नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
जी पाऊले अथक ध्येयाकडे उत्तुंग हिमनग तोकडा, मां भारतीच्या पुत्रापुढे…….. हे वर्णन ज्यांना लागू पडते त्या भारत मातेच्या सुपुत्राची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.एवरेस्ट ची उंची मोजणारे गणितज्ञ राधानाथ सिकदार……
त्यांचा जन्म, कलकत्ता येथे इसवी सन 1813साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तितुराम सिकदर. त्यांचे शालेय शिक्षण फिरंगी कमल बोस स्कूल आणि हिंदू स्कूल कोलकत्ता येथे झाले.लहानपणापासूनच त्यांना गणित विषयात विशेष रुचि होती. त्रिकोणमिती हा विषय त्यांचा विशेष लाडका! गणितावर त्यांचे लेखही प्रसिध्द होत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुढे ब्रिटिश सरकारनं त्यांना त्रिमितीय समितीत सहभागी करून घेतलं.
भारतीय सर्वेक्षण खात्यात प्रगणक या पदावर ते रूजू झाले तेव्हा ते एकमेव भारतीय तर होतेच, शिवाय त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षं.
त्यांची या क्षेत्रातील गती आणि ज्ञान इतकं थक्क करणारं होतं की देशातच नाही तर विदेशातही त्यांचा हात धरू शकणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. भारतीय सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न असा त्यांचा गौरवानं उल्लेख होऊ लागला. हवामान आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलं. वेधशाळेच्या कार्यपध्दतीत बदल करून हवेच्या दाबाच्या आकड्यांचे शून्य अंश सेल्सिअस तापमानासाठी रूपांतर करण्यासाठी म्हणून गणिती सूत्र शोधलं.
खरंतर एव्हरेस्ट या शिखराला राधानाथांच्या नावानं ओळखलं जाणं जास्त योग्य होतं. तत्कालिन सरकारनं जरी एव्हरेस्ट यांचा सन्मान म्हणून या शिखराला त्यांचं नाव दिलं असलं, तरीही हे श्रेय पूर्णार्थानं राधानाथ यांनाच द्यायला हवं.त्रिमितीय समितीचं काम चालू असण्याचा तो काळ होता, १८५२ मधील. एका सकाळी राधानाथ सिकदर, घाईनं सर ॲण्ड्र्यु वॉ यांच्या ऑफिसमधे आले. त्यांचा चेहरा अत्यानंदानं चमकत होता.
त्यावेळी त्यांनी एका दमात त्यांच्या साहेबाला सांगितलं, “सर मी जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर शोधलं आहे” व्यवसायानं गणितज्ज्ञ असणारे राधानाथ तत्कालिन ब्रिटिशराजमधील सर्वेक्षण खात्यात काम करत होते.
तत्कालिन सरकारनं हिमालयातील शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ यांचा अभ्यासगट नेमला होता. या प्रकल्पाचं नाव होतं, द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे (महा त्रिकोणमितीय सर्वेक्शण). राधानाथ हे या अभ्यास गटात सहभाग असणारे एकमेव भारतीय. सिकदारांनी सूर्य आणि रात्री दिसणारे तारे यांच्या निरीक्षणावर आधारलेली दिवसाच्या सेकंदाच्या अल्पांशापर्यंत अचूक वेळ समुद्रातील अकबोटींना इशारे देऊन कळविण्यासाठी एक संकेत प्रणाली स्थापन केली होती, ती इसवी सन 1853 पासून अमलात आली.
17 मे 1870 मध्ये गोंदालपारा येथे राधानाथ यांचे निधन झाले. अशा या हिमालया एवढ्या उत्तुंग बुद्धिमत्ता लाभलेल्या व तेवढ्याच मोठ्या मनाच्या गणित तज्ञाला कोटी कोटी नमन…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संकलन -डॉ. बी. व्ही. लिंबाळकर