+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


26 सप्टेंबर 1918.
25 मे 1999.

रसायनशास्त्राचे नामवंत शिक्षक आणि संशोधक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) १९६६ ते १९७८ या कालखंडातील संचालक – बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा या गावी 26 सप्टेंबर 1918 रोजी झाला.

त्यांचे वडील दत्तात्रय टिळक हे जळगावमधील खानदेश मिल्समध्ये एक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक जाणकार तंत्रज्ञ म्हणून ते परिचित होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे १९३३ साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून १९३७ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीमध्ये, प्रथम क्रमांक मिळवून प्राप्त केली.

त्या काळामध्ये वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणारे विविध रंग आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये नित्य लागणारी रसायने आपल्या देशात तयार होऊ लागलेली होती. तथापि दर्जेदार प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळत नसत. हे लक्षात घेऊन टिळक यांनी मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये प्रवेश घेतला. १९३९ साली बी.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी मिळवल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठ-डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.यू.डी.सी.टी.) मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करायचे ठरवले. तेथे प्रा. के. व्यंकटरामन हे अत्यंत नावाजलेले प्रोफेसर औद्योगिक रसायनशास्त्रातील दर्जेदार संशोधन करीत असत. त्यांचे मार्गदर्शन टिळकांना मिळाले.

१९४३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. सेंद्रिय रसायनशास्त्रामध्येच अजूनही सखोल संशोधन करण्याची टिळकांची इच्छा होती. यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले. प्रयोगशाळेत विविध संरचना असलेल्या सेंद्रिय रसायनांची जडणघडण करण्यात प्रा. रॉबिन्सन यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते. त्यांना आधुनिक सेंद्रिय रसायनशास्त्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये १९४४ ते १९४६ या कालावधीत संशोधन केल्यानंतर डॉ.टिळक यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४६ साली टिळकांना डी.फिल. ही पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केले.

     इंग्लंडमध्ये संशोधन केल्यावर डॉ. टिळक मुंबईच्या ‘बी.यू.डी.सी.टी.’मध्ये अध्यापन आणि संशोधन करू लागले. स्टिरॉइडवर्गीय रंगाच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली. हेटेरोसायक्लिक (विषमचक्रीय) संयुगांचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेन्ड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ या शीर्षकाचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी, त्यांचे सहकारी संशोधक डॉ.आर.बी. मित्रा यांच्याबरोबर लिहिले. गंधकाशी संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला ‘टिळक प्रक्रिया’ (टिळक रिअ‍ॅक्शन) असे नाव आहे. कृषी उद्योगामध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने गरजेचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. टिळकांनी कीटकनाशकांसंबंधी संशोधन सुरू केले.

१९६० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांना प्रा. रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड यांच्याबरोबर सेंद्रिय रसायनशास्त्रातील क्लिष्ट संरचना असलेल्या संयुगांचे संशोधन करण्याची संधी मिळाली.

१९६०-१९६१ साली त्यांनी प्रा. वुडवर्ड यांच्या प्रयोगशाळेत हेटेरोसायक्लिक कार्बन संयुगांवर संशोधन केले होते. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट वुडवर्ड हे दोघेही रसायनशास्त्रातील नोबेल मानकरी होते. प्रा. रॉबिन्सन यांनी जीवशास्त्रामध्ये विशेष क्रियाशील असणाऱ्या अल्कोलॉइडवर्गीय रसायनांचे संशोधन केले होते, म्हणून त्यांना १९४७ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रा. वुडवर्ड यांनी प्रयोगशाळेत अनेक सेंद्रिय रसायने घडवलेली होती. त्याबद्दल त्यांना १९६५ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.

डॉ. टिळकांना या दोन्ही निष्णात संशोधकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला. साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ तर झालाच, पण औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञांना रसायननिर्मिती करताना डॉ. टिळकांच्या मार्गदर्शनाची मदत झाली. रसायन उद्योगक्षेत्रातील अनेक उद्योजक, तंत्रज्ञ त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी येऊ लागले. देशातील आणि परदेशातील अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांनी रसायननिर्मितीशी संबंधित अनेक व्याख्याने दिली. वैज्ञानिक संशोधन आणि विकास या संदर्भात अनेक आंतरदेशीय करार होत असतात. त्यासाठी परदेशात जाणाऱ्या पथकांचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते.

      मुंबईच्या बी.यू.डी.सी.टी.मध्ये ‘प्रोफेसर ऑफ डायस्टफ टेक्नॉलॉजी’ या पदावर १९५० ते १९६५ सालापर्यंत डॉ. टिळकांनी अध्यापन आणि संशोधन केले. १९६५ साली त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये संचालकपदाचा स्वीकार केला. त्या काळात रसायननिर्मितीसाठी बहुतांशी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत असे. ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’च्या (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार डॉ. टिळकांनी प्रयोगशाळेच्या वाटचालीचा आराखडा बनवला.

    भारताकडे आवश्यक ती कच्ची रसायने आहेत व आणि आपल्या संशोधक आणि तंत्रज्ञांकडे पुरेशी गुणवत्ता आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रंगोद्योग, जंतुनाशके, कीडनाशके, कृषिक्षेत्रात नित्य लागणारी रसायने यांसंबंधीचे संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नेमून दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि प्रासंगिक अडचणी दूर करण्यासाठी ते संशोधकांसह नियमितपणे बैठका घेत असत. छोट्या आणि मोठ्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी आणि रसायननिर्मिती करतानादेखील त्यांची दूरदृष्टी, अनुभव, बुद्धिमत्ता, तसेच कौशल्यदेखील उपयुक्त ठरले. उपयोजित संशोधन करीत असताना, रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनाकडे डॉ. टिळकांनी विशेष लक्ष दिले होते.

दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे २०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आणि ३५ जणांनी एम.टेक. किंवा एम.फिल.साठीचे प्रबंध लिहिले. त्यांचे अनेक विद्यार्थी रसायनशास्त्रामध्ये लक्षणीय संशोधन करू शकले. विशेषत: औद्योगिक रसायनशास्त्रामधील अनेक विद्यार्थी स्वत:चा उद्योग उभारू शकले.

    डॉ. टिळक यांचा अनुभव आणि व्यासंग लक्षात घेऊन त्यांची ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स’ या रसायननिर्मितीशी संबंधित असलेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी १९६९-१९७६ सालाच्या दरम्यान नेमणूक झाली. तसेच ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’, ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’, ‘इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ अशा कंपन्यांचे एक संचालक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली.

    महाराष्ट्र सरकारने डॉ. टिळक यांना ‘विज्ञान-तंत्रज्ञान विभागा’चे मानद सल्लागार म्हणून १९८१ साली आमंत्रित केले. भारत सरकारच्या ‘नॅशनल टॅलन्ट अँड टेक्नॉलॉजी’च्या संचालकपदी डॉ. टिळकांनी काही काळ कार्य केलेले होते. भारताने रसायननिर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हावे म्हणून डॉ. टिळकांनी विशेष परिश्रम केले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी १९६६ साली स्वीकारले, तेव्हा प्रयोगशाळेच्या संशोधनावर आधारित असलेल्या रसायनांचे औद्योगिक उत्पन्न सुमारे पंधरा लाख रुपये होते. १९७८ साली डॉ. टिळक सेवानिवृत्त झाले, त्या वर्षी तो आकडा ८१ कोटी रुपये एवढा वाढला होता. प्रयोगशाळेतील संशोधन केवळ प्रयोगशाळेतच राहता कामा नये, त्याचा औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग व्हावा, असे त्यांना वाटत असे. नित्य आयात केल्या जाणाऱ्या रसायनांचे भारतामध्येच उत्पादन व्हावे, म्हणून त्यांनी आयात-पर्यायी रसायनांचे संशोधन हाती घेतले होते. त्या काळामध्ये भारतात परकीय चलनाची खूप कमतरता होती. त्याची बचत होण्याकडे त्याचा उपयोग झाला.

    सेवानिवृत्तीनंतरही डॉ. टिळक सतत कार्यमग्न राहिले. त्यांनी ग्रामोद्धाराचे कार्य हाती घेतले. भारतीय पारंपरिक ज्ञान, अनुभव यांचा उपयोग कसा करता येईल, यासंबंधी विचार केला.

जैवविविधतेचे संरक्षण, महिलांचे सबलीकरण, पशुपालन, आहार, आरोग्य, स्वच्छता, ग्रमोद्योग आदी विषयांशी संबंधित अनेक योजना किंवा प्रकल्प त्यांनी सुरू केले. खेड्यांमधील भारतीय नागरिकांची आर्थिक उन्नती त्यामुळे होऊ शकेल हे डॉ. टिळकांनी ओळखले. ऊती संवर्धन तंत्र वापरून दुर्मीळ वृक्षांची लागवड आणि वनौषधींचे आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कर्करोगरोधक वनस्पतींचाही अभ्यास केला.

ग्रमोद्धार करण्यासाठी त्यांनी ‘सेंटर फॉर अ‍ॅप्लिकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (सी.ए.एस.टी.एफ.ओ.आर.डी.-कॅस्टफोर्ड) ही संस्था स्थापन केली. त्यामुळे अनेक छोटेमोठे प्रकल्प त्यांना पार पाडता आले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या संस्थेतर्फे ‘फोरम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ (एफ.ओ.एस.टी.इ.आर.ई.डी.-फॉस्टेरॅड) हा कक्ष त्यांनी सुरू केला. कृषी मालाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने काही यशस्वी प्रयत्न त्यांना त्यामुळे करता आले. विशिष्ट रसायनांचा सूक्ष्म तवंग जर एखाद्या छोट्यामोठ्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पसरवता आला, तर पाण्याचे बाष्पीभवन काही प्रमाणात थोपवता येते. बरेचसे पाणी जमिनीत जिरते. हे लक्षात घेऊन, याचे संशोधनही डॉ. टिळकांनी दीर्घकाळ केले.

डॉ. टिळकांच्या कार्याला राजमान्यता आणि जनमान्यताही वेळोवेळी मिळत गेली. भारतातील वैज्ञानिकांना मिळणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ हा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेतर्फे देण्यात येणारा सन्मान डॉ. टिळकांना १९६३ साली मिळाला.
भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे, आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे ते मानद सदस्य झाले. के.जी. नाईक सुवर्णपदक (१९५९), बॅनर्जी सुवर्णपदक (१९६०) या सन्मानाचेदेखील ते मानकरी झाले. डॉ. टिळक औद्योगिक रसायनशास्त्राचे मान्यवर संशोधक होते. प्रयोगशाळेतील ज्ञान-विज्ञान आणि अनुभव यांद्वारे ग्रमीण विकास साधण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.

हृदयविकारामुळे त्यांचे 25 मे 1999 रोजी निधन झाले.

संकलन – डॉक्टर बाहुबली लिंबाळकर

संदर्भ – इंटरनेट