+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com
चार्ल्स डार्विन

चार्ल्स डार्विन

उत्क्रांतिवादाचा जनक

जन्म – १२ फेब्रुवारी, १८०९

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, ‘बळी तो कान पिळी’, ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.

चार्ल्स डार्विन
थॉमस एडिसन

थॉमस एडिसन

वीजेच्या दिव्याचा शोध

जन्मदिन – ११ फेब्रुवारी, इ.स. १८४७

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय “ढ’ आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
एकाधिकार
इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मतनोंदणी मशीनसाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) ९०,६४६
विद्युत दिव्यासाठी अमेरिकन एकाधिकार (पेटंट) २,२३,८९८ (४ नोव्हेंबर, इ.स. १८७९ ला मागणी केली व २७ जानेवारी, इ.स. १८८० रोजी एकाधिकार मिळाला.)

विल्हेम राँटजेन

विल्हेम राँटजेन

स्मृतिदिन – फेबृवारी १० १९२३

जीवन
एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.
संशोधन
सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.
पुरस्कार
क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
फेब्रुवारी १० १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.