+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com


जन्म. २५ सप्टेंबर १९२०

सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. धवन यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते.

त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.


धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले. १९५१ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी केली. कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ अशी ओळख असलेल डॉ. सतीश धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधनाची सुरवात केली.

त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली.

श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय. १९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणा-या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवनसरांना भेटले. रोज १ तासप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. सत्रान्ती आराखडा बनवण्याइतके डॉ. कलामांचे मन खंबीर झाले. १९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली.

डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले. १९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता.

धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत. १० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली.

यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली. त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला.

पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला. या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांनी कसे वागावे याचा आदर्श ‘धवनसर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली, डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले.

१९९० मध्ये हैद्राबादमध्ये ‘पक्ष्यांची उड्डाणे’ या विषयावर धवन सरांचे व्याख्यान झाले, त्यावेळी डॉ. कलामांनी त्यांची ओळख करून दिली. ३१ मे १९९२ रोजी, ‘लॉच व्हेइकल प्रोग्राम’वर धवनसरांनी चर्चा आयोजित केली होती. डॉ. कलामांनी इस्रे संचालकांसमोर आपले विचार मांडले. प्रा. धवन यांनी डॉ. कलामांच्या डीआरडीओमध्ये बदलीची घोषण करून सा-यांना धक्का दिला.

१९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय. १९९९ मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांना लाभला. राष्ट्रीय समस्या सा-यांना बरोबर घेऊन वैज्ञानिक मार्गाने सोडवण्याच्या धवनसरांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे डॉ. कलाम यांना त्या क्षणी वाटले. इस्त्रोचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रेचे’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वायपेयी यांनी केला.

डॉ.सतीश धवन यांचे ३ जानेवारी २००२ रोजी निधन झाले.

संदर्भ- संजीववेलणकर पुणे.
संकलन- डॉ बाहुबली लिंबाळकर