कृषीशास्त्रज्ञ
24 नोव्हेंबर 1936
15 जानेवारी 2018
यशवंत लक्ष्मण नेने यांचा जन्म मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शालेय आणि बीएस्सी (अॅग्रिकल्चर) पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. १९५७ साली त्यांनी आग्रा विद्यापीठातून एमएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी १९६० साली पीएचडी मिळवली. त्यांचा संशोधनाचा विषय ‘वानसविकृतिविज्ञान आणि विषविज्ञान’ हा होता. वानसविकृतिविज्ञान म्हणजे पिकांवरील रोगनियंत्रणाचे विज्ञान. पीएचडी झाल्यावर त्यांनी चौदा वर्षे उत्तर प्रदेशातील पंतनगर विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांपैकी शेवटची पाच वर्षे ते विद्यापीठाच्या वानसविकृतिविज्ञान विभागाचे प्रमुख होते.
१९७४ साली आंध्रप्रदेशातील पाटनचेरू येथील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेत (इक्रिसॅट) ‘वानसविकृतिविज्ञान’ विभागाच्या प्राचार्य पदावर त्यांची निवड झाली. १९८० साली डाळीमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्प विभागाची सूत्रेही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याच संस्थेत त्यांनी १९८६ ते १९८९ या काळात द्विदल धान्यविभागाचे संचालक, तर १९८९ ते १९९६ या काळात उपमहासंचालक म्हणून काम केले.
डाळींमध्ये सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. त्या काळात डॉ.नेने यांनी त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांच्या मदतीने ‘म्लान’ या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जाती विकसित केल्या. याकरिता डाळीचे सुधारित बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. याचा परिणाम म्हणून हेक्टरी ३७५ कि.ग्रॅ. उत्पादना ऐवजी १००० कि.ग्रॅ. उत्पादन मिळवता आले. त्यावर पडणाऱ्या ‘म्लान’ आणि ‘वोझोटी’ रोगांवर मात करण्यात यश मिळविले. याकरिता कमी उंचीच्या नवीन जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून, एकाच झाडापासून वर्षात दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली आणि परिणामी, हेक्टरी २००० कि.ग्रॅ. पर्यंत पीक घेता आले, जे पूर्वी हेक्टरी ६०० कि.ग्रॅ. होते. त्यापुढेही प्रगती साधताना संकरित तुरीच्या जाती विकसित केल्या; तद्वतच खूप पाऊस पडल्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ न देता, त्यावर तोडगा काढला. पीक उंच ओळीवर लावायचे आणि बाजूला खाच ठेवायची अशा पद्धतीने जास्तीचे पाणी जमिनीत मुरायची सोय करून दिली. त्यामुळे पिकांना होणारा जास्त पाण्याचा त्रास टाळला गेला.
त्यांना तांदळावरील खैरा रोगावर केलेल्या संशोधनाबद्दल १९६७ साली फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा पुरस्कार मिळाला. तसेच, ‘गव्हावरील रोगाचे निदान’ या कामाबद्दल १९७१ साली त्यांना ‘डॉ. नॉर्मन बोरलॉग’ आणि ‘डॉ. आर.जी. अँडरसन पारितोषिक’ मिळाले. वनस्पतींच्या रोगनिदानातील त्यांच्या संशोधनासाठी ‘जीरसानिधी पारितोषिक’ मिळाले. या क्षेत्रात हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान समजला जातो. नंतर त्यांना ओमप्रकाश भसीन पुरस्कार मिळाला.
डॉ. नेने यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार, वक्ते, परिसंवादाचे अध्यक्ष आणि ‘द्विदल शेंगांवरील रोग’ या विषयावरील लेखक, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्विरीत्या पार पाडल्या. वानसविकृतिविज्ञान आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सभासद असून अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. भारतीय वैज्ञानिक संघटनेमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे कार्यकारिणी सभासद व संचालक मंडळाचे सदस्य, भारतीय केंद्रीय कीटक संशोधन समितीचे सभासद, ‘बुरशी नियंत्रण’ या विषयावरील शिबिराचे संचालक, अशा प्रकारे त्यांनी निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळेच १९८० साली त्यांना भारतीय वानसविकृतिविज्ञान संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळाले, तर १९८५ व १९८६ साली त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.
असे विविध संस्थांचे काम सांभाळत असताना, डॉ.नेने यांचे संशोधनकार्यही सुरूच होते. त्यावर त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. त्यांचे एक स्वतंत्र पुस्तक असून त्यांनी दोन पुस्तके संपादित केली आहेत. त्यांचे ८४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध वैज्ञानिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. १९९१ साली जुन्नर येथे भरलेल्या चोविसाव्या मराठी विज्ञान संमेलनाचे डॉ.नेने हे अध्यक्ष होते. डॉ.नेने १९९६ साली इक्रिसॅट मधून निवृत्त झाले.
१५ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.
संकलन- डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ – इंटरनेट