+91 9028817712 pasindiaoffice@gmail.com

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

स्मृतिदिन – १६ फेब्रुवारी १९५६

साहा, मेघनाद : (६ ऑक्टोबर १८९३–१६ फेब्रुवारी १९५६). भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते.

साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एम्. एस्‌सी. आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी. एस्‌सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१–२३), पलित प्राध्यापक (१९३८–५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२–५६) तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३–३८) होते.

साहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६,०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्‌भारित अणू)म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.

कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही.

मेघनाथ साहा