा आनंद घेणं, त्यांच्यासाठी कपडे शिवणं, हे सगळं आनंद देणारं, समृद्ध करणारं होतंच की! आपलं जीवन किती यशस्वी, किती वाया गेलेलं, हे आपणच ठरवावं!


लेखिका…. मंगला नारळीकर.

संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर

संदर्भ- इंटरनेट

मंगला नारळीकर

आंतरराष्ट्रिय विज्ञान संकुलात वृक्ष दिंडी चे उत्साहात आयोजन

दिनांक 17.07.2024

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परिसर येथे वृक्षदिंडी चे परभणी अस्त्रोनॉमिकल सोसायटी व वृक्षवल्ली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते.
वृक्षदिंडी ची सुरुवात , विज्ञान चौक – राजगोपालचारी उद्यान पासून होऊन त्याचा शेवट आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परिसर येथे झाला.


वृक्षदिंडीमध्ये साधारणपणे 500 पेक्षाही अधिक विद्यार्थी , तसेच पालक आणि शिक्षक संमीलित झाले, यादरम्यान बालगोपाल वारकऱ्यांनी पावली खेळत तसेच पथनाट्य सादरीकरण करत, अभंग गात वृक्षदिंडी मध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी , तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस निरीक्षक श्री यशवंत जी काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या प्रसंगी बोलताना डॉक्टर पी. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या निर्मितीबाबत माहिती दिली, तद्वतच वृक्षवल्ली फाउंडेशनचे डॉक्टर देवानंद ओमनवार यांनी ” एक पेड मां के नाम ” असा नारा देत वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले , तसेच अप्पर पोलीस निरीक्षक यशवंत काळे यांनी वातावरणातील बदलासाठी वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये वृक्ष संगोपन याबद्दल विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
वृक्षदिंडी साठी शहरातील नामवंत शाळा उपस्थित होत्या त्यामध्ये ऍकमे इंग्लिश स्कूल , ज्योतिर्गमय स्कूल , सारंग स्वामी विद्यालय, संस्कृती विद्यालय, बळीराजा विद्यालय, या अग्र स्थानी होत्या.

वृक्षदिंडीमध्ये शहरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये पोलिस उप अधीक्षक श्री दिगंबर डंबाळे, डॉ नेहरकर, डॉ कातनेश्र्वरकर, डॉ कलकोटे, डॉ. केदार खटिंग, डॉ आनंद अनेराव, डॉ आनंद लाड, डॉ सौ मानवतकर, श्री अनुप शुक्ल, डॉ. भोसले , डॉ. राजेश मंत्री , डॉ. बंगाळे, श्री आशिष निलावार , श्री प्रशांत कायांदे, श्री पवन देशमुख, श्री कल्याण देशमुख.

तसेच सौ अंजली बाबर, सौ प्रिया ठाकुर, सौ. सूर्यवंशी, श्री. अक्षय देसरडा, श्री नारायण निलंगे, श्री ज्ञानेश्वर जोगदंड, श्री. पेडगावकर, सौ कमल पाटिल, सौ डॉ निरस, डॉ निखिल केंद्रेकर, सौ घोडे, सौ पोटेकर, श्री कृष्णा झरकर, श्री नितिन फुटाणे,श्री नागेश वाईकर, श्री. सुभाष जाधव, श्री कल्याण भारोसे, श्री प्रसन्न भावसार, श्री बंडेवार श्री लिंगायत , श्री मजीद भाई.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी अस्ट्रॉनोमिकल सोसायटी च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.