
जन्म १५४८
मृत्यु- १७ फेब्रुवारी १६००
ब्रूनोचा आज शहीद दिन.
धर्माने विज्ञान जाळून टाकले, तो हा दिवस.
जियोर्दानो ब्रूनो १६ व्या शतकातील प्रसिद्ध दार्शनिक, खगोलशास्त्री, गणितज्ञ आणि कवी होता. त्याने ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या खगोल वैज्ञानिक निकोलस कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन केले. त्यावेळी संपूर्ण युरोप हा धर्माच्या बाबतीत आंधळा झाला होता.
‘ब्रह्माण्डाचे केंद्र पृथ्वी नसून, सूर्य आहे’; या कोपरनिकसच्या विचारांचे समर्थन करताना ब्रूनो म्हणाला, –
— ‘आकाश आपल्याला जेवढे दिसते, तेवढे नाही. ते अनंत आहे. त्याच्यात असंख्य विश्वे आहेत.’
— ‘या ब्रह्मांडात अगणित ब्रह्मांडे आहेत. ब्रह्मांड अनंत आणि अथांग आहे.’
— ‘आपला जसा परिवार असतो तसा प्रत्येक ताऱ्याचा आपला एक परिवार आहे. सूर्या प्रमाणे प्रत्येक तारा आपल्या परिवाराचा केंद्र आहे.’
— ‘फक्त पृथ्वीच नाही तर सूर्यसुद्धा आपल्या अक्षाभोवती फिरत आहे.’
जियोर्दानो ब्रूनो हा *निर्भीड आणि क्रांतिकारी विचारांचा* होता.
क्रांतिकारी अशा अर्थाने की, त्याचे विचार चर्चला मान्य नव्हते. ते बायबलच्या विरुध्द होते. चर्चचे पाद्री धर्माने आंधळे झाले होते. त्यांनी ब्रुनोला विरोध केला. त्याला आठ वर्षे तुरुंगात, एकांतवासात ठेवले. पण ब्रुनो घाबरला नाही. हिम्मत हरला नाही. ब्रूनो धर्मांध पाद्रींना म्हणाला – ‘धर्म तोच आहे,ज्यामध्ये सर्व धर्माचे अनुयायी आपापसात एक-दुसऱ्याच्या धर्माबाबत मोकळेपणी चर्चा करु शकतील.” ब्रुनो तुरुंगातल्या एकांतवासातही ऐकत नाही, हे पाहून स्वत:ला ख्रिश्चन धर्माचे ठेकेदार समजणारे पाद्री चिडले. त्यावेळचे पोप आणि पाद्री यांनी त्याला तुरुंगातून बाहेर काढले. रोम शहराच्या मध्यवर्ती चौकात आणले. त्याला खांबाला बांधले. त्याच्या अंगावर तेल टाकले. आणि पेटवून दिले. त्याच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून जोरजोराने चर्चच्या घंटा वाजवल्या. त्या घंटानादात ब्रुनोच्या किंकाळ्या विरून गेल्या. कोणालाही ऐकू आल्या नाहीत.
पण त्याने सांगितलेले सत्य मात्र नंतर जगाला ऐकावेच लागले. नीच धर्मांधांचा पराभव झाला. पण ब्रुनोला त्यांनी जाळल्यानंतर. एक ना एक दिवस जगाला सत्य स्वीकारावेच लागेल यावर ब्रुनोचा विश्वास होता. मरताना त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. उलट आपल्या विचारांशी व निष्कर्षाशी तो ठाम राहिला. हिम्मत हरला नाही. त्याने बिनधास्तपणे मृत्यूला कवटाळले. त्याने मृत्यूला कवटाळेला दिवस होता;—
१७ फेब्रुवारी १६००.
आज त्याचे पुण्यस्मरण.🙏
रोममध्ये ‘Campo de’ Fiori’ या चौकात ब्रुनोला जिवंत जाळण्यात आले. १८८९ पासून त्या चौकात ‘धर्म आणि विज्ञान’ याचा सदसद्विवेक बुध्दीने विचार करणाऱ्या जियोर्दानो ब्रुनोचा पुतळा दिमाखात उभा आहे.
संकलन – डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ – इंटरनेट