+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

विक्रम साराभाई

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

स्मृतिदिन – ३० डिसेंबर, १९७१

विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

रखमाबाई सावे

रखमाबाई सावे

 

*जन्मदिन – २२ नोव्हेंबर १८६४*

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स ऑफ एडिंबरा ॲंड ग्लासगो’ (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या. ‘लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ॲंड सर्जन्स’ (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झाले.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)

रखमाबाई सावे

प्रशांत महालनोबिस

भारतीय वैज्ञानिक आणि गणितज्ञ

जन्मदिन – २९ जून १८९३

प्रशांत चंद्र महालनोबिस (२९ जून, इ.स. १८९३ – २८ जून, इ.स. १९७२) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते.

जन्म- २९जून १८८३, कोलकाता,बंगाल,ब्रिटिश भारत

मृत्यू- २८ जून १९७२ कोलकाता,पश्चिम बंगाल, भारत

हे भारतीय शास्त्रज्ञ व संख्याशास्त्रज्ञ होत.

त्यांना भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यासाठी ओळखले जाते.ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले.तसेच औद्योगिक उत्पादन जोरदार वाढ करून बेरोजगारी कमी करण्याचा सरकारच्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी योजना तयार केली.

महालनोबिस यांची प्रसिद्धी ‘महालनोबिस अंतर’ यासाठी आहे जे की, एक संंख्याशास्त्रीय एकक आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली.
आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार त्यांचा जन्मदिवस २९ जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिवस’म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निश्चितीमधे प्रो.महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे तसेच प्रेरणा देणे होय.

पुरस्कार

वेलडॉन मेमोरिअल प्राईज (१९४४)

पद्मविभूषण (१९६८)

प्रशान्त चन्द्र महालनोबिस
रखमाबाई सावे

पुरुषोत्तम तुळपुळे

जन्मदिन – ४ जुन १९२३

पोषणशास्त्रज्ञ

डॉ. पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्री गोपाळ हायस्कूल, पुणे येथे झाले, तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नवरोज वाडिया महाविद्यालय, पुणे येथे घेतले. १९४७ साली ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. झाले. त्याच वर्षी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळून ते पोषण संशोधन प्रयोगशाळा, कुन्नूर (आता राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद) येथे रुजू झाले. त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ. वि. ना. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनसत्त्व ब६ आणि आवश्यक मेदाम्ले यांचे परस्पर संबंध’ या विषयावर संशोधन करून त्यांनी जीवरसायनशास्त्रात १९५१ साली पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनात त्यांनी ‘फ्रेनोडर्मा किंवा बेडकाची कातडी हा त्वचेचा विकार आवश्यक मेदाम्लांच्या कमतरतेमुळे होतो’, हे सिद्ध केले. पीएच.डी.पश्चात संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने फुलब्राइट शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन राष्ट्रीय पोषण संस्थेत अन्न-विष विज्ञानातील संशोधनाला वाहून घेतले.

डॉ. तुळपुळे यांचे मूलभूत शास्त्रीय ज्ञानात आणि कृषीविषयक, तसेच मानवाच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम कवकविष (अफ्लॉटॉक्सीन) या बुरशीच्या विषाबद्दलचे आहे. कृषिउत्पन्न, मुख्यत्वे मका आणि भुईमूग यांचा साठा करताना बाष्प जास्त प्रमाणात राहिले, तर ‘अ‍ॅस्पर्शिलस फ्लॅवस’ या विषारी कवकाची त्यावर वाढ होते व अफ्लॉटॉक्सीन निर्माण होते. त्याच्या प्रतिबंधाकरिता काय उपाय योजावेत हे डॉ. तुळपुळेंच्या संशोधनाने दाखवून दिले. या विषामुळे यकृताचा कर्करोग होतो हे त्यांनी माकडांवर प्रदीर्घ प्रयोग करून दाखवून दिले. राजस्थानात टोळीने राहणाऱ्या जमातीत दिसून येणारे यकृताचे विकार (सिऱ्हॉसिस) अफ्लॉटॉक्सीनमुळे होतात हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.

ते १९७१ साली सहायक निर्देशक आणि अन्न, तसेच औषध विषशास्त्राचे प्रमुख झाले. १९८० साली ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे (जी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) अखत्यारीत आहे) संचालक झाले आणि १९८३ साली निवृत्त झाले. त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनकार्यात डॉ. तुळपुळे यांनी आहार व पोषणशास्त्राच्या विविध क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले असून त्यांचे ऐंशीहून अधिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.

त्यांचे खास संशोधन क्षेत्र अन्नविषविज्ञान होते आणि कवकविषासंबंधीचे संशोधन त्यांनी देशात सुरू केले. त्यांनी ‘कवकविषाचे हिंदुस्थानातील आरोग्याला धोके’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधनाकरिता मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटना, अन्नविषयक संघटना, आहार परिमाणित मध्यवर्ती समिती अशा विविध जागतिक संस्थांमधून डॉ. तुळपुळे यांनी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. तुळपुळे यांनी भारतीय पोषण मंडळात सचिव, खजिनदार आणि नंतर उपाध्यक्ष ही वेगवेगळी पदे सांभाळली. ते १९८१ साली भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. तुळपुळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या कार्याला नवीन दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच संस्थांबरोबर सहकार्याच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या अखत्यारीत त्यांनी सरकारला, तसेच काही आंतरराष्ट्रीय कार्यालयांना सल्ला दिला.
— डॉ. तरला नांदेडकर

पुरुषोत्तम गोपाळ तुळपुळे

शंकर भिसे

एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक

जन्मदिन – २९ एप्रिल १८६७

डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते.

संशोधन आणि आविष्कार
त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ‘ इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड’ नामक मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.

पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.

१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी ‘अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन’ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.

भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.

१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध, भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.

भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे
मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले.
स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र – त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
आज आपण प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.
भिसे मुद्रण यंत्र – हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
मिनिटाला २४०० टाइप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.
डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.
सौर ऊर्जेवर चालणार्‍या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
धुण्यासाठी ‘ रोला ‘ नावाचा रासायनिक पदार्थ.
जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) – या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.
बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.

एडिसन
भिसे हे खर्‍या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. भिसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढावे यासाठी दिलीप प्रभाकर गडकरी व पार्ल्याचे रघुनाथ पी. मेढेकर २०१० सालापासून प्रयत्न करीत आहेत. भिसे यांच्या संशोधन कार्याबाबत सर्व माहिती व पुरावे सादर करूनही त्यांचे पोस्टाचे तिकीट निघू शकले नाही व ही मागणी फेटाळण्यात आली.

कारकीर्द
शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.

गौरव
जागतिक दर्जाच्या ‘हू’ज हू’ या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल१९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.