इंटरनॅशनल सायन्स पार्क परभणी , येथे परभणी अस्त्रोनोमिकल सोसायटी च्या वतीने श्री भानुदास बाबासाहेब कवडे, राहणार पांढरगळा ,तालुका जिंतूर जिल्हा परभणी, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे तांत्रिक सहाय्यक वर्ग दोनच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भानुदास ने आपला प्रवास सांगत असताना ह्या प्रवासात त्याला बऱ्याचशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच घ्यावे लागले घरची हालाखीची परिस्थिती शेतकरी कुटुंब कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा मार्गदर्शक नसताना त्याने जे पुढे आले त्याला आपलंसं करून हा प्रवास पूर्ण केला बऱ्याचदा वडिलांना बाहेरगावी जायचं असेल तर भानुदास ला आपल्या शेतातील दोन बैलांना सांभाळण्यासाठी शेतात जावं लागत असे.
कशीबशी दहावी पास झाल्यानंतर अकरावी मध्ये जिंतूर या ठिकाणी कॉलेजला सायन्स फॅकल्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला तिथे सायन्स ची स्पेलिंग न आल्यामुळे त्याला अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला नाही, पण कोणीतरी पॉलिटेक्निक बद्दल सांगितले, की पॉलिटेक्निक केल्यामुळे कंपनीमध्ये नौकरी मिळेल व आपला प्रपंच चालेल, म्हणून त्याने सेलू येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.
सर्व काही इंग्रजी भाषेत असल्यामुळे प्रथम वर्षात त्याची फक्त गणित या विषयामध्ये तो पास झाला . केमिस्ट्री, फिजिक्स सारखे सर्वच विषय हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे ते विषय पूर्ण बॅक राहिले, मग पहिल्या टर्म चे विषय दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मचे तिसऱ्या टर्म असे करत करत तीन वर्षाचे पॉलिटेक्निक तीन वर्षातच पूर्ण करण्यात भानुदास ला यश मिळाले .
नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळतं आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळून आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले. पण घरच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस इंजिनिअरिंगची फीस भरू न शिकल्यामुळे त्याने आपल्याकडे असलेल्या शेतीवर एज्युकेशन लोन मिळून, संभाजीनगर येथे कॉलेजला प्रवेश मिळवला. त्यावेळेस त्याच्यासोबत चांगलं मार्गदर्शन व चांगल्या कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी हुशार विद्यार्थी होते या सगळ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.
इंजिनिअरिंग झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करून कंपनी जॉब मिळेल.पण कंपनीत जॉब मिळत नव्हता म्हणून एम. टेक. करत असताना स्टाय फंड मिळतो म्हणून त्याने पुणे येथे एम. टेक. ला प्रवेश घेतला .प्रवेश मिळण्यासाठी गेट सारखी परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेसाठी कोचिंग हैदराबाद दिल्ली पुणे मोठ्या शहरामध्येच होते, मग त्याने हैदराबाद येथील एका कोचिंग क्लासेसचे पोस्टल स्टडी मटेरियल मागून घेऊन सेल्फ स्टडी करून ऍडमिशन मिळवले.
पुण्यासारख्या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये मध्ये महिना घालवला व अभ्यास केला त्यानंतर कोविड आल्यामुळे गावी परत यावे लागले. गावी एक वर्ष पूर्णपणे शेतात काम केले आणि एक वर्षानंतर त्याला त्याच्या पीजी चा प्रोजेक्ट व पीजी पूर्ण करण्यासाठी तो परत पुण्याला गेला आणि तेथे पूर्ण अभ्यास करून पी. जी. पूर्ण केले , पीजी चा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा मध्ये लागण्यासाठी स्पर्धा परीक्षा चा पण अभ्यास चालू ठेवला.
2023 मध्ये इस्रो ची जाहिरात आली आणि त्यांची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीत भारतामधून सातव्या क्रमांक घेऊन पास झाला…..
आज व्यवस्थेच्या उणीवेचीच जाणीव, जणू भानुदासाची प्रेरणा बनली आणि भानुदास इस्रो कडे झेपावला………
भारतातील रेडिओ-खगोलशास्त्राच्या विकासाचे श्रेय प्रा. गोविंद स्वरूप यांना जाते. उत्तर प्रदेशातील ठाकुरद्वार येथे जन्मलेल्या गोविंद स्वरूप यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण अलाहाबाद येथून १९५० साली पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी चार वर्षे दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत, दोन वर्षे ऑस्ट्रेलियातील ‘राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि संशोधन संघटने’त आणि एक वर्ष अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधनात्मक कार्य केले. त्यानंतर १९६१ साली त्यांनी अमेरिकेतील स्टॅन्फर्ड विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली.
स्टॅन्फर्ड विद्यापीठातील आणखी दोन वर्षांच्या कार्यानंतर ते १९६३ साली भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. तेथे नवनिर्मित रेडिओ-खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले. १९८९ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेने पुणे येथे रेडिओ खगोल भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स’ (एन.सी.आर.ए.) हे केंद्र स्थापन केले. प्रा.स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच आली. १९९४ साली या केंद्राच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतरही प्रा.स्वरूप यांची याच केंद्रात ‘प्रोफेसर एमेरिटस’ या पदावर विशेष नियुक्ती केली गेली. या पदावर ते १९९९ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’तर्फेसुद्धा त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना ‘सन्माननीय शास्त्रज्ञ’ हे विशेष पद देण्यात आले.
गोविंद स्वरूप यांचे संशोधन हे सुरुवातीस सौरविषयक रेडिओ खगोलशास्त्राशी संबंधित होते. या संशोधनात त्यांनी सूर्यावर घडणाऱ्या सौरज्वालांसारख्या विविध घटनांशी निगडित असलेल्या, तसेच सौरबिंबावरील विविध भागांतून होणाऱ्या रेडिओलहरींच्या वर्णपटाचा मागोवा घेतला. प्रा.गोविंद स्वरूपांचा पीएच.डी.चा प्रबंध सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या सूक्ष्मलहरींच्या अँटेनाद्वारे केलेल्या दिशानुरूप निरीक्षणांवर आधारित होता. प्रा. स्वरूप यांनी सौरप्रभेतून होणाऱ्या रेडिओलहरींच्या ‘यू’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट उत्सर्जनाचा शोध लावलेला आहे. सौरप्रभेतील चुंबकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या या उत्सर्जनाचे निरीक्षण सौरप्रभेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते.
सौरसंशोधनाबरोबरच कालांतराने डॉ.स्वरूप यांनी स्पंदके (पल्सार्स), किंतारे (क्वेसार्स), दीर्घिकांची केंद्रस्थाने यांसारख्या इतरही अनेक प्रकारच्या रेडिओस्रोतांचा आपल्या संशोधनक्षेत्रात समावेश केला. वेगवेगळ्या भागात विभागलेल्या एकाच रेडिओदीर्घिकेतील दोन भागांचा एकमेकांशी असलेला संबंध त्यांनी रेडिओलहरींच्या निरीक्षणाद्वारे प्रथमच दाखवून दिला. रेडिओदीर्घिकांचा प्रा. स्वरूप यांनी निदर्शनास आणून दिलेला हा गुणधर्म आता सर्वमान्य झाला आहे. प्रा. स्वरूप यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध आणि वैज्ञानिक लेख प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विसाहून अधिक आहे.
प्रा. स्वरूप यांनी रेडिओलहरींचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी साधनेही आपल्या संशोधनाद्वारे विकसित केली असून त्याचा उपयोग जगातल्या अनेक देशांतील वेधशाळांतून केला जातो. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतल्या आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी मुंबईजवळील कल्याण येथे, सौरसंशोधनाला उपयुक्त ठरणारे व्यतिकरणमापी (इंटरफेरोमीटर) साधन उभारले. प्रा.स्वरूप यांनी विकसित केलेल्या दोन साधनांना एकस्वाचा अधिकारही मिळाला आहे. रेडिओखगोलशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी आपल्या देशात रेडिओ दुर्बिणी असण्याची गरज ओळखून प्रा.स्वरूप यांनी त्या दृष्टीने तामीळनाडूमधील उटी आणि महाराष्ट्रातल्या नारायणगाव जवळच्या खोडाद येथे वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रचंड रेडिओ दुर्बिणींची उभारणी केली.
उटी येथे उभारलेली रेडिओ दुर्बीण ही अन्वस्तीय नळकांड्यांपासून तयार केली गेलेली असून ती १९७० साली कार्यान्वित झाली. सुमारे ९२ सें.मी. लांबीच्या रेडिओलहरींचा वेध या दुर्बिणीतून घेतला जातो. विश्वनिर्मितीच्या स्थिर-स्थिती प्रारूपाचे खंडन करणारा पुरावा या दुर्बिणीने स्वतंत्रपणे मिळवला आणि महास्फोट सिद्धान्ताच्या प्रारूपाला बळकटी दिली.
खोडाद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ या प्रचंड दुर्बिणीची उभारणी ही सर्वार्थाने प्रा.स्वरूप यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणता येईल. सहा मीटरपर्यंत लांबीच्या रेडिओलहरींचे निरीक्षण करू शकणारी ही दुर्बीण अंतराळातल्या अतिदूरवरच्या हायड्रोजनच्या विद्युतभाररहित अणूंचा वेध घेऊ शकते. परिणामी या दुर्बिणीद्वारे विश्वाच्या बाल्यावस्थेतील स्थितीसंबंधी संशोधन करणे शक्य झाले आहे. याबरोबरच ही दुर्बीण विविध प्रकारची स्पंदके, दीर्घिका अशा अनेक रेडिओस्रोतांची निरीक्षणे करू शकते. मोठ्या तरंगलांबीच्या रेडिओलहरींची निरीक्षणे करणारी ही जगातली सर्वांत मोठी दुर्बीण ठरली आहे.
प्रा.स्वरूप आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या रेडिओ खगोलशास्त्रावरील समितीचे १९७९ ते १९८२ या काळात अध्यक्ष होते. याच संघटनेने स्थापलेल्या मोठ्या खगोलशास्त्रीय दुर्बिणी व तत्सम सुविधा विकसित करण्यासंबंधीच्या समितीचे ते १९९४ ते २००० या काळात सदस्य होते. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सायन्स या संघटनेच्या विविध प्रकारच्या रेडिओलहरींच्या संशोधनात्मक वापरात सुसूत्रता आणणाऱ्या समितीवरही त्यांनी काम केले आहे.
प्रा. स्वरूप हे विविध सन्मानांनी विभूषित केले गेले आहेत. १९७२ साली ‘पद्मश्री’ आणि १९७३ सालच्या ‘शांतीस्वरूप भटनागर’ पारितोषिकाचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे ‘प्रशांतचंद्र महालनोबीस पदक’ आणि ‘सी.व्ही. रमण पदक’, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ‘मेघनाद साहा पदक’, इंडियन फिजिक्स असोसिएशनचे ‘बिर्ला पारितोषिक’ असे अनेक राष्ट्रीय पुरस्कार दिले गेले आहेत. महाराष्ट्रातल्या मानाच्या फाय फाउंडेशन पुरस्कारानेही ते सन्मानित झाले आहेत.
प्रा. स्वरूप यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांत रशियातील ‘फेडरेशन ऑफ कॉस्मोनॉटिक्स’ या संस्थेचे ‘त्स्कोलावॉस्की पदक’ (१९८७), आंतरराष्ट्रीय रेडिओविज्ञान संघटनेचे ‘जॉन हॉवर्ड डेलिंगर सुवर्णपदक’ (१९९०), इराणचे ‘ख्वारीज्मी’ आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९९) आदींचा समावेश आहे. प्रा. स्वरूप यांची इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे ‘फेलो’ म्हणून १९९१ साली नियुक्ती केली गेली. ‘थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (इटली) या संस्थेकडूनही त्यांची ‘फेलो’ म्हणून नियुक्ती केली गेली. २००७ साली त्यांना ऑस्ट्रेलियातील विविध संस्थांतर्फे ग्रेट रेबेर या आद्य रेडिओ-खगोलतज्ज्ञाच्या स्मरणार्थ देण्यात येणारे पदक देऊन त्यांचा विशेष गौरव केला गेला.
संकलन - डॉ बाहुबली लिंबाळकर
संदर्भ - इंटरनेट