भगवान श्रीकृष्ण ,पांडव, कौरव यांचा तो काळ, गर्ग नावाचे एक महान मुनी. त्यांना ताऱ्यांशी गुजगोष्टी करणारा खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. विश्वरूपाचं अद्भुत वर्णन गर्गमुनि श्रीकृष्णाच्या महालात प्रवचनाद्वारे ऐकवत असत. अनेक नवनिर्माण तेजगोलांच ज्ञान, अनेक नक्षत्रांचे रहस्य त्यांना उलगडलेलं होतं. आकाशाच्या या अमर्याद अवकाशात पसरला आहे 27 ताराकापुंजांचा संभार. सतत वेगाने धावणारा आणि सारे आकाश तेजाने भारून टाकणारा. पुढे ते श्रीकृष्णाला कृतिका, रोहिणी, मृग , वर्षा ,पूनरवसु,अरद्रा पुष्य ,आश्लेषा, मघा, फाल्गुनी ,हस्त, चित्रा ,स्वाती ,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्राविषयी सांगत. नक्षत्रांच्या या पसाऱ्यात आपला जीवप्रणेता सूर्य आहे. गर्ग मुनीना तेव्हा जाणवले की नक्षत्र आपलं दैनंदिन, ऋतूंनी विविध रंगी आणि विविध गुणी केलेले जीवन घडवतात, जगण्यासाठी सुखमय करतात. आणि ह्या नक्षत्राच्या ही पलीकडे अमर्याद अतिसुंदर विश्व आहे. हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. खगोलशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ग्रहज्योतिष विज्ञान आणि फलज्योतिष विज्ञान यांचाही त्यांना चांगला अभ्यास होता. या विस्तीर्ण अवकाशात असंख्य ग्रह गोल पसरलेले दिसतात तरी ते विश्वनीयत्याच्या शिस्तीन बद्ध आहेत. त्यांची हालचाल, त्यांच्या कक्षा नियमित आणि निश्चित आहेत. गर्ग नक्षत्रांची संख्या निश्चित करणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांना गर्गसंहितेचा कर्ता मानले जाते. वराहमीहिराची बृहस्थसंहिताही गर्गसंहितेवर आधारित आहे. अथर्व वेदात त्यांच्या नावाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ऋचा आहेत. नक्षत्र संख्या 27 की 28 या वादात गर्ग यांचा भाग असावा. 20 ते 23 व्या तारका पुंजाच्या क्षेत्रात तेजोगोलांची अशी काही गर्दी आहे त्यामुळे नक्षत्र संख्येचा गोंधळ होतो. याच क्षेत्रात पण फार दूरवर असणारे नक्षत्र म्हणजे अभिजीत.
आकाश गणिताच्या सोय नुसार सूर्याच्या नक्षत्र भ्रमणाच्या काळाला 27 नक्षत्रे मानून भागले तर प्रत्येक भागाला बरोबर पूर्णांकात मोडता येईल असा काळ मिळतो. नक्षत्र मालिकात अश्विनी आणि भरणी ला गर्ग मुनी यांनीच स्थान दिले. गर्ग मुनी म्हणत परमेश्वराने आपल्या जीवसृष्टीचा प्रयोग करायला हीच भूमी मान्य केली. कारण या भूमीला अनेक ऋतुंनी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध आकर्षक सृष्टीला वैभव दिले व सजवले. वसंत ऋतुनी जीवनाचा बहरीचा उत्साह पूर्ण आणि निष्पाप प्रारंभ दाखवला, ग्रीष्माने कष्टमय आणि कर्तुत्व पूर्ण तारुण्य दाखवले, वर्षा आणि शरद यांनी कर्तुत्वाने निर्माण केलेली समृद्धीजनक लाभवृष्टी दाखवली आणि हेमंत व शिशिर यांनी समृद्ध सुखकारक अशा जीवनाची परिणिती दाखवली. आणि याच ऋतूंच्या गर्भात वसंताचा उत्साहवर्धक उषःकाल आहे या जाणिवेचे बीज निर्माण केले. यातच आपल्या जीवनाचा जणू परिपाठच दडला आहे. आकाशस्थ ग्रहगोल ,तेजोगोल, तारका समूह हे अत्यंत नियमितपणे मार्गक्रमण करतात. त्यांनी भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांचा अभ्यास करायला प्रारंभ केला. यातूनच त्यांना सूर्याचे नक्षत्र भ्रमण लक्षात आलं. सूर्याच्या विशिष्ट नक्षत्रातील स्थानावरूनच त्यांना उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा कळू लागला. वर्षातले महिने, दिवस, दिवसांचे प्रहर , घटीका हे सारे ज्ञान त्यांना आकाशान दिल. प्रत्येक आकाशात असणाऱ्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो हे अटळ आहे, असे गर्ग मुनी त्यावेळी सांगत……………
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन….
प्रा.भालबा केळकर
संकलन डॉ.बाहुबली लिंबाळकर
9834393018