अवकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी ग्रहण ही एक घटना आहे. या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे.
सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते.यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उपच्छायेत चंद्र आल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.
28 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होऊन 29 ऑक्टोबरच्या सकाळी 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत हे ग्रहण असेल हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 25 मिनिटांचे असेल आणि मुख्य खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 17 मिनिटांचा असेल या कालावधीत चंद्र पृथ्वीच्या गडदछायत असेल.
29 ऑक्टोबर च्या सकाळी 1 वाजून 05 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीला स्पर्श करेल आणि खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या अगदी काठावरून जात असल्याने सकाळी 1 वाजून 44 मिनिटांनी चंद्राचा फक्त 6% भागच ग्रासला जाईल. त्यामुळे हे ग्रहण आपल्याला खंडग्रास स्वरूपात दिसेल सकाळी 2 वाजून 22 मिनिटांनी चंद्र पूर्णपणे विरळ सावलीत आलेला असेल. त्यानंतर 3 वाजून 56 मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपेल.
अवकाशात होणारी ग्रहणे ही केवळ खगोलीय घटना आहेत. ग्रहणे केवळ ऊन सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा मानने चुकीचे आहे. सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी ग्रहणांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. हे ग्रहण पाहण्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. पूर्व दिशेला क्षितिज असेल अशा मैदानात किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्यांनी, साध्या दुर्बिणीने किंवा बायनोकुलरने देखील आपण ग्रहण पाहू शकतो.
या चंद्रग्रहणाचे निरीक्षण जास्तीत जास्त नागरिक, पालक, शिक्षक व खगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी करावे. असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.