नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻
आत्ता आपण पाहणार आहोत लगतच्या काळातील वैज्ञानिक,एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैज्ञानिक………..
भारत देश पारतंत्र्यात होता, पण भारतीय वैज्ञानिकांनी आपली राष्ट्रप्रेम जगभर दाखवून दिले. अत्यंत कठीण परिस्थिती सुद्धा आपला आत्मविश्वास,जिज्ञासा आणि जिद्दीने आपले संशोधनाचे कार्य करून सर्व जगात भारताचे नाव केले. चला तर जाणून घेऊया ह्या सर्व वैज्ञानिकांबद्दल…
भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणाऱ्या स्त्री शास्त्रज्ञ “जानकी अम्मल”
जानकी अम्मल यांचा जन्म 1897 मध्ये केरळ मधील तेलीचेरी येथे झाला.तेलीचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मद्रास येथे गेल्या. तिथे त्यांनी किन मेरी महाविद्यालयामधून वनस्पती शास्त्रज्ञाची बॅचलर्स डिग्री आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यारातून ओनर्स डिग्री प्राप्त केली. परदेशात पूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बेल शिष्यवृत्ती जानकीला मिळाली.1924 मध्ये जानकी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात रुजू झाल्या. त्या ठिकाणी plant cytology चा अभ्यास सुरू केला.
डॉक्टर जानकी अम्मल या अमेरिकेतून वनस्पती शास्त्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. वनस्पती शास्त्रात संशोधन करण्यासाठी त्या पूर्ण जग फिरल्या .मात्र कोईम्बतुर मध्ये त्यांच्या ज्ञानाचा खरा उपयोग झाला. त्यांनी ‘इम्पिरियल शुगरकेन’या संस्थेत संशोधन सुरू केले. भारतीय ऊसाच्या जातीचा सखोल अभ्यास केला.जानकी अंम्मल यांनी कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त आहे हे शोधण्यासाठी अनेक क्रॉस ब्रीड करून पाहिले. त्यामुळेच भारतीय ऊसात गोडवा निर्माण झाला आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी सुधारित जात निर्माण करता आली.म्हणूनच त्यांना भारतीय ऊसाला गोडवा प्राप्त करून देणारी स्त्री शास्त्रज्ञ असे म्हणून सुद्धा संबोधले जाते.
त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतींच्या गुणसूत्रांचा विस्तृत अभ्यास केला. त्यांच्या नावे ‘मॅग्नोलिया कोंबस जानकी अम्मल’हे नाव जपान व चीनमध्ये सापडणाऱ्या गुलाबी फुलांच्या झाडांना देण्यात आले.
1951 मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सूचनेनुसार जानकी भारतात परतल्या. भारत सरकारने त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या पदावर नियुक्त केले. त्यांनी लखनऊ आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डन ची निर्मिती केली.
दुसऱ्यांना आनंद देणारी ज्ञानी ,शास्त्रज्ञ, हुशार विद्यार्थिनी,आई-वडिलांची कर्तुत्वान लेक,भारताचे नाव अजरामर करणारी संशोधिका आयुष्यातील कटू प्रसंगाचे घोट पचवून भारतीय उसाच्या पेरापेरात गोडवा भरणारी ही गोड आम्मा 4 फेब्रुवारी 1984 रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…….
विज्ञान सेनानी
शब्दांकन – सौ.मृणालिनी कुंभारे
संकलन-डॉ. बी.व्ही. लिंबाळकर