+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
परभणीकरांना आज अनुभवता येणार खग्रास चंद्रग्रहण

परभणीकरांना आज अनुभवता येणार खग्रास चंद्रग्रहण

आज ७ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण ही खगोलीय घटना घडणार आहे.
या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे रविवारी रात्री ९ वाजता केले आहे.
यावेळेला टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण आपल्याला पाहता येईल.

आज रविवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री ११-०० ते १२-२३ संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री १२-२३ वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल.

तरी या खगोल निरीक्षणाचा आनंद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.


स्थळ:-
आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
प्रशासकीय बिल्डिंगच्या पाठीमागे, परभणी
संपर्क: 9403061572, 99211 44842, 9405919184, 9028817712

फिरती विज्ञान प्रयोगशाळा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल : श्रीमती नतीशा माथुर

फिरती विज्ञान प्रयोगशाळा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल : श्रीमती नतीशा माथुर

परभणी २८ ऑगस्ट २०२५

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केले.
तालुक्यातील दैठणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती माथुर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उज्वला कच्छवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मुंडे, बाल संशोधक कु.पुजा वायाळ यांची उपस्थिती होती.
कु. पूजा हिने “ संसाधनाची कमतरता नसून विचाराची गरज आहे “ अशी प्रतिक्रिया दिली.
प्रविन मसालेवाला ट्रस्ट पुणे व परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी च्या संयुक्‍त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दैठणा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेची माहिती घेतली. दैठणा जि.प. माध्यमिक शाळेच्या सुसज्य प्रयोग शाळेत फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेतून, विज्ञानसंवादकानी श्रीमती माथुर यांना विविध प्रयोगांचे सादरीकरण करुन दाखवले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे श्रीमती माथुर यांनी कौतुक केले. परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील, सुधीर सोनुनकर, प्रकाश केंद्रेकर, सुभाष जाधव, प्रताप भोसले, डॉ रणजित लाड, अशोक लाड, अमर कच्छवे, रामभाऊ कच्छवे, बाळासाहेब कच्छवे,
उपसरपंच अभय कच्छवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश कच्छवे, दत्तराव कच्छवे, भरत कच्छवे ,मुख्याध्यापक अर्जुन कच्छवे, धनजय कच्छवे, हनुमान कच्छवे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या प्रसंगी ग्रामस्थानी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.

फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस चे लोकर्पण

फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस चे लोकर्पण


दिनांक 18 ऑगस्ट २०२५

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ॲट्रीयम सभागृहामध्ये प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे यांचे मार्फत परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आलेल्या सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा श्री राजकुमार चोरडिया, कार्यकारी विश्वस्त प्रवीण मसालेवाले ट्रस्ट ,अध्यक्ष म्हणून प्रा डॉ इंद्रमणी कुलगुरू वनामकृवि तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रश्मी खांडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , डॉ भगवान आसेवार अधिष्ठाता वनामकृवि, श्री भानुदास कवडे माजी तंत्रज्ञ इस्त्रो इ मान्यवर उपस्थित होते .
सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम असून ट्रस्ट मार्फत बसचे रूपांतर प्रयोगशाळेत करून सदर बस ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आली आहे. या बस मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र शी निगडित प्रयोगासाठी लागणारे साहित्य व उपकरणे इत्यादी सह सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे .सदर बसद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवण्यात येणार आहेत .याकरिता सोसायटी मार्फत विज्ञान संवादकाची नेमणूक करण्यात आली असून ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवणार आहेत .
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर यांनी हा प्रकल्प अतिशय नाविण्यपूर्ण असून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . श्री कवडे यांनी या प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण होईल असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री राजकुमार चोरडीया यांनी मानव विकास निर्देशांकात मागे असलेला परभणी जिल्हा या करिता विचारपूर्वक निवडला असून समान विचाराने व निस्वार्थी भावनेने कार्यरत परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी सोबत संयुक्तपणे हा उपक्रम राबवत असलेबाबत समाधान व्यक्त केले . या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करायला मिळणार असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारा आहे असे प्रतिपादन केले . अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा डॉ इंद्रमणी यांनी श्री चोरडीया यांच्या दातृत्वाचा भावपूर्ण शब्दात उल्लेख करून ते धर्मशास्त्रा प्रमाणे कार्य करत असल्याचे व या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक यांनी मा चोरडीया सरांच्या दातृत्व वृत्तीचा सन्मानपूर्वक उल्लेख करून या उपक्रमाची माहिती सर्वांना दिली व सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून विज्ञान शिक्षक, पालक , नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन लोहट यांनी केले . आभार प्रदर्शन सोसाटीचे उपाध्यक्ष डॉ पी आर पाटील यांनी केले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली व मान्यवरांचे हस्ते बस ला हिरवा झेंडा दाखवून सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा चे लोकार्पण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲस्ट्रॉनॉमीकल सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

जिल्ह्यात ‘फिरती विज्ञान वाहिनी (Science on Wheels)’ उपक्रम; सोमवारी होणार उद्घाटन

फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रयोगांचा अनुभव!

विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘विज्ञान वाहिनी’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेली बस पुणे येथे एका कार्यक्रमात बुधवारी (दि.13) परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरीत करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ प्रताप पाटील उपस्थित होते.

विज्ञान वाहिनी (Science Lab On Wheels) ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्यविकास साधला जाणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला आहे. विकासापासून खूप मागे असलेल्या मुलांना या उपक्रमातून विज्ञानाचे दालन खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला जाणार आहे. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह विज्ञानाचे धडे मिळणार आहेत. एका मोठ्या बसमध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाची साधने ठेवून ही प्रयोगशाळा थेट शाळांपर्यंत पोहोचणार आहे.

प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ही सुविधा उपलब्ध झाली असून, यासाठी प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त मा राजकुमार चोरडिया, विश्वस्त मा प्रदीप चोरडिया, मा विशाल चोरडिया, मा आनंद चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. श्री गिरीश क्षीरसागर व श्री पोपटराव काळे यांच्या समन्वयातून ही फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलातील सभागृहात फिरती प्रयोगशाळा उद्घाटनाचा तथा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ श्री.भानुदास कवडे, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट बोर्डचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री राजकुमार चोरडिया, वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि २१ व्या शतकातील जीवनकौशल्ये विकसित करणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगणे, कोडींग आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देणे, तसेच सहयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.

फिरत्या प्रयोगशाळेची रचना

फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही एक विशेष सुसज्ज बस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक उपकरणे, प्रोग्रामिंग साधने आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध आहे. ही बस थेट शाळांच्या आवारात पोहोचून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देईल. एका वेळी २० विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवेश दिला जातो, आणि तासभराच्या सत्रात त्यांना उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळते. ही बस प्रवीण मसालेवाले ट्रस्ट, हडपसर, पुणेच्या सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी लाभ

 फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सहावी आणि त्यापुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजण्याची व स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उपकरणांचे कार्य आणि वैज्ञानिक तत्त्वे समजतील. यात व्यवहार विज्ञान व नवलाईचे प्रयोग तसेच फिरते तारांगण देखील या बसमध्ये आहे.

याशिवाय, कोडींग आणि प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्यांच्यात तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्यांच्यात सहयोग, नाविन्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करेल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, ज्यांना अशा सुविधा सहसा उपलब्ध नसतात, या उपक्रमामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन विज्ञान संवादक (सायन्स कम्युनिकेटर) नेमले असून त्यात चालकाचा देखील समावेश आहे.

प्रवीण मसाले ट्रस्टच्या सहकार्याने फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम १५ वर्षे चालणार आहे. पहिल्या टप्प्यात काही निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विस्तारित केला जाईल. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत समन्वय साधून प्रत्येक शाळेत बसच्या भेटीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

गेल्या पंधराहून अधिक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी सहजसोपे विज्ञान अनुभवले असून, आज ही मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित कार्यशाळाही संस्थेतर्फे घेण्यात येत आहेत.

या फिरत्या विज्ञान वाहिनीचा , परिसरातील सर्व विद्यार्थी सर्व शाळा यांनी याचा लाभ सर्व लाभार्थी विद्यार्थांना व्हावा या साठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडे सर्व इच्छुकानी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन सोसायटी तर्फे करत आहे.

डॉ. जयंत विष्णू नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक होते. डॉ.नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै१९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. “स्थिर स्थिती सिद्धान्त”
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने ‘व्याख्यानबाजी’ असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..

विज्ञानकथा पुस्तके संपादन
अंतराळातील भस्मासुर
अंतराळातील स्फोट
अभयारण्य
चला जाऊ अवकाश सफरीला
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
अंतराळ आणि विज्ञान
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
विश्वाची रचना
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे
विज्ञानाची गरुडझेप
विज्ञानाचे रचयिते
समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
Seven Wonders Of The Cosmos
सूर्याचा प्रकोप. त्याचबरोबर
आत्मचरित्र
“चार नगरांतले माझे विश्व”याचे पण लिखाण त्यांनी केले….


नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी

२००४ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. याआधी, १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले होते.

१९८१ मध्ये त्यांना इचलकरंजी येथील एफआयई फाउंडेशनने ‘राष्ट्र भूषण’ प्रदान केले होते.

त्यांना २०१० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.

त्यांना भटनागर पुरस्कार , एमपी बिर्ला पुरस्कार आणि सोसायटी अॅस्ट्रोनॉमिक डी फ्रान्स (फ्रेंच अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी) चे प्रिक्स ज्यूल्स जॅन्सेन हे पुरस्कार मिळाले आहेत . ते लंडनच्या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे असोसिएट आणि तीन इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त, नारळीकर हे त्यांच्या पुस्तके, लेख आणि रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे विज्ञानाचे संवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रयत्नांसाठी, त्यांना १९९६ मध्ये युनेस्कोने कलिंग पुरस्काराने सन्मानित केले.

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्ल सागन यांच्या कॉसमॉस: अ पर्सनल व्हॉयेज या टीव्ही शोमध्ये ते वैशिष्ट्यीकृत झाले होते. १९८९ मध्ये, त्यांना केंद्रीय हिंदी संचालनालयाकडून आत्माराम पुरस्कार मिळाला.

त्यांना १९९० मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.

त्यांनी २००९ मध्ये इन्फोसिस पुरस्कारासाठी भौतिक विज्ञान ज्युरीमध्येही काम केले.

२०१४ मध्ये, त्यांना त्यांच्या मराठीतील आत्मचरित्र, चार नागरांतले भूलभुलैया विश्वासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.

   आपले संपूर्ण जीवन खगोलशास्त्र .गणित आणि विज्ञानाला समर्पित करणारे असे आदरणीय जयंत नारळीकर यांनी जगाच्या नकाशावर भारतात चे नाव तेजोमय केले. असा हा तारा दिनांक 20 मे 2025 रोजी आकाशामध्ये सदैव चमकण्यासाठी आपल्या सर्वातून निघून गेला............

संदर्भ - इंटरनेट 
संकलन- डॉ बाहुबली लिंबालकर