+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


दिनांक 18 ऑगस्ट २०२५

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ॲट्रीयम सभागृहामध्ये प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांचे मार्फत परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आलेल्या सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा श्री राजकुमार चोरडिया, कार्यकारी विश्वस्त प्रवीण मसालेवाले ट्रस्ट ,अध्यक्ष म्हणून प्रा डॉ इंद्रमणी कुलगुरू वनामकृवि तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रश्मी खांडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , डॉ भगवान आसेवार अधिष्ठाता वनामकृवि, श्री भानुदास कवडे माजी तंत्रज्ञ इस्त्रो इ मान्यवर उपस्थित होते .
सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम असून ट्रस्ट मार्फत बसचे रूपांतर प्रयोगशाळेत करून सदर बस ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आली आहे. या बस मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र शी निगडित प्रयोगासाठी लागणारे साहित्य व उपकरणे इत्यादी सह सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे .सदर बसद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवण्यात येणार आहेत .याकरिता सोसायटी मार्फत विज्ञान संवादकाची नेमणूक करण्यात आली असून ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवणार आहेत .
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर यांनी हा प्रकल्प अतिशय नाविण्यपूर्ण असून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . श्री कवडे यांनी या प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण होईल असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री राजकुमार चोरडीया यांनी मानव विकास निर्देशांकात मागे असलेला परभणी जिल्हा या करिता विचारपूर्वक निवडला असून समान विचाराने व निस्वार्थी भावनेने कार्यरत परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी सोबत संयुक्तपणे हा उपक्रम राबवत असलेबाबत समाधान व्यक्त केले . या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करायला मिळणार असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारा आहे असे प्रतिपादन केले . अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा डॉ इंद्रमणी यांनी श्री चोरडीया यांच्या दातृत्वाचा भावपूर्ण शब्दात उल्लेख करून ते धर्मशास्त्रा प्रमाणे कार्य करत असल्याचे व या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी मा चोरडीया सरांच्या दातृत्व वृत्तीचा सन्मानपूर्वक उल्लेख करून या उपक्रमाची माहिती सर्वांना दिली व सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून विज्ञान शिक्षक, पालक , नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन लोहट यांनी केले . आभार प्रदर्शन सोसाटीचे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी केले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली व मान्यवरांचे हस्ते बस ला हिरवा झेंडा दाखवून सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा चे लोकार्पण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲस्ट्रॉनॉमीकल सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .