+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


12 नोव्हेंबर 1896.
20 जून 1987.

शिकारी ते बर्डमॅन : सलीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष.

डॉ.सलिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू दिले. ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणजे भारताचे ‘पक्षिपुरुष’ म्हणूनही आज संपूर्ण जगाला त्यांची ओळख असली आणि त्यांच्या शास्त्रीय कार्याला जागतिक स्तरावरची मान्यता लाभली असली, तरी त्यापेक्षाही काकणभर सरस असणारे त्यांचे कार्य म्हणजे भारताला त्यांनी दिलेली निसर्ग संरक्षण आणि सुस्थापन चळवळीची देणगी.

     त्यांचा जन्म सुलेमानी मुस्ता अली इस्माइली कुटुंबात झाला. नऊ भावंडांमध्ये ते सर्वांत शेवटचे होते. आईवडिलांचे छत्र लवकर हरपल्यामुळे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या मामांच्या, अमिरुद्दीन तय्यबजी यांच्या, गिरगावातल्या खेतवाडीमधील घरी झाले. मामांकडे निरनिराळ्या प्रकारची अनेक हत्यारे आणि बंदुका होत्या. ते शिकारी होते. लहानपणी सलिमनी गंमत म्हणून  आणि खाण्यासाठी म्हणून अनेक चिमण्यांची शिकार केली होती. एकदा त्यांनी गळ्यावर पांढरा ठिपका असलेली चिमणी मारली. 
     परंतु धार्मिक घरामध्ये ती खाण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मामांनी त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे (बी.एन.एच.एस.) अभिरक्षक डब्ल्यू.एस. मिलार्ड यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्या पक्ष्याची ओळख करून देण्याबरोबर सलिमला सोसायटीतील पेंढा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह फिरवून दाखविला. पक्षिसृष्टीचे दार त्यामुळे उघडले जाऊन सलिम अलींना पक्षीविषयक अभ्यास गांभीर्याने स्वीकारणे शक्य झाले. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता.

     शालेय जीवनात सलिम अलींनी फारशी चमक दाखविली नाही. त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष रुची नव्हती. परंतु खेळांमध्ये गोडी होती. घरामध्ये निसर्गविषयक माहिती आणि त्या संदर्भातील साधनांची रेलचेल होती म्हणून त्याची परिणती सलिम अलींच्या मनात पक्षिशास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजण्यात आणि तो फोफावण्यात झाली. १९१३ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी प्राणिशास्त्र विषयात पदवी घेण्याच्या दृष्टीने सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे प्रवेश घेतला. परंतु लॉगॅरिथम्स आणि तत्सम अवघड गोष्टींमुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) तेव्हायला प्रयाण केले. तेथे त्यांचे बंधू जाबिर अली खाणधंद्यामध्ये होते. भावाला मदत करण्याबरोबर आजूबाजूला असलेल्या वनप्रदेशात त्यांची भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच त्यांची निसर्गशास्त्रज्ञ होण्याची कौशल्ये वाढीस लागली. 
     १९१७ साली भारतात परतल्यावर त्यांनी प्राणिशास्त्रविषयक एक वर्षाचा अनौपचारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम छंद म्हणून पूर्ण केला. फावल्या वेळात ते बी.एन.एच.एस.मध्ये जात. तेथे त्यांना भारतीय पक्षिसृष्टीचा परिचय झाला. तेथे त्यांची प्रेटर यांच्याशी गट्टी जमली. त्यांच्याबरोबर त्यांनी पक्षी जगतात बरीच मुशाफिरी केली. १९१८ साली त्यांनी तेहमिना नावाच्या आपल्या दूरच्या नात्यातील मुलीशी विवाह केला. लगेच ते दोघे तेव्हायला परत गेले. सलिम अलींना खाण धंद्यापेक्षा पक्ष्यांतच रस होता. त्यामुळे आधीच डबघाईला आलेला धंदा पूर्णपणे बसला आणि १९२४ साली अली बंधू भारतात परतले.

     पक्षिजीवनाविषयीचे प्रशिक्षण घेण्याकरिता त्यांनी ठिकठिकाणी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांना बर्लिन विद्यापीठाच्या प्राणिसंग्रहालयाने प्रतिसाद दिला. प्रा. एरविन स्टेसमन यांच्या हाताखाली त्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेतले. अर्थात त्यासाठी त्यांना तत्कालीन वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी असलेल्या पक्षिशास्त्रज्ञांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. बर्लिनमधील सात महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायांत कडी चढविण्याच्या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन कार्यानुभव घेतला.

    १९३० साली भारतामध्ये पुन्हा एकदा नोकरीचा शोध सुरू झाला. योग्य नोकरी न मिळाल्यामुळे सलिम अली आणि तेहमिना यांनी अलिबागजवळच्या किहीम या किनारपट्टीवरील गावात मुक्काम हालवला. तेथेच त्यांनी आपला सारा वेळ पक्ष्यांचा मागोवा घेण्यातच घालवला. बाया सुगरण पक्ष्यांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. अशा प्रकारे बाया सुगरण पक्ष्यांचे दीर्घकाळ निरीक्षण करणारे ते पहिलेच होते. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने त्यांच्या वर्तवणूकीविषयी होता. आजवर कोणी, कुठेच न नोंदवलेले जीवननाट्य त्यांनी प्रत्यक्ष बघितले.

     बाया नरपक्षी मादीबरोबर मिलन करण्याच्या हेतूने तिला आकर्षित करण्याकरिता शिंदीच्या झाडांवर घरटी विणतात. एका विशिष्ट टप्प्यावर ते घरट्याचे विणकाम थांबवतात. मादी त्याचे निरीक्षण करते. आंतररचना तपासते. घरटे पसंत न पडल्यास पुन्हा नवे घरटे उभारण्यास नराद्वारे सुरुवात केली जाते. पुन्हा तीच प्रक्रिया पार पडते. घरट्यास पसंती लाभल्यास त्याच घरट्यात लगेच मिलन उरकून पसंतीची खातरजमा होते. मग तो नशीबवान नर घरट्याची उर्वरित बांधणी पूर्ण करतो. त्यामध्ये मादी अंडी घालते, उबवते. घरटी सजीव होतात. नर मात्र एक घरटे बांधून पूर्ण होताच दुसरे घरटे बांधायला घेतो आणि नव्या घरोब्याच्या तयारीला लागतो. याच क्रमाने, एकाच हंगामात किमान तीन-चार माद्यांचा तो दादला होतो. पक्षीविषयक पुस्तकातून आजवर कोणीही न नोंदवलेला हा जीवनपट डॉ.सलिम अलींनी सोसायटीच्या जर्नलमध्ये एक प्रदीर्घ लेख लिहून प्रकाशित केला.
     सलिम अलींच्या या मूळ अभ्यासावरच या पक्ष्यांच्या संदर्भात पुढील अध्ययन झाले. प्रत्यक्ष अवलोकन करून खातरजमा झाल्यावरच शास्त्रशुद्ध पद्धतीने निष्कर्षाची मांडणी करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. भारतीय पक्ष्यांचा मागोवा घेऊन त्याचे सूचीकरण केले. भारतीय पक्षिशास्त्राची उभारणी शास्त्रशुद्ध पायावर केली.

      त्यांचे पक्षी-सर्वेक्षणाचे अहवाल वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरले. आजवर विचारात न घेतलेल्या पर्यावरण, परिसंस्था, भौगोलिक घटकांचा विचारही त्यात होता. भारतासारख्या कृषिप्रधान देशात पक्ष्यांच्या परिसंस्थेचा परिस्थितीच्या दृष्टीने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. बंगळुरूहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात, १९६३ साली ‘इकनॉमिक ऑर्निथॉलॉजी इन इंडिया’ या शोधनिबंधातून त्यांनी पक्षी-अभ्यासाचे शेती आणि जंगलांच्या संदर्भातील महत्त्व पटवून दिले. देशातील अन्नधान्य वाढविण्याच्या मोहिमेत पक्ष्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या खाद्यसवयींचा विचार व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहामुळे, जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नंतरच्या काळात अनेक भारतीय कृषिविद्यापीठांनी अभ्यासक्रम आखले, उपक्रम सुरू केले. पारिस्थितिकी किंवा इकलॉजीचे आद्य तज्ज्ञ म्हणून डॉ. सलिम अली यांना मान द्यायला हवा.

    पक्ष्यांचे वर्तन अभ्यासण्याकरिता त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यासही फार पूर्वीपासूनच सुरू केला होता. त्या दृष्टीने ‘केवलादेव घना’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते. भरतपूरजवळील या पाणथळ प्रदेशात दरवर्षी करकोचे, बगळे, पाणकावळे, हविर्मुख (चमचे), क्रौंच इत्यादी पाणपक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधून डॉ.सलिम अलींनी आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीने लाखो पक्ष्यांना कडी चढवली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल घडून येतात, हे स्थलांतरित पक्षी कुठे कुठे विखुरतात, स्थानिक नि स्थलांतरित यांत संघर्ष होतो का, स्पर्धा असते का, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या परंपरागत जीवनात कोणता विक्षेप येतो, या आणि अशा दृष्टिकोनातून सालिम अलींनी अनेक अभ्यासप्रकल्पांची उभारणी केली. निरीक्षणातून पक्षिशास्त्र अभ्यासण्याला चालना मिळाल्यावर अनेक तरुण त्याकडे वळले. सलिम अलींच्या प्रयत्नांमुळे भारतभर अनेक ठिकाणी पक्षी-अभयारण्ये घोषित झाली.

     पक्षी-स्थलांतरणाचा त्यांचा अभ्यास एवढा गाढा होता, की जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच.ओ.) पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या बाबतीत प्रश्‍नांची उकल करण्याकरिता सलिम अलींना पाचारीत असे. त्यांचे पक्षिप्रेम, प्राणिमात्राविषयीची आस्था ही केवळ भाबड्या भूतदयेपोटी नव्हती. मात्र निरनिराळ्या प्रकल्प उभारणीपायी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने, परिसंस्था नष्ट  होऊ लागल्यामुळे आणि अनेक पक्षिजाती नामशेष होऊ लागल्यामुळे त्यांना अतीव दु:ख होत असे. नुसते कायदे करून भागणार नाही, जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी व्याख्याने, फिल्म्स, स्लाइड्सद्वारा वन्यप्राण्यांचे महत्त्व पटवून देण्याचे त्यांनी सतत प्रयत्न केले.

     सायलेंट व्हॅली संरक्षणाच्या आंदोलनात त्यांच्या प्रयत्नांना १९७७-१९७८ सालांत निसर्गप्रेमी जनतेने खंबीर आणि ठाम पाठिंबा दिला. यावरून लोकमानसात त्यांचा पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा रुजण्याची पावती मिळते. पशुपक्षी राखायचे म्हणून तिथून माणसाला बाहेर हुसकायचे, अशा विचारांचा पाठपुरावा ते करत नव्हते.माणूस आणि निसर्ग यांत सुसंवाद आणि परस्परपूरकता राखण्याच्या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. अशा विचारांना प्राधान्य देणाऱ्या ‘सह्याद्री बचाव’, ‘मुंबई बचाव’ चळवळींना त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.

     भारतीय पक्षिशास्त्राचा अभ्यास खंडित होऊ न देता, तो पुढे चालू ठेवण्याची, त्याची प्रतिष्ठा वाढविण्याची आणि त्याला लोकमान्यता, लोकप्रियता मिळवून देण्याची कामगिरी सलिम अलींनी निष्ठापूर्वक पार पाडली. पक्षिशास्त्रात सतत नवीन भर टाकली. त्यांच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे भारतात ठिकठिकाणी निसर्ग अभ्यास मंडळे, पक्षी निरीक्षण मंडळे, वृक्षमित्र संघटना उभ्या राहिल्या. सायलेंट व्हॅलीसारख्या घटना पुन्हा-पुन्हा घडू नयेत, त्यावर काही नियंत्रण असावे, लोकमताचा दबाव असावा, शास्त्रीय ज्ञानाचा अंकुश असावा, या दृष्टीने कायमस्वरूपाची एखादी योजना असावी यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे, पर्यावरण खाते निर्माण करावे असा आग्रह धरला. इंदिरा गांधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन वन आणि पर्यावरण खात्याची निर्मिती १९८१ साली केली.

     १९४७ साली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून तर ते सोसायटीचे अविभाज्य अंगच बनले. संस्थेच्या नियतकालिकाचेही ते संपादन करीत. कोणत्याही कामाबद्दल वेतन वा मानधन न घेता, त्यांनी तिचा कारभार सांभाळला. तिचे कार्यक्षेत्र वाढवले. उत्तरायुष्यात मिळालेल्या नाना पुरस्कारांचे मानधनही त्यांनी सोसायटीच्या उत्कर्षासाठी वेचले. त्यांच्या अविरत प्रयत्नांमधूनच मुंबई विद्यापीठाने १९५७ साली सोसायटीला एम.एस्सी. आणि डॉक्टरेटचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली.

    शास्त्रज्ञ, संशोधक, कार्यकर्ता या आपल्या ओळखीबरोबरच डॉ. सालिम अली प्रसिद्ध आहेत, आपल्या निसर्गविषयक विशेषत: आपल्या पक्षीविषयक लेखनासाठी, पुस्तकांसाठी. त्यांचे आत्मचरित्र ‘द फॉल ऑफ द स्पॅरो’ १९८५ साली प्रकाशित झाले आणि गाजले. परंतु त्यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तके, तांत्रिक अहवाल लिहिले होते. त्यांच्या पुस्तकांचा वापर संदर्भग्रंथ म्हणून केला जातो. त्यांनी पक्षी-सर्वेक्षणावर आधारित ‘बर्ड्स ऑफ कच्छ’, ‘इंडियन हिल  बर्डस’, ‘द बर्ड्स ऑफ त्रावणकोर’- कोचिन, ‘पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अ‍ॅन्ड सब कॉन्टिनेन्ट’ इत्यादी पुस्तके लिहिली. भारतीय पक्षिशास्त्रात सर्वांत मोलाची भर घातली ती त्यांच्या ‘हॅण्ड बुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान’ या दशखंडात्मक ग्रंथराजाने.

     डॉ. सलिम अलींच्या निसर्गविषयक ज्ञानाची, अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निसर्गसंरक्षण, वन्यप्राणी संरक्षण समित्यांचे ते सदस्य होते. १९७६ साली त्यांना ‘नोबेल’ पारितोषिकाच्या तोडीचे ‘जे. पॉल गेट्टी’ पारितोषिक लाभले. त्याशिवाय त्यांना १९५८ साली ‘पद्मभूषण’ आणि १९७६ साली ‘पद्मविभूषण’ हे भारत सरकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९६७ साली ‘ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन’चे ‘सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. डच सरकारने ‘कमांडर ऑफ द नेदरलॅण्ड्स ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क’ देऊन गौरवान्वित केले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९८२ साली ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप इन ऑर्निथॉलॉजी’साठी त्यांची भारत सरकारने निवड केली. तीन मानद डॉक्टरेट मिळालेले डॉ. सलिम अली १९८५ साली राज्यसभेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले. १९८७ साली त्यांना निसर्ग आणि वन्यप्राणी यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल ‘दादाभाई नवरोजी पारितोषिक’ देण्यात आले.

    १९८७ साली, ९१ वर्षांचे असताना, प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने मृत्यूने गाठेपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले.

संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट