होमी नुसेरवानजी सेठना,२४ ऑगस्ट १९२३.
भारतीय अणुवैज्ञानिक व रासायनिक अभियंते. भारताने पोखरण येथे १९७४ मध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा सेठना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. भारताच्या शांततामय अणुऊर्जा कार्यक्रमामधील आणि अणुऊर्जा संयंत्रे (उदा., अणुभट्ट्या) उभारण्याच्या कार्यातील सेठना हे प्रमुख व महत्त्वाचे वैज्ञानिक होते.
होमी नुसेरवानजी सेठना यांचा जन्म मुंबईला एका सधन पारशी कुटुंबात झाला. मेहरबाई व नुसेरवानजी ही त्यांच्या आईवडिलांची नावे होत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. व बी.बी.एस्सी. (टेक) या पदव्या संपादन केल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील ॲन आरबोर येथील मिशिगन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची एम्.एस्सी. पदवी मिळविली (१९४६). त्यानंतर काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये इंपीरियल केमिकल इंडस्ट्री या कंपनीत नोकरी झालेल्या अणुसंशोधन विभागात वैज्ञानिक म्हणून काम करू लागले.
केरळमधील अल्वाये येथे मोनॅझाइट वाळूतून विरल मृत्तिका नावाने ओळखण्यात येणारी धातुरूप मूलद्रव्ये अलग करण्यासाठी थोरियम (धातू) निष्कर्षण संयंत्र उभारण्यात आले. या उभारणीमध्ये सर्व तांत्रिक जबाबदारी सेठना यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तेथे दुर्मिळ (मुंबई) येथे प्लुटोनियम संयंत्र उभारण्याचा निर्णय भारताने घेतला. या संयंत्राचा पूर्ण अभिकल्प (आराखडा) भारतीय वैज्ञानिकांनी तयार केला होता तसेच हे संयंत्र उभारण्याचे सर्व काम भारतीय अभियंत्यांनी केले आणि होमी सेठना यांनी प्रकल्प अभियंता म्हणून या सर्व कामांवर देखरेख ठेवली होती. हा प्रकल्प १९६४ मध्ये सुरू झाला. त्याआधी १९५६–५८ दरम्यान ते कॅनडा–इंडिया रिॲक्टर या ४० मेवॉ. क्षमतेच्या अणुभट्टीचे प्रकल्प व्यवस्थापक होते. बिहारमधील जदुगुडा येथील युरेनियम मिल या संयंत्राची उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येथे तयार होणारे शुद्ध युरेनियम भारतातील अणुभट्ट्यांत इंधन म्हणून वापरतात. १८ मे १९७४रोजी भारतात पोखरण येथे ‘प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा’ ही अणुकेंद्रीय स्फोटाची पहिली शांततामय चाचणी घेतली. या चाचणीमागील मार्गदर्शक प्रेरणा सेठना यांची होती.
होमी भाभांच्या आकस्मिक निधनानंतर सेठना हे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले व १९६६–७२ दरम्यान ते या पदावर होते. अणुऊर्जा विभागाशी निगडित सर्व विषयांवर संशोधन करणाऱ्या या केंद्राची या काळात चांगली भरभराट झाली.
१९७१ मध्ये विक्रम साराभाईंच्या आकस्मिक निधनानंतर अणुऊर्जा विभागाची पूर्ण जबाबदारी सेठनांकडे आली व १९८३ पर्यंत ते या पदावर होते. या काळात भारतातच तयार झालेल्या सहा अणुभट्ट्यांमध्ये वीजनिर्मिती सुरू झाली संरक्षण विभाग यांमध्ये समन्वय साधण्याचे काम सेठना यांनी जबाबदारीने व गोपनीयता बाळगून उत्तम रीतीने केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी या विभागाला सल्ला देऊन मार्गदर्शन केले.
सेठना यांनी अनेक देशी व विदेशी संस्था–संघटनांमध्ये विविध पदांवरही काम केले. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जिनीव्हा येथे ‘अणूचे शांततामय उपयोग’ या विषयावर परिषद घेतली होती व सेठना तिचे अध्यक्ष होते. औद्योगिक अणुऊर्जेसाठी असलेली वैज्ञानिक सल्लागार समिती, इंटरनॅशनल ॲटॉमिक एंजिनिअरिंग एजन्सी, केंद्रीय मंत्रिमंडळाची सायन्स ॲड्व्हायझरी कमिटी इत्यादींचे सेठना सदस्य होते. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, ⇨ इन्स्टिट्यूशन ऑफ एंजिनियर्स (इंडिया), इंडियन सायन्स काँग्रेस (१९७६), महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (१९७६), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल एंजिनियर्स, रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ एंजिनियर्स (स्वीडन), आंध्र व्हॅली सप्लाय कं. लि. वगैरे संस्थांचे सेठना अध्यक्ष होते.
सेठना यांना पुढील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील मानसन्मान मिळाले होते :
पद्मश्री (१९५९), अभियांत्रिकीमधील शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६०),
पद्मभूषण (१९६६),
मिशिगन विद्यापीठाच्या (स्थापना १८१७) दीडशेव्या स्थापना दिनानिमित्तचा पुरस्कार (१९६७),
सर वॉल्टर पुसकी पुरस्कार (१९७१),
कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे सर विल्यम जेम्स मेमोरियल पदक (१९७४),
पद्मविभूषण व सर देवप्रसाद सरबंदीकर सुवर्णपदक (१९७५),
दुर्गाप्रसाद खैतान पदक (१९८३),
विश्व गुर्जरी पुरस्कार (१९८५),
पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८९)
यांशिवाय त्यांना भारतातील बारा विद्यापीठांनी आणि संस्थांनी डी. एस्सी. व डी. लिट्. यांसारख्या सन्माननीय पदव्या दिल्या आहेत. उदा., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डी.एस्सी. (१९७३), मुंबई विद्यापीठाची एल्.एल्.डी. (१९७४), हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाची डॉक्टर इन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई) या संस्थेची डी.एस्सी. इत्यादी.
होमी सेठना यांचे मुंबई येथे ५ सप्टेंबर२०१० निधन झाले.
संकलन – डॉक्टर बाहुबली लिंबाळकार